नवीन लेखन...

बाॅबी ५० वर्षांची झाली

२८ सप्टेंबर २०२३ ला – ” बाॅबी ” – ५० वर्षांची झाली…कोण ही बाॅबी ? – असा प्रश्न आज नवीन पिढीला पडू शकतो कारण आजच्या फास्ट फूडच्या जमान्यात लव्ह वगैरे सगळं एक व्यवहाराचा भाग असल्यासारखं वाटू लागले आहे पण आज जे साठीत आहेत त्यांना निश्चितच असला प्रश्न पडणार नाही कारण बरीच वर्षे बाॅबीने भुरळ घातली होती…

बाॅबी हा सिनेमा….

२८ सप्टेंबर १९७३ ला बाॅबी हा सिनेमा रिलीज झाला होता… देशभरातील कित्येक चित्रपटगृहात ह्या सिनेमाने सिल्व्हर ज्युबीली साजरी केली होती… कलकत्ता येथे तर हा सिनेमा सलग ५२ आठवडे चालला होता… परवा ह्या गोष्टीला ५० वर्षे झाली म्हणून म्हणतेय – Bobby Turned 50 !!….. ह्या निमित्ताने बाॅबीच्या आठवणी बऱ्याच जणांनी लिहील्या… आमचे एक सहकारी आणि मित्र श्री.अभय कुलकर्णी ( प्राध्यापक JNEC ) यांनी ही त्यांची आठवण आवर्जून शेअर केली आहे…. बाॅबी सिनेमाची स्टोरी,गाणी, कलाकार वगैरे संबंधित अनेक किस्से लिहिले गेले… मला वाटतं किस्से कहाण्या तर आहेतच पण त्यापलीकडे जाऊन एका वेगळ्या angle ने देखील ह्या सिनेमाकडे पहायला हवं…

बाॅबी ह्या सिनेमाच्या बाबतीतल्या काही गोष्टी मला प्रेरणादायी वाटल्या म्हणून लिहावं असं मनात आलं त्यामुळे हा सगळा उपद्व्याप…
” प्रेरणादायी ” असं लिहिल्यावर काही जणांच्या भुवया उंचावल्या तर नवल नाही…असो…. मला ४-५ मुद्दे ह्या अनुषंगाने मांडावे वाटतात… (अर्थात हे माझं वैयक्तिक प्रकटीकरण आहे ते प्रत्येकाला पटेलच असं नाही….)

(१) आत्मविश्वास ….
राजकपूरच्या अतिशय दिल के करीब असलेला – ‘ मेरा नाम जोकर ‘ – हा सिनेमा फारसा चालला नाही आणि त्यामुळे त्यांना बरंच आर्थिक नुकसान सोसावे लागले हे सर्वश्रुत आहे.. स्टुडिओ, बंगला ही गहाण ठेवावा लागला असं ही वाचण्यात आलं होतं…
धंद्यात नफा नुकसान होत असते पण काही मंडळी नुकसान झाले की संपून जातात… सुधाकर बोकाडे नावांचा एक निर्माता आठवतो का ?… माधुरी दीक्षित, संजय दत्त, सलमान खान असलेला चित्रपट साजन ह्या चित्रपटाताचा हा निर्माता…

साजन तुफान चालला पण पुढचे चित्रपट चालले नाहीत…खचला आणि पुन्हा आयुष्यात उभा राहू शकला नाही… जुन्या पिढीतील अभिनेता भारतभूषण… हिरो म्हणून अतिशय यशस्वी कारकीर्द सुरू असताना चित्रपट निर्मिती क्षेत्रात उतरले आणि अक्षरशः रस्त्यावर आले होते… शेवटपर्यंत ते चरित्र अभिनेता म्हणून नगण्य भुमिका करत राहिले… फिल्म इंडस्ट्रीत अशी भरपूर उदाहरणे आहेत…
राजकपूरला मानलं पाहिजे की मेरा नाम जोकर चित्रपटाच्या अपयशानंतर ही त्यांनी लगेच बाॅबी सारखा घिसीपिटी स्टोरी असलेला चित्रपट काढण्याचे डेअरिंग केलं…

हे राजकपूरचा स्वतःवर असलेला विश्वास दर्शविते… Self Confidence – आत्मविश्वास असलेली माणसंच असं काही ही करू शकतात हेच ह्यावरून सिद्ध होते… १९४८ ला गांधी हत्येनंतर उसळलेल्या दंगलीत कै. भालजीं पेंढारकर यांचा स्टुडिओ जाळला गेला पण ते डगमगले नाहीत, त्यांनी पुन्हा एकदा नव्याने स्टुडिओ उभारला आणि चित्रनिर्मिती सुरू केली…
चंदुलाल शहा हे ही असंच एक नांव ज्यांनी प्रचंड आर्थिक नुकसान आलं तरी न डगमगता आपला व्यवसाय नव्याने सुरू केला…
फिनिक्स पक्षी असतो ही दंतकथा असली तरी ही राजकपूर, भालजी सारखी माणसं पाहिली की ती खरी वाटू लागते…

(२) जोखीम पत्करण्याची मानसिकता….
धंदा म्हटलं की Risk – जोखीम आली… रिस्क घेतल्याशिवाय यश मिळत नसते… Modern Management मध्ये ही Risk assessment, Risk management पाहीली जाते… आजपासून ५०-५२ वर्षांपूर्वी राजकपूरने हे केलं होतं… नवीन कोवळ्या वयातील हिरो म्हणून आपला १९ वर्षांचा मुलगा चिंटूला घेतलं… गोबऱ्या गोबऱ्या गालाच्या गब्दूल ऋषी कपूरची इमेज मेरा नाम जोकर बघून प्रेक्षकांना अजून ही लक्षात होती आणि त्याला पब्लिक हिरो म्हणून स्वीकारील का हा प्रश्न होता… पण राजकपूर यांनी रिस्क घेतली… तसेच आय.एस.जोहरच्या सिनेमात हिरोईन म्हणून काम करणारी सोनिया सहानी… ती २८-२९ वर्षे वयाची तिला १९ वर्षांच्या पोराची आई म्हणून केस पांढरे करून उभी केली… १४ वर्षे वयाची अभिनयाचा गंध नसलेली हिरोईन डिंपल… आर.के. म्हणजे शंकर जयकिशन पण राजकपूर यांनी नवीन संगीतकार ट्राय करण्याचं ठरवलं – लक्ष्मीकांत प्यारेलाल…. ट्रेड पंडितांच्या भाषेत सांगायचं तर घिसीपिटी स्टोरी घेऊन राजकपूरने बाॅबी बनवला… आणि यशस्वी करून दाखवला… यश पाहिजे तर जोखीम पत्करण्याची तयारी ठेवावी ही नवीन पिढीला शिकवण आहे…

(३) प्रेझेन्टेशन महत्त्वाचे….
बाॅबीची कथा बघून समिक्षक म्हणाले – ” ह्यात नाविन्य असं काहीच नाही… बाटली नविन आहे पण दारू जुनीच आहे..” राजकपूरने स्टोरीला अशी काही ट्रीटमेंट दिली की ही नव्या बाटलीतली जुनी दारू आज ही कित्येक वर्षे आपला अंमल ठेवून आहे …
तुम्ही बघा त्यानंतर आलेले Star Kids उदाहरण द्यायचे तर कुमार गौरव ( लव्ह स्टोरी), संजय दत्त ( राॅकी ), सनी देओल ( बेताब ) यांचं launching देखील Love story नेच झालं…. आज ही तोच ट्रेंड दिसून येतो…. कुठल्याही गोष्टीचे बरेचसे यश तिच्या Presentation वर ही अवलंबून असते हा Management Mantra आहे… ह्याच मंत्राची सत्यता राजकपूरने दाखवून दिली होती…

(४) दोस्तासाठी काही पण…..
आजकाल असं वाचण्यात येते, ऐकण्यात येते की फिल्म इंडस्ट्रीत कोणी कोणाचा दोस्त नसतो मग जवळचा दोस्त तर दूरची गोष्ट झाली… फिल्म इंडस्ट्रीत काय सामान्य व्यवहारात ही सच्चे दोस्त मिळणं कठीणच… दोस्त – दोस्ती ही two way traffic असते…
प्राण साहेबांना बाॅबी सिनेमाच्या वेळी राजकपूरची आर्थिक परिस्थिती चांगली ठाऊक होती म्हणून त्यांनी बाॅबी सिनेमात काम करण्यासाठी मानधन म्हणून फक्त १ रूपया घेतला होता असे म्हणतात… माणसं कमवावी लागतात तेंव्हाच दोस्तीत काही पण – असं म्हणणारी दोस्त मंडळी जोडली जातात… Use and Throw च्या जमान्यात हे शिकण्यासारखं नाही का ???…….

(५) एकलव्याच्या आदर्श….
राजकपूर आणि शंकर जयकिशन हे आर.के. बॅनरचे यशस्वी समिकरण होते… राजकपूर म्हटलं की शंकर जयकिशन आलेच….
बाॅबी सिनेमाच्या वेळी जयकिशन हे हयात नव्हते… शंकर आणि राजकपूर यांची वेव्हलेंग्थ बहुतेक जुळत नसावी… संगीत हा राजकपूरच्या चित्रपटाचा अविभाज्य अंग.. म्हणून संगीत हा विषय आला तेव्हा त्यांनी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना विचारणा केली गेली…
लक्ष्मी – प्यारे हे शंकर- जयकिशन यांना आपले गुरू मानत… ते म्हणाले आमच्या गुरूंचा हक्क असलेला चित्रपट आम्ही करणार नाही… राजकपूरला – आर.के. बॅनरला केवळ मानलेल्या गुरुंसाठी नकार देणं ही काही लहानसहान गोष्ट नव्हती… पण लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी ते केलं… मध्यस्थ व्यक्तीनं सांगितले की हे बघा राजकपूर यांची पहिली पसंती तुम्हाला आहे… तुम्ही जर हा सिनेमा करणार नसाल तर मग आर.डी. बर्मन किंवा कल्याणजी आनंदजी यांचा विचार केला जाईल… शंकर सिंह हा चित्रपट करणार नाहीत ही खात्री झाल्यावरच लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी हा चित्रपट केला… लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी काही गंडा बांधून शंकर जयकिशन यांना गुरू केलं नव्हतं.. पण मनात एक श्रद्धा असते… आपल्या मानलेल्या गुरूप्रती अशी श्रद्धा महाभारतातील योध्दा एकलव्याच्या नंतर अभावानेच आढळते…

जी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी दाखवून दिली… असो…. चित्रपटस्य कथा रम्या !!…. थोडं वेगळं वाटलं म्हणून पाठवलं….

– शरणप्पा नागठाणे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..