नवीन लेखन...

मसनातलं जिनं

भर दुपारची येळ व्हती.वर आभाळातुन सुर्य आग वकत व्हता.उन्हाळ्याचे दिवस आसल्यानं सगळा परिसर भकास दिसत व्हता.रस्त्यानं चिट पाखरूबी नवतं.आश्यात शिवराम मसनजोगी,त्याची बायको शेवंती,पोरगी सारजी आन पोरगं पिर्‍या बाभळगावच्या दिशेनं निंघाले होते. बाभळगावात कोणतरी मेलं व्हतं,मनुन मसन राखायल ते निंघाले व्हते.आज दक्षिनाबी भेटलं आनं मेलेल्या मानसाचे जुने कपडे कुपडेबी भेटतीलं मनुन शिवराम मसनजोगी लगबगीनं निंघाला व्हता.बाभळगाव व शेजारची वाकडेवाडी आश्या दोन गावांत तो मसन राखायच काम करायचा.कव्हा या गावात तं कव्हा त्या गावात आसं सारखं त्यो भटकत राह्याचा.खरं पाह्यलं तं एखांद जिवन संपलं की लोकं मसनात जातात पण मसनजोग्यांचं मात्र जगनचं त्या एखांद्या जिवाच्या शेवटानंतर सुरू व्हायलं लागते.संसाराचं सगळं सामानं तेह्यनं संगच्या रेडकाच्या पाठीवर टाकलं व्हतं.आन लगबगीनं ते अंत्यसंस्काराच्या वढीनं झपझप पावलं टाकु लागले.

मसनाजवळ पव्हचताच शिवराम मडं जाळायसाठी सरण रचायच्या कामालं लागला.तं सारजी,शेवंता अन पिर्‍या पाल ठोकुन तेह्यचं सामान लावाण्यात गुतले.सारजीनं पटकनं पळत जाऊन एका मड्यावरची राख उचलुन आनुन भांडे घासले.तेव्हड्यातं राम नाम सत है चा आवाज यायलं लाडला.तसं शिवराम मसनजोगी सरसावला.त्याच्या हातातली भलीमोठी ‘टनमन’ घंटा ढनंऽऽ ढनंऽऽ वाजवत जोर्‍यातं शंकु फुंकला अन कपडा आथरून स्मशानाबाहेर घंटानाद करीत बसला.समोर एक कपडा आथरलेला व्हता.त्या कपड्यावर एक दोन देवायचे फुटु,आन जवळची साबुत कवटी ठुलेली व्हती.‘माती’ आटोपून लोक बाहीर यालं लागले की,“सोडवण टाका बापू सोडवण… हेच सोबत येणार हाय बापू, हे पुण्याचं काम हाय….सोडवण टाका…असं म्हणून पैसे मांघु लागला.बरेच लोकं त्या कपड्यावर पाच,दहा रुपये टाकु लागले,तं कुणी टाकतबी नावतं.तं मेलेल्या मानसायचे नातलग जे दक्षिना देतील ते तो घेत व्हता.स्मशानात प्रेताग्नी द्यायच्या आंधी शिवरामनं तिथं वाह्यलेले फळं,तांदुळ,मृताचे जुने कापडं गुंडाळुन घेतले.हळुहळु मैतीलं आलेले लोकं पांगलले. तेव्हड्यात जोराचा वारं वावदळ आलं.वावदळीत मसनात ठोकलेलं पाल मोडुन पडलं व्हतं.शिवरामच्या बायकोनं मयतीजवळ ठुलेले तांदुळ शिजवायलं टाकले व्हते‌.वावदळासंग कडुसा पाऊस झाल्यानं तांदळाखालचं सरपण वलबट व्हवून ईझलं व्हतं.संद्याकाळ झाल्यानं शिवरामनं सरणाच्या आडुशालचं रात काढायच ठरवलं व्हतं.सरनावर पतरं आसल्यानं त्यालं तिथं रात काढणं सोईच वाटलं.शिवरामनं त्याच्या बायकोलं गबाळं प्रेताजवळ हालवायलं सांगलं.तिनं बी गबाळं प्रेताच्या कडलं मांडुन प्रेताच्या ईखोरावरच ते भाताच भगुन ठुलं.तिथच जेवनं आटपले.आत्ता स्मशान सुन्न,शांत झालते.आत्ता रातभर ते स्मशान अन मसनजोगी हे दोघचं संगतीलं व्हते.

शिवराम मसनजोग्याच्या आंगावर लाल भडक रंगाचा झब्बा आसायचा.झब्याखालं ढवळाशिपत पैजेमा,डोस्क्यात शंकुसारका पितळी पट्ट्यांनी अन मोर पखायनं सजवलेला टोप,गळ्यात रंगीबेरंगी मण्यांच्या अन कवड्यांच्या माळा तं डोळ्यालं काजळ लावुन,गालायवर जाळलेल्या मड्याची राख फासलेलं आन कपाळभर कुखाच मळवट भरून शिवराम ‘फेरीवर’ निंघायचा.त्याच्या काखत झोळी आसायची.त्या झोळीतल्या एका खान्यात मानसाची कवटी आन शंकु आसायचा.त्याचा ह्यो आवतार पाहुन आम्ही लहान पोर्‍ह सोरं,बाळातीन बाया त्यालं घायबरून जायाचो. मसणजोगी गावात आला रे आला की लहान पोर्‍ह अन बायाबापड्यायची पळापळ व्हयाची, लोकं आसं मनायचे की,मसणजोगी पुरलेल्या बाळातणीचं मडं उकरून तिची कवटी काढून घेतो,तं जित्या बाळातणीची गोमाशी बनवतो,भानामती करतो.मनुन मंग बाळातणी पटापट खिडक्या-दरवाजं बंद करायच्या. दाराम्होरं आलं कि शिवराम मसनजोगी त्याच्या भसाड्या आवाजात हातातली ‘टनमन’ घंटा ढनंऽऽ ढनंऽऽ वाजवत जोर्‍यातं शंकु फुंकुन गानं मनायचा,

“हरऽऽ हरऽऽ शंभोऽऽ
हरऽऽ हरऽऽ महादेवऽऽ….
जय भोलेनाथ ऽऽ……
तुळजापूरची तुळजाभवानी ऽऽ…
आली आई आली फेरी ऽऽ…..
मसणजोग्याची ही फेरी ऽऽ….
फेरी आली दारा म्होरंऽऽ…… धरम कर पित्राच्या नावानं…..
मुक्ती भेटलं स्वरगातं ऽऽ….
पीकपाणी होईल आबादानऽऽ…
कुलदेवी पाठीशी राहीलंऽऽ…..
बोलो हर हर हर महादेव…..”

हे गाणं झालं की मंग पितराचं नावं सांगा मनायचा.आन मंग त्या पित्राच्या नावानं दानधरम आला मनुन गानं गायचा.शिवराम फेरीवर आला कि कोणी भिऊन तं कोणी पितरायल मुक्ती भेटाव मनुन दानधरम करायचे.

गावचा मसनवटा आमच्या वस्तीजवळच व्हता.शिवराम मसनजोगी आमच्या गावात आला की हमखास आमच्या शेत वस्तीजवळच्या मसनवट्यातच पाल ठोकुन राह्याचा.त्याचा आसा फायदा व्हयाचा कि चोरं चिलटं आमच्या तिकडल्या वावराकड़ भितीनं जायाचे नाहीत आन आमच्या रानाची राखनबी व्हयाची.मह्या बाचा आन शिवराम मसनजोग्याचा दोस्ताना व्हता. शिवरामनं कव्हा जंगलातून शिकार करून आणली तर ती आमच्या आखाड्यावरच शिजवायचा बेत आसायचा.मव्हा बा बी त्यालं मरणाची देशी दारू पाजायचा.दारू पिल्यावर तं शिवराम राकेसा सारकाच वाटायचा.आत्ताशानं मही दोस्ती शिवराम मसनजोग्यांचं पोरगं पिर्‍यासंग झालती.त्यो मलं तेह्यच्या जातीचे वेगवेगळे किस्से सांगायचा.त्याच्या जातीत लेकरू झालं कि त्यालं दोन नावं ठुतात मनं.एक नाव बोलायचं आन एक परंपरेनं आलेलं.परंपरेनं नात नातीचं नाव तेह्यच्या आज्या आजीच्या नावानं आसते.त्या नावानं कोणी पुकारायचं नाही,काऊन की पितरायच्या नावान पुकारलं तं पितरायचा अपमान व्हईल आस तेह्यलं वाटायचं.त्याच्या समाजात जातपंचायत भरायची.आंध्र परदेशातल्या आदिलाबादलं मसनजोग्यायची कुलदेवी अडेलामाताचं ठाणं व्हतं. जातीचे तंटे मिटविण्यासाठी तिथं जात पंचायत भरायची.मानवी विष्टा खायालं लावणं,मुताचं मडकं डोस्क्यावर फोडनं,तं कुनालं थुका चाटायलं लावणं आश्या शिक्षा तेथं देल्या जायच्या.मसनजोग्यांत जातीबाहेर लग्नालं परवानगी नाही.तसच लग्नातं दारूबी पिऊन येता येत नाही.

त्यदिशी स्मशानातं लगबग चालु व्हती.पिर्‍याच्या बहीन सारजीच त्यादिशी लगन व्हतं.लग्नालं खर्च नवरदेवाकडल्यायलच करावं लागते मनं.आज सनई चौघड्याचे मंगल सुर मसनात गुंजत व्हते.मलं तं नवलच वाटत व्हतं.मसनात कोणी लगन करते व्हयं…..! नवरा नवरी नटले व्हते.शिवराम मसनजोग्यानं घराभवतालं एका जाळलेल्या प्रेताची राख आनुन त्यानं रिंगन मारलं व्हतं.संद्याकाळी त्या रिंगनाबाहीर कोण बी जायाचं नाही,आसा शिरस्ता व्हता.भुतापसुन वाचायसाठी ते त्या दिसाचं रक्षाकवच व्हतं.लग्नालं जातीतील बरेच मसनजोगी आलते.तेह्यचा आवतार पाहुन तं मलं मसनात आज भुतायची जत्राच भरली का काय आसं वाटु लागलं.लग्नाची गडबड सुरू झाली आन तेव्हड्यातं गावातुन एक प्रेतयात्रा आली.झालं शिवराम मसनजोग्याची धावपळ सुरू झाली.एकीकडं मेलेल्या मानसायचे नातेवाईक उर बडवत रडत स्मशानाकडं आलते.तं दुसरीकडं लगनघाई चालु व्हती.एका जिवनाचा अंत झालता तं दुसरं जिवन फुलण्याच्या मार्गावर आसं विरोधाभासी चित्र मलं तिथं दिसतं व्हतं.सनई चौघडे बंद झाले.शिवरामनं सरण रचलं.रिवाज पार पाडुन ती अंत्ययात्रा आल्यापावली वापस बी गेली. अंत्ययात्रा वापस गेल्यावर ईकडं पुन्हा लगीनघाई जोमात आलती.सरणावरचं ते मडं ढन ढन जळत व्हतं तं तिथुन जवळच दुसरीकडं डुकराछ आन बकर्‍याच मटन शिजत व्हतं..काय विरोधाभास व्हता नं.तिथं हासु बी व्हतं आनं आसुबी व्हते.आसु अन हासुच्या मंधात जिवन संपत बी व्हतं आन आकार बी घेत व्हतं.

पिर्‍या शाळलं जायाचा नाही.शाळा काय आस्ते हे त्यालं कायबी माईत नवतं.त्यालं जंगलातले जनावरं आनं झाड झुडपं यांची मातर तंतोतंत मायीती व्हती.मी तं हापकुनच जायाचो.त्याच्या जवळ एक कमटीचा बाण आन एक गुल्हेर व्हती.लाव्हर्‍या,चित्तोर आशा पाखरायलं तो त्या हात्यारायनं अचुक टिपायचा.मलं त्याच्या नेमबाजीच लय कौतीक वाटायचं.त्यालं म्या बर्‍याचदा ईचारलं बी व्हतं कि बा तुलं शाळतं जावा वाटत नाही का मनुन तं तेच मलं मनायचं कि शाळा काय आसते.काय करायच शिकुन मनुनं.मी तं मह्या बा वाणी मसनजोगीच व्हणारं हे.म्या शाळत गेलो तं आमची ही परंपरा कोण चालवल.मलं तं रानावनात आन मसणातल्या भुतांच्या जगातच रमावं वाटायचं.प्रेतांची राखन करणं हेच आमचं धर्माचं काम हे आसं पिर्‍या मलं नेहमी सांगायचा.पिर्‍यालं बापजाद्यायपसुन नं हक्काचं घर व्हतं नं शेताचा एखांदा तुकडा व्हता.भणंग गरीबी आन अंधश्रद्धेच्या जंजाळातं ते जिनं जित व्हता.एक दिस आसाच पिर्‍या मह्याजवळ पळत आला आन मलं मनु लागला उंद्या तु मसनातं ये.उंद्या मी मसनजोगी व्हणारं हे मुन.पिर्‍याच्या बापान पिर्‍यासाठी पारंपारीक झब्बा शिवला व्हता.एक टोपबी घेतला व्हता.घरातली आजाच्या काळातली कवटी,टनमन घंटा,आन झोळी आशी वडिलोपार्जित संपत्ती पिर्‍यालं भेटणार व्हती.पिर्‍या लयं आनंदात वाटत व्हता.मही दुसर्‍या दिशी शाळा आसल्यानं मलं जानं जमत नवतं तरीबी येळ काढुन मी थोड्या वेळासाठी मसनाकडं गेलतो.तिथं जाऊन पाहतो तं मलं पिर्‍या एका दगडावर बसला व्हता.दोनचार मसनजोगी घागरनं पिर्‍याच्या आंगावर पाणी वतत व्हते.तं एक दोघं हातानं डमरू वाजवत काही मंत्र फिंत्र मनत व्हते.पिर्‍यालं तेह्यनं नवा लाल रंगाचा झब्बा,पयजमा घातला व्हता.डोस्क्यावर टोप घालुन हातातं टनमन घंटा देली.तसं शिर्‍याच्या बापानं जोरर्‍यातं शंखु वाजवला.त्या शंखाचा आवाज आसमंतात दुमदुमतं व्हता.म्या मागच्या पावली शाळकडं पळालो.शाळंत जन गन मण सुरू व्हतं.मी पोरांच्या सुरात सुर मिसळुन जन गन मण मनु लागलो.पण मव्ह मन कशातच लागत नवतं.मह्या डोळ्यापुढं राहुन राहुन सारखा पिर्‍या,त्याचं मसनातलं पाल अन त्याचा पेहराव दिसत व्हता.पोर्‍ह राष्ट्रगीत झाल्यावर भारत माता की जय मनत व्हते.मह्या कानात मात्र शंखुच घुमत व्हता.जोरजोरातं……!!!

©गोडाती बबनराव काळे,हाताळा,हिंगोली
9405807079

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..