जन्मतःच काही मुले खुब्यातील सांधा निखळलेल्या अवस्थेत जन्मतात. याची कारणे अनेक आहेत; परंतु पायाळू जन्मलेल्या मुलांमध्ये असा प्रकार असण्याची शक्यता अधिक असते. मुख्यत्वे उखळ व्यवस्थित तयार न झाल्याने असा प्रकार संभवतो. याचे निदान अनुभवी डॉक्टरच करतात. कारण क्ष-किरणांद्वारे नवजात अर्भकामध्ये याचे निदान करता येत नाही. त्वरित योग्य निदान आणि उपचार सुरू करावे लागतात.
पूर्वी या सांध्याला प्लॅस्टरमध्ये ठेवावे लागे. आता निरनिराळे स्पिण्टस् पट्टेही उपलब्ध आहेत. बरेच महिने योग्य प्रकारे बांधून ठेवल्यास हे सांधे पुन्हा योग्य प्रकारे तयार होऊन सर्वांसारखे होतात. बरेच महिन्यांनी जर उखळीची वाढ व्यवस्थित होत नसेल तर शस्त्रक्रियाही करतात. जन्मानंतर नाळ कापल्यावर येथे जंतूसंसर्ग होऊ शकतो. हे जंतू जर रक्तावाटे खुब्याच्या सांध्यात गेले तर तेथे पू निर्माण होऊन सांधा दुखू लागतो. याचे निदान त्वरित करून हा पू शस्त्रक्रिया करून काढून टाकावा लागतो नाहीतर हा सांधा पूमुळे कायमचा खराब होऊन निखळतो त्यानंतर आयुष्यात याची वाढ खुंटते.
एक पाय दुसऱ्या पायापेक्षा आखूड होतो आणि अनेक प्रकारच्या शस्त्रक्रियांना रुग्णाला सामोरे जावे लागते. एवढे करूनही हा सांधा १०० टक्के पूर्ववत होत नाही. त्यामुळे हाडाच्या डॉक्टरांना नवजात अर्भक ताबडतोब दाखवावे.
त्यांचा सल्ला घ्यावा. अशी जन्मतःच असणारी हाडांची व सांध्यांची दुखणी हाडाचे डॉक्टरच जाणू शकतात. वय वर्षे पाचच्या सुमारास पर्थेज डिसीज अशा रोगाचे निदान होते. फारच थोड्या मुलांना याचा त्रास होतो. यातही खुब्याच्या हाडातील फीमर हाडाच्या गोलाकार डोक्यात रक्तपुरवठा कमी झाल्याने हा सांधा दुखू लागतो. याचेही योग्य निदान लवकर झाल्यास हा सांधा वाचू शकतो; परंतु याचा उपचार मुलगा १८ वर्षांचा होईपर्यंत करावा लागतो. आपल्या देशात लहान मुलांत खुब्याच्या हाडाचा टीबी अनेक 3 कुतूहल विज्ञान जनहिताय’ मराठी विज्ञान परिषद वेळा आढळतो योग्य निदान करून टीबीविरोधी औषधे दिल्यास तो पूर्णपणे बराही होतो. लहानपणात सांधेदुखीचा रोग जडल्यासही हा सांधा खराब होतो. म्हणून सांधेदुखीची त्वरित उपाययोजना करावी. लहानपणी जर खुब्याजवळ अस्थिभंग झाला तर ही हाडे अगदी १०० टक्के व्यवस्थित बसवावी लागतात. नाही तर हाडांच्या वाढीत कमी-जास्त फरक पडून दोन पायांच्या लांबीत फरक पडेल. म्हणून कधी कधी शस्त्रक्रिया करून ही हाडे बसवावी लागतात.
डॉ. सुशील सबनीस
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply