नागीण (हरपीस सिम्लेक्स) हा रोग एच. एस. वन किंवा एच. एस. टू. हरपीस होमोनीस या विषाणूंमुळे होतो. साधारणतः याचा प्रादुर्भाव श्लेश्मल पटल किंवा त्वचा, मध्यवर्ती चेतासंस्था अथवा मधून मधून आंतरंग अवयवांना होऊ शकतो. हे अतिसूक्ष्म विषाणू शरीरात प्रवेश झाल्यावर ते १४ दिवस सुप्तावस्थेत राहतात. या विषाणूंची लागण शरीरातील चेतापेशींना होते. खरचटलेले श्लेश्मल पटल किंवा त्वचा यांच्याशी विषाणूंचा संपर्क आल्यास त्यांचा शरीरातील प्रवेश सुकर होतो.
शरीरात प्रवेश मिळविल्यावर त्वचेच्या स्तरांमध्ये विषाणूंची वृद्धी होऊ लागते. सुप्तावस्थेत असलेले विषाणू जागृत होतात. संवेदनशील चेतासंस्था व स्वायत्तचेता संस्था यावर त्याचा परिणाम होऊ लागतो. हे विषाणू अपकेंद्री पद्धतीने टोकाच्या संवेदी चेतातंतूंवर पसरत जातात व त्याचा संसर्ग दूरवर होत जातो. याशिवाय आसपासच्या त्वचेला त्यातील लस लागली तर हा रोग तेथेही पसरत जातो. सुप्तावस्थेत असलेल्या विषाणूंमुळे रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर बाह्य लक्षणे दिसू लागतात. सुरुवातीस अंगांत कणकण जाणवते, ताप येऊ लागतो, डोळ्यांवर झापड येते, स्नायूंमध्ये कळा येऊ लागतात. तोंडात लागण झाल्यास खाताना त्रास होतो. चिडचिड होऊ लागते, मानेच्या गाठी सुजू लागतात. काही वेळा टाळू, हिरड्या, जीभ, ओठ किंवा चेहऱ्याच्या काही भागांवर पाण्यासारखे फोड येतात. त्याचे व्रणामध्ये रुपांतर होऊ शकते. अशा वेळी इतर जिवाणूंमुळे झालेल्या जखमांपेक्षा हे चित्र वेगळे नसते.
म्हणून नागीणीची लक्षणे व्यवस्थित पारखून बघावी लागतात. ट्रायजेमीनल गंडिकाला (गँगलिऑन) लागण झाल्यास ज्या भागाला तेथून निघणाऱ्या चेता संवेदना पुरवितात त्या चेहऱ्याच्या भागावर दुखू लागते आग होते व जोराने कळा येऊ लागतात. हे विषाणू लाळेतूनसुद्धा रोग पसरवतात. ओठांच्या कडा व बाजूच्या चेहऱ्याचा भाग यावर पुरळ ऊठू लागते. क्वचित प्रसंगी दात काढण्याच्या प्रक्रियेनंतर हा संसर्ग तोंडात झालेला आढळतो.
-डॉ. विनोदिनी प्रधान
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply