तरुण मुलं जेव्हा खूप खेळ खेळू लागतात तेव्हा आपल्या दोन्ही खांद्यांची भरपूर हालचाल करू लागतात. कोणताही खेळ असो- क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस तसेच कबड्डी, व्हॉलीबॉल, जिम्नॅस्टिक्स, वजन उचलणे, थ्रो बॉल या सर्वच खेळात खांद्यावर फारच ताण पडतो. उलट्या-सुलट्या उड्या -मारणे, हातावर जोर देऊन काम करणे यात खांद्याला इजा होऊ शकते. खांद्याच्या हाडाला जरी फ्रॅक्टर झाले नाही तरी खांद्याच्या सभोवती असलेल्या खांदा वळविणाऱ्या स्नायूंना इजा होणे, खांद्याच्या आत असलेल्या कास्थिला इजा होणे हे खांद्याची वेगवान हालचाल करणाऱ्या खेळात होऊ शकते. उदा. क्रिकेट, टेनिस, जिम्नॅस्टिक्स इ. यातच कधीकधी खांदा सटकणे, पर्यायाने वारंवार सटकण्याचा प्रकार होऊ शकतो. यामुळे खेळाडूला आपली क्षमता कमी वाटू लागते. त्याच्या खेळातील कौशल्यावर परिणाम होतो. हळूहळू ‘जखमी’ म्हणून त्याला टीममधून बाहेर काढले जाते.
हा मोठा मानसिक आघात त्याच्या मनावर होतो. ऐन हुरुपाच्या काळात हे झाल्याने त्याची प्रगती धोक्यात येते. आता मात्र नवनवीन तपासामुळे या सर्व खांद्याच्या आतील भागातील इजा लवकर लक्षात येऊ लागल्यात व त्यामुळे हाडांचे डॉक्टर योग्य अशी उपाययोजनाही करू लागलेत. म्हणून खेळाडूही लवकर बरे होऊन पुन्हा आपला खेळ जोमाने खेळू लागले आहेत.
यात सोनोग्राफी, टफ्क्क तसेच दुर्बिणीतून चिकित्सा या महत्त्वाच्या आहेत. साध्या क्ष-किरण तपासणीत या इजा दृष्टोत्पत्तीस येत नाहीत. खांदा वळविणारे स्नायू फाटणे, सांध्यातील कास्थि तुटणे किंवा हाडाच्या किंवा बायसेप्सच्या स्नायूला असलेल्या बांधणीत भंग घडून येणे, या गोष्टी चेंडू फेकणाऱ्या, वजन उचलणाऱ्या किंवा जिम्नॅस्टिक्स खेळाडूत होऊ शकते.
अशा वेळी योग्य चिकित्सा करणाऱ्या करून हल्ली दुर्बिणीतून किंवा जरूर पडल्यास सांधा उघडून त्यावर शस्त्रक्रिया करतात. आपल्या देशात मुंबई, दिल्लीसारख्या मोठ्या शहरात आता असे निपुण डॉक्टर आहेत. म्हणूनच शाहरूख खान याने आपल्या खांद्याची शस्त्रक्रिया मुंबईत करून घेतली.
-डॉ. सुशील सबनीस
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply