पौष पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असे नांव. शाकंभरी नावाच्या देवीचा उत्सव पौष शुक्ल अष्टमी पासून पौर्णिमेपर्यंत केला जातो. या उत्सवाची समाप्ती पौर्णिमेला होते म्हणून या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असे म्हणतात. शाकंभरी देवीला बनशंकरी असेही नांव आहे. हिची उत्पत्ती कथा – एकदा फार मोठा दुष्काळ पडला. लोक अन्नपाण्याविना उपाशी राहू लागले. बळी जाऊ लागले. देवीला करूणा आली. तिने आपल्या अंगातून शाकभाज्या निर्माण केल्या त्यामुळे हिला शाकंभरी हा नांव पडले.
दुसरी कथा अशी आहे, दुष्काळ पडल्यावर ऋषीमुनींनी देवीची उपासना केली. त्यामुळे पाऊस पडला. आणि प्रथम शाक म्हणजे भाज्या तयार झाल्या. लोकांनी पालेभाज्यांचा नैवेद्य अर्पण करून प्रसाद घेतला. या प्रसंगाची आठवण म्हणून हा कुलधर्म पाळला जातो. प्रथम शाक तयार झाल्याने या देवीला शाकंभरी म्हणतात.
या देवीचे (बनशंकरी) बदामी येथे मंदीर आहे. ही देवी अष्टभुजा, आठ हातांत आयुधे, सिंहावर बसलेली, सिंहाच्या पायाखाली दोन हत्ती आहेत. या देवीची प्रत्येक शुक्रवारी पालखी निघते. त्रिकाल पूजा होते.
हिचा रथोत्सव थाटाने होतो. रथ ओढण्यात भाग घेणे हे पुण्यकर्म समजले जाते. अनेक लोकांची ही कुलदेवता आहे.
विद्याधर करंदीकर
Leave a Reply