मध्यंतरी पद्माताईंशी बोलण्याच्या ओघात खूपशा साहित्याशी निगडित गोष्टींचा मला उलगडा झाला.पद्माताई म्हणजे माझी मोठी बहिण तसेच आम्ही सिद्ध लेखिका संस्थेच्या अध्यक्षा! आमच्या गप्पांचा विषय होता अर्थातच अभ्यास! पद्माताई म्हणाल्या अभ्यास,डिग्री,प्रतिभा,अनुभव आणि संस्कार ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत.खूप गोष्टी अभ्यासापेक्षा अनुभव शिकवून जातो.
माणूस खूप शिकला म्हणजेच त्याच्यात कला, प्रतिभा आणि संस्कार असतात असे नाही.काही माणसं आत्म ज्ञानाने इतकी मोठी असतात की त्यांच्यापुढे सगळ्या डिगऱ्या व्यर्थ असतात.अगदी उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वरां प्रमाणे आपली सगळी संत मंडळी!
ह्या संत मंडळींकडे कोणतीही डिग्री नव्हती पण आज महाराष्ट्रात एकही विद्यापीठ नसेल जिथे ह्या संत मंडळींवर अभ्यासक्रम नाही.
पद्माताईंचे प्रगल्भ विचार माझ्या मनावर गारूड घालून गेले.माझ्याकडे डिग्री आहे.पण ह्या पेक्षा माझ्याकडे किती ज्ञान आहे, आणि ते ज्ञान मी योग्य ठिकाणी वापरते आहे का? ह्या सगळ्या गोष्टींचा लसावी मसावी काढत बसले.
योगायोगाने काही दिवसांपूर्वीच ह्या सगळ्या गोष्टींचा चक्क मला अनुभवही आला.
एका अती शिक्षित व्यक्तीने मला काहीसे नाराजीने म्हटले की “विद्यापीठ उगाच नाही डॉक्टरेट देत कोणाला ! त्यासाठी डोकंही असावं लागतं”…अर्थात त्या व्यक्तीचही म्हणणं खरंच आहे.तुमचा अभ्यास तुम्हाला ती डॉक्टरेट देतो.पण ह्याचा अर्थ असा नाही की एखाद्याने डॉक्टरेट मिळवली म्हणजे त्या व्यक्तीला सगळं काही समजते…मी अशा किती तरी व्यक्तींची नाव सांगू शकते की ज्या डॉक्टरेटच काय पण साध्या ग्रॅज्यूएट पण नाही! पण त्यांनी साहित्य क्षेत्रात हिमालयाची उंची गाठली. उत्कृष्ट उदाहरण म्हणजे राम गणेश गडकरी,गदिमा, आरती प्रभू, बहिणाबाई, जनाबाई, मुक्ताबाई इत्यादि. ,…. बापरे किती नाव सांगावी… ह्यां सगळ्या लोकांच्यात प्रचंड प्रतिभेचा वावर होता.त्यांच्या प्रतिभेवर कैक लोकं डॉक्टरेट करतायत आणि आपण हुषार म्हणून समाजात मिरवतायत.
कला आणि प्रतिभा ह्या डिग्रीला जोडणाऱ्या प्रतिमा आहेत.
किती आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे की एखादा सोळा वर्षांचा तरुण मुलगा तारुण्यात प्रवेश करतो आणि डाकघर सारखी कविता लिहितो आणि क्षणात संपूर्ण भारतीयांच्या मनावर गारूड घालतो .ज्यांना आपण रविंद्रनाथ टागोर म्हणून ओळखतो. डॉक्टरेट मिळालेला माणूस कदाचित असं काव्य लिहू शकणार नाही इतकी सुंदर कविता…!
पाडगावकरांकडे डॉक्टरेट नव्हती तरी ते सहज लिहून जातात पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले.तेव्हा पु.ल.देशपांडे सारखा हाडाचा साहित्यिक म्हणतो ह्या एका ओळीसाठी पाडगांवकरांना खुशाल ज्ञानपीठ द्यावे.
पी.सावळाराम जेव्हा सवयीप्रमाणे वसंत प्रभूंनी धरलेल्या तालासूरांवर शब्द पेरताना म्हणतात ‘मानसीचा चित्रकार तो तुझे निरंतर चित्र काढतो’ तेव्हा ज्ञानपीठ विजेते कुसुमाग्रज आनंदाने त्यांना जनकवी म्हणून संबोधतात!..मला वाटतं तेव्हा हा आनंद डॉक्टरेट मिळवण्या पेक्षा कितीतरी मोठा आहे.
पदवी ही आपल्या अभ्यासाच्या श्रमाची पोचपावती असते.परंतु प्रतिभा आणि कला ह्या आपल्याला देवाचा आशीर्वाद असल्याची पोच पावती असते.स्व.लता मंगेशकर, किशोर कुमार, महंमद रफी,आशा भोसले,पी.टी उशा,सचिन तेंडुलकर कडे डॉक्टरेट नाही.परंतु डॉक्टरेट मिळवलेल्या अनेक व्यक्ती त्यांचे चाहते आहेत.मला भौतिक शास्त्रात मध्ये डॉक्टरेट मिळाली आहे.मी हुषार आहे. म्हणून सचिन तेंडुलकरने मला क्रिकेटमधला सल्ला देऊ असे ज्या व्यक्तीला वाटत असले तर तो जगातील मूर्ख समजला जाऊ शकतो.तसेही समर्थांनी दासबोधात मुर्खांच्या समासात म्हंटले आहे की जो मुर्खांच्या नादी लागतो तो दुसरा मुर्ख! असो! प्रत्येक मनुष्य कुठल्यातरी विषयात अती हुषार असतो आणि कुठल्यातरी विषयात कमी हुषार असतो.आपण देव नाही सगळ्या ठिकाणी प्रगल्भता असायला.परंतु जेव्हा एखादी कमी शिकलेली व्यक्ती एका पदवीधर व्यक्तीच्या गुणांच कौतुक करून त्यांच्यातील काही शुल्लक उणीवांची जाणिव करुन देते.तेव्हा त्या पदवीधर व्यक्तीच्या अहंकाराला ठेच लागते.जणू आपल्या शिक्षणाच्या शेपटीवर पाय ठेवला असेच त्या व्यक्तीला वाटते.आणि त्यातून मग प्रतिभा,कला,संस्कापेक्षा शिक्षणाचा प्रचंड उहापोह होतो.तसेही नेपोलियन म्हणायचा की शंभर लोक तुमच कौतुक करतायत पण एखादी व्यक्ती तुम्हाला ठामपणे त्यात उणिवा दाखवते तेव्हा ती व्यक्ती तुम्हाला न घाबरणारी आणि प्रचंड अभ्यासू असावी हे निश्चित समजावे. अर्थात मनुष्य काही समजून घ्येण्यापेक्षा गैरसमजात जास्त वावरत असतो कारण तो पुस्तकी ज्ञानाचा ओझ्याने अहंकाराकडे थोडा झुकलेला असतो.
परंतु जेव्हा आपल्याच चमूतील एखादी लहान व्यक्ती काही सांगते तेव्हा ती गोष्ट मनावर घ्यायला सगळ्यांकडे मा.रतन टाटा सारखं हृदय नसतं.चोवीस वर्षांचा डिझाईन इंजिनिअर शंतनू नायडू काम करत असताना आपल्या बॉसला मुक्या प्राण्यांच्यां संरक्षणा करीता चमकदार पट्ट्याची कल्पना सूचवतो तेव्हा मा.टाटा असं नाही म्हणत की मी कितीतरी वर्ष व्यवसाय करतोय, मी तुझ्यापेक्षा किती अनुभवाने मोठा आहे.उलट तेव्हा तर टाटा कौतुकाने म्हणतात “वाह काय सुंदर कल्पना आहे.मला खूप आवडली ही कल्पना! खरंच आपण ही कल्पना तुझ्याच सहकार्याने राबवूया”
आणि मा.टाटा त्या एम्प्लॉयीजला आपल्या अगदी जवळच्या शिष्टमंडळात ठेवतात.का बर???
कधीकधी काही प्रश्नांची उत्तरं ही डॉक्टरेटच्या अभ्यासक्रमा प्रमाणेच कठिण असतात.ती अनुभवानेच सोपी होतात.
अर्थात डॉक्टरेट पेक्षाही पुढे जाऊन खूप काही सांगणाऱ्या, खूप काही शिकवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत.त्या गोष्टी पटायला,त्या गोष्टी ऐकायला आणि त्या आपल्याला कळायला आधी मनात प्रचंड मोठेपणा असावा लागतो. बाकी डिग्री हे केवळ एक माध्यम आहे तुम्ही शिक्षित आहात हे समाजाला कळण्यासाठीच! तसेतर आयुष्यात निसर्ग, परिस्थिती, अनुभव,मुलबाळ,आजूबाजूचे लोक, आपले दैव खूप काही अभ्यासाच्या पलिकडल शिकवून जातात!
ह्या सगळ्या प्रक्रियां सोबत जर एखाद्या माणसाला सहज खरं आत्मज्ञान मिळालं आणि त्या आत्मज्ञानाचा कळस असणारी एखादी डॉक्टरेट ज्याला मिळाली, तर तो खरा हाडाचा हुषार ! त्यावेळी साक्षात ज्ञानेश्वरमाऊलीनेच येऊन त्याचा डॉक्टरेट सोहळा करावा.
प्राची गडकरी
( डोंबिवली)
Leave a Reply