आज मी ७८ वर्षांचा झालो. म्हणजे ७९वे वर्ष सुरू झालं. ज्येष्ठ की वृध्द की जरठ म्हणायचं स्वतःला? पूर्वी म्हातारा पाहिला की शारदा नाटकांतल पद आठवायचं! ‘म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान.’ त्यांत दिलेला सर्व विनोदी तपशील नाही तससससससरी कांही वर्णन तर आता या वयात लागू पडतंच. लहानपणी मोठं व्हायची घाई असते. १० वर्षाच्या मुलाला तू बारा वर्षांचा दिसतोस म्हटलं की बरं वाटत. पण परवा मला कोणी तरी वय विचारलं. ते ही ज्येष्ठच होते. मी त्यांना म्हटलं, “ तुमचा काय अंदाज?” ते म्हणाले, “ एक्क्याऐंशी-ब्याऐंशी असेल. मी कळवळून म्हणालो, “ नाही हो, अजून ऐंशी व्हायचीत.” पन्नाशीपर्यंत बहुदा लोकांचा अंदाज उलट असायचा. तेव्हां चाळीशीतलाच वाटायचो. चाळीशीत तीशीतला वाटायचो. पण पन्नाशीनंतर लोक माझ्या वयाच्या अंदाज करताना चार- पांच वर्षे वाढवू लागले ते अगदी आजतागायत. मग वयापेक्षा आपली परिपक्वता ( maturity) जास्त आहे अशी मनाची समजूत घालतो.
◼
पन्नासाव्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी म्हणजे ७ फेब्रुवारी १९९०ला मी हैद्राबादला टूरवर होतो. सात तारखेलाच रात्री परतणार होतो. साडेसातची फ्लाईट होती. पण ती दोन तास उशीरा असल्याचं कळलं. थोड्या उशीराचं विमानतळावर पोहोचलो. फ्लाईट आणखी लेट असल्याचे कळले. आपल्या लीगल डीपार्टमेंटचे सौंदरराजन विमानतळावरच भेटले. आम्ही गप्पांत वेळ घालवत होतो. पण फ्लाईट टाईम पुढे पुढेच जात होता. शेवटी बारा वाजून गेले परंतु फ्लाईटचा पत्ता नव्हता. फ्लाईट मुंबईहून येणार होती. तेवढ्यांत अनाउन्समेंट झाली. कांही तांत्रिक बिघाडामुळे मुंबईहून निघालेले विमान पुन्हां मुंबईलाच परत गेले आहे व ज्यांना रात्री हाॕटेलात रहायची सोय हवी असेल त्यांनी काउंटर वर जावे. ताबडतोब तिथे मोठी रांग लागली. तिथले सोपस्कार पार पाडले. मग आम्हाला एका छानशा बसने एका पंचतारांकीत हाॅटेलमध्ये नेण्यात आले. पुन्हा हाॅटेलमधे रूमची चावी घेण्यासाठी रांग लावावी लागली.
◼
हाॅटेलच्या खोलीची चावी घेऊन मी त्या सुंदर खोलीत ( रूममध्ये म्हणायला हवं कां?) पोचलो तेव्हां रात्रीचे दोन वाजून गेले होते. तरीही मला बरं वाटलं. एकटा कां होईना पण पन्नासाव्या वाढदिवसाच्या दिवशी इंडीयन एअरलाईन्सने मला पंचतारांकीत हाॅटेलमधे आणून ठेवले होते. दुस-या दिवशी सकाळी साडेसातनंतर तिथून निघायंच होतं. तेव्हां मी कपडे बदलून आरामात झोपलो. चार-पांच तासांची झोप आणि थोडं कांही तिथलं छानसं खाऊन निघतां येईल असा विचार करून झोपलो. झोप अगदी पटकन नाही आली पण लागली ती अगदी गाढ. पण सकाळी पांच वाजताच फोनची बेल वाजली आणि जाग आली. फोनवर सांगितले गेले की एअरपोर्टला जाणारी बस तयार आहे आणि अर्ध्या तासांत ती सुटणार आहे. कसली झोप, कुठलं खाणं, १५-२० मिनिटात तयार होऊन खोलीची चावी परत त्यांच्या ताब्यात दिली आणि बसमध्ये जाऊन बसलो. नंतर आम्ही परत एअरपोर्टवर नवा बोर्डींग पास घेऊन पुन्हा विमानाची वाट पहात होतो. तेव्हां मी सौंदरराजनना म्हणालो, “ चला, आपण केक खाऊया.” त्यांना काही कळले नाही. सकाळी सकाळी केक? मग मी त्यांना म्हणालो, “आज माझा पन्नासावा वाढदिवस आहे.” विमानतळावरच्याच एका स्टाॅलवर जरा ब-यापैकी केक शोधून आम्ही खाल्ले आणि पन्नासाव्या वाढदिवसाची सकाळ साजरी केली. त्यानंतर सात-आठ दिवसांत बंगलोर विमानतळावर मोठा अपघात झाला. सौंदरराजन मला म्हणाले की अपघाती विमान तेच होते, ज्याने आम्हाला हैद्राबादला रखडवले होते.
◼
माझे कांही मित्र मला गेल्या साठ वर्षांहून अधिक काळ जन्मदिनी शुभेच्छा देतात. आमच्या पिढीत जन्मदिनी शुभेच्छा देण्याची फारशी पध्दत नव्हती. ब-याचं जणांची पक्की तारीखही पालकांना माहित नसायची. शाळेत नाव घालायला कोणीतरी घरून येई. तो जी तारीख अंदाजाने सांगे ती त्या मुलाची जन्मतारीख ठरत असे. त्यामुळे अनेकांची जन्मतारीख एक एप्रिल, एक आॕक्टोबर अशी सांपडते. प्रथम आम्ही मित्रांनी जन्मदिन साजरा करायला सुरूवात केली ती त्या मित्राकडून वसूल करावयाच्या बटाटेवड्याच्या प्रेमापोटी. ज्याचा वाढदिवस असे तो आम्हाला अंधेरीला त्याकाळी नवीन असलेल्या ‘श्रीनिवास’ हाॅटेलमधे घेऊन जाई, म्हणजे आम्ही त्याला आम्हाला न्यायला लावत असू व सर्वांना एक प्लेट बटाटेवडा ( दोन वडे) मिळत असत. त्यामुळे आठवणीने एकमेकांचे वाढदिवस लक्षांत ठेवू लागलो. मग ती संवय झाली. पुढे बटाटेवड्याच्या ऐवजी ओल्या पार्ट्याही होऊ लागल्या. आज ते माझे सर्व मित्र ७७-८२ वयाचे आहेत. फक्त एक जण लौकर गेला. आजही त्या सर्वांचा फोन नक्की येतोच.
◼
आयडीबीआयला रिफायनान्समधे आम्ही वाढदिवस असणा-याकडून कॅफे ब्रायटनमधे चौदा-पंधरा जणांसाठी झकास फ्रुट इन मिल्क वुईथ क्रीम द्यायला लावत असू. तर नरीमन भवनला आल्यावर जमल्यास स्टेटसलाच पार्टी द्यायला लावायचो. मी सी व डी ग्रेडमधे असतांना माझ्या बरोबर काम करणा-या प्रत्येकाचा वाढदिवस त्याला सर्वांच्या सहीच छान कार्ड देऊन आणि एकत्रित शुभेच्छा देऊन करायची प्रथा सुरू केली. तो जमाना कार्डांचा होता. व्हाॅटसॅप आणि फेसबुकच्या जमान्यात कार्डांचं महत्त्व कमी झालं. सत्त्यम किंवा इतर ठिकाणी जाऊन कार्ड निवडण्यांत मजा असायची. कार्डावरचा मजकुर वाचून तो आपल्या त्या व्यक्तींबद्दलच्या भावना चपखलपणे सांगणारा आहे कां हे पहावं लागे. पण खूप कार्ड येत असतं. मी मला आलेली अशी बरीच कार्ड ( साधारण सात आठशे) अजून जपून ठेवली आहेत. त्यांत संपूर्ण डीपार्टमेंटच्या स्टाफच्या सह्या असलेली कार्डही आहेत. तुमच्यापैकी कांही जणांची नावे त्यांत नक्कीच आहेत.
◼
पुढे बँक, वाढदिवस शुभेच्छांच कार्ड हेड आॅफ द डीपार्टमेंटकडे पाठवू लागली. काही विभाग प्रमुख त्या व्यक्तिला बोलावून, शुभेच्छा देऊन कार्ड देत असत. कांही जण इतरांनाही त्यात सामील करून घेत असत. कांही अरसिक प्रमुख मात्र ते बँकेचं कार्ड आपल्या शिपायाकरवी त्या व्यक्तीकडे पोहोचवत किंवा मधल्या अधिका-याकडे सुपूर्त करत. असे केल्याने कार्ड देण्यांतला मतलबच निघून जाई. जेणेकरुन तो एम्प्लायी आणि इतर यांच्यांत एक बंध निर्माण व्हावा, पर्यायाने बँकेबद्दल आपुलकी वाटावी, हा उद्देश, शिपाई टेबलावर कार्ड ठेवून गेल्याने कसा साध्य होणारं? आज आयडीबीआय बॅंकेत वाढदिवस कसे साजरे होतात ते माहित करून घ्यायला मला आवडेल.
◼
आपल्या परिचयाच्या व्यक्तींना आवर्जून कार्ड पाठवणं हा सामाजिक संपर्काचा एक महत्त्वाचा दुवा आहे. विशेषत: त्या परिचित व्यक्तीकडून कोणतीही अपेक्षा न ठेवतां असं सातत्याने करणं फार कठीण असतं. आपल्या आयडीबीआयमधल्या तिघांची तरी मला हे लिहितांना आपोआप आठवण होते आहे. पहिली व्यक्ती म्हणजे झीटो एक्स्ट्राॅस, दुसरे माझे घनिष्ठ मित्र माधव बाक्रे आणि तिसरे उत्तम काळे. झीटो रीटायरमेंटनंतरही नियमित कार्ड पाठवत असे. शिवाय फोनही करत असे. ॲास्ट्रेलीयाहून सुध्दा त्याने कार्डेही पाठवली आणि फोनही केले. इतर दोघं आजही आवर्जून शुभेच्छा पाठवतात. हे सोपं काम नाही. ह्या गोष्टी फक्त डायरी ठेऊन होणा-या नाहीत.
◼
आयडीबीआयमधल्या आम्हा जवळच्या मित्रांची पार्टी बहुदा संध्याकाळी जातांना होई. अर्थातच वाढदिवसवाल्याकडूनच पार्टी घेतली जाई. कधी दिल्ली दरबार तर कधी स्टेटस तर कधी चर्चगेटजवळच विहार. आजही त्या सर्व मित्रांचा फोन येतोच येतो. पण आता पार्ट्या हळूहळू कमी झाल्या. वर्षांतून एकदा किंवा दोनदा सर्वांची भेट झाली तरी खूप वाटतं. वाढदिवस हे निमित्त असे. गप्पाटप्पा, फिरक्या घेणे, विनोद करणे ह्यालाच खरं महत्त्व असे. ह्या सगळ्याचा कामाचा ताण कमी व्हायला नक्कीच उपयोग होतो. आमची मैत्री नक्कीच ह्या पार्ट्यांनी घट्ट केली.
◼
माझ्या साठाव्या वाढदिवसाच्या आगेमागे माझा दुसरा कथासंग्रह प्रकाशित झाला. त्या निमित्त शारदाश्रममध्ये समारंभ झाला. तर पंचाहत्तराव्या वाढदिवसाच्या दिवशीच मी माझ्या इंग्रजी कथासंग्रहाचं प्रकाशन केलं. फक्त वाढदिवस आहे हे आधी जाहीर केलं नाही. कांही जणांना अर्थातच आठवण होती. प्रकाशनाबरोबर संगीताचा कार्यक्रमही होता. आमच्या गायक मित्राच्या सूत्रसंचालकाने ते गुपित सांगून टाकलं. माझ्या एका म्हणजे ६९ व्या वाढदिवसाच्या दिवशी मला सकाळीच सुप्रसिध्द व्यगचित्रकार विकास सबनीस भेटले. आम्ही दोघेही फिरत फिरत जात असताना दरवर्षीप्रमाणे सकाळचा पहिला फोन कोल्हापूरहून श्री शिवाजीराव जाधवांचा आला. मी मोबाईलवर त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या व जास्त बोलणे न वाढवतां फोन बंद केला. पण तेवढ्यानेही सबनीसांना लक्षांत आलंच. मला त्यांनी “आज तुमचा वाढदिवस आहे कां” असं विचारलंच. मी “ होय म्हणताचं मला त्यांनी एका ठिकाणी बसायला सांगितलं. खिशांतली डायरी आणि पेन काढून अवघ्या दोन मिनिटात माझं छानसं अर्कचित्र ( caricature) काढून मला वाढदिवसाची भेट म्हणून दिलं. ती भेट फ्रेम करून मी ठेवली आहे.
◼
‘ वाढदिवस म्हणजे धमाल’ ते “वाढदिवस कां साजरा करायचा, आपलं आयुष्य एका वर्षाने कमी होतं त्या दिवशी” अशी अनेकांची परस्परविरोधी मत असतात. आपलं वय तर रोजच वाढत असतं. (मेंदू मात्र २२-२४ वयापर्यंतच वाढतो.) झी आई आम्हां मुलांच्या वाढदिवसाला एखादा गोड पदार्थ करायची. बाकी कांही लाड नसायचे. तेव्हां वाढदिवस साजरा करण्याची पध्दत नव्हती. आतां वाढदिवस साजरा करण्याची स्पर्धाच असते. नेते मंडळींच्या वाढदिवसाचं कौतुक कांही विचारूच नका. मोठे मोठे फलक आणि त्या नेत्याच्या भव्य फोटोबरोबर क्रमाक्रमाने ग्रहणांतील चंद्राच्या सारखे लहान लहान होत जाणारे पंधरा वीस फोटो. आपला फलक रस्त्यावर लागणार नाही, तेव्हां आपल्या फेस बुकच्या भिंतीवर आपणच लावायचा. अर्थात जयंत गोसावीसारखा तुमचा एखादा उत्साही मित्र असला तर तो प्रेमाने तुमची भिंत त्यादिवशी तुमच्या फोटोने व शुभेच्छांनी सजवतोच. आपला वाढदिवस साजरा करावा अथवा करू नये पण आपण आपल्या आपुलकीच्या माणसांचा वाढदिवस जरूर साजरा करावा. त्यांत औपचारिकपणा नसावा, तर खरा प्रेमाचा ओलावा असावा. आता वाढदिवस आहे असा रिमाईंडर फेसबुक पाठवतं. मग आपण सर्वजण शुभेच्छांचा वर्षाव करतो. व्हाॅटसॅप वर ही जबाबदारी ॲडमीनची असते. किंवा इतर कोणी प्रथम सुरूवात करतो. मग HBD चा मारा होतो. उत्तर देणारा रात्री सर्वांचे मन:पूर्वक आभार मानतो. या नव्या जमान्यांतला हा ही प्रकार छानच. मलाही आता अशाच खूप खूप शुभेच्छा आज (आणि दोन दिवस नंतरही) मिळतील. पण खरंच शुभेच्छांचा कांही फायदा होतो कां? इंग्लंडमधे “लॉंग लिव्ह द क्वीन/ किंग” अशी प्रार्थना करण्यात येते. एकाने अभ्यास करून सिध्द केलं की राजा/ राणी झालेल्यांच सरासरी आयुष्मान साधारण प्रजाजनांपेक्षा कमी आहे. मी ही गोष्ट माझ्या कांही मित्रांना सांगितली. माझा एक मित्र म्हणाला, “ त्याकाळी भारत आणि ब्रिटनचे इतर गुलाम देश त्यांच्या राजाला शिव्याशाप द्यायचे, त्याच्याशी विरूध्द प्रार्थना करायचे. आता करत नाहीत, म्हणून सध्याच्या राणीने नव्वदी पार केली.” आपण शुभेच्छा द्याव्या, घ्याव्या. देण्या-घेण्याचाच आनंद घ्यायचा. शुभेच्छांचा आणि परिणामांचा हिशोब कशाला मांडायचा? तर आज मला शुभेच्छा देणा-या आणि द्यायची इच्छा असून कांही ना कांही कारणांमुळे राहून गेलेल्या सर्वांना मन:पूर्वक खूप खूप धन्यवाद आधीच देवून ठेवतो.
विशेष सूचना:
एक वेळ स्वत:चा वाढदिवस विसरलात तर चालेल पण पत्नीचा विसरू नका.
अरविंद खानोलकर
८.२.२०१
Leave a Reply