वडगावात एक मोठा वाडा होता. वाड्यातील बिऱ्हाडात चार मुलगे होते. राजू, संजू, अजू, बंडू ही त्यांची नावे. रामराव त्या वाड्याचे मालक. त्यांना मूलबाळ नव्हते. ते फार मायाळू होते. मुलांना ते कधी खाऊ देत, कधी पैसे देत. एकदा ते गावाला जायला निघाले. ते तीन महिन्यांनंतर परत येणार होते. त्यांनी मुलांना जवळ बोलावून म्हटले, “राजू, संजू, अजू, बंडू इकडे या! मी तुम्हांला दहा दहा पैसे देतो. त्या पैशांचा उपयोग तुम्ही कसा करता पाहू या. मी आता गावाला जाऊन तीन महिन्यांनंतर परत येईन. त्यावेळी मला भेटा आणि सांगा.”
मुले पैसे घेऊन नाचत आपापल्या घरी गेली. प्रत्येकाने आपल्याला दिलेल्या पैशांचा उपयोग निरनिराळ्या प्रकारे केला. तीन महिन्यांनी रामराव गावाहून परत आले. त्यांनी सर्व मुलांना जवळ बोलाविले व प्रत्येकाला दहा पैशांचा उपयोग कसा केला याबद्दल विचारिले.
राजू म्हणाला, “तुम्ही दिलेल्या पैशांचा मी एक रबरी फुगा आणला व तो फुगा घरात अधांतरी टांगून ठेवला. दुपारी ‘फाट्’ असा आवाज होऊन फुगा फुटून गेला.”
संजू म्हणाला, “त्या दहा पैशांची मी बोरे आणली, ती मी माझ्या भावंडांना दिली व स्वत: खाल्ली.
अजू म्हणाला, “तुम्ही दिलेले सर्व पैसे मी पेटीत जपून ठेवले आहेत.”
रामराव बंडूला म्हणाले, “बंडू तू सर्व पैसे चट्ट केलेस वाटते!” ”
बंडू म्हणाला, “नाही, मुळीच नाही!”
रामराव म्हणाले, “मग सांग ना, तू तुझ्या पैशांचे काय केलेस!”
बंडू म्हणाला, “ मला दिलेल्या दहा पैशांचे मी घेवड्याचे बी आणले. प्रथम परसातील एका बाजूची जमीन कुदळीने खोदली. ढेकळे फोडून साफ केली. वाफा तयार केला. त्यात सरी पाडल्या व घेवड्याचे बी पेरले. वाफ्याला दररोज पाणी घातले. बीपासून वेल तयार झाले. दोन महिन्यांनी वेलाला शेंगा लागल्या. त्या शेंगा काढल्या; थोड्या शेंगांची भाजी करून खाल्ली. राहिलेल्या शेंगा विकल्या, त्यांचा एक रुपया आला.” असे म्हणून बंडूने खिशातून एक रुपयांची नोट काढून ती रामरावांना दाखविली.
रामराव म्हणाले, “ शाबास बंडू! तू पैशांचा चांगला उअपयोग केलास!” त्यांनी बंडूच्या हुशारीचे कौतुक करून त्याला चांगले बक्षीसही दिले.
[ ‘बालसुधा’, पुस्तक २ रे, कर्नाटक सरकार, १९७७, पृ. ४-६]
Leave a Reply