नवीन लेखन...

अप्पाजी प्रधानाची गोष्ट

खूप खूप वर्षांपूर्वी विजयनगरचा राजा कृष्णदेवराय यांच्या राज्यात अप्पाजी प्रधान नावाचा एक हुशार आणि चतुर मंत्री होता.

एकदा विजनगरला कलिंग देशाच्या राजाचा एक प्रतिनिधी आला आणि कृष्णदेवराय राजाला म्हणाला, ‘मी कलिंग देशातून आलो असून आमच्या राजाला कोबी आणि मुळा खाण्याची इच्छा झाली आहे. परंतु आमच्या देशात कोबी आणि मुळा पिकत नाहीत. त्यामुळे आपण आपल्या राज्यातून राजेमहाराजांसाठी लवकरात लवकर पाठवावे अशी मी आपणास विनंती करीत आहे.’ राजाचा प्रतिनिधी निरोप घेऊन आला असल्यामुळे राजाने त्याचा यथोचित सन्मान व आदरातिथ्य केले. प्रतिनिधी संतोषाने कलिंग देशास परत गेला.

दुसऱ्या दिवशी कृष्णदेवरायांनी आपल्या दरबारात सर्व मंत्रीगणांना बोलावले. कलिंग देशाच्या राजाचा निरोप सांगितला. कृष्णदेवरायांसह सर्व मंत्रीगण प्रश्नांकित चेहऱ्याने एकमेकांकडे पाहू लागले. थोड्याच वेळात कृष्णदेवराय म्हणाले, ‘ह्या कलिंग देशाच्या राजेसाहेबांना वेड लागले असावे. विजयनगरहून कलिंग देशास कोबी कसा पाठवायचा? तीन महिन्यांच्या प्रवासात कोबी आणि मुळा खराब नाही का होणार? काय करावे? नाही म्हणावे तर राजाचा अपमान केल्यासारखे होईल. या राजांनी फारच संकटात टाकले आहे.

कृष्णदेवरायांची अस्वस्थ मनःस्थिती ओळखून अप्पाजी प्रधान म्हणाले, ‘महाराज, कलिंग देशाच्या राजेसाहेबांना वेडबिड लागलेले नाही. उलट ते आपल्या हुशारीची परीक्षा पाहात आहेत असे वाटते. आपण काळजी करू नका. आम्ही योग्य तो मार्ग शोधतो आणि गाडीभर कोबी आणि मुळा कलिंग देशास पाठविण्याची व्यवस्था करतो.’ अप्पाजींच्या सकारात्मक उत्तराने कृष्णदेवरायांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. राजांनी अप्पाजींना ‘कामाला लागा’ असा आदेशही दिला.

अप्पाजींनी दोन बैलगाड्या घेतल्या. प्रत्येक गाडीत अर्धी गाडी इतकी माती भरली. त्या मातीत खत मिसळले. एका गाडीत कोबीचे बी पेरले तर दुसऱ्या गाडीत मुळ्याचे बी पेरले. गाडीतल्या मातीवर रोज पाणी टाकत होते. दहा दिवसात दोन्ही गाडीतल्या बियांना अंकुर फुटले.

दुसऱ्या दिवशी दोन सैनिकांना बोलावले आणि अप्पाजी म्हणाले, ‘या दोन्ही गाड्या घेऊन कलिंग देशास जायचे आहे. कोबी आणि मुळ्याचे बी या गाड्यांमधील मातीत पेरले आहे. दर दोन दिवसांनी पाणी घाला. दर आठ दिवसांनी सोबत दिलेले खतही घाला. तीन महिन्यांच्या प्रवासात दोन्ही भाज्या तयार होतील. तेथील राजास आपल्या विजयनगरचा ताजा उपहार प्रदान करा!’

सैनिकांनी अप्पाजींच्या सूचनांचे पालन करीत गाडीतील रोपांची निगराणी उत्तम राखली. कलिंग देशास पोहचताच कोबी आणि मुळे तयार झाले. कलिंग देशाच्या राजाला विजयनगरचे सैनिक भेटले आणि म्हणाले, ‘आम्ही विजयनगरहून आलो असून आमच्या राजांनी आपणासाठी हे ताजे कोबी व मुळे दिले आहेत. आपण त्याचा स्वीकार करावा, ही विनंती!’

ताजे टवटवीत कोबी पाहताच कलिंग देशाच्या राजाला आनंद झाला. त्यांनी कृष्णदेवरायांना मनापासून धन्यवाद दिले आणि सैनिकांना विचारले, ‘तीन महिने हे कोबी आणि मुळे इतके ताजे कसे राहिले?’ सैनिकांनी अप्पाजी प्रधानांनी ही व्यवस्था केल्याचे सांगताच कलिंग देशाच्या राजाने अप्पाजींचीही प्रशंसा केली!

प्रसंगानुरूप परिस्थितीचा अंदाज घेत कृती करण्याचे अप्पाजींचे चातुर्य सर्वश्रुत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..