नवीन लेखन...

प्राचीन वृक्ष

वनस्पती अभ्यासकांच्या दृष्टीने वृक्षाचे वय हे अत्यंत महत्त्वाचे असते. वृक्षाचे वय हा फक्त एखाद्याच्या कुतूहलापुरता मर्यादित विषय नसून, सदर वृक्षाने वातावरणातले कोणते बदल अनुभवले आहेत, याचेही ते निदर्शक असते. वृक्षाचे वय काढण्यासाठी कोणकोणत्या पद्धती वापरल्या जातात त्याचा आढावा घेणारा, तसेच आज अस्तित्वात असलेल्या विविध प्राचीन वृक्षांची ओळख करून देणारा हा लेख…

मराठी विज्ञान परिषदेच्या ‘पत्रिका’ या मासिकातील नागेश टेकाळे यांचा हा पूर्वप्रकाशित लेख 


मुंबईत एका ठिकाणी व्याख्यान देण्याचा योग आला. विषय होता, ‘वृक्षांची ओळख आणि त्यांचे रसग्रहण’. व्याख्यानानंतर रंगलेल्या प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात एका आगळ्यावेगळ्या प्रश्नाने मी थोडा चकित झालो. प्रश्न होता: “ऋषीचे आणि वृक्षाचे वय कधीही विचारू नये असं म्हणतात. यात खरे-खोटे किती?” एक विज्ञान प्रसारक आणि वृक्ष अभ्यासक म्हणून माझे उत्तर होते, “स्पष्ट नोंद आणि शास्त्रीय अभ्यास असेल, तर दोघांचेही वय एका निश्चित वर्षापर्यंत सहज काढता येते. ” कार्यक्रम संपला. मात्र वृक्षाच्या वयाचा विषय माझ्यासाठी संपला नव्हता. वृक्षाच्या खोडाचा आडवा छेद घेऊन त्यावरील वर्तुळांची संख्या म्हणजे वाढचक्रांची संख्या मोजून त्या वृक्षाचे वय आपणांस सहज मोजता येते, हे मी माझ्या अभ्यासक्रमात शिकलो होतो; पण ही वाढचक्रे एकमेकांत घट्टपणे मिसळून गेली तर त्यांची संख्या कशी मोजणार? तसेच, जिवंत वृक्षाच्या बाबतीत ही पद्धत कशी वापरणार? वृक्षाचे वय मोजण्यामध्ये हे मोठे अडथळे होते.

ठाणे महाविद्यालयासमोर असलेल्या लाकूड कापणीच्या यंत्रासमोर उभा राहून मी अनेक वृक्षांच्या पातळ चकत्यांचा अभ्यास केला. वय काढण्याची पद्धत आणि त्यामागचे विज्ञान त्या वखारवाल्यास समजावूनही दिले. पण त्यात अभ्यासापेक्षा विज्ञान प्रसाराचाच जास्त भाग होता. वृक्षाचे वय मोजण्याच्या या वैज्ञानिक प्रयोगास मी माझ्या प्राध्यापकीय उमेदवारी काळातही बऱ्यापैकी न्याय दिला. मात्र, या छंदाला खऱ्या अर्थाने वैज्ञानिक अर्थ प्राप्त झाला तो २००६ मधील माझ्या अमेरिका भेटीने. त्या एक महिन्याच्या मुक्कामात मी ॲरिझोना विद्यापीठाला मुद्दाम भेट दिली. उद्देश होता तो तेथील वृक्षांमधील वाढचक्रे मोजणाऱ्या, सत्तर वर्षे जुन्या प्रयोगशाळेस भेट देण्याचा. या विभागात ‘डेन्ड्रोक्रोनोलॉजी’ हा वृक्षाचे वय मोजण्याचा अभ्यासक्रम शिकवला जातो. ही प्रयोगशाळा मला एखाद्या गुहेसारखीच वाटली. भिंतीवर लटकवलेले प्राचीन वृक्षांचे आडवे काप, त्यावर केलेल्या खुणा, सर्वत्र लाकडांच्या ओंडक्यांचा खच आणि त्यामधून वाट काढत संशोधन करणारे शास्त्रज्ञ.

घनदाट जंगलामध्ये वाढणाऱ्या वृक्षांचे वय अनेक वेळा हजार किंवा त्याच्या पटीतही असू शकते. थोडक्यात, हजारो पावसाळे पाहणारे वृक्षराज आजही अमेरिका, आफ्रिका, अॅमेझॉनच्या जंगलात सुखाने नांदताना आढळतात. वृक्षांचे वय कसे काढले जाते हा अनेकांसाठी कुतूहलाचा विषय असू शकतो. नैसर्गिक वातावरणामध्ये आढळणाऱ्या प्राणी-पक्षांचे वय मोजण्यासाठी त्यांचे जखमी अथवा मृत कलेवर वापरले जाते. वृक्षांच्या बाबतीतसुद्धा हीच पद्धत अवलंबली जाते. मात्र प्राणी, पक्षी, जलचर यांचे वय मोजण्याच्या पद्धतीपेक्षा वृक्षकुळाचे वय मोजण्याचे तंत्रज्ञान जरा वेगळेच आहे. जंगलामधील मृत वृक्षाचा बुंधा त्याचे वय काढण्यासाठी उपयोगात आणतात.

वृक्षाला जन्मतारीख असते का? या प्रश्नाचे उत्तर आपण ‘हो’ असे देऊ शकतो, जर तो वृक्ष त्याच्या सुदृढ रोपाच्या स्वरूपातून, मुद्दाम तयार केलेल्या खड्यामध्ये शास्त्रीय पद्धतीने लावला गेला असला तर. वृक्षारोपणानंतर त्याच्या सुरक्षित वाढीसाठी त्यात ठरावीक अंतर ठेवून बंदिस्त करणे आणि त्याचे नामकरण करून तेथे रोपण तारीख लिहिणे आवश्यक असते. हा वृक्ष जेव्हा मोठा होऊ लागतो, तेव्हा सहजपणे आपण त्याचे वाढते वय निश्चित सांगू शकतो. आपल्या देशामध्ये आजही शंभरी पार केलेले हजारो वृक्ष, निसर्ग उद्यानात आणि शैक्षणिक संस्थांच्या परिसरात पाहावयास मिळतात. बंगलोरच्या लालबाग उद्यानामधील सर्वांत उंच आणि मोठा वृक्ष आजही याचा साक्षीदार म्हणून उभा आहे.

मृत वृक्षाच्या बाबतीत, पहिल्या परिच्छेदात उल्लेख केलेली, वाढचक्रांवर आधारलेली पद्धत वापरात आहे. या पद्धतीमध्ये मृत वृक्षाच्या मुख्य खोडाचा जमिनीलगत समातंर छेद घेतला जातो. छेदाचा भाग साफ करून भिंगाच्या साहाय्याने मध्यभागापासून ते कडेच्या दिशेने पसरलेली, पिवळसर आणि तपकिरी रंगाची चक्रे मोजली जातात. प्रत्येक वृक्ष त्याच्या एक वर्षाच्या कालखंडात एक मोठा फिकट पिवळसर पट्टा आतल्या बाजूस आणि त्यास जोडूनच तपकिरी रंगाचा दुसरा लहान वर्तुळाकार पट्टा बाहेरच्या बाजूस तयार करत असतो. या दोन्हींस मिळून ‘एक वार्षिक वाढचक्र’ असे म्हणतात. यातील प्रत्येक वर्षीचे नवे चक्र हे बाहेरच्या बाजूस तयार होत असते. वृक्ष वाढत असताना बाहेरची वर्तुळाकार चक्रे आतील वाढचक्रांना मध्यभागाकडे ढकलत असतात. नवी चक्रे बाहेरच्या बाजूस तयार होत असल्याने, त्यांचे व्यास हे अर्थातच जुन्या वाढचक्रांपेक्षा मोठे असतात. संथ डोहात टाकलेला एक लहानसा दगड व त्यानंतर निर्माण होणारी वलये. हे वर्णन यास योग्य वाटते. वाढचक्रांची संख्या जशी वाढू लागते, त्याच प्रमाणात वृक्षाच्या खोडाचा घेर मोठा होऊ लागतो. वृक्षाच्या मध्यभागी दबलेला लालसर गोलाकार भाग अनेक चक्रांनी तयार झालेला असतो. तो अतिशय कठीण मात्र मृत असतो. वृक्ष ताठ मानेने उभा असतो तो याचमुळे. कुठल्याही लाकूड कापणी यंत्रासमोर उभे राहून आपणांस याचे सहज निरीक्षण करता येते.

जिवंत वृक्षाचे वय मोजण्याची एक सोपी पद्धत ही गणिती सूत्रावर आधारलेली आहे. यामध्ये वृक्षाच्या खोडाचा परीघ जमिनीपासून सुमारे दीड मीटर उंचीवर मोजतात. नंतर प्रयोगशाळेमध्ये याच वृक्षसमूहामधील एखाद्या वृक्षाच्या खोडाच्या छेदावरील वाढचक्रांच्या सरासरी जाडीशी या वृक्षाच्या जाडीशी तुलना केली जाते व गणिती सूत्रावरून या जिवंत वृक्षाच्या खोडात किती वाढचक्रे असावीत, याचा अंदाज बांधला जातो. यावरून मिळणाऱ्या वाढचक्रांच्या संख्येवरून आपण निवडलेल्या प्राचीन वृक्षाचे वय आपल्याला सहज समजू शकते. परंतु, या पद्धतीने प्राचीन वृक्षाचे वय समजण्यासाठी-सुद्धा त्या वृक्षाच्या भाऊबंदांपैकी कुणा एकाचा मृत्यू आवश्यक असतोच.

तिसरी पद्धत जास्त महत्त्वाची असून ती विज्ञान-तंत्रज्ञानावर आधारलेली आहे. ही पद्धत म्हणजे ‘रेडिओकार्बन डेटिंग’ पद्धत. ही पद्धत मृत वृक्षाबरोबरच, प्राचीन जिवंत वृक्षासाठीही वापरता येते. वातावरणातील कार्बन डायऑक्साइडमधील कार्बनचे काही अणू हे चौदा अणुभार असणाऱ्या कार्बन-१४ या किरणोत्सारी अणूंच्या स्वरूपात असतात. वातावरणातील कार्बन डायऑक्साइडमधील कार्बनची वृक्षांकडील सक्रिय पेशींतील कार्बनबरोबर देवाणघेवाण होत असते. त्यामुळे वृक्षाच्या या सक्रिय पेशींत कार्बन-१४ हे समस्थानिक नेहमीच अस्तित्वात असते. जेव्हा अशा पेशी या सक्रिय राहत नाहीत, तेव्हा मात्र कार्बन-१४च्या अणूंची ही देवाणघेवाण थांबते. त्यानंतर त्या भागातले आतापर्यंत स्थिर राहिलेले कार्बन-१४च्या अणूंचे प्रमाण, त्यांच्या किरणोत्सारी हासामुळे कमी होऊ लागते. यानुसार, लाकडातील कार्बन-१४चे प्रमाण मोजून, त्या लाकडाचे वय काढणे शक्य होते. प्राचीन जिवंत वृक्षाच्या बाबतीत, त्याच्या खोडाच्या मध्यभागातील पेशी या वृक्षाच्या सुरुवातीच्या काळात निर्माण झालेल्या असतात व त्या सक्रिय राहिलेल्या नसतात. त्यामुळे प्राचीन वृक्षांच्या खोडावर छिद्र पाडून त्याच्या मध्यभागामधील काही पेशी काढून घेतल्या जातात व रेडिओकार्बन पद्धतीने त्यांचे वय काढता येते. प्राचीन वृक्षाच्या मध्यभागाचे हे वय त्या वृक्षाचे वय ठरते.

रेडिओकार्बन डेटिंगची ही पद्धत आफ्रिकेमधील हजारो ‘बॉवबॉब’ वृक्षांच्या बाबतीत यशस्वी झाली आहे. छोटी आफ्रिकी राष्ट्रे गरीब असली, तरी बॉवबॉब या प्राचीन वृक्षांच्या बाबतीत ती श्रीमंत आहेत. चार वर्षांपूर्वीच्या माझ्या टांझानिया भेटीमध्ये मी तेथील टारांगिरे राष्ट्रीय उद्यानास भेट देऊन तिथला सहा हजार वर्षांपूर्वीचा प्राचीन बॉवबॉब वृक्ष पाहिला. टारांगिरे हे या प्राचीन वृक्षांचे मोठे उद्यानच आहे. बॉवबॉब वृक्षाच्या भल्यामोठ्या खोडात भर उन्हाळ्यात एक लाख लिटरपर्यंत पाणी साठविलेले असते. याची बाहेरची साल कठीण असते, मात्र खोडाच्या मधील भाग कलिंगडासारखा पाण्याने भरलेला असतो. हा वृक्ष हत्तींचा अतिशय आवडता. कारण, त्यांच्यासाठी उन्हाळ्यात तो पाण्याचा स्रोत असतो. तहानेने व्याकूळ झाल्यावर बॉवबॉब वृक्षाच्या भोवती हत्ती जमा होतात. दातांच्या साहाय्याने या वृक्षाच्या सालीला खोलवर छिद्र पाडून, सोंड आतमध्ये ढकलून पाण्याने भरलेले पेशींचे गर ते तोंडांत टाकतात. आफ्रिकेच्या जंगलात असे कितीतरी प्राचीन बॉवबॉब वृक्ष जखमी असूनही आज ताठ उभे आहेत. कारण, या वृक्षांमध्ये छिद्रांची जखम लवकर भरून काढण्याची क्षमता असते.

गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये जगामध्ये अनेक प्राचीन वृक्ष सापडले आहेत. त्यांमध्ये कॅलिफोर्नियाच्या जंगलात २०१३मध्ये सापडलेला ५,०६२ वर्षांचा पाइन वृक्ष, २००८मध्ये स्वीडनमध्ये सापडलेला स्प्रुस जातीचा ८,००० वर्षे जुना सुचिपर्णी वृक्ष, यांचा उल्लेख जरूर करायला हवा. कॅलिफोर्नियामधील श्वेत पर्वतरांगांमध्ये सुचिपर्णी गटामधील हजारो प्राचीन वृक्षांची गर्दीच आहे. त्यांचे वय आज सरासरी ७,००० ते ९,००० वर्षे आहे. जगामधील सर्वांत प्राचीन वृक्ष ऑस्ट्रेलियातील टास्मानिया प्रांतात आढळला आहे. सुचिपर्णी गटामधील या वृक्षाचे वय १०,००० वर्षांपेक्षाही जास्त असावे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पृथ्वीतलावर अमेरिका, ब्राझिल, ऑस्ट्रेलिया या देशांमधील घनदाट जंगलांत अनेक प्राचीन वृक्ष आढळतात. युरोपमधील हिमयुगाच्या आधीसुद्धा, म्हणजे दहा हजार वर्षांपूर्वी तेथे अनेक प्राचीन वृक्ष होते. आज त्यांचे अवशेष सापडत आहेत.

प्राचीन वृक्षात अपुष्प म्हणजे सायपेरस, ख्रिसमस वृक्ष यांसारख्या सुचिपर्णी वृक्षांचे प्रमाण सर्वांत जास्त आहे. स्वीडनमध्ये २००४ साली जेमतेम पाच मीटर उंचीचा एक ख्रिसमस वृक्ष सापडला. ‘ओल्ड त्जिक्को’ या नावे ओळखल्या जाणाऱ्या या वृक्षाच्या मुळांचे वय रेडिओकार्बन डेटिंग पद्धतीने काढले, तेव्हा ते ९५५० वर्षे आढळले. याचाच अर्थ, या वृक्षाची मुळे हजारो वर्षांपासून नवीन खोडांची निर्मिती करत होती. खोड सहाशे वर्षे जगत होते; ते मृत ते मृत झाल्यावर जमिनीमधील मुळापासून पुन्हा नवीन खोड वर येत होते. मूळ आणि खोडामधील जनुकांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला गेला. आज आपणांस उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर प्रचंड बर्फ आढळते. पण तेथे सापडलेल्या प्राचीन वृक्षांच्या अवशेषांच्या वाढचक्रांचा अभ्यास करताना असे आढळले, की पूर्वी या भागात घनदाट जंगल होते.

ख्रिसमस वृक्ष हा अपुष्प वनस्पतींमधील सायपेरस कुळात मोडतो. अमेरिकेमधील फ्लोरिडा राज्यातील लॉंगवुड येथील सुमारे ३६ मीटर उंच सायपेरसचे वय ३,५०० वर्षे होते. एका माथेफिरू व्यक्तीने या वृक्षास २०१२ साली जाळून टाकले, तेव्हा त्या परिसरामधील हजारो माणसे व्याकूळ झाली होती. हा वृक्ष त्या शहराच्या अनेक सांस्कृतिक घटनांचा साक्षीदार होता. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, या वृक्षाचे वयसुद्धा त्याच्या जमिनीमधील खोलवर गेलेल्या मुळांवरून काढण्यात आले होते.

अनेक दीर्घायुषी प्राचीन वृक्षांच्या प्रजातीसुद्धा तेवढ्याच दीर्घायू असू शकतात. कारण, वनस्पतीच्या त्या कुळास मिळालेला आनुवंशिक घटकांचा हा आशीर्वादच असतो. मात्र, या घटकास निसर्गामधील विविध घटकांचाही योग्य आधार मिळणे आवश्यक आहे. वड, पिंपळ, उंबर, नांद्रुक या फॅबेसी कुळामधील वृक्ष हमखास दीर्घायू असतात. भारतामधील विविध राज्यांतले अनेक वटवृक्ष आज पाचशे ते सातशे वर्षे प्राचीन आहेत. कोलकात्याच्या आचार्य जगदीशचंद्र बोस वनस्पती उद्यानातील वटवृक्ष अडीचशे वर्षे प्राचीन असून तो साडेतीन एकर जागेमध्ये पसरला आहे. दुरून घनदाट जंगलासारख्या दिसणाऱ्या या प्राचीन वृक्षाच्या सुमारे छत्तीसशे पारंब्या फांद्यांपासून निघून जमिनीत आधारासाठी गेल्या आहेत. वृक्षाचे मूळ खोड आता अस्तित्वातच नाही. डेहराडूनच्या वन संशोधन संस्थेत साडेसातशे वर्षे वयाचा एक प्राचीन देवदार वृक्ष त्याच्या आडव्या छेदाच्या स्वरूपात भिंतीवर विराजमान आहे. या वृक्षाच्या वाढचक्रावर दर्शवलेली इतिहासाची विविध पाने आणि त्यांचे विविध संदर्भ पाहताना त्याच्या प्राचीनतेला सलाम करावासा वाटतो.

काश्मीरमधील मुगल आणि शालिमार उद्यानात आज आपणांस सातशे वर्षांपर्यंतचे जुने वृक्ष त्यांच्या जन्मतारखेपासून पाहावयास मिळतात. यावरून हे सिद्ध होते, की थंड, बर्फाळ प्रदेशामधील वृक्ष नेहमी दीर्घायू असतात; उन्हाळ्यापेक्षा पावसाळा आणि हिवाळा वृक्षांचे आयुष्यमान वाढवतो. आवश्यक सुपीक जमीन, पाण्याची उपलब्धता, वाढीसाठी योग्य तापमान आणि सूर्यप्रकाश वृक्षांना दीर्घायू करतात. संशोधनामध्ये असेही आढळून आले आहे, की जे वृक्ष चराऊ प्राणी आणि मानवी हस्तक्षेपापासून दूर असतात, ते नेहमीच दीर्घायू असतात.

तेलंगणा राज्यामधील मेहबूब नगराच्या बाहेर असलेला पुरातन वटवृक्ष तब्बल सातशे वर्षांचा आहे. तीन एकर क्षेत्रात पसरलेला हा वटवृक्ष आज मात्र मृत्युपंथास लागला आहे. या वृक्षाच्या मुख्य बुंध्यावर वाळवीने हल्ला चढवला आहे, त्यामुळे या वृक्षाच्या प्रचंड मोठ्या फांद्या आता अशक्त होऊन जमिनीपर्यंत खाली आल्या आहेत. हा वृक्ष वाचवण्यासाठी, वनखात्याने सर्वप्रथम या वटवृक्षाच्या परिसरात गोलाकार खंदक खोदून त्यामध्ये वाळवी प्रतिबंधक औषधे पाण्याच्या माध्यमातून टाकली. खोड आणि फांद्यांवर सूक्ष्म छिद्रे करून त्यांमध्येसुद्धा वाळवी प्रतिबंधक औषधे इंजेक्शनद्वारे सोडली. पण हवा तेवढा परिणाम साध्य झाला नाही. म्हणून आता वृक्षालाच वाळवी प्रतिबंधक कीटकनाशकाचा सौम्य डोस ‘सलाइन’ सारखा थेंब थेंब देण्याची नामी शक्कल येथील वनखात्याने सध्या अवलंबलेली आहे. आता या पुरातन वटवृक्षाच्या रोगग्रस्त खोडावर आणि फांद्यांना थोड्या थोड्या अंतरावर लटकवलेल्या सलाइनच्या बाटल्या आता वृक्षाच्या प्रकृतीमध्ये सकारात्मक बदल दर्शवीत आहेत. शेकडो सलाइनच्या बाटल्या अंगाखांद्यावर लटकवून आणि टोचून घेतलेल्या या वटवृक्षास पूर्ण बरे होण्यास अजून काही महिने तरी निश्चित लागणार आहेत.

माझे सर्व बालपण वाहत्या नदीकाठी, प्राचीन वृक्षांच्या सहवासात गेले. अनेक मंदिरांच्या गर्भगृहापेक्षाही मला त्यांच्या परिसरामधील, शेकडो वर्षे जुन्या असणाऱ्या वृक्षांचा सहवासच जास्त प्रिय असे. अनेक वड, पिंपळ वृक्षांना मी त्यांचे वय विचारत असे; मात्र उत्तराऐवजी मला ऐकू येत ती नवीन वर्षी फुटलेल्या वसंताच्या पालवीची सळसळ. वर्षाला एक याप्रमाणे किती वेळा पालव्या फुटल्या असतील या वृक्षाला? शंभर, दोनशे की जास्त वेळा? आज विज्ञानाने याचे उत्तर मला दिले आहे; आणि म्हणूनच एक विज्ञान अभ्यासक म्हणून ‘वृक्षाचे वय विचारू नये’, या नकारार्थी विधानास होकारार्थी होताना झालेला आनंद शब्दात व्यक्त करण्यास मला हवी आहे एका प्राचीन घनदाट वृक्षाची शीतल छाया आणि सोबत मनुष्यवस्तीपासून दूर अशी निरव शांतता!

नागेश टेकाळे
वनस्पतीशास्त्रतज्ज्ञ

nstekale@gmail.com

मराठी विज्ञान परिषदेच्या ‘पत्रिका’ या मासिकातील हा पूर्वप्रकाशित लेख 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..