नवीन लेखन...

रेखा – नावातच अख्खं व्यक्तिमत्व! आणखीन हवे काय ?

‘यश हेच चलनी नाणे’ ह्या पुस्तकातील दिलीप ठाकूर ह्यांनी लिहिलेला हा लेख


रेखा नावाचे कधीच न संपणारे पर्व अधिकाधिक व्यवस्थित आणि वेगाने सुरू झाले. आजही ते सुरुच आहे. तिचे जुने चित्रपट आपले अस्तित्व टिकवून आहेत, त्यामुळे तिचा बराच काळ एकादा चित्रपट रिलीज झाला नाही तरी फारसं बिघडत नाही.


दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांच्या ‘आस्था’ या चित्रपटात रेखा! नवीन चित्रपटाच्या मुहूर्ताच्या आमंत्रणावर नेहमीप्रमाणे नजर टाकतोय तोच ‘हा नक्कीच काही वेगळा चित्रपट असणार, जायला हवं’ असे ठरवूनच टाकले. दोन दिवसांनी बासूदांच्या कार्टर रोडवरील बंगल्यावर जाईपर्यंत मनात एकीकडे त्यांचे अनुभव, आविष्कार, गृहप्रवेश असे चित्रपट होते आणि दुसरीकडे रेखाने त्यांच्या दिग्दर्शनातील चित्रपटात भूमिका साकारण्यास होकार दिल्याचे कौतुक होते.

रेखाचा बराचसा प्रवास पारंपरिक लोकप्रिय मसालेदार मनोरंजक चित्रपटातून घडला आणि बासूदा पूर्णपणे बुद्धीवादी फिल्ममेकर, वेगळ्या पठडीतील चित्रपट ही त्यांची ख्याती आणि तोच त्यांचा हुकमी ऑडियन्स. यांचे कसे जमणार असा प्रश्न असला तरी पटकथाच तशी काही वेगळी असल्याशिवाय रेखा होकार देणार नाही असेही वाटत होते. .

बासूदानी रेखाला थीम, पटकथा, व्यक्तिरेखा, मानधन, तारखा अशा सगळ्याची कल्पना नक्कीच दिली असणार असा विचार करतच सेटवर पाऊल टाकले. आपल्याच बंगल्यात मुहूर्त आणि पहिले शूटिंग सत्र आयोजित करुन बासुदा सेफ गेम खेळताहेत काय असा प्रश्न मनात येण्यापूर्वीच लक्षात आलं की, नेहमीच्या हिंदी चित्रपटासारखा हा शोबाजी (आणि शोरशराबा) सारखा मुहूर्त नव्हता. आम्ही अगदी मोजकेच यावेळी आमंत्रित होतो. आणि अशातच रेखा अगदी कॅज्युअली रुपात सेटवर आली आणि बासूदांशी काही बोलतच आतील रूममध्ये गेली. जाताना ओम पुरीला डोळ्यानीच हाय हॅलो केलं.

एव्हाना लक्षात आलं की, बासूदांच्या सेटवरची आणि सिनेमातीलही रेखा नक्कीच वेगळी असणार. मुहूर्त दृश्यातही बासूदानी सर्वसाधारण संवाद ठेवले आणि हा चित्रपट सेटवर गेला. यावेळी औपचारिक गप्पांत बासूदा सांगत होते, या दशकातील ही गोष्ट आहे, तशी धाडसीच आहे. ओम पुरी एक मध्यमवर्गीय नोकरदार असून रेखा त्याच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. एका क्षणी ती काही वेगळा निर्णय घेते, ते म्हणजे हा चित्रपट आहे.

बासूदांच्या या बोलण्याने या चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली. काही दिवसांनी समजले की, बासूदांच्या लक्षात आलं की, रेखाला तिच्या मनासारखं काम करु दिले की ती सुखावते. पण तिचा तो मूड सांभाळायला हवा. तसे केले तर आपल्या थीम आणि सादरीकरणावर काही परिणाम तर होणार नाही ना? बड़े स्टार शांतपणे हाताळायचा बासूदांकडे अनुभव होता. ‘आविष्कार’ च्या वेळी तर राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर ऐन भरात होते, तरी बासुदानी अगदी वेळेत आणि व्यवस्थित चित्रपट पडद्यावर आणला.

‘आस्था’साठी त्यांनी काय केले माहित्येय? त्यांनी रेखाची सगळी दृश्ये सर्वप्रथम चित्रीत करायची ठरवली, समजा तिचा मूड बिघडला अथवा बदलला (तसे किस्से खूप प्रचलित होते. त्यात तत्थ किती हे रेखाच जाणो. रेखा म्हणजे उलटसुलट चर्चा हे घट्ट समीकरण कधी अधिकाधिक घट्ट झाले हे समजलेच नाही) आणि चित्रपटात थीमनुसार एक महत्त्वाचा बोल्ड सीन आहे, तो कोणासोबत अभिनय करताना तिला कन्फर्ट वाटेल हे तिलाच विचारले. तिने थोडा विचार केला आणि नवीन निश्चलचे नाव सांगितलं. तोच तिचा पहिला हिंदी चित्रपट मोहन सैगल दिग्दर्शित ‘सावन भादो’ (१९७०) चा नायक.

‘आस्था’ची थीम काय? या मध्यमवर्गीय विवाहित स्त्रीला एकदा शॉपिंग करताना पैशाची आलेली चणचण एका श्रीमंत महिलेच्या लक्षात येते. ती हिला अगदी विश्वासात घेऊन सांगते, तू अगदी साधी राहत असलीस, तरी कॉटनच्या साडीत तू खूप सुंदर दिसते. तू… तू जर श्रीमंत पुरुषांना (नवीन निश्चल) खुश केलेस तर त्यातून मिळणारा पैसा तुलाच घरखर्च भागवणे, नवीन गोष्टी घरी आणणे यासाठी उपयोगी पडेल, नवीन कॉर्पोरेट युगात असे काही करणं फारसं वावगं नाही… ही ऑफर ती स्वीकारते. आणि पतीलाही हे वास्तव समजताच तो ‘बदलत्या काळाचा महिमा’ असे मानतच मुलीच्या संगोपनाकडे लक्ष देतो… १९९७ साली हा चित्रपट पडद्यावर आला.

रेखा प्रत्यक्षातील आणि पडद्यावरील या दोन्हीची केमिस्ट्री या सगळ्यातून होत जाते.

रेखा असं म्हणताच चित्रपट रसिकांच्या किमान तीन-चार पिढ्या एकदम सुखावतात. त्यांच्यात एक प्रकारचा फ्रेशपणा येतो. काही तरी जादू झाल्यागत एकदमच उत्साहित होतात. एक पिढी एकदम सत्तरच्या दशकातील सिंगलस्क्रीन थिएटर्समध्ये रमते आणि आपण रेखाच्या अभिनय आणि सौंदर्य यातील सकारात्मक बदल कसा अनुभवला याच्या आठवणीत विलक्षण रमते.

एक पिढी ऐंशीच्या दशकातील व्हिडिओ आणि मग डिव्हिडीत रमते आणि आपण रेखाच्या परिपक्क अभिनय, कमालीचा फिटनेस, देखणेपणाचे सातत्य कसे रुपेरी पडद्यावर आणि गॉसिप्स मॅगझिनमध्ये पाहिले याच्या आठवणीत विलक्षण रमते. तर एक पिढी एकदम जागतिकीकरणाच्या सुरुवातीच्या काळात अर्थात चॅनलच्या वाढत्या प्रसाराच्या काळात जाते.

काही जणांना तर कोणत्या थिएटरमध्ये रेखाचा कोणता चित्रपट पाहिला हेही आठवते. प्रेम प्रेम प्रेम म्हणतात ते हेच तर असते. तर नवीन शतकातील पिढीला रेखाने तोपर्यंत आपली टिकवलेली पोझिशन, आपले आकर्षण, आपली लोकप्रियता आणि आपली न्यूज व्हॅल्यू याचे विशेष कौतुक वाटते. विशेष म्हणजे या सर्व पिढीतील चित्रपट चाहत्यांनी रेखासोबतच आपलीही वाटचाल सुरु ठेवली. आणि त्याचा त्यांना विशेष आनंद मिळतो. याला खरी कमिटमेंट म्हणतात. आवड निवड आणि एकनिष्ठपणा यात कसलीही तडजोड नाही.

एकदा का आपण रेखाचे चाहते झालो की इतर कोणाचेही चाहते व्हायचे नाही, तिच्याशी अगदी एकनिष्ठ राह्यचे हा तिच्या फॅन्सचा जणू जबरा हट्ट आहे. मग ती रेखाच्या चलतीच्या काळातील (तसा तो आजही सुरु आहे) हेमा मालिनी, राखी, झीनत अमान, परवीन बाबी, श्रीदेवी, जयाप्रदा, माधुरी दीक्षित असे कोणी का असेना? या सगळ्यात एकच स्टार अॅक्ट्रेस कायम, ती म्हणजे ‘ओन्ली रेखा’. हे रेखाच्या दीर्घकालीन लोकप्रियता, सातत्य, फिटनेस अभिनय आणि सौंदर्याचे यश आहे. जगात अशी ‘रेखा’ एकमेव आणि तोच एक्स्युझिवपणा हीच रेखाची ताकद आणि ओळख आहे. आणि स्टार म्हटल्यावर असेच ‘स्वतंत्र बेट’ असावे.

रुपेरी पडदा, मिडिया (अगदी गॉसिप्स मॅगझिनसह), चाहते या सगळ्यातील रेखाच्या बहुचर्चित, यशस्वी, अष्टपैलू तर अधेमधे वादळी ठरलेल्या प्रवासाचे हे चक्क मोजता अथवा न मोजताही पन्नासावे वर्ष सुरु आहे. इतक्या कालखंड कधी सरला हे रेखाने जाणवूही दिले नाही. हा एक खूपच मोठा आणि स्पीडब्रेकरचा, वादळांचा तेवढाच कौतुकाचा वळणावळणाचा प्रवास आहे. आणि रेखा अशीच असू अथवा घडू शकते.

मोहन सैगल निर्मित दिग्दर्शित ‘सावन भादो’ (१९७०) हा रेखाचा नायिका म्हणून पहिला चित्रपट होय. नवीन निश्चल तिचा पहिला हिरो. तेव्हापासून ते आजच्या तिच्या राज्यसभेतील खासदारकीपर्यंतचा रेखाचा बहुरंगी-बहुढंगी-बहुरुपी – बहुचर्चित प्रवास हा अनेक धुके-वळणे-घाट-दरी -चढ-उतार-आव्हाने-स्पीडब्रेकर धक्के अशा अनेक गोष्टींनी व्यापलेला आहे. पण या सगळ्यावर रेखाने आपली गुणवत्ता, मेहनत, व्यावसायिक रणनीती, फोकस वृत्ती, स्वतःवर प्रेम करण्याचा स्वभाव यातून मात करीत करीत आपले स्थान विलक्षण बळकट केले. आणि तेच तर महत्वाचे आहे. तिच्या मेहनतीला दाद द्यायलाच हवी.

जेमिनी गणेशनची ही मुलगी आज एक हिंदी आणि भारतीय चित्रपटसृष्टी तर झालेच पण अगदी जगभरातील सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिला २०१० साली पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. ते अतिशय उचित आहे. तेवढे आणि तसे कॉन्ट्रीब्यूशन तिचे आहे. तिचे किती चित्रपट सुपर हिट झाले, कोणते चित्रपट फ्लॉप्स झाले यापलिकडे जाऊन तिचे यश आहे. कोणत्याही कलाकाराचे प्रगती पुस्तक तपासताना हिट आणि फ्लॉपच्या पलीकडे जाऊन फोकस टाकायला हवा.

खरं तर बालकलाकार म्हणून रेखाने दिलीपकुमारची दुहेरी भूमिका असलेल्या ‘राम और श्याम’ या चित्रपटात भूमिका साकारलीय. त्यातील रामच्या वाढदिवसानिमित्ताने असलेल्या ‘आई है बहारे देखो….’ या गाण्यात रेखाचे बालकलाकार म्हणून रुप दिसते. या गाण्याचे चेन्नईतील ( तेव्हाचे मद्रास) येथे शूटिंग असताना रेखाची आई पुष्पवल्ली या स्टुडिओत रेखाला घेऊन गेली असता ही संधी मिळाली. अर्थात हे गाणे युट्यूबवर पाहताना तितक्या बारकाईने ते दिसणारे नाही. त्यात रेखा ओळखता येणार नाही. आणि सहजी ओळखता येईल अशी रेखा अजिबात नाही. त्यानंतर काही वर्षांनी या दोघी मुंबईत आल्या असता रेखाला ‘सावन भादो’ या चित्रपटात भूमिका मिळाली. रेखा या चित्रपटात बेढब दिसते. काहीनी या चित्रपटातील तिचे रुपडे पाहून तिचे नामकरण ‘काली कलुटी’ असे केले. तिने नटखट ग्रामीण युवती अगदी खटकेबाज पद्धतीने साकारली. ही अभिनयाची वेगळी शैली आहे. रेखाचा या चित्रपटातील वावर एकदम मुक्त होता. या चित्रपटाने मुंबईत मेन थिएटर नॉव्हेल्टीमध्ये रौप्यमहोत्सवी यश संपादले आणि रेखाची करियर मार्गी लागली, सिनेमाच्या जगात पिक्चर हिट म्हणजे बहुत कुछ असते, त्यातच जर पहिलाच चित्रपट सुपर हिट म्हणजे जणू चांगला परवानाच प्राप्त झाला. पण वाट आणि वाटचाल सोपी नव्हती.

अगोदरच्या पिढीतील वहिदा रहेमान, साधना, आशा पारेख, तनुजा, माला सिन्हा, शर्मिला टागोर, सायरा बानू, नंदा, मुमताज यांचा उत्तम जम बसला होता. तर त्याच सुमारास बबिता, हेमा मालिनी, राखी, लीना चंदावरकर यांचे जोरात आगमन झाले होते. त्यात मग योगिता बाली, झीनत अमान, परवीन बाबी, आशा सचदेव, जाहिदा अशा आणखीन काही नवतारकांचे आगमन झाले. रेखाला आपली वाटचाल करणे सोपे नव्हते. आपली स्पेस निर्माण करण्याचे आव्हान होते. हे वाटते तेवढे सोपे नाही. अथवा नसते. एकीकडे तिला नवीन निश्चलची नायिका म्हणून धर्मा, वो मै नही, बरखा बहार असे काही चित्रपट मिळाले. विश्वजीतची नायिका म्हणून अंजाना सफर, मेहमान असे चित्रपट मिळाले.

प्रत्येक काळात असे मसालेदार मनोरंजक चित्रपट पडद्यावर येत असतात आणि काही तारका त्यात सेक्स सिम्बल म्हणून भूमिका साकारत असतात. या चित्रपटांना फारसे कोणी सिरियसली घेत नसले तरी अशाही फिल्मची एक संस्कृती आहे. ती नाकारता येत नाही. आणि कधीकधी अशाच चित्रपटात भूमिका साकारत असतानाच काही वेगळे-धक्कादायक घडते आणि करिअरला गती येते, मिडियाचा अचानक फोकस्ड वाढतो. तो स्टार म्हणून उपयुक्त ठरतो.

रेखाच्या बाबतीत अशा दोन भारी घटना घडल्या आणि ती एकदमच प्रकाशित आली. ‘अंजाना सफर’च्या सेटवर आल्या आल्या आणि काय बरे होतेय हे समजायच्या आतच विश्वजीतने रेखाचे चुंबन घेतले आणि जणू सांस्कृतिक स्फोट झाला. तो काळ इतका मोकळाढाकळा नव्हता. सिनेमाच्या जगातही अशी धिटाई अभावानेच दिसे. ती यात दिसल्याने गॉसिप्स मॅगझिनना भरपूर खाद्य मिळाले. हे सगळे गाजतेय तोच आपले विनोद मेहराशी बिनसले अशा कारणास्तव रेखाने शिळा उपमा खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला ही बातमी सनसनाटी ठरली. यावर रेखाने चक्क पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली. खूप दिवस याची चर्चा रंगली.

गॉसिप्स मॅगझिनना यातून चटकदार असे बरेच काही मिळत राहिले. त्यांची ती सवय आणि सोय झाली. खरं तर एक अष्टपैलू अभिनेत्री आणि त्यामधील भावभावना, संवेदना असलेली स्त्री याचाही विचार व्हायला हवा. ते जास्त महत्वाचे आहे. जोडीला रेखाच्या पारंपरिक आणि मॉडर्न अशा दोन्ही प्रकारच्या फोटो सेशनची भर होतीच. त्याचा तिला कधीच कंटाळा आला नाही.

ख्यातनाम फोटोग्राफर जगदीश माळी मला एकदा म्हणाला, संपूर्ण चित्रपटसृष्टीत फोटो सेशनबाबत रेखाची क्षमता, उत्साह, सातत्य कमालीचे आहे. सतत ड्रेस बदलणे. ट्रॅडिशनल लूक असेल तर दागिने परिधान करणे याचा तिला कधीच कंटाळा असा नाही. सकाळी नऊ वाजता ती जेवढी फ्रेश असते तेवढीच संध्याकाळी सात वाजता असणार. तिची ही उर्जा विलक्षण कौतुकाची गोष्ट आहे. विशेष म्हणजे, एकदा जगदीश माळीला रविवारी रेखाच्या फोटो सेशनची असाइनमेंट असता तो तसे न करता आपले आवडते क्रिकेट खेळण्यास गेला. रेखाला प्रश्न पडला की, आपल्यापेक्षा महत्वाचे असे या खेळात असे आहे तरी काय? आणि ती चक्क जगदीश माळीची क्रिकेट मॅच पाह्यला गेली.

तिच्या करियरचा पुढचा एपिसोड म्हणजे तिचे एकेका हिरोशी नाव जोडले गेले. याचे श्रेय कोणी तिलाही देते. तिच्या सौंदर्यालाही देते. हा त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन झाला. किरणकुमार, शैलेंद्रसिंग असे करता करता अमिताभ बच्चन ! ( अधेमधे आणखीन काही नावे नसावी) शैलेशसिंगसोबत तिने लेख टंडन दिग्दर्शित ‘अगर तुम न होते’ (१९८३) साठी ‘कल तो संडे की छुट्टी’ हे गाणे गायली. गुलशन बावराच्या या गाण्याला राहुल देव बर्मनचे संगीत आहे. पडद्यावर हे गाणे राज बब्बर आणि रेखावर आहे.

रेखा आणि अमिताभ ही जोडी पडद्यावर आणि पडद्यामागे जोडी जमली ती रेखाच्या व्यक्तीमत्वात अंतर्बाह्य बदल होत जाण्याची सुरुवात होती. तिच्या अभिनयात कमालीचा आत्मविश्वास वाढला, तिची फोटो सेशन अधिक नेटकी आणि आकर्षक होऊ लागली, तिचे चित्रपट हिट, सुपरहिट होऊ लागले, तिचा चाहतावर्ग प्रचंड वाढला, ती सुपरस्टार झाली. सुखावणारे यश लाभले. या एकूणच घडामोडींवर अबब म्हणावेत असे आणि इतके किस्से, गोष्टी, कथा, दंतकथा, कुचाळक्या रंगल्या. हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील टॉप फाईव्ह गॉसिप्समध्ये लंबू आणि रेखा यांची अनोखी कहाणी आहे. रेखाच अमिताभला लंबू म्हणायची ही चौकटीतील बातमी झाली.

रेखा नावाचे कधीच न संपणारे पर्व अधिकाधिक व्यवस्थित आणि वेगाने सुरू झाले. आजही ते सुरुच आहे. तिचे जुने चित्रपट आपले अस्तित्व टिकवून आहेत, त्यामुळे तिचा बराच काळ एकादा चित्रपट रिलीज झाला नाही तरी फारसं बिघडत नाही.

तिच्या अमिताभशी असलेल्या संबंधातून अनेक गोष्टी घडल्या. महत्वाच्या सांगायच्या तर, या मैत्रीच्या नात्यावर गॉसिप्स मॅगझिन काही वाट्टेल ते लिहू लागली म्हणून तिने काही मॅगझिनशी कट्टी घेतली. म्हणून मग अमिताभनेही बराच काळ मिडियाशी चुप्पी घेतली.

या काळात जया बच्चन नेमका काय विचार करतेय यावरही चर्चा रंगली. तर यश चोप्रा दिग्दर्शित ‘सिलसिला’ याच त्रिकोणी नात्यावर आधारीत असल्याच्या चर्चेने प्रचंड धुरळा उडाला, फिल्मच्या पब्लिसिटीत तसेच फोकस होत गेले. पण या चित्रपटात तसे काही नसल्याने प्रेक्षकांनी पाठ फिरवली. आणि याच टप्प्यावर हे अफेअर थांबले. (खरं तर ‘सिलसिला’च्या थीमवर बी. आर. चोप्रा दिग्दर्शित ‘गुमराह’ या चित्रपटाचा बराचसा प्रभाव आहे. उत्तरार्धात वेगळे वळण घेतलेय इतकेच) पण हिंदी चित्रपटसृष्टीतील बहुचर्चित अफेअर्सचा विषय निघाला की निघाला या जोडीची आठवण येतेच, इतके आणि असे ते तापलं-गाजलं-रुजलयं-शिजलयं-मुरलयं. फिल्म दीवाने याची पुन्हा पुन्हा आठवण काढतात. रिपीट व्हॅल्यू असलेले हे एक महागॉसिप्स.

मुजफ्फर अली दिग्दर्शित ‘उमराव जान’ (१९८२) च्या अभिनयासाठी रेखाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला हा तिच्या उंची करियरमधील हायपॉईंट ठरला. तिने विलक्षण ताकदीने ही भूमिका साकारली. खय्याम यांचे संगीत आणि आशा भोसले यांच्या पार्श्वगायनाची साथ मिळाली. रेखाला या चित्रपटाने तिला नवीन ओळख, प्रतिष्ठा मिळाली. (नवी दिल्लीतील सोहळ्यात हा पुरस्कार स्वीकारताना ती मांग मे सिंदूर भरुन गेली त्यावरही गॉसिप्स सवयीचा भाग ) एक आदर्श अभिनेत्री म्हणून तिचा आदर होऊ लागला हे जास्त महत्वाचे आहे.

अर्थात याच सगळ्या प्रवासाला दीर्घकालीन अशी समांतर तिची पारंपरिक आणि मॉडर्न अशा दोन्ही रुपातील फोटो सेशन अधिक नेटकी आणि आकर्षक होऊ लागल्याने त्याबाबतही ती आकर्षणाचा केन्द्रबिंदू राहिलीच. अशा दोन्ही स्तरावरची ती सम्राज्ञी ठरली. एक मोठा प्रवास सुरू राहिला. आणि ‘रेखा म्हणजे चर्चा अथवा बातमी’, रेखा म्हणजे कुतूहल, रेखा म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीची एक महत्त्वाची ओळख, रेखा म्हणजे बरेच काही, रेखा म्हणजे मिडियाचे आकर्षण असेही घडत राहिले. खरं तर एक व्यक्ति म्हणून रेखा अतिशय समंजस आणि सुसंस्कृत आहे. आणि तिच्या एकूणच प्रभावी व्यक्तिमत्वात त्याच गुणाचा जास्त वाटा आहे. हे अधिकाधिक प्रमाणात अधोरेखित व्हायला हवे. त्याशिवाय ती अशा अनेक गोष्टींचा सामना करु शकत नाही. एक व्यक्ती म्हणून स्ट्रॉन्ग असणे किती आणि कसे आवश्यक असते यासाठी रेखा आदर्श आहे. नक्कीच आहे.

अभिनेत्री म्हणून तिने दो आखे, मेहमान, ऐलान, खून खून, रामपूर का लक्ष्मण, दफा ३०२, डबल क्रॉस, मांग भरो सजना, ऑचल, अगर तुम न होते, लढाई, शेषनाग, झूठा सच, आस्था, बरखा बहार, अॅग्रीमेंट, अपना बना लो, जानी दुश्मन, जाल, जलमहल, नागिन, दो मुसाफिर, संतान, धरम करम, खलिफा, दुनिया का मेला, आक्रमण, खून भरी मांग, प्राण जाए पर वचन न जाए, कहानी किस्मत की, आलाप, इमान धरम, दो अन्जाने, खलिफा, जाल, दुनिया का मेला, झूठा सच, जाल, जान हथेली पे, इजाजत, अपने पराये, जमीन आसमान, आप की खातिर, कर्तव्य, चेहरे पे चेहरा, बिवी हो तो ऐसी, फूल बने अंगारे, किमत, प्यार की जीत, गीतांजली, कलयुग, कर्तव्य, खिलाडीयों का खिलाडी, झुबेदा, काली घटा, कहते है मुझको राजा अशा असंख्य चित्रपटात भूमिका साकारत आपली यशस्वी वाटचाल कायम ठेवलीय.

अगदी सुषमा शिरोमणीने आपल्या ‘फटाकडी’ या चित्रपटात तिला ‘कुठं कुठं जायाचं हनिमूनला’ या फक्कडबाज लावणी नृत्यावर तिला नाचवले. मराठी चित्रपटातील हे पहिले आयटेम साँग आहे आणि ते असे आणि इतके सुपर हिट ठरले की आजही त्या गाण्याचा ठसा आणि ठसका कायम आहे. तसा तिने अर्जुन हिंगोरानी दिग्दर्शित ‘कहानी किस्मत की’ च्या धर्मेंद्र तिची छेडछाड करतो त्या रफ्ता रफ्ता देखो मेरी… गाण्यात अगदी शेवटी अगं ये जवळ ये लाजू नकोसच्या वेळी मराठी ठसका दाखवलाय.

चित्रपटाच्या सेटवरची रेखा हा एक वेगळा आणि मी आवर्जून अनुभवलेला विषय आहे. पूर्वी आम्हा सिनेपत्रकाराना आवर्जून सेटवर बोलावले जाई अथवा स्वत:हून जरी स्टुडिओत गेलो तरी सेटवर जाता येत असे. ते दिवसच वेगळे होते, छान होते. तेथे कोणते शूटिंग चाललयं, स्टार कसे वागताहेत, जमल्यास एकादी मुलाखत, दिग्दर्शकाशी अथवा टेक्निशियनशी संवाद अशा गोष्टी साध्य होत. अशातच रेखा सेटवर असेल तर? तर मग जायलाच हवे ना? काही अनुभव सांगतो.

रेखा अनेकदा तरी आपल्या कुत्र्याला घेऊनच सेटवर येई. पांढरा शुभ्र असा तो होता. आम्हा सिनेपत्रकारांना तो नेहमीच दिसे. विशेषत: तिच्या घराजवळच्या मेहबूब स्टुडिओत (वांद्रे) शूटिंग असेल तर हमखास ती आपल्या कुत्र्याला घेऊन येई. तुम्हालाही माहितेय की सिनेपत्रकारितेत अशा गोष्टी चघळल्या जातात. त्यात असे काय असते असा प्रश्न अजिबात करु नका. त्यावरुन बरेच काही फनी अथवा टवाळी केली वा लिहिली जाते. आता त्यातूनही त्या स्टारची पब्लिसिटी होत राहते हादेखिल भाग आहेच म्हणा.

एकदा का सिनेमातील स्टार म्हटल्यावर छोट्या छोट्या आणि खरी-खोटी गोष्टीचीही बातमी होत असते हे सर्वात मोठे वास्तव आहे. आपला हाच कुत्रा निधन पावल्यावर रेखाने चक्क फिल्म फेअरमध्ये त्यावर अतिशय भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणारा लेख लिहिला. आणि त्यांनी तो ग्लॉसी पेपर प्रसिद्ध केला. खरा स्टारडम म्हणतात तो हाच आणि रेखाला तो कायमच मिळाला अथवा रेखाच्या असंख्य छोट्याछोट्या गोष्टी न्यूज होऊ लागल्या. हे एव्हाना आपल्या लक्षात आलं असेलच.

एकदा आम्हा काही सिनेपत्रकाराना गोरेगावच्या फिल्म सिटीमध्ये ललित कपूर निर्मित आणि असरानी दिग्दर्शित ‘उडान’ या चित्रपटाच्या सेटवर निर्मात्यानी बोलावले असता मॅडम रेखाचा मूड काही वेगळाच होता. आम्हा सात आठ सिनेपत्रकारांची यादी तिने मागवून घेतल्यावर त्यात ब्लिटझचा प्रतिनिधी असल्याचे पाहून रेखाने आम्हा सर्वच सिनेपत्रकाराना सेटवरून बाहेर जायला लावले. त्या काळात तिचा सिने ब्लिटझशी वाद होता आणि त्याचा संबंध तिने ब्लिटझशी लावला. पण रेखाच्या अशा वागण्याचीही बातमी आम्ही केली. कारण सिनेमाच्या जगात असेही घडते हे स्टारच्या चाहत्यांना समजायला हवेच.

असेच एकदा मेहबूब स्टुडिओत ‘शेषनाग’च्या सेटवर घडले. नागिणीचे रुप घेऊन रेखा एका गाण्यावर नृत्य करतेय या गोष्टीला भरपूर मिडिया कव्हरेज निश्चित मिळेल अशी निर्मात्याची अपेक्षा होती. पण नृत्य दिग्दर्शिका सरोज खानच्या स्टेप अंमलात आणणे रेखाला जड जातं होते. सारखे टेक रिटेक वाढत होते. याचा राग येऊन रेखाने आम्हा सिनेपत्रकाराना सेटबाहेर काढले. यावर बरेच काही लिहिले गेले. यात गॉसिप्स मटेरियल जास्त होते आणि काही दिवसांनी सरोज खानची एक मुलाखत गाजली. याचे कारण म्हणजे त्या मुलाखतीचे हेडिंग होते, रेखा नव्हे वक्ररेखा… रेखाच्या अशा गोष्टी अनेक. तिचे आणि तिची सेक्रेटरी फरझाना यांचे कुछ खास रिश्ते आहेत असे स्कूप प्रसिद्ध केलेल्या एका गॉसिप्स मॅगझिनला तिने कोर्टात खेचले आणि सुनावणीच्या वेळी ती चक्क बुरख्यात आली आणि अर्थात त्याचीही बातमी झाली. पण एकाद्या स्टारच्या इतक्या खाजगी आयुष्यात डोकवायचे का? गॉसिप्स मॅगझिन त्यावरच जगत असली तरी काही तारतम्य हवे की नको?

रेखा आणि फिल्मी वाद हेदेखील एक घट्ट समिकरण झाले आणि त्यातूनच रेखाची ‘डिफिकल्ट स्टार’ अशी इमेज झाली. तशा गोष्टी स्टारची इमेज आकाराला आणत असतात. टीटो आणि टोनी निर्मित ‘राम बलराम’च्या सेटवर दिग्दर्शक विजय आनंदशी तिचा झालेला पंगा खूप गाजला. इतका की त्या दिवसांत रेखाच्या म्हणण्याला महत्व आले आणि विजय आनंदचा सगळा कल आपल्या कामातून काय ते बोलण्याचा! विजय आनंद शिस्तबद्ध दिग्दर्शक आणि रेखा लहरी. त्यामुळे त्यांचे सख्य जमणे शक्यच नव्हते आणि झालेही तसेच ! एक तर तिने या चित्रपटासाठी तारखा देण्यात सतत टाळाटाळ केली.

विजय आनंद उत्तम संकलकही असल्याने त्याने पटकथा एडिट केली आणि रेखाची शक्यतो गरज कमी लागेल असे पाहिले. ‘येथे दिग्दर्शक दिसतो’ असे म्हणायला हवे. पण त्याच वेळेस रामसेबंधू दिग्दर्शित ‘घुंघरु की आवाज’मध्ये चक्क विजय आनंद आणि रेखा नायक नायिका होते. हा योग छान होता. तेथे तशी तडजोड शक्य नव्हते. मग काय करणार? रेखाची ड्युप्लीकेट वापरुन हा चित्रपट पूर्ण केला. या दोन्हीची गॉसिप्स मॅगझिनमधून भरपूर उलटसुलट चर्चा रंगली. हे पुन्हा वेगळे सांगायला नकोच. हा चित्रपट पडद्यावर आला तोच जाण्यासाठी हे पुन्हा वेगळे सांगायला नकोच. रखडून रखडून बनलेल्या फिल्मचे काय होणार?

रेखाचे १९८८ साली नवी दिल्लीतील उद्योगपती मुकेश अगरवाल यांच्याशी लग्न झाल्याचे फारच कमी जणांना माहिती असेल. तेव्हाही तो आश्चर्याचा धक्काच होता. सिनेमा क्षेत्रातील व्यक्तीशी न करता ही तिची निवड कोणती हा एकमेव प्रश्न अनेकांना पडला. जुहूच्या इस्कॉनजवळच्या एका देवळात ते झाले. एवढी मोठी स्टार आणि चक्क देवळात लग्न असा कदाचित तुमच्या मनात प्रश्न आला असेलही. पण सगळे काही अचानक, भरभर आणि धक्कादायक घडले. ना बॅण्ड ना बारात. ना नाचकाम. वृत्तपत्रात पहिल्या पानावर सिंगल कॉलम बातमी आली इतकेच. कारण, लग्न समयी कसलाच बार उडाला नव्हता. गॉसिप्स मॅगझिननी मात्र बरेच शोधकाम करुन कव्हर स्टोरी, इनसाईट स्टोरी, स्कूप रंगवले. रेखा म्हटले की मिडिया भरपूर फोकस टाकणार हे घट्ट समीकरण होते.

लग्नानंतर दोघे युरोपमध्ये हनिमूनला गेले. काही गॉसिप्स मॅगझिनने त्याचे ग्लॅमरस फोटो फिचरही केले. इकडे, काहीनी ‘रेखा आपली राहिली नाही’ असे गंमतीदार लेखही लिहिले. ती चाहत्यांच्या मनातील एक सहजभावना होती. कोणी गंमतीने घेतले तर कोणी गांभीर्याने! अरेरे, अवघ्या सहाच महिन्यात रेखाच्या पतीने म्हणजे मुकेश अगरवालने दिल्ली येथील आपल्या घरी आत्महत्या केली, तोदेखिल रेखाच्याच दुपट्ट्याने! आणि सगळेच अवाक झाले. सलिम जावेदच्या स्क्रीप्टपेक्षा ते भारी घडले. या दुर्दैवी घटनेचा रेखाच्या लोकप्रियतेवर परिणाम झाला नाही हे नमूद करायला हवे. आणि हेच रेखाचे वैशिष्ट्य आहे.

अशा काही घटनांमुळे रेखा म्हणजे गूढ, रेखा म्हणजे कोडे, रेखा म्हणजे रहस्य, रेखा म्हणजे अनाकलनीयता, रेखा म्हणजे घटनांची मालिका, रेखा म्हणजे मॅगझिनची कव्हर स्टोरी असेही म्हटले गेले. रेखाला अनेक प्रकारची उपाधी दिली जाते ही तर केवढी खासियत.

प्रकाश मेहरा निर्मित आणि हॅरी बवेजा दिग्दर्शित ‘मुझे मेरी बिवी से बचाओ’ या चित्रपटाचे जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शूटिंग असताना त्याच्या रिपोर्टींगसाठी हजर असलेल्या आम्हा काही सिनेपत्रकारांशी रेखाने चक्क गप्पा करण्याची इच्छा व्यक्त केली, केवढा सुखावलो हो मी. माझ्या करियरमधला हा हायपॉईंट आणि महत्वाचे म्हणजे तेव्हा मला रेखाचा खूप चांगला अनुभव आला. ती एक विचारी आणि संवेदनशील व्यक्ती आहे, आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टींकडे ती तटस्थपणे पाहते, तिची आपली स्वत:ची अशी काही मते आहेत असे तिचे काही गुण लक्षात आले. या भेटीवर मी बरेच लिहिले. पण फिल्मी मॅगझिननी तिची प्रतिमा खूप लहरी, वादळी तरी ग्लॅमरस अशी करुन ठेवलीय आणि तीच खरी रेखा असा एक समज रुळला.

रेखा म्हणजे असचं काही आकर्षक तरी वादग्रस्त, स्टार अॅण्ड स्टाईल तरी बेभरंवशाची अशी इमेज एस्टॅब्लिज झाली आहे. जगभरातील रेखाचे फॅन्स आणि फॉलोअर्स तिला असेच ओळखतात आणि त्यानाही तेच आवडतयं. रेखाच्या वांद्रे येथील बॅण्ड स्टॅन्ड परिसरातील बंगल्यावरचा सिक्युरिटी गार्ड कोविड पेशंट ठरला, म्हणून रेखाने आपली कोरोना तपासणी करू दिली नाही, याचीही बातमी झालीच हो.

रेखाची राज्यसभेतील खासदार म्हणून वर्णी लागली हा तिचा योग्य सन्मान म्हणायला हवा. काय गंमत आहे बघा, जया बच्चन आणि रेखा एकाच सभागृहात! आता हे योगायोगाने झाले की कळत नकळत हा विषय वेगळा, ‘सिलसिला’ नंतर त्यादोघी एकाच फ्रेममध्ये आल्या हा रिअॅलिटी शो का बरे नाकारा? याकडे फिल्मी दृष्टिकोनातून पाह्यचे की राजकारणाच्या या प्रश्नाचे उत्तर न शोधलेले बरे.

हिंदी तर झालेच पण एकूणच हिन्दुस्तानी चित्रपटसृष्टीतील आपल्या अनेक वैशिष्ट्यांनी स्टार असलेल्या रेखाच्या करियरला चक्क पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत असे वाटत नाही यातच बरेच काही येते. रेखाच्या यशाची मोजदाद करण्यासाठी तराजू अथवा कॅल्क्युलेटर नाही. कारण यात एकात एक अनेक प्रकारच्या गोष्टी गुंतत गुंफत गेल्या आहेत. आणि त्यातच गंमत आहे.

अशा मोठ्या आणि वादळी आणि वळणावळणाच्या करियरमधील तिचे टॉप टेन चित्रपट सांगायचे तर, मोहन सैगल दिग्दर्शित ‘सावन भादो’, रणधीर कपूर दिग्दर्शित ‘धरम करम’, हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘खुबसुरत’ माणिक चटर्जी दिग्दर्शित ‘घर’ प्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘मुकद्दर का सिकंदर’, यश चोप्रा दिग्दर्शित ‘सिलसिला’, मुजफ्फर अली दिग्दर्शित ‘उमराव जान’, गुलजार दिग्दर्शित ‘इजाजत’, उमेश मेहरा दिग्दर्शित ‘खतरो के खिलाडी’ आणि बासू भट्टाचार्य दिग्दर्शित ‘आस्था’ हे आहेत… निवडताना बहुरुपी आणि शक्यतो विविध स्वरुपाच्या दिग्दर्शनातील रेखा ‘फोकस’ होईल असाच विचार केला.

रेखाच्या सर्वच चाहत्यांना ही निवड आवडेल असे अजिबात नाही. आणि तसे होणे हेच रेखाचे यश आहे. यात मनमोहन देसाई दिग्दर्शित ‘रामपूर का लक्ष्मण’, राकेशकुमार दिग्दर्शित ‘मिस्टर नटवरलाल’, राकेश रोशन दिग्दर्शित ‘खून भरी मांग’ असे चित्रपट का नाहीत असा प्रश्न पडू शकतो; पण तेच तर रेखाचे यश आहे.

हा सगळा एक ट्रेलरच वाटावा अशी रेखाची चौफेर वाटचाल आणि अफाट कर्तृत्व नक्कीच आहे. रेखा एकच आहे, रेखा एकच असू शकते. रेखा असं म्हणताच एकाच वेळेस डोळ्यासमोर अगणित गोष्टी नक्कीच येतात हेच तर महत्वाचे आहे ना?

-दिलीप ठाकूर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..