आपण वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाल्याची गोष्ट ऐकली आहेच. वाटसरुंना लुटणारा हा वाल्या कोळी या कलियुगातही अवतरला आहे सरकारच्या आणि टोल वसूली कंत्राटदारांच्या रुपाने. तो आता आधुनिक झालाय. त्याने राज्यभरातल्या सगळ्या हमरस्त्यांवर टोलची दुकाने थाटली आहेत. तो एकटा नाही राहिला. त्याच्या पापात नेते, अधिकारी, वसुली कंत्राटदार ही सगळी मंडळी वाटेकरी आहेत.
हमरस्ते तर सोडाच, आता त्याचं लक्ष गेलंय छोट्या छोट्या रस्त्यांवरही.
अण्णा नामक एका संताने त्याला शहाणं करायचा प्रयत्न केला पण तो बधला नाही. काही दुष्ट मंडळी त्याच्याविरुद्ध कोर्टातही गेली पण तिथेही त्याचंच पारडं जड होतं. का तर म्हणे त्याच्याशी थेट सरकारनें असा करार केला होता की सरकारसाठी तो भस्मासूराचा अवतार ठरला.
महाराष्ट्रभर धुमाकुळ घालत असलेल्या टोलच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना-भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणूकीपूर्वी आंदोलने केली होती. टोलचा विषय राज्यभर गाजला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तर टोलचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केल्याचा दावा केला होता. त्यानंतर त्या अभ्यासाचा अहवालही मुख्यमंत्र्यांना दिला होता म्हणे. मात्र पुढे त्याचे काय झाले ते त्यांचे त्यांनाच माहित. मनसेचे ते आंदोलन मात्र गुंडाळण्यात आलेले जनतेच्या लक्षात आले.
या वर्षी पुन्हा छोटी-मोठी आंदोलने झाली. कोल्हापूरातले आंदोलन तर जबरदस्त झाले. सरकारने आंदोलन करणार्या संघटनांना चर्चेसाठी बोलावले होते. चुकीच्या पद्धतीने सुरू असलेले टोल बंद करण्यात येतील असे आश्वासनही शासनाने दिले होते. मात्र या आंदोलनांची हवा कमी होते ना होते, तोच लोकसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वीच टोल दरवाढीचे आदेश काढण्यात आले आहेत.
कार व हलक्या वाहनांना ३० रूपये तर मिनिबसला ४५ रूपये, बससाठी ८७ रूपये, थ्री एक्सल वाहनांसाठी १५२ रूपये, मल्टिएक्सल वाहनांसाठी २०१, ट्रकसाठी १६४ रूपये अधिक मोजावे लागणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी आर्थिक भूर्दंड सोसावा लागणार आहे. नवीन टोलचे दर १ एप्रिल २०१४ पासून ३१ मार्च २०१७ रात्री १२ या कालावधीसाठी असणार आहेत.
एकूणच राज्यकर्ते जेव्हा म्हणतात… “शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती”.. तेव्हा जनता एवढेच म्हणू शकते .. ”थोडे दिवस थांबा…. मतपेट्या सील व्हायच्या आहेतच… पाच वर्षातून एकच वेळ असते जेव्हा तुम्हाला थोडी-फार धाकधूक असते, भीती असते, ती म्हणजे निवडणूकांचा मोसम. कदाचित “झाडू”ने तुमची साफसफाई होईल, “इंजिना”च्या मागे लटकवून यात्रा निघेल आणि चिखलातल्या “कमळां”ना तुमच्या खुर्चीवर बसवून तुम्हाला पाच वर्षांसाठी तिथेच रहावे लागेल.
महाराष्ट्रातल्या आम जनतेला सरकारच्या गुळगुळीत रस्त्यांवरुन गाड्या चालवण्यासाठी लाख लाख शुभेच्छा !
— निनाद अरविंद प्रधान
Leave a Reply