चार दिवसापासून भाऊ कदम आणि ओंकार भोजने या जोडीला पाकिटात घेऊन फिरत होतो म्हणजेच नाटकाचे तिकीट घेवून हो….दिवस उजाडला… संध्याकाळी ७ लाच ऑफिस मधून कल्टी मारली….दोन घास खावून पोरा बाळांना घेऊन नाट्यगृहाच्या गेटवर गाडी लावून दाराशी हजर…. गेटवाला भाऊ (भाऊ कदम नव्हे) बोलला…भाऊ नाटक गह्यरे उशिरा सुरू झाले…तुम्ही या फिरीसन…झाले एक तास काय करू सगळे… यू टर्न मारला…आणि भाऊंचे उद्यान (भवरलाल भाऊचें ) गाठले, श्री दत्ताच्या पाया पडून गार्डनच्या फेऱ्या मारल्या….चांगले एक किलो वजन कमी झाले असेल असे वाटायला लागले…आणि चला चला वेळ झाली म्हणून गृहमंत्री आले…परत त्याच जागी आलो तर गर्दीच गर्दी..अजून पहिला शो सुटलेला नव्हता….आणि गेटवाला दादा मध्ये पण घेत नव्हता… पब्लिक डिमांड मुळे अखेर कंपाऊंड मध्ये प्रवेश मिळाला…९.१५ च्या आसपास शो सुटला…पण सेल्फी मुले लोक उशिरा आले बाहेर…असो शेवटी प्रवेश झाला…महा…नग..र (महानगर असे लिहायला त्रास होतो) पालिकेच्या नाट्यगृहात… बाल्कनीत रांगेत ६ तिकिटे आमची….बसलो एकदाचे आणि बोटीत बसण्याचा भारी feel आला…कारण सगळ्या खुर्च्या एक जरी हलला तरी डोलत होत्या….त्यात गृहमंत्री फक्त खोकल्या तरी मस्त अंग थरथरत होते…भारीच…एवढ्यात लाइट गेली ..काळोख पूर्ण..फक्त फेसबुक..व्हॉट्स अप.. रिल्स बघणारी तोंड चमकत होती…मध्येच लाईट यायची ..जायची…स्टेजवर पूर्ण अंधार होता… खुर्च्या वरचे लाईट सुरू…आणि बाकी सगळे बंद…आम्ही इलेक्ट्रिकल इंजिनियर असल्याने….ओळखले की कूछ तो गरबड है भाऊ…ऐसा लाइट लूक झाक नही करता…१०.१५ झाले…. इव्हेंट वाले दिनेश भाऊ (भाऊ कदम नव्हे)आले…५ मिनटात होईल सुरू प्रयोग.. टाळ्या वाजवून दाद दिली सगळ्यांनी…कारण आपण जळगावकर अती सहनशील…खूपच… हे झाले आजूबाजूचे वातावरण…वाचून तुम्ही नाट्यगृहात पोचल्याचा feel येत असेलच…
आता माझा जांगळबुत्ता कोणी केला….माझ्या बाजूला ७५ तरीचे बाबाजी आणि एक ६०चे काकाजी येवून बसलेले…. एक कान खूप पकला…टाईमपास करणेका था…मग बाबाजी ने काकाला अख्या मोबाईलची गॅलरीच दाखवली…विमान… हेलिकॉप्टर…बर्फ.. गॉगल..जंगल…काय अन् काय…सगळे फोटो दाखवून ..त्या प्रत्येक जागेची महती सांगितली…मग मध्येच हा असा उशीर पुण्याला झाला असता तर…चालले असते का…पुणेकर वेळेचे पक्के…काका बोल्ले पिक्चर टाकी असती तर लोकांनी अंगावर घेतली असती….खुर्च्या तोडल्या असत्या….ब्ला ब्ला ब्ला…मग अजून टाईमपास कसा तर…खाली ८०० रुपयाचे तिकीट काढलेल्या भाऊला (भाऊ कदम नव्हे) फोन लावला…त्याला पिळला….खूप पिळला…आम्ही तर ३००चे काढले….तुम्ही ८०० चे काढले…३०० गेले तर वाटणार नाही…तुमचे कसे होईल…थंडी वाजतेय का खाली… अडी गह्यर गरम हुई राहलय….मग हा इव्हेंट वाला भाऊ (भाऊ कदम नाही)मह्या घरच्या जोय राहतो….सकाळीच ३०० मांग्याले जान पडीन … हे झाल की परत पुण्याचा डायलॉग….मग नाटक पाहायला येणारे सगळे सज्जन म्हणून काही बोलत नाहीये म्हणे…अगदी नॉन स्टॉप दोघांचे एक कानात सुरूच….दुसऱ्या कानाला रमा राघव ची सीरियल सुरू मॅडमची….म्हंटले इथे पण हेच..मग करू तरी काय… हे उत्तर…१८ वर्ष झाली लग्नाला …काय बोलणार ना माणूस…दुसरी पण सीरियल संपली…पाहून….या सगळ्यात एक मावशी मागे तिसऱ्या रांगेत….दर १० मिनिटाला ….साहेब पैसे परत द्या….नाटक होईल की नाही ते सांगा…आताच द्या पैसे….असे कुठे चालते का…८.३० चे नाटक १०.३० झाले तरी नाही सुरू केले….पैसे परत द्या….मावशीचा आवाज माझ्या कानापर्यंत येवून परत जात असेल एवढाच….पण रेगुलर ठरवून मावशी पिंगा घालत होत्या….मेरे पैसे मेरे पैसे….वाटलं आपणच देवून टाकावे हिला ३०० रुपये…निदान टिक टिक तरी बंद होईल ….पोर बाळ पण कंटाळली…मध्येच परत इव्हेंट वाले भाऊ(भाऊ कदम नाही हो)आले आता फक्त २ मिनिट….लागतील …उठून बाहेर गेलेली ८०० वाली पब्लिक जागेवर आली ….वाटले बाबा..काका..मावशी…मॅडम…. शांत बसतील…लाईट आली…चमकली..आणि मस्त…अंधार झाला….झाले…मावशी जरा सुर लावत… बोल्ल्याच..समजायचे ते समजलो….कारण ऐकण्या शिवाय पर्याय नव्हताच ..माझ्याकडे पण…यात सोबत Dad आलेले….त्यांनी तिकीट मागितली काढलेली….म्हटले पाहत असतील ….तर त्यांनी तिकिटावरचा मोबाईल नंबर डायल केला….पलीकडून कोण बोलले काय माहित..फोन कट झाला …डोक्याला हात लावण्या वाचून पर्याय नव्हता….१०.४५ झाले …आणि आवाज आला…. अजून ५ मिनिट द्या…..झाले…बाबाजी बोलले….झोप येतेय आता म्हातारा माणूस मी…मावशी…बोलल्या..नोकरीवरून थकून भागून येतो आम्ही…असे काय करताय..पैसे परत द्या… हुश….डोकं फुटायची वेळ आलेली आता….११ वाजले….स्टेजवर ५/६ डोकी आली…अंधार असल्याने कपडे तेवढे दिसत होते … पांढऱ्या कुर्त्यात आणि धोतरात माणूस दिसला (भाऊ कदम हेच आपले)आणि शेजारी लाल शर्ट फक्त…( कदाचित ओंकार भोजने हेच)…..झाले… लाइट मध्ये प्रॉब्लेम असल्याने….आणि महा नग…. र.पालिकेच्या सौजन्याने generator नसल्याने आजचा प्रयोग होणार नाही अशा केविलवाण्या शब्दात आयोजक सांगून मोकळे झाले…कदम भाऊ सुद्धा हळू आवाजात काही बोलले की….क्षमा करा बिघाड झाल्याने आजचा प्रयोग नाही करू शकत….झाले….३ तास मनोरंजन बाबा ..काका मावशी यांनी केले….
आता जाता जाता बाबा… हे जर पुणे असते ना भाऊ..नुसत्या शिव्या दिल्या असत्या….असे चाललेच नसते… हे सुरू झाले….त्यात खाली स्तेजजवळ एक काकां आले…मी ५० किलोमीटर वरून आलोय….नाटक पाहायला…सुरू करा… आताच करा….आता काय करतील आयोजक…बिचारे…मुद्दाम थोडी केले त्यांनी….एक जण बोलला मला आताच ऑनलाईन पैसे पाठवा….काय करतील…ते…त्यांनी का गोणी मध्ये पैसे आणले असतील का…परत करायला….कठीण काळ सगळा …बाबा उठले …काकांना बोलले…त्याने घरून पैसे पण आणले ना… अडी सकाळ हुई जाईन भो.. नंबर लागत लागत….त्या भाऊ कदम च तोंड बी दिसत नाहीये…त्याच्या तोंडावर बट्रिक चमकवा रे भो…..निदान दिशिन तरी भाऊ..अशी शेवटची आर्त हाक मला ऐकू आली…आणि मी जायला निघालो….ऐकून नाट्यगृहाची गुणवत्ता….लक्षात आली….बाहेर पडताना नाट्यगृहाची कोनशिला छान होती … आताचे माननीय उप मुख्यमंत्री… तेव्हाचे मुख्यमंत्री याचे नाव सुवर्णा अक्षरात छान चमकत होते…. कोनशिलेची गुणवत्ता छानच अगदी…असो आपल्याला काय…नाटक पाहायचे सोडून बाबा …काका..मावशी हा तीनपात्री प्रयोग फुकटात ऐकण्याचा योग प्राप्त झाला …अजून काय हवे …गाडी काढली सगळे घरी आलो….हळदीच्या दुधाने जखमेवर उतारा केला आणि लिहायला घेतले…
नाटकाचे नाव करून गेला गाव होते …आणि मला …करून गेला जळगाव सुचले…. सूचना – राजकीय भक्तांनी या पोस्टशी स्वतचा दूर दूर पर्यंत संबंध जोडू नये….फक्त तेवढे जरा नाट्यगृहाचे काम चांगले करून द्या….आम्ही आमचे ६ तिकिटांचे पैसे १८०० रुपये परत घेऊच…..चूक भूल माफ असावी.
आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुपवरील लेखक धीरज महाजन ह्यांनी लिहिलेला हा लेख
Leave a Reply