काही काही नाटकं ही नाटकाचं नाव बघून, निर्मिती संस्था ,दिग्दर्शक कलाकार बघून लगेच बघावी अशी वाटतात….. असच एक नाटक म्हणजे “३८ कृष्ण व्हिला”. नाटकाचं नाव बघूनच वाटत की, हे एक मर्डर मिस्टरी ,किंवा गूढ अनामिक रहस्यमय असं असावं,पण आपल्याला पहिला धक्का तिथेच बसतो….हे नाटकात रहस्य आहे, धक्का आहे, काय घडत असेल या व्हीला मधे याची सतत उत्कंठा निर्माण करणार आहे….
पडदा उघडतो तेव्हा आपल्याला एक सुंदर अभिरुची संपन्न अस घर समोर येत…..या घरात प्रवेश करणारी व्यक्ती एक मध्यमवयीन श्रीमंत सुखवस्तू आहे..पण ती जरा अस्वस्थ ,कोणाची तरी वाट बघणारी अशी आहे….आणि डोअर बेल वाजते आणि एका मध्यमवयीन देखण्या स्त्रीचा प्रवेश होतो….आणि तेथूनच मनाची पकड घेत… शब्दांचा खेळ रंगत जातो आणि आपण नकळत त्यात गुंतत जातो. कोण असतो तो मध्यम वयीन गृहस्थ आणि ती देखणी स्त्री! प्रसिद्ध लेखक देवदत्त कामत (डॉ. गिरीश ओक) यांना साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च ‘अक्षररत्न’ पुरस्कार जाहीर झालेला असतो. हा पुरस्कार त्यांनी स्वीकारू नये, असा विचित्र आग्रह नंदिनी चित्रे (डॉ. श्वेता पेंडसे) या महिलेचा आहे. त्यासाठी ती कामतांना निनावी फोन करून वारंवार सांगते. कामत ऐकायला तयार नसतात, म्हणून नंदिनी कोर्टाची नोटीस धाडते. प्रकरण कोर्टात जाण्यापूर्वी नंदिनीची समजूत घालावी म्हणून कामत नंदिनीला ‘३८ कृष्ण व्हिला’ या त्यांच्या निवासस्थानी बोलावून घेतात. नंदिनी प्रवेश करते आणि नाटक सुरू होते. कामत तिला समजावण्याचा प्रयत्न करतात; पण ती काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. पुरस्कार स्वीकारायचा नाही, यावर नंदिनीला निर्णय हवा असतो. कामत तिला शांत करण्याचा, तिच्या विचित्र आग्रहाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यावर ती तुम्ही खोटारडे आहात. ‘यक्ष’ या टोपण नावानं लिहिलेल्या ‘भग्न’ या कादंबरीला भारत सरकारचा सर्वोच्च ‘अक्षररत्न’ पुरस्कार जाहीर झाला, पण ही कादंबरी तुम्ही लिहिलीच नाही, असा आरोप करते. ‘भग्न’ या कादंबरीसह ‘बिंदूवलय’, ‘व्यूहचक्र’, ‘समाधी’, ‘वरचढ’, ‘मध्यस्थिती’ या साहित्य कलाकृतीही तुम्ही लिहिल्या नाहीत, असा गौप्यस्फोट करते.
आणि नंतर सुरू होतात वार, प्रहार, प्रतिवाद जेवढं जेवढं म्हणून नंदिनी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करते , तितके तितके ते तिला आपल्या युक्ती वादाने निष्प्रभ करतात….अगदी तुम्ही एक मनोरुग्ण आहात ,तुम्ही माझ्यावर गंभीर खोटे आरोप करीत आहात,तुम्हाला counciling ची गरज आहे इथपर्यंत ते तिला पटवून देतात…ती देखील त्यांच्यापुढे हतबल होते आणि जायला निघते आणि तिथेच देवदत्त कामत तिला थांबवतात तिच्या हातात एक हस्त लिखित देतात आणि एक गौप्यस्फोट करतात….आणि याच कर्टन लाईन वर पहिला अंक संपतो आणि आपण देखील पुढे काय होणार असं म्हणत थोडा श्वास टाकतो….. पुढे काय होतं,कथानक काय वळण घेत.ट्विस्ट काय आहे हे प्रत्यक्ष पाहण्यातच मजा आहे……
विजय केंकरे यांनी नाटकाची बांधणी सर्वांगसुंदर केली आहे…दोनच व्यक्तिरेखा असल्यानं त्यांच्या हालचाली आणि नेपथ्याचा वापर खुबीने केला आहे…..शीतल तळपदे यांची प्रकाश योजना लाजवाब आणि अजित परब यांच्या पार्श्व संगीता ने नाटकाचा स्तर उंचावला आहे…. दोनच पात्र असल्याने नाटकाने पहिल्या पासूनच पकड घेणे अपेक्षित आहे आणि त्यात दोन्ही कलाकार आणि दिग्दर्शक यशस्वी झाले आहेत….. नाटक प्रतिभावंत साहित्यकाराच्या कलाकृतीवर असल्याने शब्दसामर्थ्याचा, लेखकांच्या अंतर्मनातील भावभावनांचा, त्यांच्या कलात्मक जाणिवांचा अलौकिक श्रीमंतपणा डॉ. गिरीश ओक यांनी तेवढ्याच ताकदीने रंगमंचावर सादर केला आहे. सिद्धहस्त लेखक कामतांची भूमिका ते प्रत्येक श्वासासह जगले आहेत.त्यांची संवाद फेक, pauses, त्यांच्यातल्या कसदार अभिनयाची साक्ष देतात..नाटकाची लेखिका डॉ. श्वेता पेंडसे यांनी जन्माला घातलेली नंदिनीची भूमिका स्वत:च साकारली आहे. या व्यक्तिरेखेतील आक्रमकपणा, करारीपणा, अंतर्मनातील गोंधळ, मोहनशी असलेल्या भावनिक नात्याचे पदर छान उकलले आहेत.
सुरुवातील आक्रमक असणारी नंदिनी, हे सर्व साहित्य आपल्या नवऱ्याने लिहिलं असून देखील आपण ते सिध्द करू शकत नाही याची जाणीव , यातून येणारी अगतिकता कारण तिच्या नवऱ्याने गेली नऊ वर्ष लेखन थांबविले आहे याची सल तिला आहे ,आणि तरीदेखील हे सर्व त्याचेच आहे याची खात्री असून आपण काही करू शकत नाही यातून येणारी हतबलता प्रभावीपणे व्यक्त केली आहे. आणि तिसरी पण महत्वाची व्यक्तिरेखा म्हणजे मोहन चित्रे … ज्यांचा भोवती हे सर्व कथानक फिरत पण ती व्यक्ती कधीच रंगमंचावर येत नाही पण तिच्याविषयी येणाऱ्या संभाषणतून,तीच अस्तित्व सतत जाणवतं…… मिहीर गवळी यांची निर्मिती असलेल्या या कलाकृतीचे उत्कर्ष मेहता, ऋतुजा शिदम हे सहनिर्माते आहेत. एक वेगळ्या धाटणीचा प्रयोग व्यावसायिक रंगभूमीवर आणण्याच्या त्यांच्या धाडसाचं कौतुक करायलाच हवं. ‘३८ कृष्ण व्हिला’ची नोंद साहित्यकलेवर भाष्य करणारं महत्त्वाचं नाटक म्हणून भविष्यात होईल, एवढी ताकद या नाटकात आहे. कोणताही नाटक, कथा, कादंबरी प्रसिद्ध होते त्यात एक टॅग लाईन असते, ‘या कलाकृतीतील पात्र, घटना, व्यक्तिरेखा काल्पनिक आहेत. त्या कुणाच्या वास्तव जीवनाशी साधर्म्य साधणाऱ्या वाटत असल्यास तो केवळ योगायोग समजावा,’ असं नमूद करण्यात येतं. ‘३८ कृष्ण व्हिला’चं कथासूत्र याच सूत्रावर आधारित केलं आहे. त्यामुळे या नाटकाची गोष्टही काल्पनिक आहे की कुणाच्या वास्तव जीवनाशी नातं सांगणारी,हे फक्त लेखिका च सांगू शकेल… करोना काळानंतर आलेले हे नाटक आहे… डॉ.गिरीश ओक यांचं हे पन्नासाव नाटक आहे…..या नाटकाला बरेच म्हणजे एकवीस पुरस्कार लाभले आहेत…..आणि ते योग्यच आहे….बऱ्याच दिवसांनी एक दर्जेदार, नजरबंदी करणारी कलाकृती बघायला मिळाली…..
…..आणि दुपारची वेळ असून देखील प्रयोग हाऊसुल्ल होता..याकरिता सर्व कलाकारांनी पेक्षकांचे आभार मानले….अर्थात ही किमया या नाटकाची आहे…. सर्वांनी जरूर बघावं असं हे नाटक आहे…..एक चांगली कला कृती बघितल्याचा आनंद नक्कीच मिळेल……
श्रीराम टिळक
आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुप
Leave a Reply