नवीन लेखन...

रोटरी इंटरनॅशनल क्लब

२३ फेब्रुवारी रोटरी इंटरनॅशनल क्लब चा वर्धापन दिन.

उद्योगधंद्यांत प्रसिद्धी मिळविलेल्या व्यक्तींनी विविध क्षेत्रांत, समाजाची सेवा करावी व अशी सेवा करणाऱ्यांना प्रोत्साहन द्यावे म्हणून स्थापिलेली एक आंतरराष्ट्रीय नागरी संस्था. भूतदया, मानवतावादी व शैक्षणिक प्रकल्प यांच्या माध्यमातून विविध राष्ट्रांतील नागरिकांमध्ये सामंजस्य व मैत्री यांची जोपासना वृद्धिंगत व्हावी, हा रोटरी संस्थेचा मुख्य उद्देश मानला जातो.

प्रारंभी वेगवेगळ्या सभासदांच्या कचेऱ्यांत (कार्यालयांत) अगर निवासस्थानी आळीपाळीने क्लबची बैठक भरत असे; त्यावरून या क्लबला ‘रोटरी’ म्हणजे ‘फिरता’ क्लब असे नाव पडले. पहिला रोटरी क्लब २३ फेब्रुवारी १९०५ रोजी शिकागो येथे पॉल पर्सी हॅरिस या वकिलाने स्थापिला. त्यानंतर १९१० मध्ये ‘द नॅशनल असोसिएशन ऑफ रोटरी क्लब्ज’ ही संघटना स्थापन झाली. पुढे कॅनडा आयर्लंड, ग्रेट ब्रिटन इ. देशात क्लबाच्या शाखा निघाल्या आणि १९१२ मध्ये क्लबाचे नाव ‘इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ रोटरी क्लब्ज’ (आंतरराष्ट्रीय रोटरी संघटना) असे ठेवण्यात आले. १९२२ मध्ये पुन्हा त्याचे नाव बदलून सांप्रतचे ‘रोटरी इंटरनॅशनल’ असे ठेवण्यात आले. संस्थेचे जागतिक मुख्यालय अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील एव्हॅन्स्टन येथे आहे.
आशिया खंडात १९१९ मध्ये रोटरी क्लब मानिला (फिलिपीन्स) आणि कलकत्ता (भारत) येथे सुरू झाले. मुंबई आणि मद्रास येथे १९२९ मध्ये क्लब स्थापन झाले. रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१४ ची स्थापना महाराष्ट्र राज्यासाठी १ जुलै १९७० रोजी झाली. या डिस्ट्रिक्टमध्ये १,६६८ सभासद आणि ३८ क्लब होते. १ जुलै १९८४ रोजी डिस्ट्रिक्ट ३१४ मध्ये अकोला, अमरावती, भंडारा, मुंबई, बुलढाणा, चंद्रपूर, जळगाव, नासिक, ठाणे, वर्धा आणि यवतमाळ ह्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला.
रोटेरियन
रोटरीच्या सभासदांना ‘रोटेरियन’ म्हणून संबोधतात. रोटरी इंटरनॅशनलचे एकूण १८ संचालक असतात. रोटरी इंटरनॅशनलचे अध्यक्ष १२ वेगवेगळे महासंघ नेमतात. एकूण डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ४८५ असून ते आपापल्या डिस्ट्रिक्टकरिता संचालक नेमतात. प्रत्येक रोटरी क्लबचे अध्यक्ष आपापले सभासद नेमतात. रोटरी इंटरनॅशनलचे अधिकृत इंग्रजी मुखपत्र रोटेरियन (स्पॅनिश आवृत्ती रिव्हिस्ता रोतरिआ) हे शिकागो येथून प्रसिद्ध होते. अमेरिकेत शिकागो येथे संस्थेचे सचिवालय असून त्याची विभागीय कार्यालये झुरिक (स्वित्झर्लंड), लंडन (ग्रेट ब्रिटन) आणि मुंबई (भारत) येथे आहेत. हुषार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरिता शिष्यवृत्त्या देणे, ग्रंथालये उभारणे, उद्योगधंद्यांचे प्रशिक्षण देणे, ग्रामविकासात आर्थिक व अन्य मदत करणे, अपंगांचे व आपद्‌ग्रस्तांचे पुनर्वसन तसेच त्यांच्या गैरसोयी नाहीशा करण्यात मदत करणे इ. सेवाभावी कामे भारतात व इतर देशांत ही संस्था सतत करीत आहे. आतापर्यंत रोटरी शिष्यवृत्त्यांचा लाभ १७ हजारांवर विद्यार्थ्यांना मिळाला आहे.
भारत
भारतात १९४३ पासून एकूण ९ सभासद १६ वर्षे रोटरी इंटरनॅशनलचे सभासद बनले. १९९१-९२ या वर्षासाठी एका भारतीयाची रोटरी इंटरनॅशनलचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. अशा प्रकारे रोटरी इंटरनॅशनलचे अध्यक्षपद भारताला दुसऱ्यांदा मिळत आहे. पहिला मान १९६२-६३ या वर्षी मिळाला होता. दरवर्षी रोटरीचे जागतिक अधिवेशन भरून त्यात जागतिक अध्यक्षाची निवड केली जाते.
रोटरी इंटरनॅशनलच्या १९१७ साली अ‍ॅटलांटा (जॉर्जिया राज्य) येथे शैक्षणिक उपक्रमांना चालना देण्याच्या हेतूने एक कायमस्वरूपी निधी उभारण्यात आला. या निधीला ‘रोटरी फाउंडेशन’ (रोटरी प्रतिष्ठान) असे नामाभिधान मिळाले. या प्रतिष्ठानाला मिळणाऱ्या देणग्या, त्यांची गुंतवणूक, व्यवस्था व प्रशासन या सर्वांची जबाबदारी पाच विश्वस्तांवर सोपविण्यात आली.
रोटरी इंटरनॅशनलच्या संचालक मंडळाने १९६२ साली ‘इंटरॅक्ट’ नावाची जगभरातील माध्यमिक शाळांतील विद्यार्थि-विद्यार्थिनींसाठी एक संघटना स्थापन केली. तरुणांमधील नेतृत्वगुण, तसेच आंतरराष्ट्रीय सेवा व सामंजस्य या सर्वांचा विकास करणे हे इंटरॅक्टचे प्रमुख उद्दिष्ट होते. रोटरी क्लब हा इंटरॅक्ट क्लबचा प्रायोजक असतो. १९८७ च्या अखेरीस ८५ देशांमधील ४६० डिस्ट्रिक्टमध्ये ५,००० च्या वर इंटरॅक्ट क्लब असून त्यांची सदस्यसंख्या सु. १,१८,००० होती. धर्मातीत व राजकारणातीत अशा या आंतरराष्ट्रीय रोटरीने जगातील सर्व रोटरी क्लब व इंटरॅक्ट यांच्या सहकार्याने १८ ते २८ वर्षे वयोगटातील युवक-युवतींसाठी ‘रोटरॅक्ट’ (रोटरी इन अ‍ॅक्शन) ही एक नवी संस्था निर्माण केली. १९८८ च्या मध्यास जगातील ११२ देशांमधील सु. ५,५६७ रोटरॅक्ट क्लब आपल्या सु. १,११,३४० सभासदांनिशी विधायक कार्य करीत होते. रोटेरियनांच्या पत्‍नींनाही संस्थेच्या विविध कार्यांमध्ये सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने रोटरीने ‘इनरव्हील’ नावाची नवीन संस्था उभारली.
महाराष्ट्र राज्यातील पहिला रोटरॅक्ट क्लब ‘रोटरी इंटरनॅशनल क्र. ३१४ ६ ऑगस्ट १९६८ रोजी अंबरनाथ येथून कार्यान्वित झाला. १ जुलै १९९० पासून डिस्ट्रिक्ट ३१४ हा मुंबई ते अंबरनाथ या शहरांसाठी व डिस्ट्रिक्ट ३०३ हा नासिकपासून नागपूरपर्यंतच्या शहरांसाठी कार्य करू लागला. रोटरॅक्टच्या सभासदांना ‘रोक्टरॅक्टर’ म्हणून संबोधतात. जगातील १०५ देशांमध्ये रोटरॅक्टचे ५,००० हून अधिक क्लब असून त्यांची सदस्यसंख्या एक लाखावर आहे.
सांप्रत रोटरी इंटरनॅशनल ही संघटना १६८ देशांमध्ये २४,५०० क्लब व ११ लाखांवर सभासद यांच्या सहकार्याने विविध प्रकारचे जनहितकारक उपक्रम यशस्वीपणे पार पाडीत आहे.

मा. गु. कुलकर्णी

संकलन. संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..