होतो वाचुनि, ऐकुनि गुणगान विलायतेचे,
धूसर होते, स्वप्न मनीं, परदेश-गमनाचे ।
खुले पणाचेहोता, बाळगणे, ध्यास हा उराशी,
घडल्या विदेश वार्या, कल्पना नसतां कशाची ।
कल्पना नसतां कशाची ।।१।।
विशाल देशीं, भव्य प्रदेशी, दिसे अतिभव्यता,
गोष्टींतुनि सार्या, भव्य तेवुनि, दिसे दिव्यता ।
सारेंच येंथे, अपुल्या कल्पना – विश्वापल्याडचे
काम अपुल्या मुखास, करणे कौतुक तयांचे ।
करणे कौतुक तयांचे ।।२।।
घडी संस्कारांची, अवघड ती उमगण्या,
व्यर्थ नि अर्थहीन, यत्न अपुले, ती उलगडण्या ।
रुचेल मनांस, ते अलगद, प्रेमे उचलावे,
अचकट-विचकट, देखुनि, न च दचकावे ।
देखुनि, न च दचकावे ।।३।।
तरुणाईच्या चापल्याचा, आवेग आगळा,
सळसळणार्या रक्तगटाचा आवेश वेगळा ।
नव्हते वेळीं अमुच्या, वातावरण पोषक तैसे,
खंत ऐसी मनीं वसतां, सरणार जीवन कैसे ।
सरणार अपुले, सरणार, जीवन कैसे ।।४।।
ज्याने त्याने आयु जगावे, नियती आधारे,
क्षणा क्षणाचे हेम करावे, अपुल्या प्रज्ञेने ।
ते न जमतां, गुणी जनांचे कौतुक करावे,
न साधतां ते ही, स्व-नशीबे, रडत बसावे ।
स्व-नशीबे, रडत बसावे ।।५।।
हे न मिळाले, ते न मिळाले, न गावे रडगाणे,
हा घोर उणेपणाचा करी अवघड आयु जगणे ।
नयनीं उघड्या, मौजेत सारे, टिपुनि घ्यावे ।
परी, सुप्त लोचनीं, मंगल ते अंतरी ध्यावे ।
मंगल ते अंतरी ध्यावे ।।६।।
हातुनि जे निसटले, ते सारे, विसरुनि जावे,
मिळाले जे यत्ने, अपुल्याच भाग्याचे समजावे ।
प्राप्त सारे, स्वीकारुनि, मानावी कृपा ईश्वराची,
असावे नीट ध्यानीं, शांती मनाची, ठेव सुखाची ।
शांती मनाची, ठेव सुखाची ।।७।।
ठेविले ईशाने, तैसेचि, खुषिंत मस्त रहावे,
जे जे कधी न मिळणे, ते सारे, विसरुनि जावे ।
राहुनि खुषींत, पडणारे पदरीं, पाहुनि घ्यावे,
न जमले तर, खिन्न वदनें, कुढत बसावे ।
कुढत बसावे ।।८।।
— सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास
Leave a Reply