नवीन लेखन...

आपल्या आहारातील युती आणि आघाड्या

एका बाबतीत बदल झालेला दिसत नाही. ती बाब म्हणजे निसर्गाशी मानवाचे सातत्याने चाललेले द्वंद्व. थंडी-वारा-पाऊस असो वा त्सुनामी-वादळ – भूकंप असो, निसर्ग मानवाला चकवण्याचा प्रयत्न करत असतो आणि मानव निसर्गाला जोखण्याच्या अभ्यासात असतो… आधी – व्याधी असो, रोगराई असो वा जीवजंतू असो, मानवाच्या निरामय आरोग्यातील हे अडथळे ओलांडण्याच्या करामती मानवाने अनेक करून दाखविल्या आहेत. तरीसुद्धा आरोग्याची नवनवीन आव्हाने सतत पुढे उभी राहात असतात आणि वैद्यकीय अभ्यासाच्या साहाय्याने या आव्हानांना यशस्वीपणे तोंड देता येते. हे तो पामर मनुष्य सिद्ध करून दाखवतो आहे.

वैद्यकीय शास्त्र असो किंवा त्याच्या दिमतीला असलेले औषधविज्ञान असो, या क्षेत्राने विषमज्वर, न्युमोनिया, (फुप्फुसांचा दाह) क्षयरोग इत्यादी अनेक विकारांचा यशस्वीपणे मुकाबला केलेला आहे. आणि आज अगदी कर्करोगासारख्या दुर्धर आजारावरसुद्धा अनेक वेळा कुरघोडी करण्यात आल्याची उदाहरणे आपल्याला दिसत असतात.

तरीसुद्धा या रोगांच्या नवीननवीन जाती निर्माण होत आहेत आणि मानवाची आयुष्याची वाटचाल बिकट करत आहेत. त्याचवेळी ही बिकट वाट साफसूफ करण्याची जिद्द मनुष्य बाळगतोच आहे. वैद्यकीय आणि औषध क्षेत्रातील भक्कम व प्रभावी पाययोजनेबरोबरच आता आहाराशास्त्राच्या शस्त्राचा वापर करणे क्रमप्राप्त झाले आहे. आपल्या आहारातून विविध प्रकारची पोषक आपण व पौष्टिक अशी सत्त्वे, जीवनसत्त्वे शरीरात घेत असतो. शरीराच्या निरोगी वाढीसाठी, तसेच शुद्ध रक्त तयार होण्यासाठी, हाडे बळकट होण्यासाठी वेगवेगळ्या अवयवांचे कार्य सुरळीत चालण्यासाठी आपल्याला प्रथिने-चरबी-ऊर्जा, जीवनसत्त्वे आणि अनेक घटकांची नियमितपणे गरज भासत असते, ती शक्यतो आपल्या रोजच्या आहारातून भागवली जाणे अपेक्षित असते. अशा सुयोग्य व सकस आहारासाठी कोणते कोणते पदार्थ आपल्या रोजच्या थाळीत असावेत, त्यावर गेल्या काही वर्षात सतत संशोधन चालू आहे. प्रत्येक व्यक्तीची वयानुसार, त्याच्या वैयक्तिक कामकाजानुसार व परिस्थितीनुसार, जीवनसत्त्वे व अन्य पोषक मूल्यांची गरज वेगवेगळी असते. तसेच भौगोलिक परिस्थिती, राहाणीमान यावरदेखील बऱ्याच प्रमाणात जीवनावश्यक घटकांची आवश्यकता बदलू शकते. तरीही आपल्या रोजच्या आहारासाठी असलेल्या विविध पर्यायांचा विचार करून, आहारतज्ज्ञांनी काही ठोस निष्कर्षदेखील काढलेले आहेत. त्यानुसार उत्तम आरोग्यासाठी, कोणता आहार घ्यावा तसेच कोणते पदार्थ टाळावेत, त्याविषयी आपणास आहारतज्ज्ञांकडून सतत मार्गदर्शन मिळत असते. अगदी वरकरणी एक सर्वसामान्य उदाहरण द्यायचे झाले तर पांढऱ्या व स्निग्ध पदार्थांचा अतिशय मर्यादित व माफक प्रमाणात आपल्या आहारात वापर करणे, हा एक सावधगिरीचा मार्ग समजला जातो. पांढरे पदार्थ म्हणजे… साखर-मीठ- मैदा- साबुदाणा आणि स्निग्ध पदार्थ म्हणजे तेल.

आजकाल, जंतूंचा प्रादुर्भाव होऊन पसरणाऱ्या व्याधींइतकाच गंभीरतेने विचार करायला लागतोय तो जीवनशैली विषयक त्रिकोणी आजारांचा. हा जीवघेणा त्रिकोण आहे तो मधुमेह-उच्च रक्तदाब – हृदयविकार… विशेष म्हणजे, ग्रामीण-शहरी, स्त्री-पुरुष, उच्च-नीच वा गरीब-श्रीमंत, अशा प्रकारचा कोणताही भेदभाव न करता, हा त्रिकोणी आजार, फार मोठ्या लोकसंख्येच्या अचानक वा अकाली, अनपेक्षित वा तत्काळ मृत्यूचे कारण बनल्याचे आपण सर्वचजण बघत जीवनशैलीविषयक हा गंभीर – त्रिकोणी धोका, हा बहुतांशी आहार-विहाराशी निगडित असल्याचे वैद्यकीय संशोधकांना आढळून आले आहे. त्यामुळे सगळ्या वैद्यकीय क्षेत्राचे लक्ष्य व लक्ष झाले आहे ते आहारशास्त्र. आहारावर लक्ष केंद्रित करून मधुमेह-उच्च रक्तदाब-हृदयविकार यांच्याबरोबरचे अॅनिमिया, स्कर्व्हीं, आणि अगदी कर्करोगाला अटकाव करता येतो, हे निष्कर्ष आशादायक तर आ-हेतच, पण त्याचबरोबर कोणता – कसा व केवढा आहार घ्यावा, त्याबरोबरच आरोग्याला आहारातून हितकारक अशी पोषक द्रव्ये व पौष्टिक घटक कशी मिळतील आणि एकमेकांच्या संगतीने त्यांचे मूल्य कसे वाढते, याविषयी काही उपयुक्त व मनोरंजक माहिती आहारतज्ज्ञ देऊ लागले आहेत.

आहाराचा नवा फंडा आहे तो युतीचा (जसे काँग्रेसला सत्तेच्या सिंहासनावरून दूर करण्यासाठी, एकापेक्षा जास्त विरोधीपक्ष एकत्र येतात, साहजिकच त्यांची ताकद वाढते व मग त्यांना हवे ते घडून येते.) आहारतज्ज्ञांच्या मतानुसार, चांगली पोषणमूल्ये असलेले पदार्थ जर एकत्र शरीरात गेले तर त्यांची परिणामक्षमता चांगलीच वाढते.

आता बघा, डाळ-भात, किंवा राजमा चावल ही कोणत्याही हॉटेलमधील सर्वमान्य लोकप्रिय डिशही चवीला तर उत्तम असतेच, पण ती मुळात अत्यंत आरोग्यवर्धक आहे, त्यांचे कारण आहे, त्यांच्या अंतरंगात शरीरातला सर्वात महत्त्वाचा घटक असतो तो प्रथिनांचा. पेशांना बांधण्यासाठी अहोरात्र व आमरण गरज असते ती प्रथिनांची (प्रोटिन्सची). या प्रथिनांमधला कामाचा भाग असतो तो अॅमिनो अॅसिड्सचा. त्यांचा एक नखरा असतो. सर्वच्या सर्व अॅमिनो अॅसिड्स हजर असली तरच ते काम करतात. अन्यथा टाळेबंदी! आता वास्तवात भातामध्ये लायसिन नावाचे अॅमिनो ॲसिड नसते तर डाळीत मेथायोनिन या अॅमिनो ॲसिडचा अभाव. पण ‘डाळ-भात’ ची युती झाली तर लायसिन पण मिळते व मेथायोनिनसुद्धा. मग काय काम जोरात.

आणखी एक गंमत बघा… आपण आयुष्यात वधुपरीक्षेच्या वेळी तर (फुकटचे) पोहे खातोच खातो…पण इतर हजार वेळेस कधी नाश्ता म्हणून, कधी संध्याकाळचे चापणे म्हणून तर कधी सर्वात झटकन बनणारा चटपटित व स्वस्त पदार्थ म्हणून पोहे खात असतो. कधी बटाटे पोहे, कधी कांदे तर कधी मटारपोहे. दरवेळेस त्यावर लिंबाची फोडदेखील पिळतो. पोहे चवीचे तर होतातच… पण त्याशिवाय…

पोह्यात असते लोह… तांबड्या रक्तपेशी बनवण्यासाठी हेमोग्लोबिनची पातळी वाढविण्यासाठी-शरीरातली एनर्जीची लेव्हल वाढण्यासाठी अत्यावश्यक असलेले लोह शरीरात टिकवले जाते, ते लिंबाद्वारे मिळणाऱ्या ‘क’ जीवनसत्त्वामुळे. अशा रीतीने ‘पोहे-लिंबू’ युतीमुळे आहारातील चविष्ट पोहे, एकदम पौष्टिक बनतात. ही आहे युतीची करामत. दाक्षिणात्य म्हणता येतील, असे सदासर्वकाळ वर्षभर मागणी असलेले इडली – डोसा, यासारखे पदार्थ तर बहुगुणी समजले जातात. तात्काळ पोट भरण्याचा आभास निर्माण करणारे व शरीराला बी कॉम्प्लेक्स, जीवनसत्वांचा प्रथिनांचा व कर्बोदकांचा भरगच्च पुरवठा करणारे, सांबार-दही यांच्या सोबतीने आत जाणारे हे पदार्थ, एकमेकांच्या साथीने शरीरात चांगलेच सकस वातावरण निर्माण करतात.

शरीराला घातक ठरणारा ऑक्सिजनचा सुटा भाग नेस्तनाबूत करण्यासाठी प्रामुख्याने कामी येतात ती अॅन्टी ऑक्सिडंट नावाने ओळखली जाणारी मूल द्रव्ये. ‘ग्रीनटी’ हा एक अँटीऑक्सिडंटचा प्रभावी स्रोत. म्हणूनच ग्रीनटी मुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमालीची वाढते. ग्रीनटी कर्करोग – हृदयविकार या यमदूतांना दूर ठेवू शकते तर वार्धक्याच्या सावल्या पळवता येतात. यात ग्रीनटी मध्ये कॅटेचिन नावाचा कामका आदमी असतो. पण तो ‘क’ जीवनसत्त्वाच्या संगतीतच कामाला खुलतो. सुस्थितीत जास्त वेळ राहातो.ग्रीनटी शीजर लिंबाच्या फोडीची युती केली तर शरीराला जास्त फायदेशीर… हाडांच्या मजबुतीसाठी, दातांच्या बळकटीसाठी, स्नायूंच्या ताकदीसाठी आवश्यक असते ते कॅल्शियम. कॅल्शियमअभावी हाडे ठिसूळ बनतात, लहानशा धक्क्याने मोडू शकतात. पण हे कॅल्शियम नुसते देऊन चालत नाही.

त्याला शरीरात पुरेशा प्रमाणात साठवण्यासाठी लागते ते ‘ड’ जीवनसत्त्व या ‘ड’ गँगमुळे शरीरातल्या आतड्यांत कॅल्शियम साठवले जाते व हाडांच्या, दातांच्या वाढीसाठी भक्कमीकरणासाठी उपयोगी पडते.

त्यासाठी ऑमलेट बरोबर दुधाचा एक ग्लास घेणे किंवा हो लोनब ेड च्या सँडविचबरोबर, दही, एखादे फळ घेणे केव्हाही शरीरास पोषकच ठरते.

सोडियम पोटॅशियम हे असेच सहोर दर पण परस्परविरोधी काम करणारे. आपल्या आहारात मीठ असतेच असते. – मीठ हेच या सोडियमचे पुरवठा केंद्र. मीठाने पदार्थांना चव येते हे जरी त्रिकालबाधित सत्य असले तरी त्या मीठाच्या अतिरेकाने, सोडियमचे शरीरातील प्रमाण वाढते, त्याचा परिणाम रक्तवाहिन्यांच्या आकुंचन प्रसरणावर होतो. मग वाढू लागतो तो भयानक रक्तदाब.

पण सोडियमच्या खोड्यांना उत्तर देता येते ते पोटॅशियमद्वारा. ५ ग्रॅम सोडियमला गप्प बसवण्यासाठी फक्त ५०० मिलीग्रॅम पोटॅशियम पुरेसे असते. या ग्रॅम – मिलीग्रॅमचा हिशोब न करता, दररोज जर फळे व भाज्या आपल्या आहारात ठेवल्या तर रक्तदाबदेखील आटोक्यात राहातो.

बी जीवनसत्व व फॉलिक अॅसिड ही अशीच एक युती. मृत होत असलेल्या पेशींना पुर्नजिवीत करण्यासाठी ही बी जी फॉलिक अॅसिडची जोडीचीच जरुरी असते. आयुष्यभर हे पेशींचे जन्म-मरणाचे चक्र चालू असते. त्यामुळे लहान मुलांच्या वाढीकरता असेल किंवा वाढत्या वयातील चलनवलनाकरता असेल, या युतीची गरज भासत असते. युतीपैकी एक जरी गैरहजर असेल तर मॅक्रोसायटिक ॲनिमियाचा धोका उभा ठाकतोच.

अंडी, दूध – चिकन, मटन यामधून बी जीवनसत्व मिळू शकते तर हिरव्या पालेभाज्या, द्विदल धान्ये-डाळी यातून फॉलिक अॅसिडचा लाभ होतो.

जखम झाल्यास, अपघात झाल्यास किंवा शस्त्रक्रियांच्या वेळी – रक्तस्राव होत असतो. तो थांबवणे आवश्यक असते. त्यासाठी रक्त गोठण्याची क्रिया व्हावी लागते. या रक्त गोठण्याच्या क्रियेसाठी ‘क’ जीवनसत्त्व शरीरात अस-वे लागते. पण हे ‘क’ जीवनसत्व एकटे असून चालत नाही, त्याची आघाडी चांगली मुरवावी लागते ती फॅट किंवा चरबी मेदामधे, पालक, कोबी, मुळा, ब्रोकोली बुसेल्स स्प्राऊट्स या भाज्यात ‘क’ जीवनसत्त्व मुबलक प्रमाणात असते थोड्याशा तेलाचा तडका देऊन हे ‘क’ जीवनसत्त्व चविष्ट भाज्यांच्या रूपाने, उपयुक्त करता येते.

कोबी-फ्लॉवर यासारख्या भाज्या बारा महिने मिळणाऱ्या, परवडणाऱ्या, चविष्ट असतातच. पण त्यांच्यात कर्करोगाला प्रतिबंध करणारे सल्फोरोफेन्स नावाचे द्रव्य पण असते. मात्र हे सल्फोरोफेन्स क्रियाशील करून शरीरात साठवले जाण्यासाठी ती बारीक चिमूटभर मोहरी उपयोगी पडते.आघाडीचे म्हणाल तर बी जीवनसत्त्वाची भलीमोठी आघाडी, बी., बी., बी. बी. शरीराचे आरोग्य आयुष्यभर सुस्थितीत ठेवण्यासाठी सज्ज असते.

‘अन्न हे पूर्णब्रह्म’ असे आपल्याकडे म्हणतात, ते सर्वार्थाने सत्य आहे. आहार जर परिपूर्ण असेल तर आयुर्वेदाच्या व्याख्येप्रमाणे ‘रोग होणारच नाही’ अशा स्थितीत जाता येते, ही अतिशयोक्ती ठरू नये…. पण काही ना काही कारणाने म्हणा, आहाराकडे म्हणावे तितक्या. गांभीर्याने वा काळजीपूर्वक बघितले जात नाही. परवडत नाही. असा एक ‘बीपीएल’ वर्ग परिस्थितीशी झगडत असला तरी त्याचबरोबर डाएटिंग करणारा एक फार मोठा समाजाचा भाग अस्तित्वात आहे, त्याचबरोबर जिभेच्या खोडी आवडी निवडी असणारा, त्याविषयी अभिमान बाळगणारा, एक ‘प्रतिष्ठा’ भिमानी वर्गदेखील (स्टेट्स – कॉन्शस) आपण बघत असतो. त्यांनी आहाराचे महत्त्व लक्षात घेतले तर त्यांचाच किती तरी मोठ्या प्रमाणात लाभ होणार असतो. कारण वैद्यकीय उपचारांच्या, वैद्यकीय चाचण्यांचा किंवा औषधांचा खर्च इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे की, त्यापेक्षा चांगल्या, प्रमाणबद्ध आहारावर पैसा खर्च करणे, खरोखर परवडू शकते.

आहारात कर्बोदके, साखर (ऊर्जा), स्निग्धांश, प्रथिने, धातू, मेद – पाणी यांचे प्रमाण जर आपल्या प्रकृतीच्या आवश्यकतेनुसार ठेवता आले, साखर-मीठ, अतिरिक्त कोलेस्टेरॉल निर्माण करणारे मैदा-तेल यांचा माफक प्रमाणात वापर केला तर, अन्न हे पूर्णब्रह्मची प्रचिती येऊ शकते. आहारामधील लाभदायक आणि हितकारक युती व आघाड्या विचारात घेऊन अमलात आणल्या तर जातच प्रकर्षाने.

शरद साठे, नाशिक.

अमृत – मे 2014

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..