मला ‘मिस युनिव्हर्स’ व्हायचे आहे आणि एक दिवस हा किताब मी नक्की पटकाविणार… हा आहे आत्मविश्वास अविका गौरचा. ही अविका कोण, हे आता कुणाला सांगण्याची गरज आहे, असे वाटत नाही. किमान, ‘इडियट बॉक्स’ची पूजा करणाऱ्या कोट्यवधी रसिकांना तर नाहीच नाही! दोन वर्षांपूर्वी कलर्स वाहिनीवर ‘बालिका वधू’ ही मालि . झाली तेव्हा बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथांना प्रसिद्धीचे वलय प्राप्त करून दिले जात असल्याची ओरड केली जाऊ लागली. ‘बालिका वधू’तील केंद्रभूत व्यक्तिरेखा ठरलेल्या ‘आनंदी’ची भूमिका साकारणारी अविका काहीशी भांबावली. थोड्याच | दिवसांमध्ये मालिकेचा एकूण सूर लक्षात आला नि सुतावरून स्वर्ग काढणारे आक्रमण शमले. त्यानंतर मात्र ‘आनंदी’ केवळ ‘बालिका वधू’च नाही, तर | दूरचित्रवाणीवरील संपूर्ण मालिकाविश्वाची लाडकी ठरली! ‘आनंदी-जग्या’ ही छोट्या पडद्यावरील ‘हिट्’ जोडी ठरू लागली. मालिकांमधून अभिनय करण्याचा आनंदीला (तिच्या व्यक्तिरेखेचा प्रभाव पाहा. अविकाऐवजी आनंदी असाच उल्लेख होतो!) पूर्वानुभव होता. पण, ती घराघरात पोचली ‘आनंदी’मुळे. तिच्या शाळेतील मित्र-मैत्रिणींसह शिक्षकवर्गही आनंदी, बिंदनी, चुहिया, छोटी मिर्ची अशा टोपणनावांनीच तिला बोलावू लागले. अविकासुद्धा मिळू लागलेल्या प्रसिद्धीचा आनंद लुटू लागली. मात्र, तिने भान सोडले नाही. महत्त्वाचे अविव म्हणजे हे यश अविकाचे नसून ‘आनंदी’चे आहे, हे जाणण्याएवढी परिपक्वता तिने लहान वयातच दाखवली. त्यामुळेच ‘बालिका वधू’च्या यशामुळे ती हवेत गेली नाही! ‘सकाळची शाळा. तेथूनच दुपारी दोन वाजता मालिकेच्या चित्रीकरणस्थळी. तीन वाजल्यापासून ‘शिफ्ट’ सुरू. सर्वसाधारणपणे पाच ते सहा तासांचे चित्रीकरण. त्यानंतर घरी… असा दिनक्रम होता. चित्रीकरणाच्या ठिकाणीच गृहपाठ, टेस्ट वगैरे उरकून टाकायचे. प्रसंगी अर्धा-एक तास डुलकीदेखील काढून पुन्हा फ्रेश ! पुढील एक-दोन
दिवसांच्या चित्रीकरणासाठीचे संवाद वगैरे आदल्या रात्रीच दिले जात होते. त्यामुळे ते पाठ करण्यासाठी वेळ भरपूर मिळत असे आणि चित्रीकरणाचा मुळीच ताण येत नव्हता,’ असे अविका स्पष्ट करते. ‘माझा स्वभाव खूप बडबडा. अविका नि आनंदी या दोन्हींमध्ये कमालीचे साम्य वाटले. त्यामुळेच ‘आनंदी’ जगताना फारसा त्रास झाला नाही,’ असेही अविका सांगते. एव्हाना अविका स्टार झाली आहे. पोस्टर-वॉलपेपर्स, असंख्य छायाचित्रांच्या माध्यमातून ती इंटरनेटवर झळकते आहे. तसेच, ‘सोशल नेटवर्किंग’ संकेतस्थळांद्वारे अविका ‘चाहत्यां’ शी मनमुक्त संवाद साधते. समवयीन चाहत्यांसाठी आविकाचे ‘स्लॅम बुक’ तयारच असते. स्वभावविशेष – निरागस, गोड आणि मेहनती. आवडते कार्यक्रम -शिनचॅन, टॉम अॅण्ड जेरी. आवडती सहकलावंत -दादीसा, म्हणजेच सुरेखा सिक्री. पण, त्यांची भीतीही खूप वाटते! ‘बालिका वधू’तील अविकाचा अखेरचा भाग गेल्या आठवड्यात झाला. यापुढील कथानकात वापरता येतील, अशी ‘फ्लॅशबॅक’ची बरीच दृश्ये चित्रित केली गेली. आनंदी पाच वर्षांनी मोठी होऊन जमशेदपूरच्या प्रत्युषा बॅनर्जीच्या रूपातून ती पडद्यावर दिसेल. अविकाचा खरा अभिनयप्रवास आता सुरू झाला असून मॉर्निंग वॉक, पाठशाला अशा चित्रपटांसाठी ती यापूर्वीच करारबद्ध झाली आहे.
नसिरुद्दीन शहा, शबाना आझमी यांच्यासारख्या कसलेल्या कलाकारांसमवेत काम करण्याची संधी. अविकाला मिळणार आहे. अनेकविध पुरस्कार सोहळ्यांसाठी तिला करारबद्ध केले जाईल नि स्मृती इराणीच्या ‘तुलसी’नंतरची छोट्या पडद्यावरील सर्वांत लाडकी सून म्हणून अविकाचा यापुढेही उल्लेख होत राहील. मात्र, या चकाकत्या, मोहमयी दुनियेतच अडकून राहायचे, की खरोखरीच ‘मिस युनिव्हर्स’च्या निमित्ताने व्यक्तिमत्त्व, अनुभवाच्या कक्षा विश्वव्यापी करायच्या, याचे भान अविका आणि तिच्या कुटुंबीयांना नक्कीच आहे, असा विश्वास वाटतो. ‘बालिका’चा निरोप घेताना अविका खास संदेशही देते – यापुढेही बालिका वधू पाहा नि बालविवाहाच्या विरोधात आवाज उठवा!
Leave a Reply