माहीत नाही हे छायाचित्र खरे आहे की खोटे , पण ते पाहिल्यानंतर संवेदनशील माणसाच्या मनात कालवाकालव सुरू होईल हे मात्र नक्की खरे .
पाहिलंत का हे छायाचित्र नीट निरखून ?
एका घरट्यात दोन पिलं कासावीस झाली आहेत . त्यांचं निःशब्द आक्रंदन आपल्याला तर जाणवेलच पण पाषाण हृदयी माणसाच्या मनाला सुद्धा जाणवेल . आणि पिलांकडे न पाहता पिलांचे आईबाप ठरवून पाहिल्यासारखे दुसरीकडे नजर फिरवून फांदीवर अगदी अलिप्तपणाने बसले आहेत , हे सुद्धा जाणवेल .
ते घरटं सुद्धा त्या फांद्यांवर सुरक्षित आहे असं वाटत नाही .
आणि त्यातील पिलांना त्याची जाणीव नाही . किंबहुना जाणीव व्हावी असं त्यांचं वयसुद्धा नाही .
ना भरगच्च पानांचा आसरा .
ना घनदाट सावलीचा थंडावा .
ना घरटं सावरून धरेल अशी मजबूत फांदी .
ना घरट्याला पुरेशी खोली .
जाणवतंय ना ?
मला हे छायाचित्र दिसलं आणि मनात विचारांचे भोवरेच भोवरे निर्माण झाले .
ही पिलं कुठल्या देशाची ?
या पिलांच्या आईबापांची अशी कोणती मजबुरी की त्यांनी निग्रहाने त्यांच्याकडे मान फिरवावी .?
की परिस्थितीने त्यांना तशी मान फिरवायला लावली आहे ?
ही पिलं आपल्या देशातल्या निरागस मुलांची प्रातिनिधिक व्यथा सांगणारी तर नाहीत ना ?
घरटं सुरक्षित नाही .
झाडं सुरक्षित नाहीत .
समाज , शाळा , दुकानं , हॉटेलं, स्टेशन … गर्दीची म्हणून जी जी ठिकाणं आहेत तीही सुरक्षित नाहीत .
कोण कोण कुठले कुठले विकृत भक्षक होत आहेत .
कुणाच्या वासनांची शिकार होऊ हेही माहीत नाही .
वासना , शिकार , अवयव यांची नावे माहीत नाहीत .
नजरेतले क्रौर्य समजत नाही .
अशी ही पिल्ले का आक्रंदन करत असतील ?
हतभागी आईवडील प्राणभयानं आणि कसल्या कसल्या अनामिक भीतीनं गळाठून गेली असतील , त्याचं तर हे चित्र नाही ना ?
या पिलांचा आक्रोश ऐकू येऊ नये म्हणून डोळेझाक करणाऱ्या अगतिक समाजाची ही व्यथा नव्हे ना ?
हे घरटे म्हणजे ,कुणाचाही सहारा नसणाऱ्या आणि साध्या वाऱ्या वादळात कोलमडून जाणाऱ्या दुर्बलांच्या कमकुवत मनाचं द्योतक नव्हे ना ?
आजूबाजूला हिरवळ दिसते आहे पण श्वास घ्यायला शुद्ध हवा नाही म्हणून तर आईबाप मनानं जखमी झाले नाहीत ना ?
की या पिलांचा सांभाळ कसा करायचा हा दुष्ट प्रश्न , त्यांना पेलवत नाही ?
की पिलांच्या भवितव्याच्या काळजीनं त्यांना अबोल बनवलं आहे ?
की कुणी मदतीला येतंय का याची ते आईबाप वाट बघतायत ?
असं तर नाही ना की पिलांवर कुणाची नजर जाऊ नये म्हणून आईबाप डोळे ताणून काळजी घेतायत ?
…आता तर मला त्या पिलांचा आक्रोश अगदी स्पष्टपणे ऐकू येतोय .
…आता तर मला त्या पिलांच्या आईबापांच्या डोळ्यातील पाणी जाणवायला लागलंय .
आजूबाजूला झाडांचा सहारा नाही .
दूरवर क्षितिजापर्यंत माणुसकीची चाहूल नाही .
डोक्यावर छप्पर नाही की खाण्यासाठी अन्नाचा कण नाही .
सूर्याचा उबदार स्पर्श नाही की चंद्राच्या शीतलतेचा मागमूस नाही .
माय ममता क्षितिजापर्यंत कुठे दिसत नाही .
डोळ्यात फक्त आणि फक्त प्रतीक्षा …
अस्वस्थ उसासे आणि कोरड पडलेल्या तोंडांचे जीवघेणे दर्शन …
ही पाखरे कुठली ?
ही वेळ त्यांच्यावर यावी असा हा प्रदेश तरी कुठला ?
त्यांना बेदखल करणारा हा आसमंत तरी कुठला ?
हे प्रश्नोपनिषद न संपणारे …
आणि अंतर्मुख व्हायला लावणारे सुद्धा !
नाही का ?
तुम्हाला काय वाटते ?
————
डॉ. श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी .
९४२३८७५८०६
Leave a Reply