बहुत नजदीक मुझे आना है-तेरे बाहोमे मुझे मर जाना है ‘- एखाद्या तरूणीने प्रियकराच्या प्रेमात बेभान होऊन झोकून द्यायचे व त्याला खुशाल वाहून टाकायचे यात काय चुकलं? जगात सगळीकडे हेच घडत आलंय, मग आफ्रिकन मुलीचं यात काहीही चुकत नाही. पण एकदा लग्नाची वचनं देणारा प्रियकर एखाद्या दिवशी अचानक चालता झाला तर? मग ती चूक झाल्याचं जाणवतं आणि त्याचाच इवलासा जीव पोटात वाढतोय याची जाणीव झाल्यावर तर मग जणू जिवावर ब्रम्हांड कोसळतं! एका आकडेवारीनुसार फक्त चार कोटी लोकवस्तीच्या केनियात दर वर्षी सुमारे तेरा हजार मुली गरोदर राहिल्यावर शाळा सोडतात. त्याच वेळी बहुतेकींना आई-बापांनी घराबाहेर हाकलून दिलेले असते. मग त्या मोठ्या शहरात उपजीविकेसाठी येतात. दक्षिण आफ्रिकेत पंधरा लक्ष कुमारी माता आहेत. या देशात कुमारी मातांचे प्रमाण वाढत आहे. २००८ साली ते अठ्ठावीस टक्क्यांपेक्षा जास्त होते. अमेरिकेत २००२ ते २००७ च्या अवधीत अनौरस संततीच्या जन्माचे प्रमाण २६ टक्क्याने वाढले. युरोपमध्ये हॉलंड या देशात अनौरस संततीच्या जन्माचे प्रमाण ४० टक्के, स्पेन मध्ये २८ टक्के, आयर्लंडमध्ये ३३ टक्के व इटलीमध्ये २१ टक्के आहे. भारतात तर कुमारी माता कुटुंबाला कलंक समजून गोपनीयतेमुळे त्याची सलग आणि खात्रीलायक आकडेवारी उपलब्ध नाही. पण कुमारी माता ही जगव्यापी समस्या आहे आणि ती दिवसेंदिवस वाढते आहे यावर दुमत नाही.
पूर्व आफ्रिकेतील कुमारी मातांची तशी विस्तृत आकडेवारी उपलब्ध नाही. एरव्ही आकडेवारीने वाचकाला दिपवून टाकणारे ‘इंटरनेट’ या बाबतीत मुकाट म्हणजे ‘सोनेरी मौनव्रत’-पाळते. पण अमेरिकेने मात्र स्पष्टपणे जाहीरच केले, ‘आमच्या देशात दीड कोटी कुमारी माता आहेत!’. एका अमेरिकन सेवाभावी संस्थेने निराश्रीत २०,००० कुमारी मातांना एकमेकींच्या संपर्कात आणायचा प्रयास केला. यावरून आढळते, कुमारी मातांची समस्या काही पूर्व आफ्रिकेपुरती मर्यादीत नाही. त्या देशातल्या या मातांनी अगदी उघडपणे सांगितले, जगात त्यांच्या हाल-अपेष्टांकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नाही आणि मदतीसाठी तर कुमारी मातांची जन्मभर वणवण चालू असते.
पूर्व आफ्रिकेत कुमारी मातांना व त्यांच्या अपत्यांना सर्वसाधारण गरजा पुरविण्यासाठी हवे असलेले सहाय्य करण्याचे कार्य अवघड होत चालले आहे. तिथल्या रिवाजानुसार एकदा का तरूण अविवाहीत मुलीला बाळ झालं की तिचा घरी परतण्याचा अधिकार संपुष्टात येतो. काही वेळा तर नवर्याने सोडल्यावर तसेच घटस्फोटीत किंवा विधवा झाल्यावरही तिला घरात थारा मिळत नाही. कुमारी मातांचे आणि त्यांच्या संततीचे जीवन खडतर होत चालले आहे. कुमारी मातांचे शिक्षण घ्यायचे मार्ग बंद झालेले असतात. इतकेच नव्हे तर पोराला खायला घालायला पैसेही जवळ नसतात. कुठे नोकरी चाकरी मिळालीच तर मुलाला एकटे सोडून जाण्याखेरीज तिच्याकडे पर्याय उरत नाही.
लहान गावात किंवा खेड्यात तर पाठीवर जड बोचके घेऊन पोराला फरफटत नेत असतांना त्या संसर्गजन्य रोगाने पछाडल्या जातात. या देशात एकट्या दुकट्या स्त्रीवर बलात्कार होण्याचे भय सतत असते. त्यातूनच तिला पुढे एड्स सारख्या रोगाची लागण होण्याची शक्यता वाढते. परिणामतः बाळाला असुरक्षिततेच्या जीवनाला सामोरे जावे लागते. एखाद्या मातेची कुतुहलाने चौकशी करायला लागल्यावर ती प्रथम प्रथम सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर देईल. पण मुलाच्या बापाबद्दल चौकशी करायला लागल्यावर ती सपशेल अबोल बनते. बऱ्याच वेळाने बोलायला लागल्यावर समजेल मुलाचा बाप ती गरोदर असतानाच तिला सोडून गेला आणि आता दुसर्या मैत्रिणीबरोबर नांदत आहे. एकदा बाप चालता झाल्यावर त्याने कधी फोन केला नाही की तो कधी पोराला पहायला आला नाही की मुलाच्या आईला. त्याने आर्थिक मदत करायची तर बातच सोडा. मग मुलाला वाढविण्याची जबाबदारी तिच्यावरच येते आणि तिला बापाची भूमिकाही घ्यावी लागते.
युगांडामधल्या कुमारी मातांची कहाणी फार वेगळी नाही. लहान मुलाचे शिक्षण, कामावरची ओढाताण सहन करत ती पोराला वाढवत असते. या देशातल्याही कुमारी मातांचे प्रमाण समाजाच्या सर्व थरात पसरले आहे. बाईला साथीदाराची कितीही गरज असली तरी पुरूष तिला कोणत्याही क्षणी सोडून जाऊ शकतो. एकदा एकीचा मित्र मुलाच्या जन्मानंतर चालता झाला. मात्र नंतर पाच वर्षे मुलाला पहाण्यासाठी अधुन मधुन येत राहिला. मग मात्र एके दिवशी त्याने दडी मारली ती कायमची. पण अशा पुरूषाने घरावर लाथ मारून मनात येईल तेव्हा निघून जायचे व मग आईने मुलाला वाढवायचे हे युगांडामध्ये नेहमीचे झाले. कुमारी माता सर्व वयोगटातील, टोळीतील, व व्यावसायिक थरातील आहेत.
एकदा एका आईला आपला मुलाचा बाप खूप वर्षांनी अचानक रस्त्यात भेटला. त्याने मुलाची चौकशी वगैरे केली. पण ती तेवढ्यापुरतीच. परत घरी येण्याची किंवा मुलाला अर्थसहाय्य करण्याची गरज त्याला वाटली नाही. पण अशा बापांचे खाजगी जीवन जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर ते बहुतांशी उधळपट्टी करणारे रात्री बेरात्री बेवडे व दुसर्या एका बाईच्या प्रेमात गुंतलेले आढळतात. आईला सहाय्य करण्याच्या उद्देशाने काही संस्था स्थापन झाल्या. त्यांनी मातांचे प्रश्र्न हाती घेतले व त्यांना पोलिस किंवा कायद्याची मदत उपलब्ध करण्याचे प्रयास केले. मात्र अशा संस्थांची बापाला बिलकुल भीती वाटत नाही. संस्थांच्या काही प्रयत्नांना यश येऊन काही बेजबाबदार बापांना पैसे देण्यास भाग पाडले. पण बर्याचदा मुलाची आईच अशा फंदात पडत नाही.
‘पण असे घडण्याचे कारण काय?’ हे शोधंण्याचा एका संस्थेने प्रयत्न केला. बापांनी उत्तर दिले, त्यांनाच त्यांचा पगार पुरत नाही आणि त्यांच्या नाकर्तेपणाचे खापर ते देशाच्या डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेवर फोडतात. तज्ज्ञ म्हणतात, देशात मातांना सहाय्य करायला पुरेसे कायदे-कानून नाहीत. पण अशी कारणे आयांना बिलकुल मान्य नाहीत व ‘जळलं मेलं पुरूषाचं लक्षण’ म्हणून या वादात भाग घेण्यालाही त्या तयार नसतात. एकदा घरकाम करणाऱ्या बाईचा मित्र पोर झाल्याबरोबर तिला व पोराला सोडून खेड्यात चालता झाला. मग त्याला कोण शोधणार? इकडे पोर मातेच्या आश्रयात वाढते व त्याच्या संगोपनाचा खर्चही वेगाने वाढत राहतो. सरकारचे याकडे किती लक्ष असेल कुणास ठाऊक. संशोधन हाती घेतलेल्या संस्थेला सर्वच उत्तरे नीटशी प्राप्त झाली नाही व समाजानेच या मातांच्या गरजांकडे लक्ष द्यावे अशा निष्कर्षापर्यंत ही संस्था येऊन पोहोचली.
उत्तर घानामधल्या जमातीमध्ये तर कुमारी मातांचे प्रमाण वाढवायला उत्तेजन देणारी एक अजब रूढी प्रचलीत आहे. एकाच जमातीतल्या दूरच्या स्त्री-पुरूष नातलगांना एकमेकाची शय्यासोबत करण्याची सपशेल मुभा आहे. मात्र त्यांनी विवाह करण्याचे समाजाला मंजूर नाही. शक्यतो त्यांना मुले होऊ न देण्याचा दंडक आहे पण झालीच तर ती अनौरस संतती मानण्यात येते. बापाला मुलाचे संगोपन न करण्याचा जणू हक्क आहे. म्हणजे एकूण एकच-मुलाची जबाबादारी फक्त आईच्या डोक्यावर येते. आणखी या जमातीमधली मुलुखावेगळी समजूत आहे, ती म्हणजे, फक्त मुलाला वंशाचा वारस मानले जाते. मुलगी जन्माला आलीच तर तिला इस्टेटीत वाटा मिळत नाही. समाजात तिला फार मोठे मानाचे स्थान नाही. तिने स्वतःच जोडीदार निवडायचा व संसार चालवायचा. यावेळी मुलाच्या संगोपनाची जबाबदारी मात्र आजोबांकडे आणि मुलाच्या बापाला या जबाबदारीतून सुट्टी. घरात अशी एकटी बाई असलीच तर तिला शिक्षण घेण्यास उत्तेजन नसते व पुढे स्वतःच्या जीवीताची जबाबादारी स्वतःलाच उचलावी लागते. अलीकडे घानाचा मानवी कल्याण व शिक्षण संस्थेचे या समस्येकडे लक्ष देण्याचे ठरवले व घाना विकास कार्यक्रमाअंतर्गत अशा महिलांना मदत देण्याची तरतूद केली आहे.
‘‘होय, मी कुमारी माता आहे’’- एखाद्या कवीने अशा मातेवर काव्य लिहिण्याचे किंवा एखाद्या चित्रकाराने तिचे चित्र रेखाटण्याचे ठरवले तर ते किती हृदय हेलावून टाकणारे ठरेल. पण समजा, खुद्द मातेनेच आपली कहाणी जगासमोर मांडण्यासाठी लिहिली तर ती किती अंतःकरणाला भिडेल. याचाही प्रत्यय जगाला लाभला. एका संस्थेच्या हिकमती खटाटोपी प्रयत्नांमुळे. या संस्थेने संगणकावर एक वेबसाईट निर्माण केली व तिचे नामकरण केले, ‘होय, मी कुमारी माता आहे’. मग कुमारी मातांनी मनात गुदमरून टाकलेल्या सर्व कहाण्या ऐकायला नवा सखा मिळाल्यासारखे वाटून आपल्या कहाण्या भाडभाडपणे सांगितल्या.
एकीने लिहिले, मला जुळी मुले आहेत. मी सहा महिन्याची गरोदर असतांना माझा मित्र घरातून निघून गेला. दुसरी म्हणते, माझ्या मुलीला बाप नसल्याची समज लहान वयातच आली व ती स्वतःची कामे स्वतःच करायला शिकली. अगदी ‘शी’ आली की पॉटी घेण्यापासून. मुळाक्षरं ती स्वतःच शिकली. तिसरीने लिहिले, मी एका मुलाच्या प्रेमात पडले व गरोदर राहिले. मला मुलगी झाली व इस्पितळातून घरी जाण्याचा दिवस उजाडला. तेव्हा समजले, मित्र अचानक सोडून गेला. बाळंतपणाचा खर्च भरण्याचे तर सोडाच.
या उपक्रमानंतर दुसऱ्या एका संस्थेने कुमारी मातांच्या मुलांसाठी एक संगणक वेब सादर केली. मुलांनी आपल्या आईने घेतलेल्या कष्टाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतांना बापाबद्दल तिरस्कार व्यक्त केला. या कथातून मुलांना बाप सोडून चालता झाला याची किती लवकर समज येते ते स्पष्ट कळते.
पण आता मातृत्वाच्या कल्पना व मातृत्व पदाचे आकर्षण यात केवढा बदल होतोय. केवळ आई होण्यासाठी प्रसूतीच्या व्यापातून जायलाच पाहिजे का? किंवा एखादीला मूल होण्याची शक्यता नसल्यास तिने जन्मभर वांझ म्हणूनच राहायला हवे? इतकेच नव्हे तर बाळंतपणानंतर कमनीय शरीरबांधा बिघडतो म्हणून फक्त आपला गर्भ वाढविण्यासाठी व त्याला जन्म देण्यासाठी बाळंतपणापुरते दुसऱ्या स्त्रीचे सहाय्य घेतले तर? हे नवे विचार पुढे आले. या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी हवे असलेले वैद्यकीय तंत्र उपलब्ध झाले. मुख्य म्हणजे, कायद्याची चौकट तयार झाली व त्यासाठी हवी असलेली वैधानिक मान्यताही प्राप्त झाली. आता जगभरच्या प्रयोगांनंतर हे विचार शिष्टसंमत झाले. पण ही तर नुसती सुरूवात. पुढच्या भविष्यात आणखी काय काय वाढून ठेवले आहे कुणास ठाऊक. या प्रयोगांमुळे एक गोष्ट निश्चित घडणार की मातृत्वाचे देणे फक्त ईश्वराच्या हाती राहणार नाही. ते सर्जनच्या पण नियंत्रणात राहील. आणखी एक बाब नक्की. माना किंवा मानू नका पण देवा-ब्राम्हणांसमोर आणाभाका घेऊनच होणारा म्हणजे ‘नवरा’ अशा हट्टी आवश्यकतेची गरज भासणार नाही. म्हणाल तर हे स्त्रीला मिळणारे नवे मुक्ती स्वातंत्र्य ठरेल. आणखी एक गोष्ट नक्की. मला आई व्हायला नवरा जन्मभरासाठी कशाला हवाय् आणि अधिकृत नवऱ्याशिवाय झालेल्या मुलाची किंवा त्याच्या आईची घृणा होण्याचे कालांतराने साफ थांबेल. मग कुमारिका आई परित्यक्ता राहणार नाही.
आफ्रिकेत सरोगेट आई संकल्पनेला एक वेगळा इतिहास आहे. त्याचे असे झाले – १९८७ साली दक्षिण आफ्रिकेत कॅरन फेरेरा जॉर्ज नावाच्या अठ्ठेचाळीस वर्षाच्या एका आईने स्वतःच्या लेकीच्या बाळाची सरोगेट आई होण्याचे ठरवले. कारण होते, वैद्यकीय दृष्ट्या तिच्या मुलीला अपत्य प्रसूती करणे शक्य नव्हते व प्रसूती टाळण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. पण बाळ झाल्यावर परस्त्री बाळ परत देईलच याची पार खात्री नव्हती. म्हणून आई पुढे सरसावली. प्रसूतीकाळातील दिवस भरल्यावर तिला चक्क तिळे झाले. मग विधिविषयक समस्या उभ्या राहिल्या. नव्या तीन बाळांच्या अधिकाराबद्दल. जुन्या १९८२ च्या कायद्यात खूप त्रुटी होत्या. या कायद्याने बाळांना रीतसर अधिकार दिले नव्हते व नाकारलेही नव्हते. मग कायदा सुधारणेसाठी १९८७ साली नवा शासकीय लवाद स्थापन झाला. या मंडळाने वृत्तपत्रात रीतसर प्रश्नावली प्रसिध्द केली व त्यावर प्रतिक्रिया मागवल्या. मग नागरिकांशी विस्तृत चर्चा केल्यावर सुधारणा-संमती झाली. यावर एक कच्चा अहवाल १९९३ साली तयार झाला. त्याला अंतिम स्वरूप १९९९ साली प्राप्त झाले. संसदेला नव्या कायद्याचा मसूदा संमतीसाठी सादर झाला. २००३ साली नवा कायदा तयार झाला. त्यामध्ये महत्त्वाचे कलम होते, नव्या बाळाला कायद्यानुसार मिळकतीचे व इस्टेटीचे सर्व हक्क प्राप्त होतील.
काळ आता आणखी पुढे गेला. बाळ परीक्षा नळीत निर्माण करण्याचे तंत्र जगाला अवगत झाले. दीड लाख लोकवस्तीच्या पश्र्चिम गुजराथच्या आणंद गावातली ही कथा. डॉ. नयना पटेल नावाच्या आणंदच्या या डॉक्टरणीच्या अमेरिकेत राहणार्या लेकीला मूलबाळ नव्हते म्हणून २००३ साली तिने मुलीला भारतात बोलावून घेतले. तिच्या वैद्यकीय अनुभवाच्या आधारे मुलीच्या बाळासाठी गरोदर राहण्याची तयार असलेली एक स्थानिक महिला निवडली.तिच्या गर्भाशयात रोपण करण्यासाठी तिने परीक्षा-नळी तंत्राच्या सहाय्याने बाईच्या पोटात गर्भारोपण केले. दिवस भरल्यावर बाईला जुळे झाले. या अनुभवाआधारे तिने गरजू बायकांसाठी बाळांची निर्मिती करण्याचा दवाखाना उघडला. दवाखान्याला नाव दिले – आकांक्षा भवन. थोड्याच अवधीत डॉक्टर मॅडमनी दुसर्या बाईच्या बाळाला जन्म देण्यासाठी पंचेचाळीस स्त्रियांचा चमू तयार केला. प्रसूती शुल्क होते, चार लाख रूपये. याच क्रियेला परदेशात सात लाख रूपये खर्च येतो.
— अरुण मोकाशी
Leave a Reply