नवीन लेखन...

जॉनने फडकावला झांझीबार स्वातंत्र्याचा झेंडा

पहाटचे तीन वाजले होते. दिवस होता बारा जानेवारी १९६४. सुलतानाला पदच्युत करून झांझीबार देश स्वतंत्र झाला. जॉन स्वतंत्र राज्याचा राष्ट्राध्यक्ष फील्ड मार्शल म्हणून घोषित झाला.

झांझीबारचे नागरीक साखरझोपेत होते. सुमारे ८०० आफ्रिकन बंडखोरांनी बेटावरच्या पोलिस चौक्यांवर ‘जॉन ओकेलो’ या जिगरबाज म्होरक्याच्या नेतृत्वाखाली अचानक हल्ला चढवला. जबरदस्त हल्यामुळे स्तंभित झालेले पोलिस काहीही करू शकले नाहीत. बंडखोरांनी चौकीतला दारूगोळा यथेच्छ लुटला आणि रेडिओ स्टेशनवर कबजा मिळवला. अरब पोलिसांना अशा हल्ल्याचा प्रतिकार करण्याचे कोणतेही प्रशिक्षण मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांच्याकडून प्रतिकार होण्याचा प्रश्र्नच नव्हता. बंडखोरांनी चौकीचा ताबा घेतल्यावर हाताला लागेल ते शस्त्र आणि शेकडो बंदुका हस्तगत केल्या. मग त्यांना खरा चेव चढला! प्रथम त्यांनी सर्व प्रमुख इमारतींचा ताबा मिळवला. सकाळचे नऊ वाजले होते. अवघ्या सहा तासात शहरातले टेलिग्राफ कार्यालय आणि सर्व सरकारी कार्यालये पण कबजात आली. इतकेच नव्हे तर शहारातल्या एकुलत्या एक विमान-धावपट्टीवर पण ताबा मिळविला. दुपारचे दोन वाजून अठरा मिनिटे झाली आणि झांझीबार शहर आणि सबंध देश जॉन ओकेलोच्या क्रांतीकारकांनी अरब राज्यकर्त्यांकडून जिंकून घेतला.

बारा तासाच्या या बंडात ऐशी अरब ठार आणि दोनशेजण गंभर जखमांनी घायाळ झाले होते. उपग्रह भ्रमणाचा वेध घेणाऱ्या नासा या संस्थेचा एक अमेरिकन नागरीक व सोळा सहकाऱ्यांनी शहरातल्या एका इंग्लिश क्लबमध्ये आश्रय घेतला. त्याखेरीज शहरात चार अमेरिकन पत्रकार होते. त्यांना नव्याने स्थापन झालेल्या सरकारने डांबवून ठेवले.

तशा या बंडाच्या घटना नाट्यमय वाटल्या व युगांडामधून आलेल्या जॉन ओकेलो या मर्द गड्याने बंडाचे म्होरकेपण स्वीकारले असले तरी सत्तांतराचा हा डाव ‘अॅफ्रो शिराझी पक्षा’ध्यक्ष अबीद करूमे या नेत्याने मूळतः रचला होता, असा दावा केला जातो. करूमे हे क्रांतीकारी मंडळाचे अध्यक्ष होते. त्यांच्या बरोबर अब्दुल रहमान मोहम्मद बाबू हे त्यांचे सहकारीही होते. जॉन ओकेलोने करूमेना बंडाची झळ लागू नये म्हणून सुरक्षिततेसाठी झांझीबारपासून दूर ठेवले होते. तसे झांझीबारला इंग्रजांकडून सुलतानाच्या अंमलाखाली ९ डिसेंबर १९६३ रोजी स्वायत्तता मिळालेली असली तरी बऱ्याच नागरिकांना हा बदल पसंत नव्हता. त्यांना परदेशीय अरबांचे वर्चस्व झुगारून द्यायचे होते. जॉनला तसा केनियामध्ये क्रांतीकारक कारवायांचा अनुभव होता व त्यासाठी त्याने ‘फील्ड मार्शल’ हा किताब स्वतःलाच देऊ केला होता. वास्तविक त्याला लष्करी प्रशिक्षणाचा अथवा प्रत्यक्ष युध्दाचा अजिबात अनुभव नव्हता. पण तो धाडसी होता. ‘आपल्याला साक्षात् ईश्वराने झांझीबारच्या प्रजेला अरबांपासून स्वातंत्र्य मिळवून देण्याची आज्ञा केली आहे’ असा त्याचा दावा होता. हे कारण देऊन त्याने झांझीबारमधल्या नोकरी नसलेल्या बेकार तरूणांना हाताशी धरून बारा जानेवारीचा हल्ला चढवला होता. एका विद्वानाच्या मते तर, सत्तांतराच्या क्रांतीत इतर कुणाचाच भाग नसून केवळ जॉन सर्वेसर्वा होता.

क्रांतीनंतर अंतरिम सरकार स्थापन झाले. त्या सरकारचे करूमे हे अध्यक्ष म्हणून घोषित झाले. बाबू हे परराष्ट्रमंत्री झाले. देशाचे जुने नाव बदलून ‘पीपल्स रिपब्लीक ऑफ झांझीबार आणि पेम्बा’ असे संबोधण्यात येऊ लागले. नव्या सरकारने सुलतानाच्या पक्षावर संपूर्ण बंदी आणली. एक महत्त्वाची अनपेक्षित कृती म्हणजे नव्या करूमे सरकारने जॉन ओकेलोला बाजूला सारून सर्व अधिकार आपल्याकडे घेतले. फक्त त्याचा ‘फील्ड मार्शल’ किताब त्याला स्वतःकडे ठेवण्यास संमती दिली. नंतर जॉनचे आणि करूमा यांचे परस्पर संबंध बिघडत गेले. त्यावेळचे टांझानियाचे राष्ट्राध्यक्ष ज्यूलियस न्येरेरे यांनी हा संघर्ष सोडविण्यासाठी मध्यस्थी केली पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही.

इकडे जॉनच्या समर क्रांतीकारक समर्थकांनी अरब आणि आशियाई नागरिकांवर अत्याचार सुरू केले. त्यांना ठोकून काढण्यास, घरेदारे लुटण्यास, ठार मारण्यास व चक्क स्त्रियांवर बलात्कार करण्यास सुरूवात केली. जॉनच्या सेना अधिकाऱ्यांनी रेडिओवरून भाषणांचा भडीमार सुरू केला. सुलतानाच्या सेवेतले व त्यांचे पाठीराखे यांचा ‘दुष्मन’ म्हणून उल्लेख केला. काही पाश्र्चिमात्य आणि अरब वृत्तपत्रांनी ठार झालेल्या नागरिकांचा आकडा सुमारे हजारापर्यंत असावा असा अंदाज व्यक्त केला. एका इटालियन वृत्तपत्र कंपनीने तर हेलिकॉप्टरमधून एका आफ्रिकन वृत्तपत्र एजन्सीसाठी सामुदायिक कत्तलीचे चित्रण प्रसारित केले. जॉनने कोणत्याही यूरोपियन नागरिकाला न मारण्याचा आदेश दिला. दरम्यान अरब नागरिक ओमानला पळून गेले.

इकडे बारा जानेवारीला क्रांती लढा चालू झाल्यानंतर सुमारे तीन आठवड्यांनी म्हणजे तीन फेब्रुवारीला झांझीबार पूर्वस्थितीला आला. करूमे यांना लोकांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून स्विकारले. पूर्वीसारखी पोलिसांची गस्त चालू झाली. लोकांनी लुटलेली दुकाने उघडायला लागली. लोकांनी बळकावलेली शस्त्रे परत करायला सुरूवात केली. नव्या सरकारने घोषणा केली की त्यांनी पकडलेल्या पाचशे राजकीय कैद्यांवर रीतसर कारवाई केली जाईल. जॉन ऑकेलोने त्याला साथ देणाऱ्या जवानांच्या सहाय्याने ‘स्वातंत्र्य सैनिक दल’ स्थापन केला. त्यांनी लगेच रस्त्यावर गस्त घालायचे कार्य हाती घेतले. मात्र जॉनचा व त्याच्या सहकार्‍यांचा आक्रमक आणि हिंसक पवित्रा झांझीबारवासीय खिश्र्चन व मुस्लीम जनतेला पटणारा नव्हता. शिवाय जॉनच्या संभाषणातले युगांडन उच्चार त्याच्या परदेशीय नागरिकत्त्वाचे जाचक स्मरण करून देणारे होते. यावरची प्रतिक्रिया म्हणजे करूमांच्या समर्थकांनी जॉनच्या दलाचे अधिकार हळूहळू काढून घेण्यास सुरूवात केली. अकरा मार्च रोजी करूमा सरकारने जॉन ऑकेलोचा ‘फील्ड मार्शल’ किताब रद्द केला. इतकेच नव्हे तर जॉनला दारेसालामहून झांझीबारला परतण्याचा परवाना रद्द केला. त्याला टांगानिकाला जायला सांगितले व तेथून पुढे केनियाला जाण्याचा हुकूम दिला. तिथून अखेर जॉनला मायदेशी म्हणजे युगांडाला परतावे लागले.

मात्र जॉनची करूण कहाणी इथेच संपली नाही. सव्वीस एप्रिलला टांगानिकाबरोबर वाटाघाटी पूर्ण झाल्यावर नवीन ‘टांझानिया’ नावाच्या देशाची स्थापना झाल्याची करूमाने घोषणा केली. त्या अगोदर जॉनचा ‘स्वातंत्र्य सैनिक दल’ पूर्णतः बरखास्त केला. या सर्व स्थित्यंतरात करूमा सरकारचा डाव्या गटाच्या कम्युनिस्टधार्जिण्या सरकारला डावलण्याचा बेत होता असे इतिहासकारांचे मत होते. मात्र प्रत्यक्षात सरकारने स्वास्थ्य, शिक्षण व सामाजिक सेवा या संबंधीची कम्युनिस्टधार्जिणी धोरणे तशीच स्वीकारली होती.

स्वातंत्र्य समरानंतर जॉन काही काळ केनियामध्ये व युगांडामध्ये राहिला. बर्‍याच वेळा तो राष्ट्राध्यक्ष इदी अमिन याच्या सहवासात १९७१ पर्यंत असल्याचे समजले होते. पण त्याला दुजोरा मिळाला नाही. अमिन एकदा कुत्सितपणे उदगारला होता, ‘‘चला आता आपल्या युगांडाला दोन ‘फील्ड मार्शल’ मिळाले!’ जॉनच्या अचानक येण्याबद्दल अचानक अफवा पसरल्या पण काही इतिहासकारांच्या मते इदी अमिनने जॉनला ठार केले.

तसे पाहिले तर जॉनचे जीवन गरीबीत व झगडण्यातच गेले. तो जन्माने ख्रिश्चन होता. तो बाराव्या वर्षीच आपल्या खेड्यातल्या घरातून चालता झाला व पूर्व आफ्रिकेत नोकरीसाठी वणवण भटकत राहिला. त्याने पेम्बा बेट १९५९ साली सोडले व झांझीबार बेट १९६३ साली सोडले होते. या दोन्ही बेटावर त्याने कारकून, घरगडी, माळी आणि पोलिस म्हणून काम केले.

त्याच्या मृत्यू अगोदर त्याला अज्ञात व्यक्तीकडून विटंबना करणारी पत्रे यायची. तू फार दिवस जगणार नाहीस अशी ताकिद देणारी पण पत्रे आली. त्यात तू मुसलमान नाहीस याचा त्याला स्मरण करून देणारा उल्लेख असायचा. जॉनच्या मृत्यूच्या पश्चात त्याच्या दोन पत्नी व मुले अनाथ झाली. मुलांनी त्याच्या अस्थी मिळवण्यासाठी सरकारकडे बर्‍याच विनवण्या केल्या. त्याच्या कुटंबियांना मदत करण्याचे आवाहन पण झाले. झांझीबारला स्वातंत्र्य मिळवून देणारा जॉन अखेर उपेक्षित राहिला.

झांझीबारच्या स्वराज्य प्राप्तीसाठी झालेल्या बंडात २०,००० अरब ठार झाले. क्रांतीनंतर जॉन ऑकेलोवर एक पुस्तक प्रसिध्द झाले. त्यात त्याने ‘अॅफ्रो शिराझी पक्ष’ अध्यक्ष अबीद कुरामे व पंतप्रधान अबदुला रहमान बाबू हे त्याच्यापासून कसे दुरावत गेले याबद्दलची खंत व्यक्त केली. कशामुळे झाले हे? तो मूळचा युगांडाचा होता म्हणून? का तो ख्रिश्चनधर्मीय होता हे त्याच्या मुस्लिम मित्रांना पसंत नव्हते म्हणून? का ते त्याला जहाल कम्युनिस्ट विचारसरणीचा मानत होते? या थोर व्यक्तींनी त्याला चक्क झिडकारले. कारण काहीही असेल पण त्याच्या कार्याचा व नावाचा फारसा उल्लेख होत नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पूर्व आफ्रिकेची प्रसार माध्यमे पण त्याच्याबददल फारसे बोलले नाही. फार काय, झांझीबारच्या इतिहासात त्याचा मानाचा उल्लेख नाही. का?

पण जॉनची करूण कहाणी ‘रेव्होल्यूशन इन झांझीबार’ या पुस्तकात सादर केली. त्यात म्हटले आहे, इदी अमिनला जॉन ओकेलो दुष्मन वाटायचा. तो निराश झाल्यावर युगांडाला म्हणजे मायदेशी निघून गेला. १९७३ च्या नोव्हेंबर महिन्यात इदी अमिनच्या सैंनिकांनी जॉन ऑकोलोला पळवून नेले. पुढे त्याची क्रूरपणे हत्या झाली. जॉनच्या मुलांनी वडिलांच्या अस्थी शोधून काढण्यासाठी सरकारला खूप विनवण्या केल्याचे बोलले जाते. काय हे मरण एका झुंझार क्रांतीकारकाच्या नशिबी आले !

“परि ज्यांच्या दहन भूमीवर – नाही चिरा नाही पणती!”

बंडानंतर जॉन दारेसालामला आला. एकटाच रस्त्याने निघाला असतांना घेतलेले हे छायाचित्र. पण किती बोलके आहे हे चित्र ? बंडानंतर जॉन ऑकोलो खरंच अगदी एकटा पडला-थेट त्याची हत्या होईपर्यंत!

– अरुण मोकाशी

परिवहन तज्ज्ञ अरुण मोकाशी यांच्या झांझिबार डायरी या इ-पुस्तकातील हा लेख.

त्यांचे या पुस्तकातील सर्व २५ लेख वाचण्यासाठी हे पुस्तक खरेदी करा. 

हे इ-पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…
https://marathibooks.com/books/zanzibar-diary/

किंमत : रु.२००/
सवलत किंमत : रु.५०/-

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..