मी दादरला ( सुखात ) रहात असताना ( गेले ते दिवस ) माझ्या आजीच्या माहेरच्या दूरच्या नात्यातील एक वृद्ध गृहस्थ आमच्या घरी आठवड्यातून एखादी चक्कर मारत असत. ते येताना ( न चुकता ) माझ्यासाठी १० पैशांची दोन पेपरमिट आणत. एकदा असेच त्यांनी दिलेले पेपरमीट चघळत, मी बेसावध असताना त्यांनी भागवत चंद्रशेखरप्रमाणे गुगली टाकला…. “बाळ , तू अभ्यासाव्यतिरिक्त काही अवांतर वाचन करतोस की नाही ?”
( खरे तर, ‘अभ्यासाव्यतिरिक्तच वाचतो , अभ्यासाचेच धड वाचत नाही’ हे त्या प्रश्नाचे खरे उत्तर होते.)
” हो तर…. वाचतो की “…..बाळ बेफिकिरीने बोलला.(पेपरमीटसाठी काहीही !)
“काय वाचतोस ?”….आजोबांचा
मुरलीधरनसारखा ‘ दुसरा ‘ आला.
“अं…अं…अं….”….आणि मी प्रविण आमरेप्रमाणे चाचपडू लागलो.
इतक्यात समोरच्या टीपॉयवर पडलेल्या ‘महाराष्ट्र टाइम्स’ ने, काँग्रेसने महाविकास आघाडीला द्यावा तसा मला ‘हात’ दिला.
” मटा वाचतो “..बाळाने बुडबुडा सोडला.
आपल्या माहेरचं माणूस आपल्या नातवाची इतक्या आस्थेने चौकशी करतं आहे म्हणून कौतुकाने आजी त्यांच्यासाठी चहा घेऊन आली.
” अरे वा… तळवळकरांचा अग्रलेख वाचतोस की नाही ?”….आजोबा बशीत चहा ओतता ओतता विचारते झाले.
” नाही ! “….मी म्हणालो. ( ‘तुला पिष्टमय पदार्थ व सिग्ध पदार्थातला फरक माहीत नाही ?’…असे सामान्यविज्ञानाच्या बाईंनी हताश आवाजात विचारल्यावर मी इतक्याच आत्मविश्वासाने “नाही” म्हणालो होतो.)
” मग वाचतोस तरी काय ? नाटक-सिनेमांच्या जाहिराती ? “…..आजोबा करवादले.
” मी ‘विविक’ वाचतो…. मी छाती पुढे काढून म्हणालो. ( एका पेपरमिटसाठी आपले इमान सोडायला मी काही फुटकळ राज्यमंत्रीपदासाठी आपली निष्ठा सोडणारा कोणी फडतूस आमदार नव्हतो.)
” विविक म्हणजे ?”..आजोबांनी
अमोल पालेकरपेक्षाही बावळट चेहरा करुन विचारले.
” विविक म्हणजे वि. वि. करमरकर “….मी अभिमानाने उद्गारलो.
” कोण करमरकर ? ”
” मटाच्या शेवटच्या पानावर खेळांवर लिहितात ते. मी मटाचे फक्त शेवटचं पानच वाचतो.”…..मी सी. के. नायडूंची शपथ घेऊन सांगावे तसे खरे तेच सांगितले. ( मटाची इतर पाने वाचून, मनाची मशागत करणारे आणि मला समाधानाच्या सरोवराकाठी नेणारे शेवंती दिवस अजून उगवायचे होते.)
” काय ? “….आजोबा हिंदकळले आणि त्यांच्या बशीतला अर्धाअधिक गरमागरम चहा, त्यांच्या देवेंद्र फडणवीसांच्या कारभारापेक्षाही पारदर्शक असलेल्या धोतरावर सांडला.
” अहो चंपुताई ( आजीचे माहेरचे नाव ), काय म्हणतोय बघा हा …..पेपरचे शेवटचं पान वाचतो म्हणे…. अरे.. भिकेची लक्षणं आहेत ही….खेळामुळे आतापर्यंत कोणाचं भलं झाले आहे ?….चंपुताई, नातवाला सांभाळा नाहीतर वाया जाणार हा !”…असा संतप्त परशुरामाने द्यावा तसा मला शाप देत आणि मांडीला चिकटलेले धोतर झटकत ते निघून गेले. चहा नेहमीपेक्षा जरा जास्तच उकळला असावा असा मी सोईस्कर निष्कर्ष काढला.
शायर मुनीर नियाज़ी म्हणतो,
किसी को अपने अलम का हिसाब क्या देते,
सवाल सारे गलत थे,जवाब क्या देते !
” अरे त्या भालचंद्रचे काही ऐकू नकोस तू.लहानपणापासून असाच तिरसट आहे तो. तू काय करमरकर वगैरे वाचतोस ते वाच खुशाल.”….आजीने ईडीने अजित पवारांना द्यावी तशी मला क्लीन चिट दिली.
” मी बाजारात गेले की आणत जाईन तुला पेपरमीट”….आजीने मला आश्वस्त केले.आणि आजीने कबूल केलेल्या त्या पेपरमीटच्या गोडीने मी गेली ४५ वर्षे “करमरकर” वाचतोच आहे. जास्त नाही, तुम्हाला फक्त मागची पुढची २/३ उदाहरणे देतो.
१९८३ च्या सप्टेंबरमधे झहीर अब्बासच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी संघ ( नाइलाजाने ) भारतात आला होता. कसोटी सामना ( व अर्थातच मालिका ) हरायची नाही या एकमेव उद्देशाने आणि अतिशय नकारात्मक मनोवृत्तीने झहीर अब्बास, जावेद मियांदाद ही मंडळी भारतात आली होती. बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवरच्या पहिल्याच कसोटीत त्याचा प्रत्यय आला. भारताचा पहिला डाव संपून पाकिस्तानचा पहिला डाव संपायला पाचव्या दिवसाची सकाळ उजाडली. सामना अर्थातच अनिर्णित राहणार होता. पण भारतीय क्रिकेटरसिकांना वेगळीच उत्सुकता होती. त्याकाळी ज्या आतुरतेने दादरच्या ( वेस्टर्न रेल्वे ) एक नंबर प्लॅटफॉर्मवर ब्रिजच्या खांबामागे लपून प्रियकर जमात आपल्या प्रेयसीला घेऊन येणाऱ्या अंधेरी लोकलची वाट बघत असे त्याच आतुरतेने रसिक सुनिलच्या ( पुढील ) शतकासाठी नवस बोलत असत. झालेही तसेच.अंशुमन गायकवाडच्या साथीने खेळणारा सुनिल सावकाश शतकाकडे वाटचाल करीत होता. पाकिस्तानी कर्णधाराची व खेळाडूंची देहबोलीच सांगत होती की सुनीलचे शतक व्हावे अशी त्यांची बिल्कुल इच्छा नव्हती. दोन षटकांमधे शक्य तितका वेळकाढूपणा करत आणि सतत माधव गोठोस्कर व स्वरुप किशन या अंपायर्सकडे नियमांबाबत विचारणा करत त्यांनी खेळ सुरु ठेवला होता. माझी आजी देव पाण्यात बुडवून बसली होती. ( शेवटी शिवाजीपार्कचे पाणी होते बाबा ते.) सुनिल ८५ कोटी भारतीयांच्या अपेक्षांचे ओझे खांद्यावर घेऊनदेखिल डोक्यावर बर्फाची लादी ठेवल्यासारखा थंड डोक्याने खेळत होता. शेवटच्या तासातील अनिवार्य २० षटकांचा खेळ सुरु झाला .आणि अचानक १४ व्या षटकाअखेर ( सुनिल -८७ ) झहीर आपला संघ घेऊन मैदानाबाहेर गेला. नक्की काय झालंय ,ड्रेसिंगरुममधे काय चाललंय , कोणालाच काही पत्ता लागेना.भारतीय टीव्ही समालोचन त्याकाळी बाल्यावस्थेत होतं आणि जे पडद्यावर दिसते आहे तेच फक्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची समालोचकांची मानसिकता होती.
जवळपास अर्ध्या तासानंतर पाकिस्तानी संघ परत मैदानात आला.खेळाला सुरुवात झाली आणि मुद्स्सर नझरने टाकलेल्या दिवसाच्या शेवटच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर चौकार मारत सुनीलने आपले २८ वे शतक पूर्ण केले. सिंधूनदीत घोडं न्हालं.हे तर ठीकच झालं पण आमच्या चिकित्सक मनाला प्रश्न पडला की, नक्की काय झालं असावं ? नियम काय सांगतात ? झहीरचं काय म्हणणं होते ? आणि एवढ्या मिजाशीत मैदान सोडणारा पाकिस्तानी संघ परत गपगुमान मैदानात कसा आला ? एक नाही अनेक. आम्हाला फार वेळ वाट पहावी लागली नाही. फक्त एका रात्रीचाच प्रश्न होता. दुसऱ्या दिवसाच्या मटामधे करमरकरांनी आम्हाला पडलेल्या ( आणि न पडलेल्या देखिल ) एकूणएक प्रश्नांची विस्तृत ,खुलासेवार आणि सहजसोप्या भाषेत उत्तरे दिली होती.
त्यांचा तो लेख आजही माझ्या आठवणीत आहे. त्यांनी लिहिले होते की, झहीर काही नियमांमधून पळवाट काढू पहात होता किंवा त्या नियमांचा स्वतःच्या सोयीचा अर्थ लावू पहात होता. दिवसात ( किमान ) ७७ षटकांचा खेळ झाला पाहिजे असा तेव्हा नियम होता.( आता तो ९० षटकांवर जाऊन पोहोचला आहे.) पण त्याचबरोबर सामन्याच्या अखेरच्या ( म्हणजे पाचव्या ) दिवशी ( तोपर्यंत दिवसभरात किती षटके टाकून झाली आहेत याचा हिशेब न करता ) शेवटच्या तासात अनिवार्य २० षटकांचा खेळ झालाच पाहिजे. त्यासाठी सामना नियोजित वेळेपेक्षा अधिक काळ खेळावा लागला तरी हरकत नाही. दोन्हीही कर्णधारांची संमती असेल तर(च) सामना नियोजित वेळेच्या अर्धा तास आधी थांबवता येऊ शकतो. करमरकर पुढे म्हणतात….. इथेच खरी गोम होती. अनिवार्य षटकांतील १४ वे षटक टाकल्यावर , दिवसभरात ७७ षटकांचा खेळ झालेला आहे व सामन्याचा निर्णय लागण्याची सुतराम शक्यता नाही ,त्यामुळे खेळ थांबवायला हवा असे झहीरचे ( व मॅनेजर इंतिखाब आलमचे ) म्हणणे होते. करमरकर सांगतात की भारताच्या सुदैवाने माधव गोठोस्कर व स्वरुप किशन यांच्यासारखे अनुभवी , खमके व नियमांचा सखोल अभ्यास असणारे पंच मैदानात होते. त्यांनी सुनिलला विचारले ” तुम्हाला खेळ पुढे सुरु ठेवायचा आहे काय ?” ( तेव्हा कपिलदेव भारताचा कर्णधार होता , पण नियम सांगतो की जेव्हा कर्णधार मैदानात नसेल तेव्हा खेळणारे फलंदाजच कर्णधाराचे प्रतिनिधित्व करतात.) सुनीलने अर्थातच होकार दिला. करमरकर लिहितात की पंच गोठोस्करांनी झहीरला ( व त्याच्या अतिशहाण्या मॅनेजरला ) स्पष्ट शब्दात खडसावले की पुढील १० मिनिटांत तुमचा संघ मैदानात आला नाही तर ( नियमांप्रमाणे ) तुम्ही सामना सोडून दिला आहे असा त्याचा अर्थ होईल व ( नियमांनुसारच ) आम्हाला भारताला विजयी घोषित करावे लागेल. ( पंचांनी सुनिलला शतक पूर्ण करता यावे म्हणून नियम वाकविल्याचा आरोप करत ) पडेल चेहेऱ्याने झहीर आपला संघ घेऊन मैदानात उतरला.
या सर्व प्रकरणावर उपहासात्मक टिपण्णी करताना ” विविक ” मिश्किल सवाल उपस्थित करतात की ‘वेळकाढूपणा न करता दोन्ही एन्डकडून मंदगती गोलंदाजांनी मारा केला तर २.५/३ मिनिटांत एक षटक पूर्ण होऊ शकते आणि तासाला २०/२२ षटके टाकली जाऊ शकतात . तसे झाले असते तर कदाचित चहापानालाच ( झहीरच्या म्हणण्यानुसार ) दिवसभराचा षटकांचा कोटा पूर्ण झाला असता. अशा परिस्थितीत झहीर काय चहापानालाच सामना संपविणार ( किंवा थांबविणार ) होता का ?
करमरकरांचे हे सर्व विश्लेषण वाचल्यानंतर , निर्माता-दिग्दर्शक मनमोहन देसाईंच्या कथानायकाप्रमाणे , आपण सर्वज्ञ असल्याचा आम्हाला भास झाला तर त्यात आश्चर्य ते काय ?
संदीप सामंत.
९८२०५२४५१०
३१/०३/२०२०
Leave a Reply