वरात एकाएकी थांबली . गाणं वाजवण्यात दंग झालेला बँड बंद झाला .
भल्या मोठ्या स्पीकर्सच्या प्रचंड भिंती अचानक अबोल झाल्या . रस्त्यावर बेभान होऊन नाचणारे , लोळण घेवून नागीण डान्स करायला अधीर झालेले , मान खाली घालून एक हात उंचावत , वाद्यांच्या ठेक्यावर डोलणारे इकडे तिकडे बघू लागले .
फुकटची दारू ढोसायला मिळाल्याने कसाबसा तोल सांभाळत घरंगळल्या सारखे चालणारे उभं राहण्याचा प्रयत्न करू लागले . हॅलोजन , प्रखर हेडलाईट्स, डोळे आणि मेंदू चक्रावून टाकणाऱ्या विविध रंगी लाईट्सच्या माळा आणि विविध रंगी लेझरचे प्रकाशझोत चालू होते .
वरात का थांबली हे कुणालाच कळत नव्हतं . हॉलमधून निघून देवळात आणि तिथून नवरदेवाच्या घरी इतकाच प्रवास होता . दोन किलोमीटर इतकंच तर सगळं अंतर होतं . दोन तास झाले पण अर्धा किलोमीटर अंतर जेमतेम पार झालं होतं . या हिशोबानं किती वेळ लागणार होता ते कुणाला सांगता येत नव्हतं .
हौसेला मोल नव्हतं . त्यामुळं रस्ता अडवून चालणाऱ्या वरातीतल्या कुणालाही , ट्रॅफिक जॅम झाल्यानं , झालेल्या प्रचंड गर्दीचं भान राहिलं नव्हतं . लाईव्ह गाण्यांचा हट्ट असल्यानं गायक देखील बेजार झाले होते .
क्षणाक्षणाला कुणीतरी येऊन फर्माइश सांगून जात होता . आणि गाणं पूर्ण होण्याच्या आत दुसरी फर्माइश आल्यानं भांडणाचे प्रसंग उद् भवत होते .वरात अचानक थांबल्यामुळे वैतागलेले हौशी वऱ्हाडी तावातावाने बोलू लागले .रस्त्यावरच्या वाहनांच्या हॉर्नचा कर्णकर्कश आवाज सगळ्यांना असह्य होऊ लागला होता .
परिस्थिती हाताबाहेर जाईल की काय अशी शक्यता निर्माण झाली होती . सजवलेल्या रथावर असणाऱ्या नवरीच्या ते लक्षात आलं . तिनं नवऱ्याकडे सहेतुक पाहिलं . त्याच्याही ते लक्षात आलं . त्यानं तिथल्याच एकाला बोलावलं आणि गायकाकडला माईक आणायला सांगितलं . कुणीतरी चटकन माईक आणून दिला . नवरा नवरीला काहीतरी बोलायचं आहे , हे अनेकांच्या लक्षात आलं . आणि शांतता पसरली .
तिनं नवऱ्याच्या हातातला माईक घेतला . ” वरात आम्ही मुद्दाम थांबवली . आत्ता जे काही चालू आहे त्याची आम्हाला कल्पना नव्हती . सगळ्या वऱ्हाडी मंडळींकडून ही अपेक्षा नव्हती . गायकांकडून , बँडवाल्यांकडून सुध्दा ही अपेक्षा नव्हती . आम्ही सगळ्यांनी अगोदर सांगितलं होतं , की वरातीत नाचा पण विकृती नको . गाणी वाजवा , गा पण ती चांगली असू द्या . मुंगळा , जलेबीबाई, चोली के पीछे , नागीण , रिक्षावाला , झिंगाट असली गाणी वरातीत भयंकर वाटतात . त्याच्यावर अचकट विचकट नाचणारे तर आणखी भयंकर वाटतात . आपल्या मराठीत लग्नविधीची , वरातीची कितीतरी गाणी आहेत , ती वाजवा , गा . आणि हिंदीत सुध्दा , बहारो फूल बरसाओ, मेरा मेहबूब आया हैं , हे कशाला गाणं हवं ? हिंदीतसुध्दा खूप चांगली गीते आहेत . आणि आज खरंतर एक गाणं सतत वाजवायला हवं . गायला हवं . आपली संस्कृती त्यात आहे . तुम्ही नवरा नवरीला लक्ष्मी नारायण स्वरूप मानता , मग घरी येणाऱ्याचे त्यापद्धतीने स्वागत करायला नको ? तुम्ही म्हणाल वरातीच्या वेळी हे काय शिकवते आहे ही नवरी ? पण आत्ता नाही सांगितलं तर पुन्हा पुढच्या वेळी हीच विकृत गाणी , हेच वेडेवाकडे अंगविक्षेप पाहायला मिळतील . कुणी प्लीज रागावू नका , उत्साहानं वरात सुरू करा . ज्यांच्याकडे मोबाईल आहेत त्यांनी एक गाणं शोधून काढा आणि ते म्हणत वरात सुरू करा . बजाओ ढोल स्वागतमे l मेरे घर राम आये हैं ll चालेल ना ? रागावणार नाही ना आमच्यावर ? आणि हो वरात थांबवली म्हणून आम्ही दोघं माफी मग मागतो . ”
नवरा नवरीनं हात जोडून नमस्कार केला . अचानक टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला . आणि बँडवर नवीन गीत सुरू झालं … बजाओ ढोल स्वागतमें l मेरे घर राम आये हैं ll — आणि अत्यंत शिस्तबद्ध स्वरूपात वरात सुरू झाली . वऱ्हाडी नाचत होते , पण त्याला सुध्दा आता एक लय आली होती .
नव्या नवरीने नवऱ्याकडे पाहिलं . तो हसला . त्यानं मोबाईल काढला . त्यातला लाईट लाऊन मोबाईल उंच धरला . क्षणार्धात सगळ्यांनी त्याचे अनुकरण केले . वरात आता आणखीनच शोभिवंत आणि अर्थपूर्ण झाली होती .
( काल्पनिक )
— डॉ . श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी.
९४२३८७५८०६
Leave a Reply