नवीन लेखन...

लाल माकड

एकदा एक शिष्य आपल्या गुरुंना म्हणतो की मला असा एक प्रभावी मंत्र द्या ज्याच्यामुळे आत्मशांती लाभेल. गुरु म्हणतात की रोज तुझ्या आराध्य दैवतेचा नामजप कर आणि दुसरे कोणतेही विचार मनात येणार नाहीत याची काळजी घे. विशेषतः लाल माकडाचा विचार तर अजिबातच करू नकोस. आत्मशांतीचा इतका सोपा मार्ग कळल्यावर शिष्य समाधान पावला. त्याच दिवशी तो जपाला बसला.तेव्हा त्याला आठवले की लाल माकडाचा विचार मनात अजिबात आणायचा नाही. तत्क्षणी लाल माकड त्याच्या मनश्चक्षुंसमोर आले. कल्पनेनेच तो त्याला हाकलू लागला. पण ते काही केल्या मनातून जाईना. जप सोडून शिष्य उठला. दुसऱ्या दिवशी जपाला बसताना त्याने ठरवले की आज काही झाले तरी माकडाचा विचार करायचा नाही. डोळे बंद करुन जपाला सुरुवात केली अन् त्याच क्षणी ते लाल माकड त्याच्या मनात आले. ध्यानभंगाने तो त्रस्त झाला. तिसऱ्या,चौथ्या दिवशी तसेच घडले. जपाला बसण्याची त्याला भीती वाटू लागली. तो पुन्हा गुरुंकडे गेला. सर्व हकीकत सांगून म्हणाला की आधी जेवढी शांती होती ती सुद्धा आता हरवली आहे.

गुरु म्हणाले ही तुझ्या स्वभावातील नकारात्मकता आहे जे करायचे नव्हते तेच तू केलेस. दैवतापेक्षा तू त्या माकडाचे स्मरण जास्त केलेस. नकारात्मक विचार जर काढता आले नाहीत तर आत्मशांती मिळणारच नाही. ही गोष्ट आपणा सर्वसामान्य माणसांनाही किती चपखल लागू होते पहा. आत्मशांती हे त्या शिष्याचे उच्च ध्येय होते. संसारात रमलेल्या,षड्रिपूंनी घेरलेल्या सर्वसामान्यांची उद्दिष्टे अगणित असतात. एकाच वेळी अनेक आणि एकापुढे दुसरे तयारच असते. बरेच काही मिळवूनही माणसे असमाधानीच असतात. बव्हंशी लोक असेच असतात.अगदी अलीकडच्या किंवा पलीकडच्या टोकावर माणसे नसतात असे नव्हे, पण ते अत्यल्प असतात. अनेक हव्यासांनी घेरल्यामुळे आपण एकावेळी एका गोष्टीवर केंद्रित न होता अनेक गोष्टींचा विचार करतो. अनेक जण एखादे उद्दिष्ट पूर्ण होण्यापूर्वी मार्गातील अडथळ्यांना व संभाव्य अपयशाला घाबरतात. होय! बहुतांशी लोक याच वर्गात मोडतात. याची कारणे आहेत स्वभावातील भीती, विचारातील नकारात्मकता आणि मुख्य म्हणजे मनाची चंचलता. या गोष्टीतले लाल माकड हे या वृत्तींचे प्रतीक आहे. या जागृत झाल्या की मग कुठली एकाग्रता आणि कुठली शांती! एखादी गोष्ट हवी असते. ती मिळवण्याचा प्रयत्न होतो पण त्याच वेळेस ती नाहीच मिळणार किंवा मिळवून गमावली तर काय असेही विचार मनात येतात. उदाहरणार्थ पैसा. कष्टाने किंवा सोप्या मार्गाने सर्वांना हवाच असतो. तो मिळवत असताना हरवला,बुडाला किंवा चोरीला गेला तर काय, तो कसा, कुठे सांभाळायचा,कसा वाढवायचा या विचारांनी काहीजण अतिरिक्त अस्वस्थ होतात. म्हणूनच म्हणतात ना की श्रीमंतांची झोप उडते, गरीब मात्र सतरंजीवरही शांतपणे झोपतो.

असे चिंतातूर जंतू आपणामध्ये भरपूर आहेत. अभ्यासू विद्यार्थी निकालाचा, नोकरदार बढतीचा, व्यापारी नफातोट्याचा अतिरिक्त ताण घेतात. चांगल्यापेक्षा वाईटाचा विचार आपण जास्त करतो. आनंदाचे क्षण लगेच विरतात, दुःखाचे दीर्घकाळ रेंगाळतात. मग आपण अशांत होतो. मनातली शांती बाहेर शोधतो. पूजाअर्चना, व्रतवैकल्ये, नवससायास या मार्गांनी जातो. त्या बदल्यात देवाने प्रसन्न व्हावे असे वाटते, जणू काही तो कुणी लाचखोर व्यक्ती आहे. शांती समाधानाचे मार्ग इतके सोपे असतात का? बरं ते करताना तरी मन मोकळं असतं का? देवळात हात जोडताना मन बाहेर सोडलेल्या चपलांच्या काळजीत असतं. रोजची पूजा करताना मनात तर वेगवेगळेच विचार येतात. अशा साध्या साध्या गोष्टीतून जर आपली सुटका होत नसेल तर आत्मशांती फार दूरची गोष्ट आहे. स्वत:च्या नाभीतील कस्तुरीच्या शोधात हरीण रानोमाळ भटकते. आपलेही तर तसेच आहे. सुख, समाधान, आनंद, आत्मशांती या अनुभूती आहेत. त्या वस्तूंसारख्या धरता येत नाहीत किंवा दागिन्यांसारख्या लॉकरमध्येही टाकता येत नाहीत. त्यांची प्रचितीही अल्पकालीन असते.

आपण सामान्य माणसे, आत्मशांतीच्या शोधात आपल्या संसाराचा त्याग करून हिमालयात जाणार नाही आहोत. आपल्याला हवे असलेले समाधान आपल्या वाट्याला आलेल्या परिस्थितीतच शोधायचे आहे. ही साधना साधता यायला हवी. त्यासाठी आपल्याला कुटुंबाची,माणसांची, नात्यांची गरज आहे. त्यांना तोडून आपण समाधानी होऊ शकत नाही. त्यासाठी गरजेचे आहे माणसे जोडणे, नाती टिकवणे, स्वतःची सहनशीलता वाढवणे. याच गोष्टी मनाशी जपल्या तरी मंत्राचे काम करतील. यातून मिळणाऱ्या समाधानाचे रूप शांती नव्हे काय? मनाला बांधून नाही ठेवता येत,पण मोठे तर करता येते ! त्या मोठ्या मनातील एका कोपऱ्यात राहू द्या ना ते लाल माकड. त्याला हाकलण्याचा जेवढा प्रयत्न करु तेवढे ते आपल्याला जास्त खिजवते.

त्याच्या जोडीला एखादे पांढरे कबूतरही आणून ठेवता आले तर बघावे. दुःख आहे म्हणून तर सुखाचे महत्त्व आहे. दुःखच नसेल तर सुखाला कोण विचारेल? आणि मनःशांती तरी कशाला हवी आहे, समाधानासाठीच ना? हे करून पाहूया. विचाराची दिशा बदलून बघूया. आपल्याकडे काय नाही त्यापेक्षा जे आहे ते पाहूया,टिकवून ठेवूया. दिवस संपला, आता रात्र होईल असे म्हणण्याऐवजी, रात्र झाली, आता सकाळ होईल असा विचार केला तर…! फ्रेंच तत्त्वज्ञ पिएरे टेलहार्ड द शार्डनने म्हटले आहे, ” आपण आध्यात्मिक अनुभव घेणारे मानवी जीव नसून, मानवी अनुभव घेणारे अध्यात्मिक जीव आहोत.” तेव्हा .. अवघड आहे पण अशक्य नाही.

-आराधना कुलकर्णी

Avatar
About सौ. आराधना अनिल कुलकर्णी 10 Articles
सेवानिवृत्तजेष्ठ अधिव्याख्याता.कथालेखन व अनुवाद. काही पुस्तके प्रकाशित. वृत्तपत्रीय प्रासंगिक लेख व दै. प्रजपत्र साठी सदर लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..