नवीन लेखन...

न्याय मिळवावा लागतो!




प्रकाशन दिनांक :- 22/08/2004

‘आपल्या कुटुंबीयांना उघड्यावर टाकणारा आत्महत्येसारखा मार्ग निवडणे म्हणजे पळपुटेपणा होय. त्याला पुरुषार्थ म्हणत नाही. शेतकऱ्यांनी तो मार्ग न निवडता, जिद्दीने संकटावर मात करावी.’ – इति शरद पवार. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी व्यथित झालेल्या शरद पवारांनी परिस्थितीपुढे लाचारी न पत्करता परिस्थितीला आपल्या अनुकूल करण्याची हिंमत शेतकऱ्यांनी अंगी बाणवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांची अपेक्षा योग्यच म्हणायला पाहिजे. स्वत:ला संपविणे हा कोणतीही समस्या स्वत:पुरती संपविण्याचा सोपा मार्ग असला तरी तो मार्ग योग्य ठरत नाही. आत्महत्या करून शेतकरी स्वत: संकटातून मुक्त होत आहेत. परंतु त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांना वाऱ्यावर सोडण्याचा हक्क त्यांना आहे काय? त्या उघड्यावर पडलेल्या कुटुंबीयांनी कोणाकडे पाहायचे? उभे आयुष्य जिवंतपणी जळत जगण्याची शिक्षा त्यांना का म्हणून? घरातल्या कर्त्या पुरुषानेच असा आत्मघाताचा मार्ग पत्करल्यावर इतरांनी जगायचे कशासाठी आणि कुणासाठी? आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी शेतकऱ्यांनी याचा थोडा विचार करावा. संकटे प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतात. त्याची तीपता कमी – अधिक असेल, परंतु सुखी माणसाचा सदरा आजपर्यंत कोणालाच गवसला नाही, ही वस्तुस्थिती आहे. या संकटांवर जिद्दीने मात करण्याचा प्रयत्न म्हणजेच पुरुषार्थ! अर्थात प्रत्येकवेळी आपल्याला विजय मिळेलच असे नाही, परंतु त्याचवेळी प्रत्येक लढाईत आपला पराभवच होईल असेही नाही. जय-पराजयाची ही मालिका आयुष्याच्या लढाईत अव्याहत सुरुच असते. त्यामुळे एखाद्या पराभवाने खचून रणांगणातून पळ काढणे श्रेयस्कर ठरत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय विश्लेषण केले जात आहे. त्यांच्या आत्महत्यांमागील
कारणांचा शोध घेतल्या जात आहे. आर्थिक दुरावस्था, नापिकी, कर्जबाजारीपणा ही कारणे त्यांच्या आत्महत्यांमागे आहेत यात शंका नाही, परंतु ही कारणे अचानक उद्भवली असे नाही. नापिकी आणि कर्जबाजारीपणाचे वरदान तर शेतकऱ्याला जन्मत:च असते. ते पूर्वीही होते, ते आजही आहे. अशा परिस्थितीत

गेल्या तीन -चार वर्षातच

एखाद्या रोगाची साथ पसरावी तशी आत्महत्येची साथ शेतकरी वर्गात का पसरली? इतर अनेक कारणांसोबतच त्यामागे एक महत्त्वाचे कारण हेसुद्धा आहे की, स्वभावत:च असलेली लढण्याची जिद्दच शेतकरी वर्ग अलीकडील काळात हरवून बसला. खरेतर पाठोपाठ होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागे हेच एक महत्त्वाचे कारण आहे. एकाची आत्महत्या वेगळ्या अर्थाने दुसऱ्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे. एकाची निराशा दुसऱ्याच्या निराशेला अधिक काळोखी करत आहे. एकाचे पलायन दुसऱ्याला मार्गदर्शन ठरत आहे आणि खेदाची बाब ही आहे की, शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागील या महत्त्वाच्या पैलूकडे बहुतेकांचे दुलर्क्ष होत आहे. केवळ शरद पवारांनी या कारणाचे नेमके विश्लेषण केले. आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारतर्फे अगदी गळ्याशी आले म्हणून काही प्रयत्न केले जात आहेत. परंतु हे प्रयत्न म्हणजे वरवरची मलमपट्टी आहे. वीज बिल माफी किंवा कर्जावरील व्याज माफ करणे हे शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा देणारे उपाय आहेत. तो कायमस्वरूपी तोडगा ठरू शकत नाही. आज खरी गरज आहे ती शेतकऱ्यांच्या मनात आत्यांतिक निराशेचे मळभ दाटून आलेले दूर करण्याची, त्यांच्या हरवलेल्या जिद्दीला पुन्हा प्रज्वलित करण्याची, न्यायासाठी चाललेल्या त्यांच्या लढाईला वेगळी दिशा देण्याची! आत्महत्या करणे म्हणजे शरणागती पत्करीत संकटाला पाठ दाखविणे. या मार्गाने संकटे दूर होत नसतात. संकटांना, आव्हानांना भिडावे लागते. त्यांच्याशी लढावे लागते. ज
जिद्दीने लढतो त्याचा विजय निश्चित असतो. लढण्याची ही स्फूर्ती शेतकऱ्यांमध्ये पुन्हा निर्माण करावी लागेल.
सरकार, प्रशासन, सावकार अशा सगळ्याच घटकांकडून शेतकरी पिळला जात आहे. एकवेळ कर्ज दिल्यानंतर ते कर्ज फेडल्याशिवाय बँका शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज देत नाहीत. उत्पादनासाठी निसर्गावर आणि उत्पन्नासाठी सरकारवर अवलंबून असलेला शेतकरी बरेचदा हे कर्ज निर्धारित मुदतीत फेडू शकत नाही. कधी निसर्ग दगा देतो तर कधी सरकार पिळवणूक करते. कर्ज तर फेडायचे असते आणि त्यासाठी पुन्हा शेतीत पैसे गुंतविण्याशिवाय पर्याय नसतो. अशावेळी शेतकरी अलगद सावकारी पाशाच्या जाळ्यात अडकतो. हाती आलेली शिकार फाडून खायला सावकारही मागे-पुढे पाहत नाही. लाखमोलाची जमीन केवळ काही हजारांसाठी अव्वाच्या सव्वा व्याजदराने पैसे घेऊन गहाण ठेवली जाते. सावकारी कर्जाला कुठलाही नीती-नियम लागू होत नाही. बेभरवशाच्या शेतीतून या कर्जाचे व्याजही फेडल्या जाऊ शकत नाही. शेवटी शेतकऱ्याच्या जगण्याचा एकमात्र आधार असलेली शेती सावकाराच्या घशात जाते. कर्जे त्यांच्या व्याजासहित उत्तरोत्तर फुगत जातात. शेवटी कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत शेतकरी असहाय अवस्थेत मृत्यूला जवळ करतो. परंतु अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी थोडा वेगळा विचार करायला पाहिजे. आत्यंतिक निराशेच्या क्षणी किंवा अन्यायाने परिसीमा गाठल्यावर मनुष्याच्या मनात दोनच विचार येतात किंवा त्याच्याजवळ दोनच पर्याय उरतात-मारणे अथवा मरणे! मरणे हा पलायनवाद झाला. मरायचेच आहे तर स्वत: फाशी घेऊन कशाला मरायचे? त्याने काहीही साध्य व्हायचे नाही. कुणाच्याच हृदयाला पाझर फुटणार नाही. त्यापेक्षा ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला त्याला मारा; तुमच्या फाशीची सोय सरकार करेल. शिवाय साक्षी, पुरावे वगैरेच्या भानगडी तुमच्या पथ्यावर पडण्याचीच शक्यता अधिक. तुम्
ी निर्दोष सुटू शकता. एखाद्याला असा धडा शिकविल्यानंतर बाकी कुणाची तुमच्या वाटेला जाण्याचा टाप नाही. मरायचेच ठरविले असेल तर मारुन मरणे केव्हाही श्रेयस्कर. आजकाल न्याय मागण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. न्यायाची प्रतीक्षा कराल तर प्रतीक्षाच करावी लागेल. न्याय मागून मिळण्याचे दिवस गेलेत, तो आता मिळवावा लागतो. नागपुरातल्या त्या महिलांनीसुद्धा अशीच प्रतीक्षा केली, परंतु न्याय मिळत नाही म्हटल्यावर त्यांनी आपल्या पद्धतीने न्याय मिळविला. अक्कू यादवला त्या पीडित महिलांनी भर न्यायालयात अक्षरश: ठेचून मारले. त्या महिलांवरील अन्यायाने सुद्धा परिसीमा गाठली होती. त्यांच्या मनातही आत्यंतिक निराशा दाटून आली असणार, परंतु म्हणून त्यांनी आत्महत्या केली नाही. त्यांनी सूड

उगवला आणि तोही अशा भीषण पद्धतीने की पुन्हा कोण्या

अक्कू यादवला महिलांकडे डोळे वर करुन पाहण्याची हिंमतदेखील होऊ नये. त्या महिलांना कुणी खुनी म्हणणार नाही. उलट त्यांच्या धिरोदात्तपणाचे कौतुकच केले जाईल. जीवाशी गाठ पडल्यानंतर माकडीणही स्वत:च्या पिल्लाला पायाखाली घेते, हा निसर्ग नियमच आहे. इथे प्रत्येकाला जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि सोबतच त्या अधिकाराला कोणी अन्यायकारकरित्या बाधा आणत असेल तर त्याला संपविण्याचादेखील. नागपुरातल्या त्या महिलांनी या निसर्गसिद्ध अधिकाराचेच पालन केले. मानवी कायदे सदोष असू शकतात, पण निसर्ग नियमात कुठल्याही भेसळीला वाव नाही. त्यामुळेच निसर्ग नियमाला डावलून केलेली आत्महत्या पळपुटेपणा ठरतो. संघर्ष हा जीवनाचा स्थायीभाव आहे. संघर्ष टाळणे म्हणजे जीवनाला नाकारणे. शेतकऱ्यांच्या जीवनात तर पदोपदी संघर्ष असतो. सतत संघर्षाशी लढून कणखर झालेल्या मनात आत्महत्येचे विचार डोकावतातच कसे? नाही, ही परिस्थिती बदलायलाच पाहिजे. आता शेतकऱ्यांनी मरायचे नाही आणि मर
ायचेच असेल तर मारुन मरायचे. 400 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. प्रत्येकाने किमान एकेक जुलमी अधिकारी, सावकार संपविला तर अर्धा महाराष्ट्र आज स्वच्छ झाला असता किंवा असेही म्हणता येईल की आत्महत्येस उद्युक्त झालेल्या पहिल्या शेतकऱ्याने मरण्यापूर्वी एखाद्याचा बळी घेतला असता तर कदाचित पुढच्या 399 शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला नसता. शेवटी अन्याय सहन करायला एक मर्यादा असते आणि ही मर्यादा ओलांडल्यावर काय होते किंवा काय केले जाऊ शकते, हे नागपुरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या अडाणी महिलांनी दाखवून दिले.
मी आधीच म्हटल्याप्रमाणे न्याय मिळण्याचे दिवस आता संपलेत, ते असते तर शेतकऱ्यांवर आत्महत्येची पाळी आली नसती. आता न्याय मिळवावा लागतो आणि प्रत्येकाचा प्रत्येकाला मिळवावा लागतो. कुणाच्या मदतीची वाट पाहण्यात अर्थ नाही. आयुष्य आपले असते, संघर्षही आपल्यालाच करावा लागतो. आता साने गुरुजींच्या शब्दात सांगायचे तर –
‘येथून तेथून सारा पेटू दे देश,
उठू दे देश, पेटू दे देश।
कमावता तुम्ही गमावता कसे
सिंह असून तुम्ही बनलात रे ससे
तेजे उठा आता पडा ना असे
माणसे बना आता, बनू नका मेष,
येथून तेथून सारा पेटू दे देश,
उठू दे देश, पेटू ते देश।

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..