नवीन लेखन...

पुरस्कार आणि तिरस्कार




प्रकाशन दिनांक :- 09/11/2003
जगात भारताची ओळख भारतातील नानाविध वैशिष्ट्यांमुळे अनेक प्रकारे स्थापित झाली आहे. अर्थात ही सगळीच वैशिष्ट्ये आपल्यासाठी भूषणावह आहेतच असे नाही, उलट बहुतेक वैशिष्ट्यांनी भारत जगाच्या पाठीवर कुचेष्टेचाच विषय ठरला आहे. सर्वाधिक सुट्ट्या घेणारा देश ही आपली एक ओळख आपल्या आळशी आणि बेपर्वा वृत्तीचे जसे जाहीर प्रदर्शन ठरते, तद्वतच विपुल नैसर्गिक साधन संपत्ती, मनुष्यबळ असतानादेखील देशात असलेली गरिबी आपल्या नियोजनशून्य कल्पकतेला उघडे पाडीत असते. आपली अशी ‘ओळख’ देणाऱ्या वैशिष्ट्यांची मालिका तशी खूप मोठी आहे. या मालिकेतील एकेक भाग स्वतंत्र ठांथाचा विषय होऊ शकतो. ‘पुरस्कार’ हासुध्दा या मालिकेतलाच एक भाग आहे.
शाळेत म्हटल्या जाणाऱ्या (घोकल्या जाणाऱ्या म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल) प्रतिज्ञेत भारताचा उल्लेख ‘समृध्द आणि विविध परंपरांनी नटलेला’ असा केला जातो. कालपरत्त्वे आता या वाक्यात थोडी सुधारणा करून ‘समृध्द आणि विविध परंपरा तसेच पुरस्कारांनी नटलेला’ असा उल्लेख करणे अधिक योग्य ठरेल. इतर कोणत्या गोष्टींनी भारत नटलेला आहे की नाही, हा कदाचित वादाचा विषय ठरू शकतो. परंतु हा देश पुरस्कारांनी नटलेला आहे, हे मात्र निर्विवाद सत्य आहे. ‘गल्लीरत्न’ पासून ‘भारतरत्न’ पर्यंत पसरलेल्या या पुरस्काराच्या महासागरात डूबकी घेऊन आजपर्यंत कितीतरी रत्न धन्य झाले आहेत. कोणतातरी पुरस्कार किंवा सन्मान आपल्या पदरी पडावा, यासाठी बहुतेकांची धावपळ सुरू असते. एकवेळ या पुरस्काराचे लेबल नावाच्यासमोर लागले की, मग त्या लेबलच्या आड सुरक्षित राहून बरेच काही बिनबोभाटपणे करता येते. कुठला तरी ‘महर्षी’ किंवा ‘सम्राट’ म्हणून आपली ओळख प्रस्थापित झाली की, आपल्या सगळ्या काळ्या – पांढऱ्या धंद्याला अधिकृतता, वैधता, समाजमान्यता मिळते हे ठाऊक असलेल्या चाणाक्ष
ोकांनी या पुरस्कारांचे व्यवस्थित मार्केटिंग करणे सुरू केले. परंतु या सगळ्या प्रकारात पुरस्कारांचा गरिमा, त्यांचे पावित्र्य

पार हरवून गेले आहे.

बरेचदा तर अशा व्यक्तींना पुरस्कार दिला जातो की, त्यामुळे त्या व्यक्तीचा सन्मान झाला की त्या पुरस्काराचे अवमूल्यन झाले हेच कळत नाही.
क्रीडा, राजकारण, समाजसेवा, शिक्षण, साहित्य अशा जवळपास सगळ्याच क्षेत्रात विविध पातळीवरचे पुरस्कार दिले जातात. या सगळ्या पुरस्कारांचा एक अदृश्य परंतु सामाजिक घटक असतो तो म्हणजे राजकारण. पुरस्कार कुठल्याही क्षेत्रातला असो, कुठल्याही पातळीवरचा असो तो प्रदान करताना किंवा एखाद्या व्यक्तीची त्या पुरस्कारासाठी निवड करताना राजकारण खेळल्या गेले नाही असे कधीच होत नाही आणि ज्या ठिकाणी राजकारण आहे तिथे पावित्र्य, नीतिमत्ता, पात्रता असल्या गोष्टींना थारा मिळूच शकत नाही. तिथे निकष एकच असतो आणि तो म्हणजे ‘फायदा’! पुरस्कार देणारा आणि घेणारासुध्दा त्यातून आपला फायदा किती होईल, याचाच विचार करीत असतो. एकंदरीत पुरस्कारांचा बाजार मांडल्या गेला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही आणि एकवेळ वस्तू बाजारात मांडली गेली की, त्या वस्तूचे ‘मूल्य’ हरवते आणि उरते ती केवळ किंमत. खरेतर मूल्य हरविलेल्या वस्तूला किंमतही उरत नाही. आपल्या देशात पुरस्कारांचेही तसेच झाले आहे. विविध सामाजिक संस्था आणि सरकारतर्फे पुरस्काराने गौरवान्वित केलेल्या व्यक्तींच्या नावावर एक नजर फिरवली तरी हसावे की रडावे, हा प्रश्न पडतो. वास्तविक पुरस्काराने एखाद्या व्यक्तीचा गौरव करणे ही संकल्पनाच चुकीची आहे. पुरस्कार प्रदान करून त्या व्यक्तीच्या कार्याचा, त्यागाचा गौरव होऊ शकत नाही. पुरस्काराच्या फुटपट्टीने एखाद्या व्यक्तीचे कर्तृत्व मोजल्या जाणे सर्वथा चुकीचे आहे. पुरस्कार प्रदान करून त्या व्यक्तीविषयी
, त्याच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाऊ शकते, त्याचा गौरव केल्या जाऊ शकत नाही. पुरस्कार व्यक्तीपेक्षा, त्याच्या कर्तृत्वापेक्षा मोठे असू शकत नाही. पाकयुध्दात अतुलनीय पराक्रम गाजवित शहीद झालेल्या अब्दुल हमीदला लष्करातील सर्वोच्च पुरस्कार ‘परमवीर चक्र’ प्रदान करण्यात आले. इथे परमवीर चक्राने अब्दुल हमीदचा सन्मान वाढला, त्याचा गौरव झाला असे म्हणणे योग्य ठरणार नाही तर अब्दुल हमीदच्या पराक्रमाने परमवीर चक्राची शान वाढली असेच म्हणावे लागेल. थोडक्यात कुठलाही पुरस्कार प्रदान करताना त्या पुरस्काराचा सन्मान एकवेळ झाला नाही तरी चालेल किमान त्याचे अवमूल्यन तरी होणार नाही याची दक्षता घेतली जाणे अपेक्षित आहे. परंतु पुरस्कारांच्या बाजारीकरणाने हा साधा आणि सर्वाधिक महत्त्वाचा संकेत केव्हाच गुंडाळून ठेवला आहे. व्यक्तीच्या कार्यापेक्षा पुरस्काराचे महत्त्व वाढले आहे. पुरस्काराच्या या अवमूल्यनाने खऱ्या अर्थाने पुरस्कारासाठी पात्र असलेल्या व्यक्ती बरेचदा पुरस्कारापासून वंचित राहतात आणि पुरस्कार मिळविण्याची ‘हातोटी’ ज्यांना साधली आहे, अशी नकली माणसे पुरस्काराचे बिरुद नावासमोर लावून उजळमाथ्याने समाजात वावरत असतात. आजही देशासाठी, समाजासाठी निरलस वृत्तीने कार्य करणारे, आपल्यापरीने शक्य होईल तेवढा त्याग करणारे शेकडो लोकं समाजात आहेत. परंतु कोणत्याही सरकारी पुरस्काराला त्यांची दखल घ्यावीशी वाटत नाही, अर्थात या लोकांनाही ती अपेक्षा नाही. पुरस्कार डोळ्यासमोर ठेवून समाजसेवा करणारी व्यावसायिक वृत्ती त्यांच्यात नाही. परंतु अशा लोकांची उपेक्षा करून ज्यांचे कुठलेही कर्तृत्व नाही, योग्यता नाही त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असेल तर खंत ही वाटणारच. देशाच्या तिजोरीत स्वत:च्या कष्टाने करोडोची भर घालणाऱ्या, नव नवे तंत्
ज्ञान विकसित करून मोठ्याप्रमाणात विदेशी चलन वाचविणाऱ्या आणि मिळवून देणाऱ्या, लाखो बेरोजगारांच्या हाताला काम देणाऱ्या लोकांचे कर्तृत्व कथित पुरस्कार प्राप्त लोकांच्या तुलनेत कितीतरी सरस आहे. परंतु त्यांच्या वाट्याला केवळ अवहेलना आणि तिरस्कारच येतो. कित्येक पुरस्कारप्राप्त लोकांचे कर्तृत्व तपासले तर आपण शेवटी या निष्कर्षावर पोहचू की, या लोकांनी देशाची, समाजाची जी सेवा केली आणि ज्याप्रकारे केली आहे, ती नसती केली तर देशाचे अधिक भले झाले असते. बरेचदा तर असे वाटते की, या लोकांच्या समाजसेवेसाठी यांना पुरस्कार

देण्याऐवजी यांनी आपली समाजसेवा आवरती घ्यावी, यासाठी पुरस्कार दिला

तर अधिक बरे होईल.
पुरस्कार प्रदान करताना काही निकष निश्चित केलेले असावेत. एकच पुरस्कार अनेकांना देताना सगळ्यांचेच कर्तृत्व एकाच पातळीवर आणण्याचे पातक होऊ शकते, अशावेळी अतिशय सुमार उंचीची, खुज्या कर्तृत्वाची माणसंही एका रात्रीतून मोठी होतात. हे त्या पुरस्काराचे अवमूल्यन तर आहेच शिवाय त्या पुरस्काराने सन्मानित इतर श्रेष्ठ लोकांचा अपमान होतो, हेसुध्दा ध्यानात घेतले पाहिजे. पुरस्कारासाठी व्यक्तींची निवड करताना याचे भान असणे आवश्यक आहे. दुर्दैवाने हे भान पाळले जात नाही. ‘भारतरत्न’ सारखा सर्वोच्च नागरी पुरस्कार देतानाही राजकारण खेळले जाते. धर्मांतरणाचे लक्ष्य ठेवून रुग्णसेवा करणाऱ्या एका विदेशी स्त्रीला ‘भारतरत्न’ देतांना आमचे सरकार क्षणाचाही विलंब लावत नाही आणि ज्यांच्या कर्तृत्वासमोर साक्षात हिमालयाने नतमस्तक व्हावे, अशा नेताजी सुभाषचंद्र बोसांना कित्येक वर्षे या पुरस्काराच्या ‘वेटींग लिस्ट’वर राहावे लागले. नेताजीसारखी व्यक्ती ‘भारतरत्न’ ठरू शकत नसेल तर या देशातील एकही व्यक्ती त्या पुरस्काराच्या जवळपासही फिरकण्याच्या योग्यतेची नाही. ‘भारतरत्
‘ पुरस्कार प्राप्त नावांच्या यादीवर नजर फिरवा आणि काही सन्माननीय अपवाद वगळता इतरांच्या कर्तृत्वाची नेताजींच्या कर्तृत्वाशी तुलना करा, भारतात रत्नांची किंमत दिवसेंदिवस किती घसरत चालली आहे हे तुमच्या सहज लक्षात येईल. प्रत्येक सरकारी पुरस्काराच्या बाबतीत परिस्थिती अशीच आहे. बहुतेक वेळा असेच होते की, ज्यांचे कर्तृत्व पुरस्कारापेक्षा मोठे असते त्यांच्या वाट्याला उपेक्षा, अवहेलना आणि तिरस्कार येतो आणि ज्यांना पुरस्कार दिला जातो त्यांचे कर्तृत्व पुरस्काराचे अवमूल्यन करणारे असते.

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..