नवीन लेखन...

नव्या युगाचा नवा मंत्र!




प्रकाशन दिनांक :- 08/08/2004
विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि म्हणूनच प्रवाहीपणा हे तिचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल. खळाळत वाहणारी नदी स्वत:सोबत वाटेत येणाऱ्या सगळ्यांनाच वाहत नेत असते; परंतु एखादा मोठा खडक तिच्या प्रवाहाला दाद न देता अविचल उभा राहतो. अशावेळी त्या खडकावर डोके आपटीत आपला प्रवाह अवरुद्ध करणे नदीला मान्य नसते. त्या खडकाला वळसा घालून ती आपले मार्गक्रमण सुरू ठेवते. विकासाचेही तसेच आहे. विकास प्रक्रियेतील बदलाला स्वीकारून जे समोर जातात त्यांच्या विकासाचा प्रवाह सतत खळाळता असतो आणि जे त्या खडकाप्रमाणे अडेलतट्टू धोरण स्वीकारतात. त्यांची दखल घेण्याची गरज विकासाला भासत नाही. शेवटी ते खडक असतात आणि खडकच राहतात. त्यांच्यात कुठलाही बदल घडून येत नाही. जग कितीही समोर गेले तरी ते आहे तिथेच राहतात. खडकाच्या बाबतीत ते ठीक असले तरी राष्ट्र किंवा जिवंत माणसाच्या संदर्भात असा अडेलतट्टूपणा घातक ठरू शकतो. बदलत्या काळानुसार बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेतच विकास शक्य होत असतो. इथे विकास हा शब्द मी व्यापक अर्थाने वापरला आहे. विकास म्हणजे केवळ आर्थिक प्रगती नव्हे; या विकासात आर्थिक प्रगतीसोबतच सामाजिक, बौद्धिक, मानसिक, वैज्ञानिक प्रगतीचाही समावेश होतो. त्यामुळे कोणे एकेकाळी एखादी गोष्ट त्यावेळच्या परिस्थितीला अनुरूप असली तरी ती आजही तेवढीच योग्य ठरेल, असे म्हणता येणार नाही. महात्मा गांधींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देताना चरख्याचा मंत्र प्रभावीपणे वापरला. सूतकताईच्या माध्यमातून, कापडाच्या व्यापाराच्या पायावर उभ्या असलेल्या ब्रिटिश सत्तेला महात्माजींनी मुळापासून हादरविले. त्याकाळी प्राप्त परिस्थितीत स्वातंत्र्य मिळविण्यासाठी तो एक प्रभावी मार्ग होता; परंतु आज मानसिक गुलामगिरीतून डोकावणारे पारतंत्र्य आम्हाला झुगा
रून द्यायचे असेल तर वेगळा मार्ग चोखाळावा लागेल. खरे तर आज आपण स्वत:ला स्वतंत्र देशाचे नागरिक संबोधतो, हाच एक मूर्खपणा

आहे. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून आपण राजकीयदृष्ट्या

भलेही स्वतंत्र झालो असोत, व्यवस्था मात्र अद्यापही ब्रिटिशकालीनच आहे. प्रशासन, शिक्षण व्यवस्था ब्रिटिशकालीन आहेच आणि इतकेच नव्हे तर सामाजिक संकेत पाळतानासुद्धा आम्ही ब्रिटिशांच्या गुलामगिरीतच स्वत:ला धन्य मानत असतो. आता ही गुलामगिरी झुगारून देण्यासाठी आम्ही महात्माजींच्या मार्गाचा अवलंब केला तर एका नव्या गुलामगिरीत अडकून पडू शकतो. सांगायचे तात्पर्य, प्रत्येक बाबतीत काळानुसार संदर्भ बदलत असतात आणि या बदलत्या संदर्भांना समजून घेऊनच काळाच्या प्रवाहात टिकून राहता येते. अन्यायाविरुद्ध बंड करून उठायचे म्हणजे बंदुकच हातात घेतली पाहिजे, असे नाही. खरे तर आज बंदुक हातात घेणे, हा एक मूर्खपणाच ठरेल. बऱ्याचवेळा बंदुक किवा इतर शस्त्राने जे शक्य होत नाही ते लेखणी हातात घेऊन सहज प्राप्त करता येते. त्या त्या वेळेच्या परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागतो. प्राचीन काळी भारतात अनेक महायोद्धे होऊन गेलेत. त्यांच्या पराक्रमाच्या गाथा आजही आमच्यासाठी स्फूर्तिदायक आहेत; परंतु त्यांच्यासारखे हाती तलवार घेत घोड्यावर स्वार होऊन आम्ही पराक्रम गाजवायला बाहेर पडलो तर आमचा पराक्रम केवळ हास्यास्पद ठरेल. शारीरिक ताकदीच्या जोरावरील पराक्रमाला आता कुठलाही अर्थ उरलेला नाही. आता पराक्रम गाजवायचा तर तो केवळ डोक्याने गाजवावा लागतो. पूर्वी परदेशगमन पाप समजले जायचे. समुद्र ओलांडून जाणे अधर्म मानले जायचे. आज त्याच कल्पनांना आम्ही कवटाळून बसलो तर जगातील इतर पापी लोकं आमच्यासारख्या धर्मनिष्ठांवर पुन्हा हजारो वर्षे सत्ता गाजवतील. समुद्र ओलांडून परदेशात जाण्याचा अधर्मच आज धर्म ठरला आहे. स
दर्भ बदलले त्यामुळे धर्म अधर्माची व्याख्याही बदलली. माझा देश, माझी मातृभूमी, मी या मातीत जन्मलो आणि या मातीतच मरणार वगैरे संकल्पना आता कालबाह्य ठरल्या आहेत. या मातीत जन्मणे ठीक; परंतु या मातीचा, आपल्या मातृभूमीचा उद्धार करायचा असेल तर सात समुद्र ओलांडून परदेशात जाणे, डॉलर-पाऊंड- माक्र्स कमावणे आणि देशाच्या तिजोरीत या परकीय चलनाची भर घालणे, हाच सध्या देशभक्तीचा सर्वोत्तम मार्ग ठरला आहे. जुन्या काळातील संदर्भ आता सर्वार्थाने बदलले आहेत. पूर्वी पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्यांना समाजात प्रतिष्ठा होती. त्यांच्या योग्यतेला मान मिळायचा. आज मात्र तुमच्या बीए,बीकॉमला कोणी विचारत नाही. तुम्हाला संगणक हाताळता येत नसेल, इंटरनेटबद्दल माहिती नसेल तर तुमच्या पदव्या गुंडाळून कपाटात ठेवण्यापेक्षा अधिक महत्त्वाच्या उरत नाहीत. ‘शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी’ हे जरी ठीक असले तरी या शुद्धतेचा अत्याठाह धरीत आम्ही आमच्या जुनाट आणि कालबाह्य परंपरांना नको तितके गोंजारत बसलो तर सध्याच्या जेट युगात बैलगाडीने प्रवास करण्याइतपत ते मूर्खपणाचे ठरेल. साध्या बिजाचेच उदाहरण घेतले तर आज जैव तंत्रज्ञानाने या बिजाचे अंतर्बाह्य स्वरूप अगदी पालटून टाकले आहे. बीज आता त्या अर्थाने शुद्ध राहिलेलेच नाही. अशावेळी जे बदल घडत आहेत, जी तांत्रिक प्रगती होत आहे ती समजून घेऊन त्यातून आपल्यासाठी योग्य, उपयुक्त ठरेल ते तंत्रज्ञान विकसित करण्यातच खरा शहाणपणा आहे. साधन – शुचितेच्या व्याख्याही काळानुरूप बदलल्या आहेत. कधी काळी ‘चूल- मूल’ हेच स्त्तियांचे कार्यक्षेत्र होते. स्त्तियांनी घराचा उंबरा ओलांडणे पाप समजले जायचे. आज या पोथीनिष्ठ परंपरेला कवटाळून बसायचे ठरविल्यास 95 टक्के भारत कायम मागासलेला राहील.
सांगायचे तात्पर्य एवढेच की, काळानुरूप होत असलेल्या बदलाला स
वीकारून आपण सतत प्रवाहीत राहिले पाहिजे. प्रवाह तुंबला की त्याचे जसे डबके होते, त्यावर शेवाळ साचते आणि प्रवाहाचा अपरिहार्य गुण असलेली नितळता जशी कायमची हद्दपार होते, तसेच ज्ञान, संदर्भ,बदल याबाबतही आहे. पूर्वीच्या काळी ऋषी-मुनींना दिव्यज्ञान प्राप्त होत असे, असे म्हणतात. त्यांना दिव्यदृष्टी असायची म्हणे. आधुनिक काळात हे दिव्यज्ञान संपादित करायचे असेल तर आपलीही दृष्टी सर्व बदलांना समजून घेण्याइतकी, बदलत्या

संदर्भात त्या बदलांचे योग्य मूल्यमापन करण्याइतकी दिव्य असायला पाहिजे. त्या

पाच आंधळ्यांप्रमाणे आपणही हत्ती खांबासारखा, सुपासारखा किंवा केरसुणीसारखा आहे असेच समजत असू तर जीवनाच्या समठातेचा हत्ती आपल्याला कधीच दिसणार नाही. ही समठाता ज्याने समजून घेतली नाही, ज्याचे ज्ञान किंवा विचार कायम एकांगी राहिले तो काळाच्या प्रवाहात कधीच टिकू शकणार नाही. ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळुनी अथवा पुरुनी टाका’, हाच नव्या युगाचा नवा मंत्र आहे. जे चिरंतन सत्य असते ते कधीच नष्ट होत नाही. आपण ते जोपासत आहोत की नाही याने काहीही फरक पडत नाही. जे टिकायचे असते ते टिकतेच. त्याची प्राणपणाने जपणूक करणे वेडेपणा आहे. असा वेडेपणा करत आपण नव्या बदलांकडे, बदलत्या संदर्भांकडे पाठ फिरविली तर आपला विकास होणे कधीच शक्य नाही.

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..