जग एकविसाव्या शतकात दाखल झाले आहे, असे आपण अभिमानाने म्हणत असतो. या अभिमानाच्या मागे असते मानवाने वैज्ञानिक, तांत्रिक, शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या प्रगतीचे पाठबळ. गेल्या शे-दीडशे वर्षात मानवाने शैक्षणिक आणि तांत्रिक प्रगतीची शिखरे अतिशय झपाट्याने सर कलीत, यात काहीच शंका नाही. मानव चंद्रावर केव्हाच पोहचला आहे आणि आता मंगळावर स्वारी करण्याचा त्याचा प्रयत्न सुरु आहे. संगणकयुगात तर या प्रगतीने अतिशय वेग घेतला आहे. अत्याधुनिक साधने, उपकरणे मानवी जीवन सुसह्य करण्यासाठी सज्ज आहेत. निसर्गाचे प्रत्येक कोडे उलगडण्याची त्याची जिद्द निश्चितच कौतुकास्पद म्हणायला हवी. प्रत्येक गोष्टीमागचा कार्यकारणभाव शोधून त्याची कारणमिमांसा स्पष्ट करण्याचा प्रयत्न मानवाला इतर जीवसृष्टीच्या तुलनेत खूप प्रगत करून गेला. परंतु या प्रगतीला तो खऱ्या अर्थाने व्यापक करु शकला नाही, हेसुद्धा त्याचवेळी खेदाने नमूद करावेसे वाटते. वैज्ञानिक प्रगतीच्या साह्याने आपले भौतिक जीवन सुसह्य करण्यात तो यशस्वी झाला. विश्वाचे कोडे बहुतांश प्रमाणात सोडविण्यात त्याला यश मिळाले, परंतु त्याचवेळी आत्मिक प्रगतीपासून तो दूर गेला. भौतिक प्रगती इतकीच किंबहुना त्याहून अधिक आत्मिक प्रगती सुद्धा महत्त्वाची आहे, हे तो विसरला. चंद्र-मंगळावर तर तो पोहचला, परंतु मनाच्या अंतराळात त्याला डोकावणे जमले नाही. त्याचा परिणाम हा झाला की प्रचंड वैज्ञानिक भौतिक प्रगती साधूनसुद्धा त्याच्या मनातली अनामिक भीती नाहीशी होऊ शकली नाही. त्याच्या मानसिक जडणघडणीचा ताळमेळ बाह्य भौतिक प्रगतीशी कधीच साधल्या गेला नाही.
परवा हज यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी होऊन दोन-अडीचशे भाविक ठार झाले. मागे नाशिकच्या कुंभमेळ्यात देखील अशीच चेंगराचेंगरी झाली आणि अनेकांना प्राणास मुकावे लागले. आपल्या देशात तर हे प्रकार नित्याचेच झाले आहेत. कुठले तरी पावन पर्व असते, लाखोंची गर्दी जमते आणि मग चेंगराचेंगरी, अपघात हे ठरलेलेच. काही विशिष्ट प्रसंगी, काही विशिष्ट पर्वावर गर्दी करणाऱ्यांची मानसिकता नेमकी काय असते? प्रश्न श्रद्धेचा नाही. केवळ श्रद्धा आहे म्हणून लोक जातात, असे म्हणता येणार नाही आणि ही केवळ श्रद्धा असलीच तर या श्रद्धेचीही चिकित्सा होणे गरजेचे आहे. ही श्रद्धा ज्या पाप-पुण्यांच्या संकल्पनेवर उभी आहे, त्या संकल्पनेचीही चिकित्सा व्हायला पाहिजे. आमचे विज्ञान नेमके तिथेच उणे पडते. दोन अधिक दोन बरोबर चार असा सरळसोट नियम श्रद्धेच्या संदर्भात लावता येत नाही. ही अतिशय सापेक्ष संकल्पना आहे. व्यक्तिपरत्वे ती बदलू शकते. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या सोयीने श्रद्धेची व्याख्या करताना आढळतो. पाप – पुण्याचा प्रत्येकाचा हिशोबही वेगळा असतो. त्यामुळे एखाद्यासाठी एखादी गोष्ट पुण्याची असेल तर दुसऱ्यासाठी तीच गोष्ट पाप ठरु शकते. मुळात पाप-पुण्य ही संकल्पनाच अतिशय तकलादू आहे त्यामुळे या पाप-पुण्याच्या पायावर उभी असलेली श्रद्धादेखील तितकीच तकलादू ठरते. श्रद्धेला आज जे बाजारू स्वरूप प्राप्त झाले आहे ते याचमुळे.
अमुक इतक्या वाऱ्या करा, अमुक इतके दान करा, जप करा म्हणजे तुमच्यावरची संकटे नाहीशी होतील, कुठल्यातरी नदीत, संगमावर स्नान करा म्हणजे तुमचे शेकडो जन्माचे पाप धुऊन निघेल, असा व्यवहार चालतो. मुंबई ते शिर्डी पैदल वाऱ्या करणारे बरेच लोक मी पाहिले. त्यापैकी कोणीही मोक्षप्राप्तीसाठी वारी करीत नव्हता. कुणाला नोकरी हवी होती तर कुणाच्या धंद्याला बरकत नव्हती. इतरांचीही कारणे असलीच काहीतरी असतील.
उद्या जर खरोखरच ईश्वर प्रगट झाला आणि तमाम कथित भक्तांना त्याने मोक्ष देऊ केला तर 99.99 टक्के भक्त हेच म्हणतील की, आम्हाला मोक्ष नको. देऊ शकत असशील तर एक चांगली लठ्ठ पगाराची नोकरी, एखादा बंगला, गाडी, छानशी बायको दे. तुझा स्वर्ग कोणी पाहिला? आमचे स्वर्गसुख या गोष्टीतच आहे. अशाच कोणत्यातरी गोष्टीच्या अभावाने बहुसंख्य भक्तमंडळी ईश्वराकडे वळलेली असतात. हा अभाव दूर झाला की, भक्तीदेखील संपुष्टात येते आणि अभाव कायम राहिला तर भक्तीची तीपता अधिक वाढते. असल्या स्वार्थप्रेरित भक्तांनीच भक्तीचे अवडंबर माजविले आहे. हेच लोक लाखोच्या संख्येने पवित्र स्नानासाठी गर्दी करतात. ज्याची भक्ती ही केवळ भक्तीसाठीच असते तो,
‘हेची दान देगा देवा ,
तुझा विसर न व्हावा,
असे म्हणत शांतपणे आपले नित्यकर्म करीत असतो. त्याला कुठे जायची आवश्यकता नसते. ईश्वर चराचरात व्यापून उरला आहे. तो कुंभाराच्या चिखलात आहे, माळ्याच्या मळ्यात आहे, सर्वत्र आहे, हे त्याला माहीत असते. असो.
आजकाल श्रद्धेच्या नावाखाली जे काही चालते त्याला भक्ती म्हणणे योग्य ठरणार नाही, हा तर व्यापार झाला परंतु हे सुद्धा नाकारता येणार नाही की, वैज्ञानिक प्रगतीने, भौतिक सुविधांनी मानवी जीवनाला पूर्णता प्राप्त करुन दिली नाही. अपूर्णतेच्या या जाणिवेतून एक प्रकारचा न्यूनगंड किंवा भयगंड म्हणा वाटल्यास; मानवी जीवनाला व्यापून उरला आहे. एक प्रकारच्या मानसिक अस्वस्थेतेने, अशांततेने माणूस पोखरला गेला आहे. या अस्वस्थतेमुळेच माणसं देवभोळे होतात. ज्या प्रश्नाचे उत्तर कोणी देऊ शकत नाही, अगदी आधुनिक विज्ञानालादेखील ज्या प्रश्नांपुढे शरणागती पत्करावी लागते, अशा प्रश्नांच्या शोधात अलौकिक शक्तीला शरण जाणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. परंतु या शक्तीचे अस्तित्व कधी सिद्ध झाले नाही कधी होणारही नाही. जी भीतीच खोटी आहे, त्याचे समाधान तरी खरे कसे ठरणार? परंतु माणसं अगतिक आहेत, लाचार आहेत, प्रचंड अस्वस्थ आहेत, हे सत्य नाकारता येणार नाही. ही अस्वस्थता दूर करण्यासाठी चोखाळल्या जात असलेला मार्ग ही तितकासा योग्य नाही, हेदेखील तितकेच खरे आहे.
या विचित्र कोंडीतून मानवाला बाहेर काढणे हे विज्ञानापुढे, बुद्धिवादापुढे एक आव्हानच आहे. तुर्तास तरी हे आव्हान पेलण्यात विज्ञान यशस्वी ठरले नाही, असेच म्हणावे लागेल. परंतु शेवटी बुद्धिवादाची कास धरुनच ही कोंडी फोडावी लागणार आहे. श्रद्धावान असणे वाईट नाही.
आपली कुठेतरी, कशावर तरी श्रद्धा असायलाच हवी. माणसाला माणुसकीशी जोडणारा हाच एक सेतू आहे. फक्त ती श्रद्धा डोळस हवी. सत्याच्या, बुद्धीच्या, चिंतनाच्या मजबूत पायावर उभी असलेली हवी. सर्वच गोष्टी मानवी बुद्धीच्या कक्षेत मोडत नाहीत, हे मान्य असले तरी बुद्धीच्या, आकलनाच्या पलिकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी ‘शरणं मम्’ म्हणत कुठेतरी लोटांगण घालणेसुद्धा योग्य ठरणार नाही. त्यामुळे माणसे निर्वीर्य होण्याचा धोका संभवतो ‘ठेविले अनंते…’ ही वृत्ती बळावते. कर्तव्यपराङ्मुखता वाढीस लागते. गझनीच्या मेहमुदने पहिल्यांदा सोरटी सोमनाथवर स्वारी केली, तेव्हा त्या मंदिरात इतके पंडे (पुजारी) होते म्हणतात की, त्यांनी आपल्या हातातील पळी-पंचपात्रे फेकून मारली असती तरी मेहमूदच्या सैन्याचा पराभव झाला असता. कदाचित ही अतिशयोक्ती असेलही, परंतु परिस्थिती तशी निश्चितच होती. मुठभर इंठाजांनी खंडप्राय हिंदुस्थानवर राज्य केले ते आपल्या याच ‘देवतारी..’ मानसिकतेचा लाभ घेऊन.
सांगायचे तात्पर्य एवढेच की, श्रद्धेला कर्तव्य आणि बुद्धिवादाची जोड देणे नितांत गरजेचे आहे. श्रद्धा बळी घेणारी नसावी तर स्वत:सोबतच समाज आणि देशाचा उद्धार करणारी असावी. आज श्रद्धेला कबीरांच्या शब्दात सांगायचे तर,
‘जत्रा में फतरा बिठाया,
तिरथ बनाया पानी’
असे सवंग स्वरूप प्राप्त झाले आहे. या श्रद्धेला बुद्धिवादाच्या कोंदणात जडविण्याचे आव्हान विचारवंत, व ज्ञानिक, तत्त्वचिंतकांपुढे आहे आणि हे आव्हान त्यांना स्वीकारावेच लागेल.
प्रकाशन दिनांक :- 08/02/2004
Leave a Reply