प्रकाशन दिनांक :- 14/12/2003
आपला देश गरीब आहे, असे आपण म्हणतो, सगळेच म्हणतात. स्वत:च्या नाकर्तेपणाला गरिबीच्या गुळगुळीत आवरणाखाली झाकण्याचा आपला प्रयत्न असतो आणि त्यात आपण बऱ्याच प्रमाणात यशस्वीसुद्धा झालो आहोत. ‘गरीब’ या शब्दातून ध्वनित होणारा अर्थ हेच सांगतो की, एखाद्या विवशतेमुळे, बाह्य संकटामुळे आलेली ती एक अपरिहार्य अवस्था आहे. आपण स्वत:ला त्याच अर्थाने गरीब समजतो. परंतु ही शुद्ध आत्मवंचना आहे. आपल्या गरिबीसाठी कोणतेही बाह्य कारण अथवा संकट कारणीभूत नाही. आपली गरिबी कुठल्याही विवशतेचा परिपाक नाही. आपल्या गरिबीसाठी आपणच जबाबदार आहोत आणि म्हणूनच आपण आपला उल्लेख गरीब असा न करता दरिद्री असा करायला हवा. दरिद्री हा शब्द योग्य आहे. आपण गरीब नाही, आपण दरिद्री आहोत आणि हे दारिद्र्य आपल्याला आपल्या भाग्याने नव्हे तर आपल्या कर्माने मिळाले आहे. त्याअर्थी आपण कर्मदरिद्री आहोत.
आपले दारिद्र्य केवळ कर्मापुरतेच मर्यादित नाही तर आपण वैचारिकदृष्ट्यासुद्धा दरिद्रीच आहोत. एखादा कुठलाही नवा विचार, नवी कल्पना पुढे आली तरी जोपर्यंत त्यावर पाश्चिमात्य जगताच्या मान्यतेचा ठसा उमटत नाही तोपर्यंत तो विचार किंवा कल्पना आम्ही स्वीकारतच नाही. कुठलाही समाज किंवा देश वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ असेल, त्या देशातील लोकं खऱ्या अर्थाने प्रज्ञावंत, प्रतिभावान असतील तरच तो समाज-देश प्रगती करू शकेल. सगळ्या दु:खाचे मूळ अज्ञानात आहे असे म्हणतात, ते खरेच आहे. देशाच्या प्रगतीचा सरळ-सरळ संबंध त्या देशातील बौद्धिक संपदेशी आहे. या पृष्ठभूमीवर आपल्या देशाची अवस्था तपासली तर काय दिसते? बोटावर मोजण्याइतके शास्त्रज्ञ, विचारवंत, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ वगळता बौद्धिक संपदेच्या क्षेत्रातील आपली जमा पुंजी कितीशी आहे? कळसाचे टोक सोन्याचे आहे म्हणून संपूर्ण मंदिर सुवर्णाच
आहे, असे कसे म्हणता येईल? आज कुठल्याही क्षेत्रातले उदाहरण घेतले तरी आपल्याला हेच आढळून येईल
की, इथे केवळ उचलेगिरीच सुरू
आहे. चित्रपट, नाटक, साहित्य, दूरचित्रवाणीवरील मालिका यातून हाताळले जाणारे विचार, स्वत:च्या म्हणून पुढे ठेवलेल्या कल्पना मुळात स्वत:च्या असतात का? कुठून तरी उचललेल्याच असतात ना! एवढेच नव्हे तर बहुतेक राजकीय, आर्थिक, सामाजिक विचारवंतही परोपजीवीच असतात. मूलगामी संशोधन किंवा चिंतन हा प्रकारच राहिलेला नाही. एखादा दाक्षिणात्य चित्रपट तुफान चालला असेल तर लगेच त्याची मोडतोड करून, भडकपणाला फोडणी देऊन, हिंसेला अधिक रक्तरंजित करून, अश्लीलता अधिक ‘पारदर्शक’ करून त्याची हिंदी आवृत्ती काढली जाते आणि तीदेखील तुफान चालते. अशाच प्रकारे एखाद्या सुपरहिट हिंदी चित्रपटाची दाक्षिणात्य आवृत्ती काढली जाते आणि विशेष म्हणजे दोन्हीकडचे चित्रपट निर्माते, दिग्दर्शक पाश्चिमात्य चित्रपटांचीच नक्कल करीत असतात. अस्सल काहीच नाही. स्वत:च्या मेंदूला ताण द्यायची कोणाचीच तयारी नाही. चित्रपट कसा असावा हे समजून घ्यायचे असेल तर मूळ चित्रपट पाहावा. क्राउन चिन टायगर, हिडन ड्रॅगन, मॅट्रीक्स, जुरासिक पार्क, स्टार वॉर, टर्मिनेटर इत्यादी चित्रपट ज्यांनी पाहिले असतील (आणि ज्यांनी पाहिले नसतील त्यांनी जरूर पहावे) त्यांना मी काय म्हणतो ते लक्षात येईल. चित्रपट कसा नसावा हे जाणून घ्यायचे असेल तर त्याची भ्रष्ट हिंदी किंवा देशी आवृत्ती बघावी. आपल्याकडे सर्वोत्कृष्ट म्हणून गौरविल्या गेलेला, अगदी ‘ऑस्कर’ची स्वप्न आपण ज्याच्यासाठी पाहिली तो ‘लगान’ शेवटी एका इंठाजी चित्रपटाची नक्कलच होता ना? त्या चित्रपटात फुटबॉल होता. आम्ही आमची कल्पनाशक्ती कमाल ताणून फुटबॉलऐवजी क्रिकेटचा खेळ त्या चित्रपटात दाखविला, बाकी जैसे थे! आपल्याकडचे जे सर्वोत्कृष्ट आहे, तेच मुळी उचल
ेगिरीतून आलेले, नक्कल केलेले असेल तर परिस्थिती निश्चितच शोचनीय म्हणावी लागेल. विचार करण्याची, एखाद्या समस्येच्या मुळाशी जाण्याची, सखोल चिंतन करण्याची, स्वत: प्रयोग करून पडताळा घेऊन एखादा निष्कर्ष-सिद्धांत मांडण्याची कोणाचीची तयारी नाही. सगळं अगदी रेडिमेड हवं. मळलेल्या पायवाटेवरून डोळ्यांना झापडे बांधून चालण्यातच आम्ही धन्यता मानणार, नव्या पाऊलवाटा शोधणे आम्हाला मान्य नाही आणि आम्ही तसा प्रयत्नही करणार नाही. आमची मतीच कुंठित झाली आहे. बुद्धीचा कस लागतच नाही.
शाळेला दांडी मारून एखाद्या झाडाखाली बसून विचारात गढून जाण्याची छोट्या न्यूटनला सवय होती. असेच एकदा सफरचंदाच्या झाडाखाली तो बसला असताना झाडावरून एक सफरचंद तुटून खाली पडले. एरवी ही अतिशय साधी, क्षुल्लक घटना. परंतु या क्षुल्लक घटनेनेच न्यूटनच्या विचारचक्राला गती दिली आणि गुरूत्वाकर्षणाचा जगमान्य सिद्धांत मांडणाऱ्या सर आयझॅक न्यूटनचा जन्म झाला. आमचीही शाळकरी मुलं शाळेला दांड्या मारतात. परंतु न्यूटनची आणि त्यांची बरोबरी तेवढ्यापुरतीच. हे असंच का, हा प्रश्न कधी आम्हालाच पडला नाही तर आमच्या मुलांना कसा पडेल?
कोणत्याही नवीन शोधाची सुरूवात कल्पनेपासून होते. पक्षी आकाशात उडतात. मग माणसांना का उडता येऊ नये, अशी ‘वेडगळ’ कल्पना कधीतरी कुणी मांडली असेलच. कालांतराने या वेडगळ कल्पनेलाच मूर्त स्वरूप प्राप्त झाले. एखादी घटना प्रत्यक्ष घटनास्थळावर न जाता घरीच पाहता आली तर, असा विचार कधीतरी एखाद्याच्या मनात आला असेल, ही कल्पना म्हणजे अगदी शुद्ध वेडेपणाच होती. परंतु कालांतराने तेसुद्धा सहजसाध्य झाले. आपल्या रामायण-महाभारतसारख्या हजारो वर्षांपूर्वीच्या ठांथात अशा कल्पनांची रेलचेल आढळते. तो केवळ कल्पनाविलास होता की त्याकाळी आपले ज्ञान-विज्ञान तेवढे प्रगत होते, हा वेगळा विषय ठरतो.
रंतु हे सत्य तर कुणी नाकारू शकत नाही की, कल्पनेत तरी का होईना आमच्या विचारांनी त्याकाळी प्रचंड उंची गाठली होती. आज परिस्थिती काय आहे? चित्रपट, कथा, कादंबऱ्या, नाटके, विविध मालिकांतून जे काही दाखविले जाते त्याला कल्पनेची भरारी म्हणता येईल की, कल्पनेचे दारिद्र्य?
वास्तविक असंख्य प्रज्ञावंतांचा दैदीप्यमान इतिहास आपल्याला लाभला आहे. महर्षी व्यासांनी संपूर्ण जग उष्टे करून ठेवले आहे. व्यासांच्या महाभारतात
जे आहे तेच जगात आहे, जे महाभारतात नाही ते
जगात नाही. प्रत्येक समस्या आणि प्रत्येक समस्येचे समाधान महाभारतात आहे, असे म्हणतात. रामायणासारखे अनुपमेय महाकाव्य याच भूमीत हजारो वर्षांपूर्वी निर्माण झाले. चार्वाकाच्या ईहवादापासून शंकराचार्यांच्या ब्रह्यसुत्रापर्यंत पसरलेले आमचे तत्त्वज्ञान कोणत्याही पाश्चात्य तत्त्ववेत्याला शिष्यत्व पत्करायला लावणारे आहे. चाणक्य, आर्यभट्ट, भाष्कराचार्य, वराहमिहीर आणि वात्सायनसुद्धा याच भूमीतले. परंतु हे सगळं आपलं भूतकाळातील वैभव. आज परिस्थिती काय आहे? संपूर्ण जग एकेकाळी ज्या भूमीकडे ‘विश्वगुरू’च्या आदरार्थी भावनेने पाहत होते, त्याच भूमीतले लोकं आज पाश्चात्यांकडे आशाळभूतपणे पाहताना दिसतात. ही परिस्थिती निर्माण का झाली? आमची गौरवशाली परंपरा कुठे आणि कशी खंडित झाली? या प्रश्नांचे उत्तर कदाचित खूप विस्तृत असेल, परंतु त्याचे मूळ प्रचलित आहार आणि शिक्षण पद्धतीत निश्चितच आहे. बुद्धीचा संबंध शेवटी आहाराशी असतोच. आहार जेवढा सात्त्विक, सकस असेल बुद्धी तितकीच तरल असते. आज आमची मुलं जो संकरित किंवा विषारी आहार घेतात, ज्या पद्धतीचे शिक्षण घेतात ते पाहिले तर उचलेगिरी आणि नक्कल करणारी टोळी निर्माण होण्यापलीकडे दुसरे काहीही शक्य नाही, याच निष्कर्षावर पोहचावे लागेल. इंठाजांची दीडशे वर्षांची राजवट यासाठी
कारणीभूत ठरली. इंठाजांनी आपले केवळ आर्थिक शोषणच केले नाही तर आहारविहारासह आपली जीवनशैलीच बदलून टाकली. नंतर आलेल्या स्वकीय राज्यकर्त्यांनी त्यांचीच परंपरा जोपासली आणि जुन्याच पायवाटांनी जाणे पसंत केले. आपल्या श्रद्धा, आपल्या मान्यता, आपल्या परंपरा मुळासकट उखडल्या आहेत. त्यांचे हे अप्रत्यक्ष शोषण किंवा आक्रमण इतके सूक्ष्म, परिणामकारक होते की, त्यांच्या प्रभावातून बाहेर पडण्याचा आपला प्रयत्नही मागासलेपणाचे लक्षण ठरतो. एक भयानक परावलंबित्व आपल्या रोमारोमांत मुरले आहे. कल्पना किंवा विचारही आपल्याला आयात करावे लागतात, यावरून त्याची व्याप्ती आपल्या लक्षात येते.
या अप्रत्यक्ष गुलामगिरीतून बाहेर पडणे शक्यच नाही, असे नाही. दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर ते सहज शक्य आहे. त्याची सुरूवात शिक्षण पद्धतीपासून करावी लागेल. कृषीवर आधारित नवी अर्थव्यवस्था उभारावी लागेल, देशी उद्योगाला चालना देणारे नवे धोरण प्रस्थापित करावे लागेल, देशातला पैसा देशातच राहून विदेशी भांडवल देशात कसे आणता येईल, या दिशेने प्रयत्न व्हायला हवेत. या सगळ्यांच्या एकत्रित परिपाकातूनच एक सशक्त, स्वयंपूर्ण आणि स्वयंप्रज्ञेनेयुक्त असा भारत निर्माण होऊ शकेल. ज्या दिवशी हे घडेल त्या दिवशी आपल्याला कसलीच (अगदी विचारांचीही) आयात करावी लागणार नाही. हे एक दिवस निश्चित होईल. माणूस आकाशात उडू शकेल ही वेडी कल्पना नाही का प्रत्यक्षात उतरली. विचाराला दृढ निर्धाराची आणि अथक प्रयत्नांची साथ लाभली तर या जगात अशक्य काहीच नाही.
— प्रकाश पोहरे
Leave a Reply