नवीन लेखन...

देशभक्तीचे बदलते आयाम!




प्रकाशन दिनांक :- 28/09/2003
देशाला स्वातंत्र्य मिळून अर्धशतकाचा कालावधी उलटून गेला. स्वातंत्र्याचा उपभोग घेणारी तिसरी पिढी जन्माला आली. शेकडो वर्षांच्या संघर्षाचे एक पर्व संपले, परंतु त्याचा अर्थ संघर्ष संपला असा करता येणार नाही. संघर्ष कधीच संपत नसतो. संघर्ष ही तर जीवनाला पर्यायवाची संकल्पना आहे. संघर्षाचे स्वरूप बदलले, संघर्षाचा आयाम बदलला, व्याख्या बदलली आणि अर्थातच संघर्षाचे मार्ग बदलले. स्वातंत्र्यपूर्व काळात संघर्षाला एक निश्चित दिशा होती. लक्ष्य समोर होते आणि लक्ष्यप्राप्तीचे अनेक मार्गदेखील! त्यावेळी देशभक्तीची व्याख्या अतिशय सुस्पष्ट होती. इंठाजांच्या जोखडातून आपल्या देशाला स्वतंत्र करण्याची इच्छा, महत्त्वाकांक्षा आणि त्यासाठी स्वत:ला रूचेल त्या मार्गाने प्रयत्न, या थोड्या वेगळ्या अर्थाने मर्यादित स्वरूपात देशभक्ती मोजली जायची. त्याकाळी इंठाजांना हाकलून लावणे, या एकमात्र ध्येयाने पछाडलेल्या देशभक्तीची नशा इतकी प्रभावी होती की, गोखले – आगरकर प्रभृतींचा नेमस्तवाद अलगद बाजूला फेकल्या गेला. आधी सामाजिक सुधारणा घडवून आणू, एक सुदृढ – सशक्त समाज उभा करू आणि नंतरच स्वातंत्र्याचा प्रयत्न करू, विस्कळीत आणि प्रचंड विषमतेने पोखरलेल्या समाजाला स्वातंत्र्याचे मोल करता येणार नाही, ही मवाळ पंथियांची धारणा अगदीच चुकीची नव्हती. त्या लोकांनी त्या दिशेने प्रयत्न केले. जहाल असो अथवा मवाळ, वैचारिक भेद असले तरी प्रत्येकाच्या प्रयत्नांचे केंद्रबिंदू होते ‘देशहित’! सांगायचे तात्पर्य, स्वातंत्र्यपूर्व काळात देशभक्तीचे मार्ग अनेक होते, परंतु लक्ष्य अगदी स्पष्ट, ठळक होते. मार्ग वेगवेगळे असल्याने लक्ष्यप्राप्तीची साधनेही वेगवेगळी होती. कुणी अहिंसेचा शस्त्र म्हणून वापर केला तर कुणी बंदुकीला हात घातला. काही सुधारणावाद्यांनी लेखणी
जवळ केली.
आज स्वातंत्र्योत्तर काळात आणि त्यातही दोन पिढ्या उलटून गेल्यावर प्रश्न उपस्थित होतो आहे तो देशभक्तीच्या बदलत्या आयामाचा! असा प्रश्न उपस्थित होणे दुर्दैवाचे असले तरी हे सत्य नाकारून चालणार नाही.

या दुर्दैवी सत्याला जबाबदार आहेत

राजकीय विचारवंत, समाजकारणी, अर्थतज्ज्ञ, बुध्दिवादी मंडळी! देशाला दिशा आणि दशा देण्याचे काम या लोकांचे होते. या लोकांनी जनतेचे नीट प्रबोधन केले नाही. कदाचित असेही असू शकते की, त्यांनाच काही कळत नसावे. परिणामस्वरूप एखाद्या क्रिकेटच्या सामन्यात पाकिस्तानला आपण हरवलं की, फटाके फोडून जल्लोष करणे म्हणजेच देशभक्ती समजली जाऊ लागली. ‘दूध मांगो खिर देंगे, काश्मीर मांगो चीर देंगे’ सारखे क्षणैक भावना उद्दीपित करणारे ‘डॉयलाॅग’ तरुण पिढीच्या ओठावर खेळू लागले आणि ‘सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ताँ हमारा’ हा सार्थ अभिमान एक भाबडी आशा बनून शिल्लक राहिला. हिंदुस्थानला ‘सारे जहांसे अच्छा’ करायचे असेल तर नेमके काय केले पाहिजे, याचा विचार करायला कोणी तयारच नाही. देशावर सगळ्यांचेच प्रेम आहे, परंतु केवळ भावनिक प्रेम असून चालत नाही. प्रत्यक्ष कृतीतून ते प्रगट व्हायला पाहिजे आणि विचार सुस्पष्ट असल्याशिवाय कृती परिणामकारक ठरू शकत नाही.
जगाच्या पाठीवरील इतर विकसित देशांच्या तुलनेत आपण खूप मागे आहोत. त्यामागचे प्रमुख कारण एकच. स्वातंत्र्योत्तर काळातील आपली विचारांची, पर्यायाने प्रयत्नांची दिशाच चुकली. सोबतचे लोकं पळत असतील तर आपल्यालाही धावणे भाग असते. परंतु आपल्याला धावायचे नव्हते आणि मग त्यासाठी आम्ही सोपा मार्ग पत्करला, स्वत:चे डोळेच झाकून घेतले. त्यामुळे पुढे पळणारे जग आम्हाला दिसलेच नाही, आम्हाला पळायची गरजच वाटली नाही. आज ही परिस्थिती आहे असे नाही; कुपमंडूकवृत्ती आपण शेकडो वर्षाच्या परंपरेने जतन करून ठेवली आहे. व
स्को – द – गामा आपल्या शिडाच्या नौका घेऊन आप्रि*का खंडाला वळसा घालत भारतात येऊन पोहचला, कोलंबसने अमेरिकेला जगाच्या नकाशावर आणले, हजारो किलोमीटर अंतरावरच्या ब्रिटिशांनी केवळ आरमारी ताकदीच्या जोरावर एवढा मोठा देश घशात घातला आणि आम्ही समुद्र ओलांडणे पाप आहे, त्यामुळे धर्म बुडेल अशी जपमाळ ओढत स्वस्थ बसलो. जे देश आज जगाच्या पाठीवर विकसित म्हण्ूान मिरवित आहेत, त्यांचा थोडा इतिहास तपासून पाहिला तर आपल्या सहज लक्षात येईल की, त्यापैकी प्रत्येक देशाने दुसऱ्या देशांची लूट केली, शोषण केले आणि आपला देश समृध्द केला. नीती-अनितीचा इथे कुठेही संबंध येत नाही. ‘जेव्हा प्रश्न भूकेचा असतो तेव्हा उत्तर केवळ भाकरीच असते!’ नीतिने वागणाऱ्या हिंदुस्थानइतका लाचार देश आज दुसरा कुठला नसेल. कुणासमोर तरी सतत रडायची, नाक रगडायची आम्हाला सवयच लागून गेली आहे. नीतिने वागण्याचे फळ हे असेल तर आता नीती बदलावी लागेल. यशाचे काही त्रिकालाबाधित तोडगे नसतात. स्थळ, काळ, वेळानुसार यशाचे मार्ग बदलत असतात. वर्तमान स्थितीत जो मार्ग योग्य असेल तोच अनुसरणे ही काळाची गरज असते. तीच खरी नीती असते. काळाशी समन्वय साधत केलेली वाटचालच नीतिपूर्ण असते. आपण उराशी बाळगलेल्या नीती – अनीतीच्या संकल्पना स्थळ – काळासोबत बदलण्याइतक्या लवचिक नसतील तर आपण स्वत:चे नुकसान करण्यापलीकडे काही करू शकत नाही.
इंठाज इथे आले, स्थिरावले. त्यांचा हेतू स्पष्ट होता. त्यांना या देशातली अमाप संपत्ती लूटून आपले घर भरायचे होते. फ्रान्स, पोर्तुगाल आदी तत्कालीन साम्राज्यवादी देशांनीसुद्धा हाच मार्ग अनुसरला. बदलत्या काळानुसार मार्ग बदलले, परंतु अमेरिकादी भांडवलशाही राष्ट्रांचे धोरण आजही तेच आहे. आपल्यालादेखील या विकसित राष्ट्रांच्या पंक्तीत बसायचे असेल तर हाच मार्ग चोखाळणे भाग आहे. याचा अर्थ एखाद्या राष्ट्रावर
क्रमण करून तो देश लुटायचा आणि आपले घर भरायचे असा होत नाही; तसे करणे आज कोणत्याच राष्ट्राला शक्य नाही. प्रत्यक्ष आक्रमण न करतादेखील आपला स्वार्थ साधल्या जाऊ शकतो. अमेरिका तेच करीत आहे आणि आपले हातसुध्दा कोणी बांधलेले नाही.
त्यासंदर्भात देशभक्तीचा बदलता आयाम कोणता असू शकतो, याची चर्चा अप्रस्तुत ठरू नये. अर्थशास्त्राची

मान्यता हेच सांगते की, पैसा जितका फिरता असेल तितक्या

प्रमाणात तो वाढत जातो. समजा एखाद्या गावात एखाद्या वस्तूचे भरपूर उत्पादन होत असेल, परंतु ते उत्पादन शहरापर्यंत पोहचतच नसेल, गावातच राहत असेल तर त्या उत्पादनाच्या अनुषंगाने होणारे उत्पन्न खूप मर्यादित राहील. त्यामुळे उत्पादन भरपूर होऊनही गावाची गरिबी कायमच राहील. ‘जिथे पिकते तिथे विकले जात नसते’, हा तर सर्वमान्य सिध्दांत आहे. एकवेळ गावातली संपत्ती, उत्पादन बाहेर गेले नाही तरी चालेल, परंतु बाहेरची संपत्ती गावात येण्याची व्यवस्था अत्यावश्यक ठरते, गाव समृध्द करायचा तोच एक मार्ग आहे. आज आपल्या देशाची अवस्था अशा ‘गोठलेल्या’ श्रीमंत गावासारखीच आहे. ही श्रीमंती खऱ्या अर्थाने प्रवाही करायची असेल तर डॉलर्स, पौंड आपल्या देशात आणण्याचे मार्ग चोखाळावे लागतील. आज ज्या प्रमाणात रुपया बाहेर जात आहे त्या प्रमाणात डॉलर्स, पौंड देशात येत नाही. एखाद्या राष्ट्राची श्रीमंती त्या राष्ट्राकडे असलेल्या विदेशी गंगाजळीवरून ठरविली जाते. त्यादृष्टीने आपण गरीबच आहोत. पेट्रोल, डिझेल तसेच अनेक प्रकारच्या तंत्रज्ञानासाठी आपण इतर राष्ट्रांवर अवलंबून आहोत. त्यासाठी करावा लागणारा विनिमय डॉलर्स, पौंड आणि युरोमध्येच होतो. जपानी येनलादेखील किंमत आहे, पण आपल्या रुपयाला कोणी विचारीत नाही. त्यामुळे सद्यस्थितीत आपल्या गंगाजळींतील विदेशी चलनाचे प्रमाण वाढविणे, थोडक्यात बाहेरची संपत्ती कुठल्याही
मार्गाने का होईना, आपल्या देशात आणणे हाच मार्ग देशहिताच्या दृष्टीने सर्वोत्तम ठरतो. त्यादृष्टीने विचार केला तर जगभरात विखुरलेले अनिवासी भारतीय आज खऱ्या अर्थाने देशभक्त ठरत आहेत. हे लोकं अमेरिका, ब्रिटन, जर्मनीसारख्या देशात राहून आपल्या बुध्दीच्या जोरावर तेथील डॉलर्स, पौंड, मार्क आपल्या देशाच्या तिजोरीत आणून टाकत आहेत.
आज घडीला 40 ते 50 लाख हिंदुस्थानी विविध देशात काम करून मातृभूमिची सेवा करीत आहेत. या अनिवासी भारतीयांची संख्या 4 ते 5 कोटीपर्यंत वाढली तर एक दिवस जागतिक अर्थकारणावर भारताची निर्विवाद अधिसत्ता स्थापन होईल. विकासाचा हाच एक महामंत्र आहे, ‘बाहेर पडा; बाहेरची संपत्ती आणून आपले घर भरा.’ काळ बदलला, देशभक्तीचा आयाम बदलला. बदलता काळ आपल्याला हेच सांगत आहे की, खऱ्या अर्थाने सीमोल्लंघन करायची कधी नव्हे तितकी आज गरज निर्माण झाली आहे. ज्या मशालीने आपल्या श्रीमंतीला चूड लावली तिच मशाल आता आपल्याला हाती घ्यावी लागणार आहे. काय योग्य, काय अयोग्य याचा नंतर विचार करू! लुटारूंच्या जगात राहायचे आहे, सोज्वळ बनून राहता येणार नाही. अमेरिका, ब्रिटनला भिकारी करण्याचे ध्येय समोर असू द्या, आपल्याला भिकारी करूनच ते श्रीमंत झाले. आता हिशोब चुकता करायची वेळ आली आहे. त्यांच्या भिकारपणातच आपली श्रीमंती दडली आहे. त्यामुळे आपल्या देशात येणारा प्रत्येक डॉलर, प्रत्येक पौंड महत्त्वाचा आहे. डॉलर, पौंड आणणारा महत्त्वाचा आहे, श्रेष्ठ देशभक्त आहे. देशभक्तीचे आयाम बदलत आहेत आणि बदलत्या आयामाला अनुसरून आपली नीतिदेखील आपल्याला बदलावी लागणार आहे.

— प्रकाश पोहरे

The four companies agreed to settle last best spy app month

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..