आजचा जमाना स्पर्धात्मक जाहिरातींचा मानण्यात येतो. जाहिरात कोणासाठी, कश्यासाठी, त्याचे स्थळ, काळ, वेळ या सर्वांवर अवलंबून आहे. कंपनीने/उत्पादकाने बाजारात एखादी नवीन वस्तू/माल ग्राहकांपर्यंत पोहोचण्याअगोदर वस्तू/मालाचे वेगळेपण बाजारात असलेल्या अश्याच उत्पादनांपेक्षा कसे वेगळे, चांगले, स्वस्त, मस्त आणि भिन्न आहे हे सांगण्याचे उत्तम माध्यम म्हणजे त्या वस्तूची जाहिरात. मग ती जाहिरातीच्या कोणत्याही माध्यमातून झालेली असो !
यासाठी आपण आत्तापर्यंतच्या जाहिरातीची वाटचाल कशी होत गेली हे थोडक्यात जाणून घेऊ.
१५व्या शतकात मुद्रण कलेचा शोध लागला आणि छापखाने सुरु झाले. याचा परिणामस्वरूप जाहिरातीची कला झपाटय़ाने वाढू लागली. १६२५ मध्ये वर्तमानपत्रातून पहिली जाहिरात लोकांसमोर आली. अठराव्या शतकात हस्तपत्रके जास्त प्रमाणात प्रचलित झाली आणि त्यांतून जाहिरातीच्या मजकुराबरोबर चित्रांना जाहिरातींत वाव मिळाला. १७०४ मध्ये अमेरिकेत वर्तमानपत्रातील जाहिरातींना सुरवात झाली आणि १८१२मध्ये पहिली जाहिरात वितरण संस्था इंग्लंड मध्ये सुरु झाली. प्राचीन काळी इजिप्शियन लोकांनी भूर्जपत्राचा उपयोग जाहिरातींचा मजकूर लिहिण्यासाठी न् भिंतीवर लावण्यासाठी केला होता. प्राचीन ग्रीस, रोम मध्येसुद्धा त्या काळानुरूप अशा पद्धतीच्या जाहिराती केल्या जात होत्या. जून १८३६ मध्ये ‘ला प्रेस’ या फ्रेंच वृत्तपत्रानं प्रथम ‘पेड’ जाहिरात छापली.
मुद्रणकला जोर धरत असतानाच फ्रान्स मध्ये १८७५च्या दरम्यान भित्तीपत्रके (पोस्टर्स) तयार होऊ लागली. अनेक नामवंत चित्रकारांच्या चित्रांचा त्यात वापर होऊ लागला. या सर्व गोष्टीमुळे जाहिरात जास्त ठसठशीत आणि आकर्षक होऊ लागली. तेव्हापासून या जाहिरातीत चित्रांच्या वापराची प्रथाच पडली आणि पर्यायाने चित्रकारांना एका नव्या दुनियेत संधी प्राप्त झाली. या सगळ्याचा विचार करता भारतात १७९० पासून वर्तमानपत्रात जाहिरात येण्यास सुरवात झाली आणि १९०७ मध्ये मुंबईत पहिली जाहिरात वितरण संस्था सुरु झाली.
रेडियो वरील जाहिरातींना परदेशात १९२०साली सुरवात झाली. दुसर्या महायुद्धानंतर विज्ञान-तंत्रज्ञानात अमुलाग्र बदल आणि शोध लागल्याने टीव्ही वर जाहिराती झळकू लागल्या. दुसर्या महायुद्धानंतर सिनेमा गृहात मोजक्याच उत्पादनांच्या जाहिराती दाखवण्यात येऊ लागल्या. भारतात आकाशवाणी (रेडीओ) वरून १९६७ साली जाहिरातींना सुरुवात झाली तर १ जानेवारी, १९७६ पासून दूरदर्शनच्या माध्यमातून जाहिराती दाखविण्यास सुरुवात झाली.
आज सोशल मिड्यावरून विविध उत्पादनांच्या जाहिराती दाखविल्या/ऐकविल्या जातात. काही जाहिरातींबद्दल सर्वसामान्यांच्या मनात गैरसमज निर्माण होतात. सर्वच जाहिराती वाईट असतात असे नाही. तरीही जाहिरातीत दाखविल्या प्रमाणे वस्तू/माल त्या दर्जाचा असेल असे त्याच्या रंग, रूप, आणि आकर्षक पॅकींग यावरून कळणार नाही त्यासाठी ती वस्तू/माल स्वत: वापरून बघावा लागेल. तसेच काही जाहिरातींचा सततच्या भडीमारामुळे विशेषत: लहान मुलांवर कसा विपरीत परिणाम होतो हे सर्वश्रुतच आहे.
नागरिकांच्या आणि देशहिताच्या कल्पक जाहिरातीमुळे सरकारला त्यांच्या योजना योग्यरीत्या मांडता येतात. जनजागृतीसाठीही त्यांचा उपयोग होतो. एखाद्या संसर्गजन्य रोगाच्या साथीमध्ये नागरिकांनी योग्यती दक्षता कशी घ्यावी याची माहिती प्रिंट आणि इलेक्ट्रोनिक मीडियातून होते. यामुळे साथ आटोक्यात ठेवण्यास मदत होते. एखाद्या आपद्कालीन समयाची पूर्व सूचना नागरिकापर्यंत मिळण्यासाठी आणि दक्षता घेण्यासाठी जाहिरातीची मदत होते. असे अनेक फायदे आहे.
१८ वर्षांखालची शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकासावर परिणाम होईल, अशी कामं करणारी मुलं म्हणजेच बालमजूर. बाल कामगार कायदा १९८६ नुसार १४ वर्षांखालील मुलाला कामावर ठेवणार्या व्यक्तीवर कारवाई होते. बाल न्याय अधिनियमनानुसार १८ वर्षांखालील मुलांना कामावर ठेवणं हा गुन्हा आहे. नाटक, सिनेमा, मलिका आणि जाहिराती अश्या क्षेत्रात बाल कलाकार काम करतना दिसतात त्यांना हा कायदा लागू होतो? का नाही मला माहित नाही, असे जरी गृहीत धरले तरी काही वेळा त्या बालकाच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी, हौसेसाठी, भविष्यातील करिअर डोळ्यासमोर ठेऊन कदाचित त्याला या क्षेत्रात काम करण्याची संधी दिली जात असावी. कदाचित वरील कायद्यात तशी काही तरतूद असल्यास माहित नाही. कोणाचा यावर आक्षेप असण्याचे कारण नसावे. परंतू स्वत:च्या हौसेसाठी, करिअर करण्याच्या नादात आणि वेळेचे बंधन नसलेल्या शिफ्टमध्ये काम करण्याने अभ्यासतील लक्ष उडायला किंवा कमी होण्यात होऊ नये एवढेच. अर्थात याचा त्यांच्या पालकांनी विचार केलेलाच असेल. असो.
इथे हा मुद्दा मांडण्याचे कारण की प्रिंट मीडियातील जाहिराती बनविण्यापेक्षा, इलेक्ट्रोनिक मिडियातील जाहिराती बनविण्याची हातोटी, कसब, मांडणी, कुशलता, स्क्रिप्ट, त्यातील संवाद, छायाचित्रण, आशय, गुणवत्ता, त्यासाठी घेतलेले परीश्रम, गुंतवलेला पैसा, काळ, वेळ आणि मुख्य म्हणजे त्यातील व्यक्तींचा सहभाग फार महत्वाचा असतो. याची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी आपल्याला एक साधे “हग्गी” या लहान मुलांच्या डायपरच्या जाहिरातीच्या उदाहरणावरून लक्षात येईल.
सध्या सर्व दृक्श्राव्य वाहिन्यांवरून या उत्पादनाची जाहिरात केली जाते आहे. जाहिरातीत एक बालक (बहुतेक मुलगीच) आणि श्रेष्ठ स्त्री कलाकार काजोलला घेऊन ही जाहिरात केली आहे. काजोलला काम समजून देणे किंवा करून घेणे त्यामानाने सोपे आहे परंतु त्या एक-दीड वर्षाच्या निरागस बालकाकडून त्या सर्व एक्सप्रेशन (हावभाव), बॉडीलँगवेज त्या उत्पादनाच्या प्रमोशनसाठी करवून घेणे किती कठीण आहे हे ती जाहिरात बघताना जाणवते. जाहिरातीच्या सुरवातीपासून ते जाहिरात संपेपर्यंत उत्पादन लक्षात राहतेच पण ज्यांनी ही जाहिरात केली आहे त्याची कल्पकता, जाहिरातीसाठी आवश्यक असलेलं ग्राहकांच आणि कलाकारांच्या मानसशास्त्राचा चांगला उपयोग करून घेतला आहे. अगदी सहज ते डायपर बद्दलचे गाणं म्हणत त्या बालकाच खाली वाकून बघणं, तसाच काजोलचा प्रतिसाद, मग दोघांनी एकमेकांचे हात धरून नाचण, काय त्या दोघांच्या चेहेर्यावरील नैसर्गिक हावभाव. एकदम मस्त. काजोल आणि त्या बालकाचे बॉन्डींग इतके सुंदर आहे की एखाद्या आईने आपल्या मुलाला/मुलीला ते डायपर त्याच्या गळी उतरविण्यासाठी काय गमती/जमती केल्या असतील याची कल्पना येते. या दोन भिन्न वयाच्या, एक सरायीत आणि दुसरी या विश्वाची कल्पना नसलेल्या बालकाला घेऊन सत्यात उतरविल्या आहे यात वाद नाही. जाहिरातीच्या शेवटी ते बालक दोन हात वरकरून आनंदाने असेकाही नाचले आहे आणि उतस्पूर्त साद, संवाद, आणि अक्टिंग केली आहे, त्यात दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद, हास्य कुठेही न लपविता दिलखुलास आणि नैसर्गिक वाटतात आणि यातच जाहिरातीच्या यशस्वीतेचे गुपित दडले आहे. वा, क्या बात है | खूप कठीण आहे कारण बालकाच्या वेळा आणि त्याचा मूड बघून करणे सोप्पी गोष्ट नाहीऐ. जाहिरात डायरेक्टरच्या पसंतीस उतरेपर्यंत बालकाचे सर्व मूडस आणि वेळेचे भान सांभाळून बालकाकडून पुन्हा, पुन्हा एकच गोष्ट करून घेणे खूपच कठीण आहे. बऱ्याच वर्षापूर्वी मर्फी रेडीओसाठी एका मुलाचा ‘मर्फी बॉय’ फोटो खूपच गाजला होता. निर्मा, अमूल बटर अशी काही चांगल्या जाहिरातींची उदाहरणे देता येतील.
जगदीश पटवर्धन
Leave a Reply