भारतात महिला क्रिकेटची सुरवात १९७३ मध्ये झाली आणि त्याच वेळी भारतीय महिला क्रिकेट संघाची स्थापना झाली. भारतीय महिला संघाने आपला पहिला सामना १९७६ मध्ये वेस्टइंडीज विरुद्ध खेळला.
नुकतीच वर्ल्डकप २०१५ची अंतिम लढत ओस्ट्रेलिया विरुद्ध न्युझीलंड यांच्यात होऊन ऑस्ट्रेलियाने पाहुण्या न्यूझीलंड संघाचा दारूण पराभव करून वर्ल्डकप पाचव्यांदा जिंकून वर्ल्डकपची शानदार सांगता केली.
परंतु एक गोष्ट मनाला खटकली ती म्हणजे महिलांची टेस्ट म्यॅच, एक दिवसीय, २०-२० सामने दूरदर्शन किंवा इतर स्पोर्ट्स वाहिन्यांवरून त्याला चांगली प्रसिद्धी, उत्तेजन आणि चांगले मानधन देऊन दाखविण्यात आल्याचे ऐकिवात नाही. या निमित्ताने माजी महिला क्रिकेट खेळाडू आणि माजी कर्णधार यांच्या प्रतिक्रिया फार बोलक्या आहेत. याच अनुषंगाने २८ मार्च, २०१५ रोजी सह्याद्री वाहिनीवरून दिल्या जाणाऱ्या रात्रो ९.३०च्या बातम्यात भारतकडून एक कसोटी आणि १५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली महिला क्रिकेट खेळाडू आणि प्रशिक्षिका देविका पळशीकर यांनी भारताच्या पराभवाचे आणि ऑस्ट्रेलियाच्या यशाचे उत्तम आणि मार्मिक विश्लेक्षण केले. मुलाखती दरम्यान त्यांनी भारतीय महिला क्रिकेट बद्दलची खंत व्यक्त केली. मुलाखती दरम्यान त्या म्हणाल्या की “भारतामध्ये महिला क्रिकेटला पुरुषांच्या क्रिकेट सारखी प्रसिद्धी व उत्तेजन दिले जात नाही” त्या पुढे असेही म्हणाल्या की गावखेड्यातील मुलींना तर महिला क्रिकेट खेळतात आणि त्यांचे संघ आणि संघटना असतात हेही माहित नसते. क्रिकेट खेळात पुरुषांच्या प्रमाणात मुली क्रिकेटचे प्राशिक्षण घेण्यासाठी येत नाहीत कारण त्यांना त्यांचे पालक प्रोत्साहन देत नाहीत. त्यांनी हेही मान्य केलं की त्या स्वत: वयाच्या १९व्या वर्षी क्रिकेट खेळायला लागल्या. खेळात कोणाचीतरी हार-जीत असतेच पण त्याने खचून न जाता आपण काय चुका केल्या ते सुधारून पुढील खेळी चांगली करून संघाला विजयी कसे करता येईल या कडे लक्ष देण्याची सवय लागते. लीडरशिपमुळे हार, पराजय पचवण्याची क्षमता आणि मानसिकता तयार होते आणि त्याचा जीवनातील संघर्षाला कसे सामोरे जायचे आणि त्यावर मात कशी करायची याचे प्रशिक्षण खेळातून मिळते. दररोज कुठलातरी खेळ खेळात राहण्याने मन आणि बुद्धी तजेलदार राहते. त्यांच्यामते जर चांगली मेहनत, चिकाटी आणि तंत्रशुद्ध क्रिकेटचे ज्ञान घेतल्यास आणि स्वत:ची अशी एक खास वेगळी शैली विकसित केली तर या खेळात करिअरला वाव आहे !
भारताच्या माजी कर्णधार डायना एडलजी यांनीही दोन वर्षापूर्वी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत महिला क्रिकेट बद्दलची खंत बोलून दाखविली. त्या म्हणतात की “बीसीसीआयच्या उदासीनतेमुळे भारतात महिला क्रिकेट घसरणीला लागले आहे, तसेच पुरुषांच्या तुलनेत महिला क्रिकेटपटूंना दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. ‘‘आयसीसीने दिलेली एक जबाबदारी म्हणून बीसीसीआय महिला क्रिकेट चालवत आहे. वर्ल्डकपच्या आयोजनाबाबत घेतलेले निर्णय पाहता महिला क्रिकेटबाबत बीसीसीआय किती उदासीन आहे, हे दिसून येते. आयसीसी आहे म्हणून महिला क्रिकेट टिकून आहे असे उदासीनतेने त्या म्हणतात. ‘मरिन ड्राइव्ह येथून गाडीतून जाताना भारताचा महिला संघ सी ग्रीन हॉटेलमधून वानखेडे स्टेडियमकडे चालत जातो, भारताचा राष्ट्रीय संघ रस्त्यातून चालतोय, हे पटतच नाही’ पुरुष संघाबाबत असे कधीच पाहायला मिळाले नाही. महिला क्रिकेटपटूंना सराव म्हणून पोलिस जिमखाना, हिंदू जिमखाना किंवा बॉम्बे जिमखान्यात खेळवण्यात येत असे. पुरुषांचा राष्ट्रीय संघ याठिकाणी खेळतील का, असा प्रश्नही त्यांना संबंधितांना विचारावासा वाटतो. महिला आणि पुरुषांना समानतेने वागविण्यात येते असे ऐकले आहे. परंतु पैसा, प्रसिद्धी आणि वलय असणाऱ्या महिला क्रिकेटकडे असे सापत्न भावाने का बघितले जाते? का येथेही पुरुषांचीच चालते? आपण महिला क्रिकेट बद्दल थोडक्यात जाणून घेऊया.
इतिहासात प्रथम २६ जुलै १७४५ मध्ये महिलांचा पहिला क्रिकेट सामना खेळला गेला. १८८७ साली प्रथमच यॉर्कशायरमध्ये महिला क्रिकेट क्लबचे नाव समोर आले. तीन वर्षानंतर इंग्लंडमध्ये पहिली टीम बनली जिचे नामकरण इंग्लंड लेडी क्रिकेटर ठेवले गेले. ऑस्ट्रेलियात पहिली महिला क्रिकेट लीग सन १९८४ला स्थापन झाली. सन १९५८मध्ये आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट परिषदेची स्थापना झाली, त्याचे मूळ उद्दिष्टच मुळी जगभरात महिला क्रिकेटचे इतर देशांशी समन्वय साधणे हे होते. महिला क्रिकेटमध्ये आणखी सुधारणा होण्यासाठी सन २००५मध्ये आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट परिषदेला आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत विलीन करण्यात आले. पहिली महिला टेस्टम्यॅच डिसेंबर १९३४ मध्ये इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन संघात खेळवण्यात आली. १९७३ पासून आजपर्यंत महिलांसाठी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. आज पर्यंत आठवेळा महिला क्रिकेट विश्वकप आयोजित करण्यात आला आहे त्यात पाच वेळा ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ विश्व च्यॅम्पियन राहिला आहे. इंग्लंड संघ दोनदा आणि न्यूझीलंड संघ एकदा विश्व च्यॅम्पियन झाले आहेत. भारतीय महिला क्रिकेटचा संक्षिप्त आढावा घेऊया. भारतात क्रिकेट हा खेळ १६व्या शकतात आला. पहिल्यांदा क्रिकेट १७२१ साली खेळल गेलं. १८४८मध्ये मुंबईत पारशी समुदायाकडून पहिल्या क्रिकेट क्लबची स्थापना झाली. भारतीय संघाने १९३२मध्ये इंग्लंड विरुद्ध आपली पहिली टेस्ट म्यॅच खेळली. याच सुमारास जगात महिला क्रिकेट आपले स्थान पक्के करीत होती. भारतात महिला क्रिकेटची सुरवात १९७३मध्ये झाली आणि त्याच वेळी भारतीय महिला क्रिकेट संघाची स्थापना झाली. भारतीय महिला संघाने आपला पहिला सामना १९७६मध्ये वेस्टइंडीज विरुद्ध खेळला. आज पर्यंत भारतीय महिला क्रिकेट संघाने बरीच चांगली झेप घेतली आहे. पण म्हणावे तसा प्रतिसाद बीसीसीआय कडून मिळत नाही. वर्ष २००६मध्ये आयसीसीने बीसीसीआयला भारतीय महिला क्रिकेट असोसिएशनमध्ये सामील करून घेण्याचे निर्देश दिले. परंतु त्याचा लाभ फक्त २५-३० महिला क्रिकेट खेळाडूंनाच मिळाला. म्हणावा तसा प्रतिसाद भारतीय मुलींकडून मिळत नाही अशी खंत बऱ्याच महिला क्रिकेटियर खाजगीत बोलून दाखवतात. याला कदाचित महिला क्रिकेटला देशात मिळणाऱ्या उत्तेजन आणि प्रोत्साहनाच अभाव, सरावासाठी मोकळ्या मैदानांचा अभाव, क्रिकेट साहित्यात झालेली जबर भाववाढ अश्या अनेक कारणांनी महिला क्रिकेट म्हणावे तसे बहरले नाही. मुख्य म्हणजे पुरुषांसारखी नोकरी किंवा फायदे महिला क्रिकेटियरना मिळत नाहीत. महिला क्रिकेटचे सामने खाजगी वाहिन्यांवरून दाखविले जात नाहीत. त्यामुळे प्रचार आणि प्रसार होत नाही. तसेच महिला क्रिकेटला प्रायोजक मिळवून देण्यात बऱ्याच क्रिकेट संघटना कमी पडतात असे वाटते. महिला क्रिकेटियर तयार होण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी शिष्यवृत्ती देऊन प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. आतातरी संबंधितांना जाग येईल का असे नाईलाजाने म्हणावेसे वाटते.