फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही.
त्यावेळी सगळ्या सगळ्या झाडांची पानं अगदी सारखीच होती.
सगळी पानं एकदम गोलम गोल होती.
सगळ्या झाडांची, झुडुपांची, वेलींची पानं एकदम गोलम गोल होती.
सगळ्या झाडांवर लहान लहान गोल गोल पानं.
तर काही झाडांवर मोठी मोठी गोल गोल पानं.
झाडांवरच्या वेलीसुध्दा गोल गोल.
त्या वेलींची पानं सुध्दा गोल गोल गोल.
झाडाखालचं गवत सुध्दा लहान लहान गोल.
तर मैदानातलं गवत मात्र मोठे मोठे गोल.
पण,
काही झाडं डुलणारी.
काही झाडं सळसळणारी.
काही झाडं लठ्ठं होती.
काही झाडं रोड होती.
काही झाडं जरा ऊंच होती.
काही झाडं जरा बुटकी होती.
काही झाडं फारच लहान होती.
काही झाडं ऊंचंच ऊंच होती.
काही झाडं एकदम सरळसोट.
काही झाडं विचित्र वेडीवाकडी.
झाडांना वाटे,
आपले आकार निरनिराळे.. ..
पण आपल्या पानांचा मात्र एकच एक आकार!
का बरं असं?
आपल्याप्रमाणे पानांचे पण वेगवेगळे आकार हवेत.
आपल्याप्रमाणे पानांचे पण वेगवेगळे प्रकार हवेत.
प्रत्येक झाडावरची पानंसुद्दा वेगवेगळी हवीत.
प्रत्येक रंगीत पानाची रंगत वेगळी हवी.
प्रत्येक पानाची स्टाइल वेगळी हवी.
आणि खरंच,
दसऱ्या दिवशी. . . . . . .
गाई म्हशी आल्या.
ढकलाढकली करत.. गोल गवत चराचरा चरू लागल्या.
शेळ्या बकऱ्या आल्या..
झाडावरती दोन पाय ठेवून, जवळची पानं बचाबचा ओरबाडू लागल्या.
जिराफ आले..
ऊंचावरची कोवळी पानं खुडून खुडून चघळू लागले.
हत्तींचे कळप आले..
झाडावरची पानं, मैदानातलं गवत मन मानेल तसं रपारप उपटू लागले.
माकडांच्या टोळ्या आल्या..
झाडावरची पानं तोडत आरडाओरड करू लागल्या.
पक्ष्यांचे थवे आले..
घरटं बांधण्यासाठी चोचीने पानं,गवत टुकूटुकू खुडू लागले.
छटेमोठे रंगीबेरंगी किडे आले..
मचामचा पानं खाऊ लागले. कुटूर कुटूर कुरतडू लागले.
कुणी पानं अर्धवट खाई..
तर कुणी मधलं मधलं गवतच तोडी.
कुणी चोचीनं पानं कातरी..
तर कुणी भराभरा पानं ओरबाडी.
कुणी नखानं पानं चिरी..
तर कुणी पंजाने पानं खुडी.
कुणी अर्धवटच पानं खाई..
तर कुणी उगाचंच पानं फाडी.
पण काही पानांकडे कुणाचंच लक्ष गेलं नाही.
आणि त्यामुळे. . .
काही पानं सरळ,
तर काही पानं लांबुडकी झाली.
काही पानं टोकेरी,
तर काही पानं पसरट झाली.
काही पानं कातरलेली,
तर काही पानं नक्षीदार झाली.
काही पानं विचित्र झाली,
तर काही पानं चित्रविचित्रच झाली.
काही पानं उभी झाली,
तर काही पानं लोंबकळू लागली.
काही पानं अगदी एकसंध राहिली,
तर काही पानं पार फाटून गेली.
पण,
ज्या पानांकडे कुणाचंच लक्ष गेलं नाही,
ती पानं मात्र गोलम गोलच राहीली.
तेव्हापासूनच…
सगळ्या पानांचे आकार वेगवेगळे झाले.
प्रत्येक झाडाची पानंसुध्दा वेगवेगळी झाली.
झाडं आनंदाने फुलली
तर
पानं मजेत सळसळली.
— राजीव तांबे.
Leave a Reply