१९४० च्या दशकापर्यंत घरगुती स्वरूपाची, नवरा-बायको मिळून चालवणारी किरकोळ किराणामालाची दुकाने ठायी ठायी असायची. या दशकाच्या उत्तरार्धात खाद्य संस्कृतीच्या किरकोळ विक्रीच्या अंगाचे खर्या अर्थाने व्यापारीकरण सुरू झाले. निरनिराळ्या सुपर मार्केट्सच्या शाखा, मोठ्या आणि मध्यम वस्तीच्या शहरा-गावांमधे उघडू लागल्या. १९७० सालापर्यंत अनेक छोट्या स्थानिक सुपर मार्केट्सचं एकत्रीकरण होऊन त्यांच्या मोठमोठ्या देशव्यापी साखळ्या झाल्या होत्या.
ही प्रक्रिया ९० च्या दशकाच्या सुरवातीच्या काही वर्षांपर्यंत अनिर्बंध चालू होती. वॉलमार्टने तोपर्यंत किरकोळ विक्रीच्या क्षेत्रामधे आपले अढळ स्थान निर्माण केले होतेच. आपल्या प्रचंड मोठ्या पसार्याचा अचूकपणे फायदा उठवीत, अल्पावधितच वॉलमार्टने ‘अमेरिकेतील सर्वात मोठे किरकोळ अन्नाचे विक्रेते’, हा किताब आरामात पटकावला. याला प्रत्युत्तर म्हणून, इतर मोठमोठ्या देशव्यापी सुपरमार्केटच्या साखळ्यांनी, छोट्या छोट्या स्थानिक साखळ्यांना विकत घेऊन किंवा इतर मोठ्या साखळ्यांशी हातमिळवणी करून, स्वत:चा मार्केटमधला हिस्सा वाटण्याचा सपाटा लावला. याचा परिणाम म्हणजे आज अमेरिकेतले निम्म्याहून अधिक खाद्यपदार्थांचे नियंत्रण फक्त सहा अवाढव्य साखळ्या करत आहेत.
अशाच स्वरूपाची प्रक्रिया “घरापासून दूर” (away from home) या खाद्य संकल्पनेच्या क्षेत्रात झाली. आता ठायी ठायी दिसणार्या मॅकडोनल्डच्या सोनेरी कमानींचा, १९५० च्या दशकाच्या शेवटच्या काही वर्षांमधे प्रसार वाढू लागला. हळू हळू त्यांनी स्थानिक रेस्टॉरंट्सचा व्यवसाय काबीज करायला सुरुवात केली. पिझ्झा हट आणि कॆंटकी फ्राईड चिकन (KFC) सारख्या प्रतिस्पर्ध्यांनी फारसा वेळ न गमावता, मॅकडोनल्डच्या पावलावर पाऊल ठेवून ठिकठिकाणी आपले झेंडे रोवायला सुरुवात केली. या प्रकारच्या रेस्टॉरंट्सचे पेव फुटायला हातभार लावला तो गृहिणींनी ! त्यासुमारास ‘चूल आणि मूल’ हे आपलं परंपरागत कार्यक्षेत्र सोडून, महिला मोठ्या प्रमाणात कामानिमित्त घराबाहेर पडायला लागल्या होत्या. घराबाहेर पडून विविध कार्यक्षेत्रांची वाट चोखाळू पहाणार्या आणि आर्थिक स्वातंत्र्य उपभोगू पहाणार्या या महिला वर्गाने या नवीन प्रकारच्या रेस्टॉरंट्सना मोठाच आश्रय दिला. आज अमेरिकेत अन्नावर खर्च होणार्या एकूण डॉलर रकमेपैकी निम्मी रक्कम ही अशा ‘घरापासून दूर’ खाल्लेल्या अन्नावर खर्च होते. त्यातही विशेष म्हणजे या ‘घरापासून दूर’ अन्नावर खर्च केलेल्या रकमेपैकी, अर्धीअधिक रक्कम ही फास्ट फूडवर खर्च होते. ‘घरापासून दूर’ या अन्न संकल्पनेच्या क्षेत्रात देखील काही मोजक्याच मोठ्या कंपन्यांची मक्तेदारी दिसून येते. उदाहरणार्थ Yum! Brands Inc ही कंपनी, पिझ्झा हट , KFC, टाको बेल, लॉंग जॉन सिल्व्हर्स आणि A & W रेस्टॉरंट अशा पाच वेगवेगळ्या रेस्टॉरंट्सच्या साखळ्या नियंत्रित करते. अशाप्रकारे शेकडो, हजारो रेस्टॉरंटसवर नियंत्रण ठेवणार्या कंपन्या किती प्रभावशाली असतील याची कल्पनाच केलेली बरी!
— डॉ. संजीव चौबळ
Leave a Reply