अंहकाराचा पेटून वणवा,
थैमान घातिले त्या मेघांनी ।
तांडव नृत्यापरि भासली,
पाऊले त्यांची दाही दिशांनी ।।१।।
अक्राळ विक्राळ घन दाट,
नी रंग काळाभोर दिसला ।
सूर्यालाही लपवित असता,
गर्वाचा भाव चमकला ।।२।।
पृथ्वीवरती छाया पसरवूनी,
चाहूल देई आगमनाची ।
तोफेसम गडगडाट करूनी,
चमक दाखवी दिव्यत्वाची ।।३।।
मानवप्राणी तसेच जीवाणे,
टक लावती नभाकडे ।
रूप भयानक बघून सारे,
कंपीत त्यांची मने धडधडे ।।४।।
त्याच वेळी वादळ सुटूनी,
देह घनाचा टाकी विखरूनी ।
गर्व हरण होऊन जाता,
अश्रू पडती नयनामधूनी ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply