गरीब सुदामा बालमित्र , आला हरीच्या भेटीला,
बालपणातील मित्रत्वाची, ओढी मनाला ।।१।।
छोटी पिशवी घेवून हाती, पोहे घेतले त्यात,
फूल ना फुलाची पाकळी घ्यावी, हीच भावना मनांत ।।२।।
काय दिले वहिनींनी मजला, चौकशी केली कृष्णाने,
झडप घालूनी पिशवी घेई, खाई पोहे आवडीने ।।३।।
बालपणातील अतूट होते, मित्रत्वाचे त्यांचे नाते,
मूल्यमापन कसे करावे, उमगले नाही कृष्णाते ।।४।।
समोर असता सुदामा, काही न दिले त्याते,
द्विधा होऊनी मन:स्थिती, परत पाठवी रिक्त हस्ते ।।५।।
देवूनी ऐश्वर्याच्या राशी, सुदाम्याच्या माघारी,
मित्रत्वाच्या प्रेमभावाची, भेट देई श्री हरी ।।६।।
— डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply