चिंव चिंव करीत चिमणा चिमणी खोलीमध्ये माझ्या आली ।
अवती भवती नजर टाकून माळ्यावरती ती बसली ।।
वाचन करण्यात रंगून गेलो लक्ष्य नव्हते तिकडे ।
आश्चर्य वाटले बघून मजला काड्या गवताचे तुकडे ।।
घरटे बांधण्या रंगून गेली आणती कडी कचरा ।
मनांत बांधे एकच खुणगांठ तयार करणे निवारा ।।
भंग पावता शांत वातावरण वैताग आला मला ।
कचरा आणि घरटे काढून खिडकीतुनी फेकला ।।
काम संपवूनी सांज समयी घरी परत मी आलो ।
त्याच चिमण्या तसेच घरटे पाहून चकित झालो ।।
पहाट होता चिमण्या उडाल्या काढून टाकले घरटे ।
असेंच चालले कित्येक दिवस परी जिद न सोडी ते ।।
चार दिवसाची सुटी घालउन गांवाहून परतलो ।
घरटे बघता संताप येऊन मुठी वळवूनी धावलो ।।
घरट्या मधूनी चिमणी उडाली बसली पंख्यावरती ।
चिव चिव करुनी विनवू लागली दया दाखवा ती ।।
परी मी तर होतो रागामध्ये चढलो माळ्यावरी ।
मन चरकले बघून अंडी छोट्या घरट्यामध्ये ।।
असहाय्य दृष्टीने चिमणी पाही मज करुणायुक्त नयनी ।
यश मीळाले तिनेच शेवटी भूत दया जागवूनी ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply