एखाद्याच्या वर प्रभू रामचंद्र प्रसन्न होतात पण त्यासाठी जशी त्याची भक्ती कारणीभूत असते तशी त्याचे पूर्व सुकृत सुद्धा जबाबदार असते. समर्थांच्या बाबतीत त्याचे पूर्व सुकृत प्रचंड होते. त्यांच्या आधीच्या २१ पिढ्या रामाची उपासना करीत होत्या. २१ पिढ्या गेल्यावर प्रत्यक्ष हनुमान त्यांच्या रूपाने पुन्हा रामनामाचा प्रचार करण्यासाठी त्याच्या कुळात प्रगट झाला. अशा या परम पावन कुळात, राम नवमीच्या दिवशी दुपारी बारा वाजता, जांब या गावात समर्थांचा जन्म झाला. समर्थांच्या रूपाने प्रत्यक्ष हनुमानानेच जणु पुन्हा मानव देह धारण केला. लहानपणापासून वैराग्य वृत्तीचे समर्थ प्रपंचाबद्दल उदासीन होते.
कुठेतरी आडगळीत एकांती बसावे आणि चिंतन करावे असा दिनक्रम चालू असताना एके दिवशी त्यांच्या आईने त्यांना विचारले-बाळ आडगळीत काय करतो आहेस ? समर्थांनी उत्तर दिले “आई, चिंता करतोय विश्वाची”. लहानपणापासून त्यांनी विश्वाची चिंता केली आणि ती चिंता सर्वव्यापी होती.
मुलाने प्रपंच करावा म्हणून त्यांच्या आईने त्यांच्या लग्नाचा घाट घातला. समर्थांना प्रपंचात गुंतून राहणे मान्य नव्हते. त्यांनी लग्नाचा मंडप दारात उभा राहत असलेला पाहीला आणि सरळ कुणालाही न सांगता नाशिक जवळील टाकली हे गाव गाठले. (पळून गेले नाहीत ….पण आईला न सांगता गेले ) प्रभू रामचंद्र आणि सीता माई या शिवाय आता कुणीही नाही आणि विश्वाची चिंता कार्यवाहित आणायची तर आपण संसारात आडकणे योग्य नाही म्हणून संसार बंधनात त्यांनी स्वतःला गुंतून ठेवले नाही. समर्थांनी टाकली येथे घोर अनुष्ठान केले. उपासनेशिवाय सामर्थ्य नाही आणि सामार्थ्याशिवाय लोकोद्धार नाही हे त्यांनी जाणिले .
“राम तुज कारणे, जिवलगांचा संग सोडला …! असे म्हणत त्यांनी १२ वर्षे घोर तप केले. उग्र अनुष्ठान केले. श्री राम प्रभूंनी त्यांना दर्शन दिले आणि त्यांचा जन्म कृतकृत्य झाला. खरे तर प्रभूंच्या दर्शनाने त्यांचा मानव जन्म सफल झाला होता. करायचे असे काहीही राहिले नव्हते परंतु खुद्द हनुमानाने घेतलेले हे मानव रूप काही तरी विशेष करण्यासाठीच होते.
समर्थ प्रभू रामचंद्रांचे दर्शन झाल्यावर संपूर्ण देशभर फिरले. अफगाणिस्थान ..पाकिस्थान …नेपाळ…भूतान या आजच्या देशात समर्थ गेले होते. हिमालयापासून लंकेपर्यंत त्यांनी भ्रमण केले. लोकांचे दुखः पाहीले. धर्माचा ऱ्हास अनुभवला. आणि यवनांच्या अत्याचाराची त्यांना कल्पना आली.
समर्थांनी आपल्या सामर्थ्य बळाने अखिल राष्ट्र संघटीत केले.
— चिंतामणी कारखानीस
Leave a Reply