श्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या मंत्री पदाची शपथ घेतल्यावर जाहीर केले होते की ते आर टी ओ च्या कामकाजात आमूलाग्र बदल घडवतील. मुंबई -पुणे एक्सप्रेस वे केल्यापासून उभा देश त्यांना ओळखू लागला आहे. आठवा ते पूर्वीचे दिवस ज्यामधे पुण्याला जाताना घाटात ५-५ तास आडकून पडावे लागत असे. शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचे स्वप्न ख-या अर्थाने नितीन गडकरी यांनी साकार केले. ते करीत असताना त्यांनी प्रॉजेक्टचा खर्च आणि वेळ मोठ्या प्रमाणात कमी करून दाखवला. नितीन गडकरी यांच्याकडे त्याच त्यांच्या अनुभवामुळे रस्ते व वाहतूक मंत्री म्हणून केंद्रीय कारभार दिला गेला. पण त्यांनी संसदेत मांडलेले या संदर्भातील बिल अडकले आहे. अशा प्रकारे चांगली बिले रोखून धरायची आणि कुठे आहेत चांगले दिवस म्हणून तोंड वर करून विचारायचे हेच पाहण्याचे तुमच्या आमच्या नशिबी आले आहे.
“रीजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसेस किंवा RTO मधला भ्रष्टाचार इतका प्रचंड आहे की त्यापुढे चंबळचे दरोडेखोर काहीच नाहीत”. खुद्द रस्ते व वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांचे हे शब्द आहेत. रोड ट्रान्सपोर्ट अँड सेफ्टी बिल गेले आठ महिने मंजुरीच्या प्रतीक्षेत संसदेत अडकून पडले असून RTO च्या अधिका-यांनीच या विधेयकाविरोधात राज्य सरकारांचे कान भरले असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे .
RTO अधिका-यांनी आपली दुकानं बंद करावीत असं जाहीर आवाहन यापूर्वीही गडकरींनी केलं होतं. हे विधेयक संमत झालं तर हे संपूर्ण क्षेत्र सुधारेल आणि भ्रष्टाचार निपटला जाईल असा गडकरींचा दावा आहे. ज्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत, तेच या विधेयकाला विरोध करत असल्याचे गडकरींचे म्हणणे आहे. राज्यांच्या अधिकारांवर गदा येईल असे सांगण्यात येत असून ते निखालस असत्य असल्याचे गडकरींनी म्हटले आहे.
भारतात जितक्या सहजपणे ड्रायव्हिंग लायसन्स मिळतं, इतक्या सहजपणे जगात कुठंही मिळत नाही असं सांगताना यातली ३० टक्के बोगस असतात असंही गडकरींनी स्पष्ट केलं आहे. मानवी हस्तक्षेपाशिवाय ड्रायव्हिंग लायसन्स देता येऊ शकतात, ऑनलाइन परमिट आणि अन्य सुधारणाही या बिलात प्रस्तावित आहेत.
संपूर्ण वाहतूक व्यवस्था बदलण्याची क्षमता या विधेयकात असून संसदेच्या अधिवेशनात ते मंजूर व्हावं अशी अपेक्षा गडकरींनी व्यक्त केली आहे. सदर विधेयकला हाणून पाडणा-या लोकांना उघडे पाडले पाहिजे. देशात आता शिकलेल्या मतदारांचे प्रमाण लक्षणीय आहे. जी मंडळी या विधेयकला विरोध करीत आहेत त्यांना संसद आणि विधी मंडळाचे दरवाजे कायमचे बंद केले पाहिजेत .देशाच्या बाबतीत फालतू राजकारण नको. आता खूप झाले.
— चिंतामणी कारखानीस
Leave a Reply