लोकसत्ताच्या ८ मार्च २०१६ च्या अग्रलेखात झुंझार पत्रकार श्री गिरीश कुबेर यांनी माझं नाव न घेता मला – “कोणी तरी रिकामटेकडा संगीतकार कलात्मक झटापट आणि माल-विक्रीकौशल्याची खटपट करीत अभिमानगीत गात लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतो.” – म्हणून संबोधलंय! कुबेरांना ‘रिकामटेकड्या संगीतकारांवर’ अग्रलेख लिहायची वेळ आली हे पाहून मला त्यांची कीव आली. असंही वाटलं की रिकामटेकडेपणाचे फायदे कुबेरांना लहानपणीच कुणी समजावून दिले असते तर आज बिचाऱ्यांमध्ये इतकी कटुता नसती!
कुबेरांना एकच सांगतो.
की सव्वा वर्ष रिकामटेकडा राहून फक्त अभिमानगीत करत राहिलो
– म्हणून रत्नागिरीत ८००० मुलं ते एका सुरात गायली.
-म्हणून अमेरिकेत जन्माला आलेल्या मराठी घरातल्या मुलांना, ‘आपण हे गीत बसवून आपल्या आईवडिलांना एक सुखद धक्का देऊया’ असं वाटलं.
– रिकामटेकडा राहून हे गीत केलं म्हणून मुंबईच्या खासगी रेडियो वाहिन्यांवर मराठी गाणी लागू लागली आणि व्होडाफोनचे लोक मराठीतून सेवा देऊ लागले
– म्हणूनच चीनमध्ये राहाणाऱ्या Chu San Quek या चायनीज माणसाला वाटलं की भारतात येऊन महाराष्ट्र काय ते पहायला हवं.
– म्हणूनच बिवरली हिल्सच्या सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर शेखर रहाटे यांनी ऑस्कर ॲवॉर्डपूर्व संध्येला हॉलिवुडच्या मॉडेल्सना घेऊन मराठी अभिमानगीतावर फॅशन शो केला.
– म्हणून अमिताभ बच्चन यांना वाटलं की या गाण्यात मीही गायला हवं होतं.
– म्हणून हे गाणं ऐकून श्रीनिवास खळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं.
– आणि म्हणूनच या रिकामटेकड्या संगीतकाराच्या कलात्मक खटपटीची तुमच्या जगविख्यात वर्तमानपत्राला पहिल्या पानावर दखल घ्यावी लागली
कुबेर, अशा अनेक कथा आहेत. कधी रिकामा वेळ मिळाला तर या. ऐकवेन. आणखी एक गोष्ट. माझ्या रिकामटेकडेपणात अनेकांना आनंद देण्याची क्षमता आहे जी तुमच्या ‘कार्यग्रस्ततेत’ जराही नाही.
तुम्हाला तुमच्या कार्यबाहुल्यामुळे कदाचित एक गोष्ट लक्षात आली नसेल ती सांगतो आणि थांबतो.
उद्या तुमचा हा ‘व्यग्रलेख’ रद्दीत जाणार आहे आणि या रिकामटेकड्याने केलेलं गाणं लहान लहान मुलं पुढची शंभर वर्ष गात रहाणार आहेत.
आपला विनीत
कौशल इनामदार
Leave a Reply