बाल वयात जेव्हा पासून सभोवतालच्या जगाविषयी समज येवू लागली, त्या ईश्वराला जाणण्याची उत्सुकता मनामध्ये निर्माण झाली. सर्व अद्भूत जग निर्माण करणारा त्यावर नियंत्रण ठेवणारा, त्याला नियमानुसार चालविणारा कुणी तरी असेल हा विचार पक्का होऊ लागला. बुध्दीमध्ये स्थीर होवू लागला. जन्म, संस्कार आणि कौटूंबीक धार्मिक आचरण ह्याचा लवचिक असलेल्या बालमनावर त्वरीत पगडा बसू लागला. जे आहे, जे बघतो, जे ऐकतो, जे वाचतो आणि त्या वयात प्राप्त झालेल्या ज्ञानाने जे समजतो ते सारे मान्यता पावू लागले. कसलाही विरोध न करता गृहण करणे, आत्मसात करणे ही मनाची ठेवण व स्वभाव बनू लागला. अनेक कविता, श्लोक, सूभाषिते ज्यांचा अर्थ त्यावेळी मुळीच कळला नव्हता, ती मुखोलगत करू लागला. त्यात महान तत्वज्ञान भरलेले आहे. चांगले विचार आहेत. भावनांचे उच्च स्तर आहेत. ईश्वरी श्रध्देचे वर्णन आहे. जीवन कशासाठी व जगायचे कशाकरीता ह्याचा अर्थ भरलेला आहे. हे सारे आम्हास सांगितले गेले. ते आम्ही जसे आहे तसेच पाठांतर करून नियमीत रूपाने व्यक्त करीत होतो, म्हणत होतो. त्यावर फारसे चिंतन केले नव्हते. कित्येक संस्कृत श्लोक मुखोलगत केले व म्हटले गेले ज्याचा आजही अर्थ व्यवस्थित कळत नाही. एक मात्र झाले की सर्वांमधून त्या ईश्वराची महानता, भव्यता, दिव्यता, अथांगपणा, शक्तीसामर्थ ह्या गुणांची प्रचिती येवू लागली. फक्त ओळख पटू लागली. ह्यातच जाणीव निर्माण होवू लागली की त्या दिव्य अशा परमात्म्याला कसे भेटावे, बघावे आणि खऱ्या अर्थाने कसे जगावे.
कौटूंबीक धार्मिक संस्काराचा पगडा मनावर बसत असताना पूजाअर्चा, मंत्र विधींचा प्रभाव पडू लागला. देवघरातील मुर्ती, तसबीरी मनाला आनंद देणाऱ्या वाटू लागल्या. कर्मकांडात मन गुंतू लागले. पूजापाठ, भजन ह्याचे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न झाला. धार्मीक पुस्तक संग्रह गोळा करू लागला. पूजा विधी कशी निटनेटकी होईल. ह्याकडे लक्ष केंद्रीत करू लागला. कोणतीही वस्तू वा साधने जर पूजाविधीत कमी पडली तर खंत वाटू लागली. त्याची योजना व काळजी घेतली जायी. समोर असलेल्या मुर्ती व तसबीरीबद्दल ज्ञान मिळण्याची उत्सुकता लागली. माहीतीसाठी अनेक पौराणीक ग्रंथाचे वाचन करू लागलो. अर्थात ते अभ्यासाने म्हणण्यापेक्षा चाळने असावयाचे. प्रचंड धार्मिक पुस्तके वाचली. देवदेवतांची वर्णने, त्यांच्या विषयीच्या अनेक कथा, त्यांची उत्पती अथवा अवतार पावने, प्रासंगीक कथा, शाप-वरदानाच्या गोष्टी वाचल्या. अनेक संस्था असलेले म्हणजे ३३ कोटी देवांची संख्या असलेले वर्णन, अनेकांची कार्ये व विश्वाची योजना इत्यादी प्रचंड प्रमाणात असलेली माहिती वाचता वाचता, संकलन करता करता, मन आनंदून जसे जात असे. त्याचवेळी मनात असंख्य प्रश्नाची गर्दी होवू लागली. कित्येक कथा प्रसंग, वर्णने आणि परिणाम मानव जीवनचक्राला समोर ठेवून केल्याचे भासले. त्यामध्ये थोडीशी भव्यता, दिव्यता प्रदर्शीत होत आहे. मानवी जीवनाचा वरचा स्थर, उच्चता फक्त प्रतीत होत होती. कित्येक प्रसंग वा वर्णने मनाच्या श्रध्येला विचलीत करीत होते. ती अंधश्रध्देच्या दालनात नेवून ठेवीत होते. मनाचा एक प्रकारे कोंडमारा होत असल्याची जाणीव होत होती.
आपलीही एक बुध्दी आहे, विचार करण्याची आपलीपण क्षमता आहे. हे वाटू लागले. एखादा विचार जो वर्षानुवर्षे चालत आलेला आहे. त्याचे मुळ अज्ञात आहे. त्यात बरेच फेर बदल झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तो विचार आजच्या घडीला स्थिर झाल्याप्रमाणे भासतो. तो आहे तसाच मान्य करावा का? ह्यामध्ये मन हेलकावे घेवू लागले. तरी आपल्या अभ्यासाच्या मर्यादा जाणल्या. ते पौराणीक चित्र, त्या कथा तशाच मान्य कराव्यात हे मनाने ठरविले. जे पूर्ण पटले, आवडले त्याला श्रध्येने मान्यता दिली. जो भाग विपरीत वाटला, त्यावर भाष्य न करता विचारांच्या दालनातून वेगळा करून दिला.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply