बाटलीतले पाणी विकत घेउन पिणे ही एक फॅशन झालेय का? हा प्रकार गेल्या काही वर्षातच फोफावला आहे. खरं आहे की बाटलीतलं पाणी शुद्ध असतं, त्याने पोटाचे विकार-बिकार होत नाहीत वगैरे वगैरे. पण त्यासाठी विकत घेतलेल्या बाटलीतलंच पाणी प्यायला हवं असं कुठे आहे? घरातूनही पाणी बाटलीत भरुन घेउन जाता येतंच की? पण त्याने स्टेटस खाली येतं असं मंडळींचं म्हणणं असतं. १ रुपयाचं पाणी १५-२० रुपयाला घेतलं की स्टेटस वाढतं म्हणे !
आता काही मजेदार गोष्टी बघूया.
आपण एखाद्या मोठ्या नावाजलेल्या हॉटेलमध्ये जातो. टेबलावर स्थिरस्थावर होत नाही तोच वेटर आपल्याला विचारतो… “साहेब, पाणी बिसलरीचं की साधं?” (तो मराठीत विचारत नाही हा भाग वेगळा)
आपण आजुबाजूला नजर टाकतो. आपल्याबरोबरच्या माणसांना उगाचच विचारल्यासारखं करतो आणि त्याला ऑर्डर देतो… “बिसलरी”.
आपल्याला हे माहित असतं का, की ग्रेड १ च्या सगळ्या हॉटेल्समध्ये वॉटर प्युरिफायर बसवणं हे कायद्याने बंधनकारक आहे. मग जर त्या हॉटेलमध्ये वॉटर प्युरिफायर बसवला असेल तर मुळातच त्या वेटरने आपल्याला बिसलरी हवंय का असं विचारायलाच नको. पण तो त्या हॉटेलवाल्याच्या व्यवसायाचा भाग झाला.
वेटरने विचारलेला एक साधा प्रश्न…. आणि त्याच्या उत्तराने आपण फटकन पंधरा-वीस रुपयांचा चुराडा करतो. स्टेटससाठी !
बरं आता तो वेटर आपल्यासाठी पाण्याची बाटली घेउन येतो. ती बहुतेकवेळा बिसलरीची नसते. कुठल्यातरी भलत्याच ब्रॅन्डची असते. आपण मात्र काहीही न बोलता ती निमूटपणे उघडतो आणि त्यातलं पाणी समोरच्या ग्लासात भरुन प्यायला सुरुवात करतो. इथे आपल्या त्या बाटलीतल्या शुद्ध पाण्याचे बारा वाजलेले असतात कारण तो ग्लास कुठच्या पाण्यात धुतलाय हे आपण लक्षातच घेत नाही !
काही विशिष्ट हॉटेल्समध्ये पाणी दिलं जात नाही. तिकडे पाण्याची बाटलीच विकत घ्यायला लावतात. मॅकडोनल्ड हे त्यातलंच एक. काही वर्षापूर्वी माझं तिकडे त्यावरुन भांडण झालं. खाद्यपदार्थ विकणार्या कोणत्याही हॉटेलमध्ये गिर्हाईकाला पाणी मोफत द्यायला पाहिजे असा नियम आहे. तो नियम दाखवून पाणी न दिल्याबद्दल तक्रार करीन असे सांगितल्यावर निमूटपणे मला ग्लासमधून पाणी दिलं गेलं. किती जण या मार्गाचा अवलंब करतात?
काही गोष्टींना एखाद्या ब्रॅंडच्या नावाने ओळखलं जातं. आपण झेरॉक्स काढतो. खरंतर ती फोटोकॉपी काढली जाते आणि त्यासाठी पहिलं मशीन आलं ते झेरॉक्स कंपनीचं म्हणून फोटोकॉपी म्हणजे झेरॉक्स असं समीकरण झालं. मी पूर्वी एकदा उत्तर प्रदेशातल्या मधल्या एका गावातल्या एका दुकानात उभा होतो. एका ग्राहकाने “लालवाला कोलगेट देना” असं त्या दुकानदाराला सांगितलं आणि दुकानदारानेही शांतपणे “क्लोज-अप”ची लाल टूथपेस्ट कार्ढून दिली.
“बिसलरीचं पाणी” याचं पण तसंच आहे. सर्वसाधारणपणे कोणत्याही सीलबंद पाण्याच्या बाटलीला बिसलरी म्हटलं जातं. सिलबंद पाण्याचा हा हजारो कोटींचा धंदा आहे. तो असा सहजासहजी बंद होणार नाही. कारण त्या धंद्यावर आज एक इकॉनॉमी चालते. १ रुपयाचं पाणी २० रुपयांना विकल्यामुळे आज काही कंपन्यांच्या शेअर्सच्या भावात सातत्याने वाढ होते.
या बाटलीबंद पाण्याच्या रिकाम्या बाटल्यांवरही एक समांतर अर्थव्यवस्था (parallel economy) चालते हे माहित आहे? सर्वसाधारणपणे ७० टक्के ग्राहक रिकाम्या बाटल्या तशाच टाकून देतात. या बाटल्या जमा करुन पुन्हा भरुन आपल्यालाच विकणं हा एक प्रचंड मोठा धंदा सुरु आहे. साधारणपणे रेल्वे स्टेशन, बस स्टॉप अशा ठिकाणी अशा रिसायकल केलेल्या बाटल्यांमधलं, कुठेही भरलेलं पाणी आपल्याला विकलं जातं.
आता आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे बघू. या बाटलीबंद पाण्याला एक एक्सपायरी डेट असते. मात्र ती बाटलीवर अशा प्रकारे आणि अशा ठिकाणी छापलेली असते की सहजपणे आपल्याला ती दिसतच नाही आणि शोधत बसायला एकतर आपल्याला वेळ नसतो किंवा ती डेट शोधत बसणं हे आपल्या तथाकथित स्टेटसच्या आड येतं. आपण म्हणाल की पाण्याला कसली आलेय एक्सपायरी डेट. पण लक्षात घ्या पाण्याला एक्सपायरी डेट नसली तरी पाणी प्लास्टिकच्या बाटलीत किती दिवस साठवून ठेवायचं त्याला असते.
इतर कोणत्या देशात पिण्याचं बाटलीबंद पाणी वापरलं जातं हे तपासायला पाहिजे. कदाचित हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच देश निघतील आणि त्यातही “मेरा भारत महान”चं स्थान सर्वात वरचं असेल.
— निनाद प्रधान
good