कोण याती वशं लोके मुखे पिंडेन पूजिता
मृदंगो मुखलेपेन करोति मधुरं ध्वनी ………
या श्लोकाचा अर्थ असा कि-
तोंडात ( भाताचा ) गोळा भरवल्यावर कोण वश होत नाही ? मृदुंगाच्या तोंडावर जेव्हा कणिक थापतात तेव्हा तो सुद्धा मधुर ध्वनी करू लागतो …..!
विजय मल्ल्या शेवटी सर्वांना चुना लावून पळालाच. त्याला म्हणे भारतात परत आणण्यासाठी सरकार पयत्न करणार आहे.वरपासून खाल पर्यंत हा देश किती पोखरला आहे हे मल्ल्या प्रकरण मुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले. पुन्हा पुन्हा त्याच विषयावर बोरू घासत बसण्या पेक्षा लोकांनीच आता विचार करून सरकारला जाब विचारला पाहिजे.संसद किंवा विधानसभेत लोकांचे प्रश्न सुटनार नाहीत हेच पुन्हा पुन्हा सिद्ध झाले आहे.सर्वपक्षीय राजकारणी, नोकरशहा, बॅंकांचे काही बडे अधिकारी आणि काही उद्योगपती यांच्यातील हातमिळवणीचा मल्ल्या हा ढळढळीत पुरावा आहे!
काळा पैसा आणणार ,२०२० साली देश महासत्ता होणार …बुलेट ट्रेन …..स्मार्ट सिटी ….ऐकून ऐकून कंटाळा आला.
लोकप्रतिनिधी आणि सरकारी बाबूंनी ज्या प्रमाणात या देशाला लुटले आहे ते पाहून इंग्रजांनी सुद्धा शरमेनी मान खाली घालावी.
गांधी– सावरकर या पैकी हा देश कुणाचा ?कोणी अधिक त्याग केला? या विषयावर चर्चा करण्यापेक्षा ज्यांनी गडगंज पैसा कमावून देशाला लुटण्याचा धंदा सुरु केला आहे त्यांचा हा देश आहे हेच या प्रकरणात अधोरेखित झाले आहे .हा देश शेतकरी कष्टकरी यांचा पूर्वीही नव्हता आणि आता तर होण्याची सुतराम शक्यता नाही.लोकसभेतील होणारी निरर्थक भाषणे करणारे नेते आणि सरकारी बाबू यांचा हा देश आहे ॰
देशासाठी या साऱ्या “खेळा‘चा अर्थ एवढाच आहे की कॉंग्रेसप्रणीत राजवटीत मल्ल्यांनी देशातील राष्ट्रीयीकृत बॅंकांची हजारो कोटींची दिवसाढवळ्या लूट केली आणि भारतीय जनता पक्षाच्या राजवटीत तो सर्वांच्या हातावर तुरी देऊन परदेशात पसार झाला. त्यामुळे आता सर्वपक्षीय राजकारणी आणि काही उद्योगपती यांचे संगनमत आणि साटेलोटे यांचा मल्ल्या हा आता ” प्रतीक ” बनला आहे! बॅंकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सगळ्या प्रकरणात काय केले, हाही प्रश्न विचारायला हवा. हजारो कोटींच्या थकीत कर्जांचे रडगाणे गात बसण्याऐवजी मल्ल्याच्या मुसक्या आवळाव्यात, असे राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या अधिकाऱ्यांना तो पळून जाईपर्यंत का वाटले नाही? एरवी लहान -लहान कर्जदाराच्या वसुलीसाठी हात धुवून मागे लागणाऱ्या या अधिकाऱ्यांची मल्ल्याच्या बाबतीत एवढी दातखीळ का बसली होती? सीबीआय अधिकाऱ्याला देखील हाच प्रश्न पडला आणि एकाही बॅंकेचा अधिकारी तक्रार घेऊन पुढे न आल्याबद्दल सीबीआय च्या अधिका-यांनी खेद व्यक्त केला.
कर्जाची थकबाकी झाली कि शेतक-याच्या गळ्याभोवती” मृत्यू ” चा फास घालणा-या बँकांच्या अधिका-यांचे काहीही नुकसान नाही .राजकारणी मोकळे , सरकारी अधिकारी मोकळे,न्यायालये हताश , कार्यकर्त्यांनी मात्र जय-जय म्हणत विविध पक्षाचे झेंडे नाचवायचे आणि वडापाव वर ताव मारून निवडून आलेल्या आमदार खासदार यांच्या भोवती गर्दी करायची.
शेवटी गोरे घालवून आम्ही काय मिळवले.??????
— चिंतामणी कारखानीस
Leave a Reply