बँकेची भलीमोठी इमारत, काऊंटर नावाच्या भिंतीमागे निर्विकार चेहेऱ्याने लाखांच्या रकमा मोजत बसलेले बँक कर्मचारी नावाचे स्थितप्रज्ञ, ती भिंत ओलांडून आत शिरण्याचे धाडस करून बँकेचे व्यवहार करणारी काही कर्तृत्ववान माणसं, टोकन नावाचे बऱ्यापैकी वजन असलेले पितळी बिल्ले, ते लुकलुकणारे टोकन नंबर्स व आपला नंबर येताच होणारा बेलचा ‘डिंगडाँग’ असा आवाज या सर्व गोष्टींबद्दल मला शाळकरी वयापासून प्रचंड कुतूहल वाटत आलंय. बंद दरवाज्यामागे बसलेल्या बँक मॅनेजर या माझ्या दृष्टीने अत्यंत महान असलेल्या व्यक्तीचे एकदा तरी दर्शन व्हावे यासाठी मी अनेकदा माझे काम आटोपल्यानंतरही उगीचच बँकेत रेंगाळलो आहे. काही वर्षांनंतर माझे काही शाळकरी मित्र बँकांचे मॅनेजर झाल्यानंतर त्यांच्या केबिनचं आपोआप बंद होणारं दार ढकलून ती अलीबाबाची गुहा एकदाचा बघून आलो. प्रत्येक बँकेला एक मोठ्ठं तळघर असतं आणि त्यात नोटा छापायचा कारखाना असतो अशा (गैर) समजुतीत मी शाळकरी वयात अनेक वर्ष वावरत होतो. माझ्या एका बँक मॅनेजर मित्राला लाजतलाजत मी जेव्हा त्या नोटांच्या कारखान्याबद्दल सांगितलं तेव्हा एखाद्या मनोरुग्णाला भेटत असल्यासारखा त्याचा चेहरा झाला !
स्वतःच्या बचत खात्यातून पैसे काढण्यासाठी बँकेत गेलो असताना नोटा मोजणाऱ्या कॅशीयर नावाच्या महापुरुषाबरोबर नोटा मोजण्याचा अनेकदा मी निष्फळ प्रयत्न केला आहे. एकदा त्याने नोटा मोजल्या कि आपल्याला पुन्हा तेच काम करण्यात वेळ वाया घालवायला नको एवढाच माफक हेतू. पण आजपर्यंत हे काम मला एकदाही जमलेलं नाही. त्याच्याबरोबर नोटा मोजताना मी एक म्हटलं की तो पठठा कमीतकमी चार ते पाच नोटा माझ्यापुढे निघून गेलेला असतो. मी महत्प्रयासाने धापा टाकत ‘दहा’ म्हणेपर्यंत पन्नास नोटांची गड्डी तो पिंजऱ्यातील प्राणी अत्यंत निर्विकारपणे माझ्या अंगावर फेकतो! आपल्याला साध्या नोटाही लवकर मोजता येत नाहीत या वस्तुस्थितीमुळे आलेलं वैफल्य कितीही लपविण्याचा प्रयत्न केला तरी लपवता येत नाही. त्या वैफल्याची अंशतः भरपाई करण्यासाठी बँकेत आलेल्या एका कॉलेजकुमाराला डीमांड ड्राफ्ट तयार करण्यासाठी आवश्यक असलेला फॉर्म मी भरून दिला. ”कोणत्या गाढवाने हा फॉर्म तुम्हाला भरून दिला?” त्या कॉलेजकुमाराच्या दिशेने पिंजऱ्यामागून आलेला प्रश्न ऐकून मी काय समजायचं ते समजलो. चिंतन करण्याची सवय सोडली तर माझ्यात व गाढवात काहीही साम्य नसताना माझा गौरव करण्यासाठी त्या बँक कर्मचाऱ्याला गाढवासारख्या चतुष्पाद प्राण्याचीच का आठवण झाली असावी?
बँकेत शिरताना माझं कोणी हसून स्वागत केलं तर मला विलक्षण संकोचायला होतं. बँक नावाच्या प्रकरणाची खूप लहानपणापासून मनात दडून बसलेली अनामिक भीती त्यामागे असावी. आपल्याच खात्यातून आपलेच पैसे काढताना कुणी माझा जाहीर सत्कार करावा अशी जरी माझी इच्छा नसली तरी अगदीच भिक घातल्यासारखं किंवा मोठ्ठे उपकार केल्यासारखं कुणी वागू नये एवढीच माफक अपेक्षा असते. कधीकधी संबंधित कर्मचाऱ्याचा चेहरा एरंडेल तेल प्यायल्यासारखा दिसला तर बरेच दिवस मला बँकेची पायरी चढण्याची इच्छा होत नाही आणि पैसे न काढल्यामुळे माझ्या बँक बँलन्सचा आकडा आपसूकच फुगू लागतो!
काही दिवसांपूर्वी एका बँकेत माझं जंगी स्वागत झालं. अचानक झालेल्या त्या हल्ल्याने मला भोवळ आली. प्रयत्नपूर्वक स्वतःला सावरल्यानंतर माझी नजर एका बँनरवर पडली ज्यावर लिहिलं होतं ‘सौजन्य सप्ताह’. ग्राहकांशी सौजन्यपूर्वक वागण्याची अजिबात सवय नसल्यामुळे सौजन्याचं खोटं प्रदर्शन करण्यासाठी सप्ताह पाळण्याची दुर्दैवी वेळ आमच्यावर यावी यालाच कलियुगाचा महिमा म्हणायचे का?
श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com
Leave a Reply