सकाळी उठल्या उठल्या खिडकी उघडून बाहेर डोकावले. आज सूर्य देवाने पडद्याआड रहाणेच पसंत केले होते. काळ्याभोर घनमालांनी दिलासा दिला. ‘होय, तो आज नक्की येणार’. माझ्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. ग्रीष्माच्या भट्टीत होरपळलेली सृष्टीही माझ्यासारखीच अधीर झाली होती. मृगाचे चार दिवस उलटून गेलेत, तरी याच्या येण्याची चाहूल नाही. फक्त जीव गुदमरून टाकणारे वातावरण स्वत:शीच स्पर्धा करीत दररोज नवा उच्चांक गाठणारा उष्मा, खरतर आत आणि बाहेर जीवाची काहिली होतेय. आशेने पहावे आकाशाकडे तर तेथेही वाकुल्या दाखवणारा पिंजलेला कापूस. काय करावे? कुठे जावे? पूर्वीसारखे शहर सोडून महिना दोन महिने मामांचा गाव गाठावा तर तिथले चित्र हृदय पिळवटून टाकणारे, गुरावासरांसोबत जीव कंठाशी आलेला बळीराजा, दुभंगलेली धरणीमाय, थेंबाथेंबाचा हिशोब घालणारे कोरडे पाणवठे, तहानलेले नद्यानाले, हिरवळण्यासाठी आसुसलेली वनराई, अंकुरण्याची आस धरून बसलेले बी-बीयाणे सगळेच त्राण नसलेले निस्तेज होत चाललेले. डोळ्यांसमोर भरदिवसा काजवे चमकले.डोळे भरून आले. इतक्यात…… इतक्यात कुठुनसा आलेल्या पावशाने वर्दी दिली ‘धीर सोडू नका तो येतोय’. पाठोपाठ वाऱ्याने गिरक्या घेत हजेरी लावली. आतामात्र प्रत्येकजण जीव डोळ्यात आणून आशेने आभाळाकडे पाहू लागला. मी सुध्दा सगळ्या संवेदना एकवटून टपोऱ्या थेंबाची वाट पहात होते. घरावर, अंगणात, रस्त्यावर, झाडावेलींवर पहिला वहिला प्रेमस्पर्श करणारा पर्जन्यराजा, किती बरं वाट पहायला लावतोय. मातीचा सुगंध रोमारोमात भरण्यासाठी जीव अधीर झालाय. मनसोक्त चिंब होण्याच्या कल्पनेनेच सृष्टी सुखावलीय. अचानक टपटपकरीत टपोऱ्या थेंबातून त्याने धाव घेतली. कौलांवर तडतड ताशा वाजवित तो आला. मुलांनी अंगणात धाव घेतली. दोन्ही हात पसरून गोल फिरत आकाशाकडे पाहून डोळे मिचकावू लागली. डांबरी रस्त्यावर पाऊस फुलांचा वर्षाव पहाण्यासाठी डोळे भिरभिरले.तप्त रस्त्याने विश्वास टाकला. चिमण्या पाखरे किलबिलू लागली. झाडेवेली थरथरू लागली. जणूकाही सृष्टी शहारू लागली. मी सुध्दा लहान मुल होऊन अंगणात धावले. पण अचानक काय झाले कुणास ठाऊक. आला आला म्हणत असताना तो कुठे निघून गेला ते कळलंच नाही. मी हिरमुसली होऊन वर पहात राहिले का बरे मागे फिरला तो. ज्याच्या स्वागताची तयारी मनापासून करावी आणि तो मात्र दारावरून मागे फिरावा असंच झालं. मातीचा सुगंध हवेतच विरला. झाडेवेली माना खाली घालून स्तब्ध झाली. आता मात्र तो रुसला असल्याचे स्पष्ट झाले होते. णन अस्वस्थ झालं. उन्हाचा कवडसाही नाही तरी उन्हाळा अंगाची लाही लाही करतोय. जळमटलेले वातावरण मनाला उदास करून सोडतय. सगळीकडे धीरगंभीर शांतता पसरलीय. मनातल्या मनात हात जोडून विनवण्या सुरू होत्या. सृष्टी अबोल होऊन विनवित होती. ‘नको रे असा निर्दय होऊस. का बरं रुसलास माझ्यावर? जीवाची नुसती घालमेल होतेय. आज किती खुश होते मी तू येणार म्हणून. पण तुला तर काहीच नाही त्याचं असा कसा रे निष्ठून होऊन मागे फिरलास? सांग ना कशी जगू मी तुझ्याशिवाय? गेले काही दिवस तू येण्याच्या वार्ता येतायत. त्या ऐकून मला हायसं वाटतं. कारण मागच्या वर्षीची जलसंपत्ती लोकहितासाठी खर्च झाली. अलीकडे मी कोरडी झालेय. सूर्यदेवाने तर सगळ्या शक्तीनिशी मला होरपळून काढलंय. माझी सहनशीलता आता संपत चाललीय. मी निस्तेज झालेय, रुक्ष झालेय. निर्जीवच होत चाललेय. तुझ्यावाचून माझे जीवन संपत चाललेय. आता तरी तू माझ्यावर दया कर. असा अंत नको रे पाहूस. मी तुझ्याविना नाही रे जगू शकत. अरे तू येत नाहीस म्हणून राजाने वाघिणीने पाणी आणले. कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न केला. मला खूप वाईट वाटले. पण मला माहित आहे असे कितीही प्रयत्न झाले तरी ते तुझ्या पासंगाला पुरणार नाहीतच. एकदा का तू आलास की हे सगळे कुठल्या कुठे पळून जातील. मी जाणून आहे. एक दिवस तुला नक्की पाझर फुटेल. माझ्या हाकेला तू साद देशील. आणि माझ्या सर्व यातना, दु:ख संपवून टाकशील. ए, खरच आज मी खूप आनंदात होते. तुझ्या येण्याचा संकेत मिळाला आणि पुन्हा एकदा मन मोरपीस झालं होतं. पण तू …. तू अशी हुलकावणी दिलीस, मागे फिरलास का … का असा हा आडमुठेपणा? ये ना लवकर आणि मला चिंब भिजवून टाक. मला नवसंजीवनी दे. मला जगायचंय, मला फुलायचंय, मला हसायचंय आणि हे सारं फक्त तूच करू शकतोस… तूच करू शकतोस.’ तिच्या कळवळण्याने कदाचित तो हेलावला. त्याला रहावले नाही. तिच्या आर्त हाकेला त्याने साद दिली. मेघ गर्जना करीत विजांच्या लखलखाटात वाऱ्याच्या वेगाने तो अवतरला. सगळा आसमंत व्यापून टाकला. वसुंधरेला कवेत घेतली. तिचे शुष्क अश्रू पुसले आणि कडाडत म्हणाला, ‘मला तुझ्या वेदना पहावत नाहीत म्हणून मी आज आलो. परंतु तुझ्या मुलांना जे तू लाडावून ठेवलं आहेस ना तेच तुझ्यावर अन्याय करताहेत. मला त्यांची कीव करावीशी वाटते. तू त्यांचे पालन पोषण करतेस आणि ते मात्र तुला केवळ दु:ख देतात. किती कृतघ्न आहेत ते. त्यांच्या बेदरकार वागण्याने सगळं ऋतुचक्र बिघडून गेले आहे आणि माझ्याकडून किती मोठ्या अपेक्षा ठेवतात,बघ. ते जर वेळेवर जागे झाले नाहीत तर अन्नपण्याविना प्राण सोडण्याची वेळ येईल त्यांच्यावर हे का त्यांना कळत नाही. त्यांच्या क्रूर कर्माची फळं त्यांच्या मुलाबाळांना भोगावी लागतील हे समजत असं नाही. मी तुझ्यावर रागावलो नाहीच. परंतु या मानवपुत्रांच्या हव्यासापोटी तुझी ही अवस्था झाली आहे. आता तरी त्याने जागे व्हावे आणि स्वत: सुखाने जगावे तसेच तुलाही जगू द्यावे. नाहीतर माझ्यासारखा वाईट कुणीच असणार नाही. मी जसे जीवन देतो तसेच ते घेतोही. माणसा जागा हो. माणसा जागा हो!’ मी सुन्न होऊन हे सारे ऐकत होते. डोळ्यातल्या पावसाने पापण्यांच्या मर्यादा ओलांडल्या होत्या. खरंच जागे व्हायला हवे ना माणसाने?
(“ठाणे वैभव” च्या सौजन्याने)
— नूतन बांदेकर
अप्रतिम लेख.
मुलांनी त्यांच्या हव्यासासाठी आई-बाबा यांच्यात दरी निर्माण केल्या सारखं वाटत आहे. मला स्वतःला बाबांना भेटायला खूप आवडतं पण जर मी आईची काळजी घेतली नाहीतर मग मला बाबा देखील भेटणार नाहीत.
फार सुंदर लेखन
धरतीची तगमग माणसांना लागलेली आस आणि निसर्गाची कथा
किती मोजक्याच आणि नेमक्या शब्दांत प्रभावीपणे मांडली आहे! !!
छान