आत्मा-ईश्वर, या शब्दांचा, अर्थ होई आई |
त्या मायेचा, थांग न लागे, इतुकी गहराई ||१||
आईवाचुनी, नसे वेगळा, जगात परमेश्वर |
स्वर्ग आणि सूर्य-चंद्रही, त्यापुढती नश्वर ||२||
सोशी वेदना, झेली यातना, नसे तया गणती |
स्वतः जळुनी, प्रकाशणारी, ऐसी ती पणती ||३||
चिमणचोचिने भरवी बाळा, राही स्वतः उपाशी |
होईल याची, तुलना कैसी, सांगा बरे कुणाशी? ||४||
लिंबलोण ती, नित्य उतारी, निजबाळावरूनी |
कळी काळाला, यम् राजाला, लावी ती परतुनी ||५||
काळीज कातरणारा ऐसा, कारुण्याचा स्वर |
स्वरातुनी या, जणु हाकारी, आई रुपात ईश्वर ||६||
कमलकरांचा, करुनी पाळणा, जोजवी लडीवाळा |
तिला भासते, बाळ तिचा जणु, पंढरीचाच नीळा ||७||
उत्सव कां तो, एक दिनाचा, करे साजरा कुणी ?|
क्षण क्षण सारे, जरी वेचले, तरिही शक्ति उणी ||८ ||
जीवन अवघे जरी अर्पिले, आईच्या चरणाशी |
तरिहि पुर्तता, कधी न होई, ऐश्या आशिषराशी ||९ ||
© कवी : उपेंद्र चिंचोरे
८ मे २०१६
कविता-गझल
Leave a Reply