स्वरसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर ह्यांनी गौरविलेला, मी लिहिलेला हा लेख मास्टर दीनानाथ मंगेशकर ह्यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षी २० एप्रिल २००० रोजी प्रसिद्ध झाला होता.
बलवंत संगीत मंडळीच्या मानापमान नाटकामध्ये मास्टर दीनानाथांनी धैर्यधराची भूमिका करण्यास १९२७ मध्ये सुरुवात केली ! मास्टर दीनानाथांच्या आधी अनेकांनी रंगभूमीवर धैर्यधर साकारला होता. “मानापमान”मध्ये मास्टर दीनानाथांनी पदांच्या चाली बदलण्यापासून सर्व ठिकाणी नाविन्य निर्माण केले !
गरिबी-श्रीमंतीचा झगडा, शौर्याच्या पार्श्वभूमीवरील शृंगाररसाने ओथंबलेले मानापमान नाटक ! त्याला कालमानाचे, वेशांतराचे बंधन कशाला ? म्हणून मास्टर दीनानाथांनी आपल्या पहिल्या रुपामध्ये आमुलाग्र बदल केला. पहिल्या अंकातील साधा लष्करी नोकरीमधला एक सेनापती, आपल्या वधूची निवड करावयास येतो, म्हणजे तो गणवेशात नसणारच ! दुस-या अंकाचेवेळी, छावणीभोवती चोरट्यांचा धुमाकूळ सुरु असतो, त्यावेळी त्याला गणवेश हवाच ! तिस-या अंकात त्याला पृथ्वीवर महाराजांकडून तीन चांदीची सरदारी आणि पंचवीस लाखांची जहागिरी मिळालेली असते, म्हणजे धैर्यधर त्याच दिमाखात दिसावयास हवा ! चौथ्या अंकात त्याचा ऐश्वर्यभोगांकित शृंगाररस सादर करावयाचा आहे म्हणून मास्टर दीनानाथांनी धैर्यधराच्या भूमिकेतील वेशाविश्करण वेळोवेळी बदलून, रंगभूमीवर आणले, याचे नाट्याचार्य खाडिलकर ह्यांनी खूप कौतुक केले. ते म्हणाले, “माझे हे नाटक कालमानानुरूप आणि विधानककुशल आहे, असा जो मला सुरुवातीपासून एक आत्मविश्वास होता, तो या स्थित्यंतरित मास्टर दीनानाथांच्या भूमिकेनेही बळावला !”
रणदुंदुभी नाटकामधील मास्टर दीनानाथांची तेजस्विनीची भूमिका बघून, श्रीमान पसारे अप्पा ह्यांनी मास्टर दीनानाथांना बक्षीस म्हणून चांदीची ढाल आणि तलवार दिली होती. ह्या चांदीच्या ढालीचा आणि तलवारीचा उपयोग मास्टर दीनानाथांनी धैर्यधराच्या भूमिकेसाठी केला !
मानापमान नाटकामध्ये धैर्यधराची भूमिका करतांना, दुस-या अंकात, मास्टर दीनानाथांचा वेष इंग्रजी चित्रपटातील एखाद्या जुन्या काळच्या सेनापातीप्रमाणे दिसे. प्रसिद्ध अमेरिकन अभिनेते रुदाल्फ व्हलेंटिनो हे अशा पद्धतीचा पोषाख करीत. या सेनापतीच्या पोषाखात मास्टर दीनानाथ रुबाबदार दिसायचे !
मास्टर दीनानाथांनी धैर्यधराच्या पदांना रसानुकुल नव्या चाली लावल्या. “माता दिसली” या पदात, “नेत सकल रणवीर रणासी” ही ओळ गातांना मास्टर दीनानाथ तानांची उसळी घेत. रणवीरांचे ठिकाण रणांगण हे ते पटवून देत असत, “चंद्रिका ही जणू” हे पद मास्टर दीनानाथ दुर्गा रागात गायचे. त्रिताल बदलून, रूपक तालात, म्हणायचे. “दे हाता या शरणांगता” या पदाच्यावेळी तर हा वीरपुरुष केवळ वनमालेच्या दृष्टीक्षेपात घायाळ झाल्यामुळे हतबल, दीन होऊन, तिची प्रेमभराने मनधरणी करीत असल्याचा गोड भास रसिकांना होत असे. “रवी मी चंद्र कसा” ही चाल मास्टर दीनानाथांनी कवीच्या भावनांची सुयोग्य गुंफण करून केली, असे वाटते. धैर्यधराच्या त्या प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन, त्यांनी ठेक्याची योजना केली.
“प्रेमसेवा शरण” हे ऐकतांना तर रसिक प्रेक्षाकांची खात्री व्ह्यायची, की रणांगणावरील हा सेनापती, रमणीच्या पायावर अक्षरशः लोटांगण घालून घायाळ झालाय ! मूळ भिमपलास मधले हे पद मास्टर दीनानाथांनी मुलतानी अंगाने म्हणण्यास सुरुवात केली. मास्टर दीनानाथांच्या ह्या भूमिकेला, या पदांना संगीतप्रेमींनी प्रत्येक खेळास उदार आश्रय दिला. प्रत्येकवेळी वन्समोअर मिळणारे पद होते, “शूरा मी वंदिले”!
मानापमानच्या प्रयोगास सुरुवात होताच, मास्टर दीनानाथांच्या उत्साहाला जणू उधाण फुटायचे ! आपल्या नवीन चाली रसिकांना आपण कधी ऐकवितो, असे त्यांना व्ह्यायचे. नाटकातील संभाषणे आवरून, ते गाण्यावर स्थिर होत असत. गाण्याची सुरुवात करतांना, मास्टर दीनानाथ पेटीवाल्यांच्या साथीची वाट पाहायचे नाहीत. त्यांच्या गाण्यावरून, जणू पेटीवाल्यांनी सूर लक्षात घ्यायचा ! रंगभूमीवरच्या गायनात पेटीची साथ न घेता, गाण्याची अचूक फेक करणारे मास्टर दीनानाथ पहिलेच !
मानापमानमध्ये “माता दिसली समरी” या प्रथम पदापासून ते “प्रेम सेवा शरण” या अखेरच्या पदापर्यंत, प्रत्येक पदाला, प्रत्येक वेळी टाळ्यांच्या कडकडाटात वन्समोअर मिळविणारे दीनानाथ साक्षात “स्वरनाथ” होते !
एकदा शनिवारी कोल्हापूरच्या पॅलेस थिएटरमध्ये मानापमानचा प्रयोग जाहीर झाला होता. त्याच दिवशी, त्याच वेळी, कोल्हापूरमध्येच देवल क्लबमध्ये मंजीखाँसाहेबांचे गाणे ठरले होते. बाबा देवल चिंतातूर झाले. ते वसंत देसाई ह्यांना म्हणाले, “अरे वसंता, आज आपल्याकडे मंजीखाँसाहेबांचे गाणे आणि तिकडे दीनाचे मानापमान, सगळेजण तिकडेच जाणार”. हे ऐकताच वसंत देसाई ह्यांनी आनंदाने जोरात टाळी वाजवली !
पॅलेस थिएटर हाउसफुल्ल होते. धैर्यधराची भूमिका केलेल्या विद्यमान नटांनी कळत-नकळत “बलवंत”च्या या धैर्यधराला चार-आठ वेळा पैसे खर्चून मानाचा मुजरा केला होता.
बळवंत संगीत मंडळीने हैद्राबादहून आपला मुक्काम मुंबईस आणला, तेव्हां एकट्या मानापमान ह्या नाटकावरच मुंबईचा मुक्काम नवीन नाटकाप्रमाणे अत्यंत यशस्वी केला.
नटसम्राट बालगंधर्व, विनायकराव पटवर्धन, कृष्णराव फुलंब्रीकर, बापूराव पेंढारकर, आदी कलावंतांनी, मास्टर दीनानाथांची धैर्यधराची असामान्य भूमिका औत्सुक्याने पाहून गौरविली !
गोवा येथील मानापमानचा प्रयोग पाहून, लयभास्कर कपिलेश्वरी ह्यांनी मास्टर दीनानाथांना विचारले, “भाळी चंद्र”ची ठेवण आपण अशी कां योजली ?” त्यावर मास्टर दीनानाथ उत्तरले, “धैर्यधर जर मस्तकावर चंद्र धारण केलेला सुचवलाय, तर अशा उंच स्वरांची ठेवण नको कां ? प्रथम भावना आणि मग स्वर निर्माण झाला.” मास्टर दीनानाथांचे हे उत्तर, कपिलेश्वरी ह्यांना मनोमन पटले !
श्रीमदजगत्गुरू श्री शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटी ह्यांनी मास्टर दीनानाथ ह्यांना, वैशाख वद्य ४ शके १८४४ म्हणजेच १४ मे १९२२ रोजी अमरावती येथे, “संगीतरत्न” हे बिरूद बहाल केले. त्याचे पूर्वपुण्य मास्टर दीनानाथांना धैर्यधराच्या निमित्ताने मिळाले !
बलवंत संगीत मंडळीने, १९३८ मध्ये कंपनीच्या पुनरुज्जीवनानंतर पहिला “रणदुंदुभी”चा तर दुसरा प्रयोग “मानापमान”चा केला होता. तेव्हांची एक आठवण ! त्या दिवशी पुणे येथे नाटकाचा प्रयोग होता. नाटकाचा पहिला अंक झाल्यावर, मास्टर दीनानाथांचे स्नेही दादासाहेब जेस्ते त्यांना भेटण्यासाठी रंगपटात गेले. पाहतात तो काय ? मास्टर दीनानाथ तापाने कण्हत होते. जवळच औषधाची बाटली होती. “एवढा ताप आहे, तर आज काम कां करता ?” असे जेस्ते ह्यांनी विचारले. त्यावर मास्टर दीनानाथ म्हणाले, “संपूर्ण महिन्यात बलवंत संगीत मंडळीने लावलेली सर्व नाटके, माझ्या अनुपस्थितीमुळे बंद करावी लागली.” प्रेक्षक तर मास्टर दीनानाथांशिवाय नाटक पाहण्यास तयार नव्हते. कंपनी चालविणे भाग होते. त्यामुळे तापातसुद्धा काम करणे, हे मास्टर दीनानाथांनी
आद्यकर्तव्य मानले होते. विशेष म्हणजे दुस-या अंकापासून त्यांनी नेहेमीप्रमाणे आपले आकर्षक गायन सादर केले !
या दिलदार आणि दानशूर धैर्यधराने गिरगावच्या एका शाळेच्या इमारत निधीसाठी मदत म्हणून “मानापमान”चा प्रयोग केला होता.
धुळ्याला १९४१ मध्ये बलवंत संगीत मंडळीची इतिश्री झाल्यानंतर, केवळ लोकाग्रहास्तव मास्टर दीनानाथांनी सांगली मुक्कामात मानापमानमध्ये धैर्यधराची भूमिका केली. ती रंगभूमीवरील त्यांची शेवटची भूमिका ठरली ! हा प्रयोग राजाराम संगीत मंडळीने केला होता. कंपनीचे मालक गंगाधरपंत लोंढे ह्यांनी मास्टर दीनानाथांना आग्रहपूर्वक विनंती केली होती.
सांगली मुक्कामात १९४१ च्या नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भारावून टाकणारा हा एक प्रसंग ! मास्टर दीनानाथांनी, “दे हाता शरणांगता” ह्या पदातील “आपदा भोगी नाना” या ओळी म्हणताच, त्यांना गहिवरून आले. भावनेने ओथंबलेल्या स्वरात, पद चालू असतांनाच ते म्हणाले, “मला याच ठिकाणी आपदा भोगाव्या लागल्या.” मास्टर दीनानाथांचे, हे वाक्य उपस्थित रसिक श्रोतृवृंदाने ऐकले मात्र आणि काही क्षण, सा-या थिएटरमध्ये गंभीर अशी शांतता पसरली. प्रत्येकाच्या चर्येवर मास्टर दीनानाथांविषयी वाटणारी सहानुभूती दिसू लागली. या व्यावहारिक जगात मास्टर दीनानाथांचे म्हणणे काय चूक होते ?
नाटकातील हा “धैर्यधर” कलावंत, वास्तव जीवनातही कृतीने आणि वृत्तीने तसाच “धैर्यधर” होता !
{मास्टर दीनानाथ मंगेशकर ह्यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षी २० एप्रिल २००० रोजी प्रसिद्ध झालेला लेख}
लेखक : उपेंद्र चिंचोरे
Leave a Reply