माझी ही गीतरचना पुणे आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित झालेली आहे तसेच माझ्या काव्यसंग्रहामध्ये प्रसिद्ध झाली आहे
दुष्टकाळ रे म्हणती याला,
सांग पावसा कुठेशी दडला ?!| ध्रु ||
तुला गौरविले जीवनदाता,
स्वतःच ठरला खोटा आता,
कां रे डोळा असा उघडला ?
सांग पावसा कुठेशी दडला ? || १ ||
करीत होता मेघगर्जना,
गङगङोनी भिववी जनांना,
मुहूर्त टळला, तरीही अडला,
सांग पावसा कुठेशी दडला ? || २ ||
धाडधाड तू कोसळणारा,
छप्पर ढगांचे फाङणारा,
मेघराजा तो इतिहास घडला,
सांग पावसा, कुठेशी दडला ? || ३ ||
केली पेरणी, फळा न आली,
उरली – सुरली आशा पळाली,
बोल तुला रे, कुणी कोंडला ?
सांग पावसा कुठेशी दडला ? || ४ ||
अवर्षणाची अवकाळी ऐरण,
गाई – गुरांना नाही वैरण,
भयभीत होऊनी, जीवच उड़ला,
सांग पावसा कुठेशी दडला ? || ५ ||
मेघा धरणे कुणी भरावी ?
वरुणा, करुणा, किती करावी ?
भयसागरी या मानव बुडला,
सांग पावसा कुठेशी दडला ? || ६ ||
फसवे ढग हे अवती – भवती,
हुलकाउनी ते तोंड फिरवती,
पेच तुला कां, कसला पडला ?
सांग पावसा कुठेशी दडला ? || ७ ||
अवर्षणाने घडे उपोषण,
उपोषणाने घडे कुपोषण,
कुणास ठावे, दिस कसा पुढला ?
सांग पावसा कुठेशी दडला ? || ८ ||
जलातुनी रे जीव जन्मतो,
जलाकारणे जीव पोसतो,
हाय ! जलाविण तो तङफङला,
सांग पावसा कुठेशी दडला ? || ९ ||
आमिष तुजला नसे धनाचे,
वचन हवे कां, संतुलनाचे,
संकल्प आज मी झणी सोडला,
सांग पावसा कुठेशी दडला ? || १० ||
© रचना : उपेंद्र चिंचोरे
Leave a Reply