शाळेजवळच्या एका कोपर्यावर विक्रेत्यांची गर्दी असे. त्यात लहान मुलांना मधल्या सुटीत खाता येतील, अशा गोष्टी विकणारे बरेच असत. त्यात एकविक्रेता रोज चणे-फुटाणे व इतर काही पदार्थ घेऊन बसत असे. मधल्या सुटीत शाळेतील मुले आली की त्यांना तो पैसे घेऊन चणे-फुटाणे देत असे. मात्र हा विक्रेता लबाड होता. मुलांच्या निरागसतेचा फायदा घेऊन तो त्याच्याजवळच्या छोट्या मापाने चणे-फुटाणे देताना नेहमीच फसवणूक करीत असे. छोटे माप पूर्ण भरल्यासारखे तो दाखवायचा, मात्र देताना त्या मापातील बरेचसे चणे-फुटाणे आपल्या टोपलीत पुन्हा सांडायचा. त्यामुळे पैसे देऊनही कमीत कमी चणे-फुटाणे मुलांच्या वाट्याला यायचे. कोण्या मुलाने तक्रार केली की तो त्याला म्हणायचा,’अरे, तुझा हात लहान आहे. मग त्या हातात मावतील एवढेच चणे-फुटाणे घेतलेले बरे. नाही तर खाली रस्त्यावर सांडून ते वाया जाणार नाहीत का?’
त्याच्या या युक्तिवादावर मुले फारशी बोलत नसत. छोट्या गोपाळला त्या विक्रेत्याची ही लबाडी लक्षात आली होती. त्याने एकदा त्याची खोड जिरवायची ठरविले. एक त्याने दहा-दहा पैशाची सुटी नाणी कोठून तरी गोळा केली व मधल्या सुटीत त्या विक्रेत्याकडे जाऊन दोन रुपयाचे चणे-
फुटाणे मागितले. विक्रेत्याने नेहमीप्रमाणे त्याला कमीत कमी चणे-फुटाणे दिले. गोपाळने दोन रुपयाचे एवढेच चणे-फुटाणे कसे? असे विचारल्यावर त्याने नेहमीप्रमाणेच, ‘ तुझ्या छोट्या हातात जास्त मावणार नाहीत ‘, असे उत्तर दिले. त्यानंतर त्याला पैसे देताना गोपाळने दोन रुपयाऐवजी एका रुपयाचीच दहा पैशाची सर्व सुटी नाणी त्याच्या हातावर ठेवली. विक्रेता ते मोजेपर्यंत गोपाळ शाळेकडे निघाला होता.
ती दहा पैशाची सुटी नाणी म्हणजे एकच रुपया आहे असे विक्रेत्याच्या लक्षात आल्यावर तो गोपाळकडे पाहून ओरडला, ‘ अरे तू मला पैसे कमी दिले आहेस. ‘ त्यावर गोपाळ ओरडूनच त्याला म्हणाला ‘ अरे, तुला पैसे मोजायला अधिक त्रास नको म्हणूनच तुला मी कमी पैसे दिले.
गोपाळचे हे ‘जशास तसे’ उत्तर ऐकून विक्रेता गप्प बसला. त्याची खोड जिरली होती.
Leave a Reply